– हेमंत मोने

ब्रिटिश सत्तेतून भारत स्वतंत्र झाला तो १९४७ या वर्षी. विनोबांचा जन्म १८९५ चा आणि त्यांनी प्रायोपवेशन करून देह ठेवला तो महावीरांच्या निर्वाण दिनी आश्विन अमावास्येला (१६-११-१९८२). त्यामुळे योगायोगाने स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळ विनोबांनी अनुभवला ही गोष्ट आपल्या दृष्टीने उपकारकच सिद्ध झाली.

assembly election 2024 Frequent party and constituency changes make trouble for Ashish Deshmukh
वारंवार पक्ष व मतदारसंघ बदल आशीष देशमुखांना भोवणार
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Loksatta balmaifal The fun of sharing kid moral story
बालमैफल : शेअरिंगची गंमत
pm modi said ek hai toh safe
योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’नंतर पंतप्रधान मोदींकडून ‘एक हैं तो सेफ है’चा नारा
Loksatta chaturang Along with sensible profound partner family
इतिश्री: समंजस, प्रगल्भ सोबत
Loksatta chaturanga Parent Nature Confused Psychologist
सांधा बदलताना : संसार शांतीचा झरा…
Dev Diwali 2024
देव दिवाळीला गजकेसरी योगामुळे ‘या’ राशीच्या लोकांचे नशीब उजळणार! अचानक धनलाभाचा योग, मिळेल पैसाच पैसा
Dev deepawali 2024
देव दिवाळीपासून शनी-गुरूचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशींच्या दारी नांदणार लक्ष्मी

स्वातंत्र्यपूर्व काळात धर्म, विद्वत्ता, तत्त्वज्ञान, अध्ययन, अध्यापन आणि शरीरश्रम यांचा मार्ग विनोबांनी हेतुपूर्वक निवडला. प्रशासकीय किंवा राजकीय स्वातंत्र्य मिळाले म्हणजे सर्व काही आलबेल आहे असे विनोबांनी कधीच मानले नाही. १९४० ते १९४५ या काळात जागतिक परिस्थिती संघर्षाची होती. संघर्ष आणि स्पर्धा यातून सहकार आणि समन्वय यासाठी शांततामय आणि सतर्क जीवनाची समाजाला गरज आहे हे या द्रष्ट्या पुरुषाने ओळखले. अज्ञान, अंधश्रद्धा, अस्पृश्यता, सामाजिक आणि आर्थिक विषमता या गोष्टींशी सामना करायचा असेल तर विधायक आणि रचनात्मक कामांची गरज विनोबांना जाणवली. गांधीजींचा राजकीय प्रभाव, खादी इत्यादीमुळे अनेकांची पावले सत्तेकडे वळली. काँग्रेस विसर्जित करून समाजाला आध्यात्मिक मूल्यांकडे वळविणे आवश्यक आहे या गांधींच्या विचाराला सत्तेच्या मोहाने दुर्लक्षित केले गेले.

हेही वाचा – ‘लाडक्या बहिणींनो’ कोणी तुमच्यावर उपकार करत नाही…!

विनोबांचे वेगळेपण आणि द्रष्टेपण याचा प्रत्यय या राजकीय पार्श्वभूमीवर आपल्याला जाणवतो. विधायक आणि रचनात्मक कार्यासाठी पायाभूत असलेल्या गोष्टींकडे विनोबांचे लक्ष होते. आसपासच्या लोकांमध्ये चांगली भावना निर्माण व्हावी आणि त्यातून उत्तम कार्यकर्ते निर्माण व्हावेत असा विनोबांचा प्रयत्न होता म्हणूनच आश्रमीय जीवन व्यतीत करताना शरीरश्रम, अध्ययन, अध्यापन आणि शिस्तबद्ध दैनंदिन जीवन यावर विनोबांनी भर दिला.

गांधी आणि विनोबा

लहानपणी विनोबांवर सुसंस्कार केले ते त्यांच्या आजोबांनी, वडिलांनी आणि आईने. त्यामुळे विनोबांच्या विचारांचा पाया घडत गेला. गांधीजींच्या प्रत्यक्ष सहवासाने विनोबांचा आध्यात्मिक पाया पक्का झाला. गांधी आणि विनोबा यांच्या वयात २६ वर्षाचे अंतर असले तरी गांधीजी गुरू आणि विनोबा शिष्य हे नातं अबाधित न राहता प्रत्येकाने गुरू-शिष्याची भूमिका आलटून-पालटून केली असेच म्हणावे लागेल. गांधी हा माणूस केवळ राजकीय स्वातंत्र्याचा विचार करीत नाही तर समाजाच्या आध्यात्मिक उन्नतीची गरज अधोरेखित करतो या विचाराने विनोबा प्रभावित झाले. गांधी आणि विनोबा यांच्या भेटीची आणि काही काळ त्यांना एकमेकांच्या सहवासात, संगतीत ठेवण्याची नियतीचीच इच्छा होती.

