महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरूंना आदर्श मानत भारतातली जी पिढी वाढली, त्या पिढीतला मीही एक भारतीय. गांधी ‘राष्ट्रपिता’ होते आणि नेहरू देशाचे पहिले पंतप्रधान होते. आपल्या भूमीला परकीय राजवटीपासून मुक्त करण्यासाठी त्यांनी केलेल्या शौर्याच्या कहाण्या आमच्या वडीलधाऱ्यांनी आम्हाला सांगितल्या, त्या आम्हीही आवडीने ऐकल्या.

ऑगस्ट १९४७ मध्ये देश स्वतंत्र झाल्यानंतर आणि ब्रिटिशांनी आपला किनारा सोडल्यानंतर काही महिन्यांतच, देशातील फारच कमी लोक ज्या विचारसरणीचे अनुयायी होते, अशा एका अतिरेकी विचारसरणीने आपले प्रिय महात्मा गांधी दिल्लीतील त्यांच्या निवासादरम्यान सायंकाळच्या प्रार्थनेसाठी पायी जात असताना त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. यानंतर अनेक वर्षांनी पंडित नेहरूंचा नैसर्गिक मृत्यू झाला.

Melania Trump Look
Melania Trump : निळा कोट, डोक्यावर हॅट सोशल मीडियावर मेलानिया ट्रम्प यांच्या स्टायलिश लूकचीच चर्चा!
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
loksatta editorial on devendra fadnavis
अग्रलेख : आजचे बालक; उद्याचे पालक!
financial reforms in india
वास्तववादी आर्थिक सुधारांची प्रतीक्षा!
loksatta editorial Donald Trump 2024 presidential campaign
अग्रलेख: सुज्ञ की सैतान?
donald trump latest marathi news
विश्लेषण: अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांची अनपेक्षित मुसंडी कशी?
loksatta editorial on aliens
अग्रलेख : ‘तारे’ तोडण्याचे तर्कट!
Manoj Jarange Patil maulana sajjad nomani
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे आता दिल्ली हादरवणार? मुस्लीम, बौद्ध धर्मगुरुंची साथ? रणनिती तयार, हिंदीचा अडथळाही दूर

मोदी-शहा सरकारने गेल्या दशकात दिल्लीत सत्ता हाती घेतली, तेव्हापासून आपल्या दोन्ही अत्यंत आदरणीय नेत्यांची बदनामी सुरू झाली. हिंदुत्ववादाचा अतिरेकी पुरस्कार करणाऱ्या नेत्या प्रज्ञासिंह ठाकूर यांना भाजपने भोपाळमधून लोकसभेचे तिकीट दिले, त्या निवडूनसुद्धा आल्या आणि खासदार म्हणून त्यांनी, महात्मा यांची गोळ्या झाडून हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचे कौतुक केले. त्या विधानावर लोकांच्या प्रतिकूल प्रतिक्रियेमुळे आमच्या पंतप्रधानांना त्यांच्याच पक्षाच्या खासदाराची निंदा करण्यास भाग पडले. अर्थात, याच खासदारावर आधीपासून एका दहशतवादी कृत्यात सहभागाचा आरोप दाखल होऊन त्याविषयीचा खटला सुरू असूनसुद्धा खासदारकी त्यांना मिळाली, हेही उल्लेखनीय.

आणखी वाचा-वास्तववादी आर्थिक सुधारांची प्रतीक्षा!

परंतु पंडित नेहरूंविरुद्ध कधी बटबटीत, तर कधी तुलनेने सौम्य बदनामीकारक मुक्ताफळे आपल्या आसपास वावरणारे हिंदुत्ववादी घटक वेळोवेळी उधळत राहातात. अल्पसंख्याक मुस्लीम समुदायाच्या द्वेषावर आधारित असलेले त्यांचे हे आक्रोश आणि आरोप ऐकणे हे दुःखदायक आहे. या आक्रोशांचा आणि आरोपांचा देशातील बहुसंख्य हिंदू लोकसंख्येवर आजतागायत परिणाम झालेला नाही. किंबहुना, स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात आणि लोकांच्या हृदयात नेहरूंचे जे स्थान आहे, त्याला जराही धक्का बसलेला नाही. तरीही बहुसंख्याकवादाचे हे पाईक नेहरूंचा तिरस्कार सुरूच ठेवतात!