गांधी आणि विनोबा दोघेही एकमेकांचे आध्यात्मिक आणि कृतिशील मोठेपण कोणताही अभिनिवेश आणि अहंकार बाजूला ठेवून मान्य करीत असत ही फार मोठी गोष्ट आहे. गांधींच्या सत्याग्रह आश्रमात विनोबा पोहोचले तेव्हा हा तरुण आश्रमाकडून केवळ काही घ्यायला आला नसून आश्रमाला काही द्यायलाही आला आहे हे गांधीजींनी तात्काळ ओळखले. विनोबांच्या वडिलांना गांधीजींनी पत्र लिहिले. त्यात ते म्हणतात की अनेक वर्षाच्या धैर्यपूर्वक परिश्रमानंतर मी जी आध्यात्मिक उन्नती आणि वैराग्य प्राप्त केले आहे, ते तुमच्या मुलाने लहान वयातच प्राप्त केले आहे. गीता या विषयावर शंकराचार्य, ज्ञानेश्वर, लोकमान्य टिळक, योगी अरविन्द इत्यादींनी भाष्य केले आहे. ही भाष्ये वाचून अनेकांनी पांडित्य प्राप्त केले असेल, कोश, व्याकरण याद्वारे गीता समजावून घेतली असेल पण गीतेची शिकवण आपल्या जीवनात उतरविणारे कितीजण असतील?

विनोबांचे वेगळेपण इथे जाणवते. गीतेवरील सगळ्या भाष्यांचा अभ्यास विनोबांनी केलाच; परंतु प्रत्यक्ष जीवनाशिवाय गीता कळायची नाही हे विनोबांनी जाणले. म्हणूनच आपल्या जीवनाला दिशा देणाऱ्या शंकराचार्य, ज्ञानेश्वर आणि गांधी या त्रयींचे ऋण विनोबा मानतात. जीवनाचं तत्त्वज्ञान शंकराचार्यांकडून विनोबांना मिळालं असलं तरी त्याला कृतिशील बनवलं ते गांधींनी. या कृतीला जोड मिळाली ती प्रेमाची आणि करुणेची. ज्ञानेश्वरांविषयी म्हणूनच विनोबांना कळवळा आहे. गांधींच्या दैनंदिन जीवनात विनोबांना गीतेचा पदोपदी प्रत्यय आला. विनोबांनी आपले सारे जीवन एकादश व्रतांच्या पायावर उभे केले. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, असंग्रह, शरीरश्रम, अस्वाद, निर्भयता, सर्वधर्मसमभाव, स्वदेशी आणि स्पर्शभावना या एकादश व्रतांचा परिसस्पर्श विनोबांना गांधींमुळे झाला. या एकादश व्रतांचं पालन फक्त साधुसंतांसाठीच आहे अशी सर्वसामान्यांची समजूत आहे; परंतु सामान्य माणसांच्या जीवनातही या व्रतांचं तितकंच महत्त्व आहे गांधीजींचं म्हणणं विनोबांना भावलं.

अनासक्ती आणि निष्काम कर्मयोग मला गांधींच्या जीवनात दिसला नसता, सत्य हाच परमेश्वर असं म्हणणारे गांधीजी मला जाणवले नसते तर गांधीजींजवळ मी क्षणभरही राहिलो नसतो, हे विनोबांचं म्हणणं विचारात घेण्यासारखं आहे. ऊठसूट गांधींना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणाऱ्या विद्वानांना ना गांधीजी समजले ना विनोबा. विनोबांना नि:खळपणे समजावून घेण्यात गांधी विनोबा साहचर्य सुशिक्षित वर्गाला आड येत असावं. विनोबांचा स्वभावही त्याला कारणीभूत आहे. विनोबा मूकपणे काम करू पाहत होते. आपल्या कामाची जाहिरात करून लोकप्रियता मिळवावी असा विनोबांचा पिंड नव्हता. प्रसिद्धीपासून विनोबा कायम दूर् राहिले. आपला एक मोठा शिष्य परिवार असावा, त्यांनी विनोबांची प्रतिमा उभी करावी आणि समाजात त्यांच्या नावाचा जयघोष होत राहावा हे विनोबांना कधीच अभिप्रेत नव्हतं.

१९२० ते १९५० या तीन दशकांत जी रचनात्मक कार्ये विनोबांनी उभी केली त्याची कल्पना फारच थोड्यांना असेल. विनोबांच्या आश्रमात प्रार्थना आणि सूतकताई हे दोन कार्यक्रम फार महत्त्वाचे होते. प्रार्थना ही वाणीची उपासना आणि सूतकताई ही कर्म उपासना असे विनोबा मानीत असत.
गीताईची रचना आणि तुरुंगात दिलेली गीता प्रवचने हे चिरकाल टिकणारे साहित्य याच दशकात जन्माला आले. ग्रामसेवा मंडळाच्या माध्यमातून विनोबांनी अनेक सजग कार्यकर्ते घडविले. प्रत्येक कार्यकर्त्याकडे ५० गावे असे सहा कार्यकर्ते खेड्यात फिरून येत आणि विनोबांशी चर्चा करीत. सूतकताई, विणकाम, साक्षरता, ग्रामीण जनतेच्या समस्यांची जाण आणि त्यावर उपाय शोधणे इत्यादी द्वारा ग्रामीण जनतेशी संबंध जोडले गेले. मनोहर दिवाण या कार्यकर्त्याने कुष्ठरोग्यांच्या सेवेचे काम हाती घेतले. कुष्ठरोग्यांवर औषधोपचार करणे हे काम प्रामुख्याने मिशनरी करीत असत. मनोहर दिवाण हा या क्षेत्रात उतरलेला पहिला कार्यकर्ता होय. विनोबांची प्रेरणा, मार्गदर्शन आणि मदत याकामी होती.