आपल्या देशवासीयांना वसाहतीच्या जोखडातून मुक्त करण्यातील जवाहरलाल नेहरूंचे योगदान आपल्या इतिहासाच्या पुस्तकातून पूर्णपणे काढून टाकण्यात यावे, अशी भगव्या प्रभावाखाली पूर्णत: ‘ब्रेन-वॉश’ झालेल्या काही स्त्री-पुरुषांची इच्छा आहे. त्यासाठी त्यांचे आवडते इतिहासकार शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तकांचे पुनर्लेखन करण्यात व्यग्र आहेत.

पंडित नेहरूंनी खैबर खिंड ओलांडून भारतात आलेले मुस्लिम आक्रमक आणि सागरी मार्गाने आलेले युरोपियन आक्रमक यांच्यात फरक असल्याचे प्रतिपादन (‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ या ग्रंथातही) केले होते. नेहरूंच्या मते पूर्वीचे आक्रमक हे जरी भारताला गुलाम बनवण्याच्या उद्देशाने इथे आले असले तरी ते याच भूमीवर- आपल्या देशात- स्थायिक झाले आणि त्यांनी स्वत:ची पाळेमुळे इथे पुन्हा रुजवण्याचा प्रयत्न केला. वर्षानुवर्षे ते भारतीय समाजात मिसळले गेले आहेत. त्यामुळे ज्यू आणि पारशी लोकांप्रमाणे तेदेखील या देशाचा आणि येथील लोकांचा भाग म्हणून गणले जावेत. याउलट पोर्तुगीज, फ्रेंच आणि ब्रिटिश हे दर्यावर्दी आक्रमक- त्यांचा एकमात्र हेतू या देशातल्या नैसर्गिक संसाधने बळकावून आपापल्या देशांमधल्या लोकांसाठी त्यांचा व्यापार करणे आणि युरोपीय देशांच्या तिजोऱ्या भरणे हाच होता.

आणखी वाचा-लोकांना अंधारात ठेवणारे कायदे!

हिंदुत्ववादी नेते नेहरूंचा हा युक्तिवाद नाकारतात आणि मुस्लिम आणि युरोपियन विजेत्यांना एकाच मापाने तोलतात. ते मुस्लिम शासकांच्या वंशजांना भारतवासी मानण्यास नकार देतात. परकीय राज्यकर्त्यांमुळे भारताचे पारतंत्र्य हजार वर्षांपूर्वी सुरू झाल्याचे नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणांत अनेकदा सांगितले आहे. त्यांच्या एखाद्या मुद्द्याशी सहमत होता येईल; पण ‘वसाहतवाद’ आणि इथे राहून, इथलेच होऊन केला गेलेला राज्यविस्तार यांच्यातला उघड फरक इतिहासाच्या अनेक ग्रंथांमध्ये नोंदवला गेलेला असतानासुद्धा मोदी तो कसा काय नाकारतात, याचे आश्चर्य वाटते. ‘पारतंत्र्य’ हा शब्द दोन्ही प्रकारांना लागू करता येईल हे ठीक; पण पारतंत्र्याच्या या दोन प्रकारांमध्ये फरकाची स्पष्ट रेषा आहे. विजेत्याच्या सैन्याचे अवशेष भारतात स्थायिक झाले त्यांनी याच भूमीला आपले मानले, हे सत्य माझ्या मनाने स्वीकारले पाहिजे. शिवाय, विजेत्यांच्या धर्मात इथल्या मूळ रहिवाशांचे धर्मांतर झालेले आहे, त्यामुळे धर्मांतरितांना कोणत्याही अर्थाने ‘परकीय’ मानले जाऊ शकत नाही; कारण त्यांना त्यांचा स्वतःचा देश म्हणता येईल असा कोणताही इतर देश माहीत नाही.

तरीसुद्धा हिंदुत्वाचे राजकीय राखणदार केवळ ‘धर्म’ पाहातात. मग जवाहरलाल यांनी अर्थव्यवस्थेने घेतलेल्या चुकीच्या निर्णयांचाही ते उल्लेख करतात. नेहरू ईटन आणि केंब्रिजमध्ये शिकले होते, डाव्या विचारसरणीच्या हेरॉल्ड लास्कीच्या विचारांनी ते प्रभावित झाले होते हाच जणू नेहरूंचा अंगभूत दोष मानून, नेहरूंनी अर्थव्यवस्थेबाबत घेतलेले निर्णय चुकीचेच होते, असा आरोप हे टीकाकार सातत्याने करतात.

या टीकेचा परस्पर समाचार घेणारे, तसेच भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पंडित नेहरूंनी अवलंबलेल्या आर्थिक मार्गाची जोरकस पाठराखण करणारे ‘नेहरूज इंडिया – पास्ट, प्रेझेंट ॲण्ड फ्यूचर’ हे ‘जेएनयू’तील प्राध्यापक आदित्य मुखर्जी यांचे पुस्तक अलीकडेच (नोव्हेंबर २०२४) प्रकाशित झाले आहे. या पुस्तकात प्रा. मुखर्जी यांनी असा युक्तिवाद केला आहे की नेहरूंसाठी दोन तत्त्वे सर्वाधिक महत्त्वाची होती – एक म्हणजे लोकशाही आणि दुसरे सार्वभौमत्व. ब्रिटिशांनी माघार घेतल्यानंतर, विकासाच्या ध्यासात नेहरूंनी सार्वभौमत्व आणि लोकशाही या दोन प्रमुख हेतूंभोवतीच अर्थव्यवस्थेचा विचार केला. त्याचमुळे, अर्थव्यवस्थेला प्रगतीच्या मार्गावर नेण्यासाठी त्यांनी सार्वजनिक क्षेत्राची निवड केली. नेहरूंनी हे ओळखले की, देशाचा औद्योगिक विकास करण्याचे महत्कार्य खासगी क्षेत्राच्या हाती सोपवल्यास भांडवलाच्या मार्गाने परकीयांचा चंचुप्रवेश होऊ शकतो. सार्वभौमत्वाप्रती त्यांची बांधिलकी या निर्णयातून दिसून आली. शिवाय, कोणत्याही मोठ्या निर्णयासाठी श्रमिकांचा सल्ला आवश्यक ठरेल, श्रमिक हे प्रगतीतले भागीदार मानले जातील, अशी व्यवस्था नेहरूंना हवी होती ती लोकशाहीप्रती बांधिलकी असल्यामुळेच. खासगी क्षेत्राऐवजी नेहरूंनी सार्वजनिक क्षेत्राला प्राधान्य दिले, त्यामागे सार्वभौमत्व आणि लोकशाहीच्या रक्षणाची कटिबद्धता दिसते, हे प्रा. मुखर्जी यांनी विशद केले आहे.

पंडित नेहरूंची ‘भारताची कल्पना’ ही एकोप्यावर विश्वास ठेवणारी होती, त्यांना अभिप्रेत असलेला भारत हा एकसंध देश होता, जिथे जात-पात, पंथ यांमुळे काही फरक पडत नसून शंभर टक्के लोकसंख्या भारतीयच मानली जाईल. हिंदुत्वाचा अजेंडा म्हणजे हिंदू धर्म किंवा बौद्ध, जैन आणि शीख यांसारख्या इतर धर्मांच्या ८० टक्के लोकसंख्येला एकत्र करून हिंदू धर्माच्या वर्चस्वाला असलेल्या कोणत्याही धोक्याच्या विरोधात त्यांना उभे करणे.

आणखी वाचा-भारतीय हवामानशास्त्र विभागाचे गेल्या दीडशे वर्षांतील योगदान  

हिंदूंना स्वतःच्या धर्माचा अभिमान वाढवायचा असेल तर व्यक्तिशः माझा त्यावर काहीही आक्षेप नाही. उलट, काळाच्या कसोटीवर उतरलेल्या आणि आता युरोपातील आणि जगातील इतर प्रगत समाजात अध्यात्माचे साधक ज्याचा अभ्यास करत आहेत अशा या प्राचीन धर्माचे पालन केल्याचा अभिमान कोणत्याही स्त्रीपुरुषांना असू शकतो, हेही मी जाणतो. मात्र इतर पंथांच्या अनुयायांविरुद्ध भीती आणि द्वेष पसरवणे आणि समाजात मतभेद निर्माण करणे, हे हिंदुत्वाचा अभिमान बाळणाऱ्यांनी आता सुरू केले आहे (हे प्रकार पूर्वी अस्तित्वात नव्हते), त्याला माझा आक्षेप निश्चितपणे आहे.

पंडित जवाहरलाल नेहरूंचे खलनायकीकरण किंवा राक्षसीकरण हे एका विचारसरणीमुळे देशभर पसरवल्या जात असलेल्या फुटिरतेचे लक्षण आहे. ते वेगाने फैलावते आहे. माझे मत असे आहे की या असल्या फुटीरतावादी प्रकारांमुळे जगभरातील भारताचे स्थान आणि मान यांमध्ये भर पडण्याऐवजी, विपरीत परिणाम दिसू शकतात.

लेखक भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) निवृत्त अधिकारी असून मुंबईचे पोलीस आयुक्त होते, तसेच १९९० च्या दशकात पंजाबातील खलिस्तानवादी चळवळ निपटून काढण्यासाठी त्यांनी काम केलेले आहे.

Story img Loader