लेखनातून समाजप्रबोधन

चांगल्या गोष्टी आत्मसात कराव्यात, त्या मनात घोळवाव्यात आणि त्याची परिणती वर्तनात व्हावी हे विनोबांचे धोरण होते. पण त्यामुळे विनोबांच्या ज्ञानगंगेचा लाभ इतरेजनांना मिळत नव्हता. जमनालाल बजाज, श्रीकृष्णदास जाजू इत्यादींच्या आग्रहाने ही ज्ञानगंगा वाहती झाली, ती ‘महाराष्ट्र धर्म’ या नियतकालिकाच्या रूपाने. १९२३ च्या जानेवारी महिन्यात पहिला अंक निघाला. पुढे साधारण तीन वर्षे हा उपक्रम चालला, यामध्ये विनोबांचे २२२ लेख आहेत. या लेखांचे मूल्यमापन पृष्ठ संख्येत करणे म्हणजे आतला दाणा टाकून टरफलाचे कौतुक करण्यासारखे आहे. शिक्षण, राजकारण, समाजकारण, धर्म, अस्पृश्यता निवारण अशा अनेक विषयांना स्पर्श करणारे लेखन विनोबांनी केले. त्यातील निवडक ४० लेखांचे संकलन ‘मधुकर’ या शीर्षकाखाली पुस्तक रूपाने १९३६ साली प्रसिद्ध झाले. आजही त्यातील लेख नुसतेच चिंतनीय नाहीत तर कार्यप्रवण करणारे आहेत. या लेखांचे साहित्यिक आणि वैचारिक मूल्य सांगायचं झालं तर एक स्वतंत्र लेखच लिहावा लागेल. ‘गीता जयंती’ या लेखात विनोबा म्हणतात की, ‘गीता जयंतीच्या दिवशी गीतेच्या बाह्य कल्पनेवर जोर न देता हातून काहीतरी निष्काम सेवा होईल असा प्रयत्न करावा.’’

विनोबा आत्मशुद्धीला किती महत्त्व देतात हे त्यांच्या ‘अस्पृशता निवारण यज्ञ’ या लेखातील एक उताऱ्यात दिसून येते. ते काय म्हणतात पाहा- ‘काळाचा ओघ अस्पृश्यता निवारणाला अनुकूल आहे. याचा अर्थ अंत्यज आता जागे झाले आहेत, ते आपल्याकडून करवून घेणारच आहेत मग आपण कशाला करा, असे असेल तर ठीकच आहे, तसे होईल, पण त्याने आत्मशुद्धीचे पुण्य लाभणार नाही. अग्नीने आहुती घेणे आणि अग्नीला आहुती देणे यात अंतर आहे. पहिल्या क्रियेला आग लागणे म्हणतात, दुसरीला यज्ञ करणे म्हणतात. आम्ही आत्मशुद्धीच्या यज्ञकुंडात अस्पृश्यतेची आहुती न दिल्यास सामाजिक बंडाची आग लागून अस्पृश्यता जळून जाणार ही वस्तुस्थिती निश्चित आहे. परमेश्वर आम्हाला सदबुद्धी देवो.’

हेही वाचा – मत हवं? नद्या, झाडे, टेकड्या वाचवा…

विनोबांचा तुरुंगवासही उभयतांना म्हणजे विनोबांना आणि लोकांना उपकारक ठरला. हृदयपरिवर्तन आणि त्यातून वर्तन परिवर्तन ही विनोबांची तळमळ यामुळे सार्थ ठरली. गीतेचा संदेश गीताईच्या रूपाने ग्रामीण जनतेपर्यंत पोहोचला. गीतेची शिकवण केवळ तात्त्विक पातळीवर नसून तिने दैनंदिन जीवनात वर्तन परिवर्तन घडविता येते हा आत्मविश्वास गीतेच्या प्रवचनातून मिळाला.

वेल्लोर तुरुंगात विनोबा दक्षिणेकडील तामिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम् या भाषा शिकले. त्यामुळे त्या त्या भाषेतील आध्यात्मिक ग्रंथांच्या अभ्यासाने विनोबांचा आध्यात्मिक पाया अधिक समृद्ध झाला, इतकेच नव्हे तर पदयात्रेमध्ये विनोबांनी या ग्रंथातील ज्ञानभांडार त्या त्या प्रांतातील जनतेपर्यंत पोहोचविले. अशा विविध माध्यमातून आपल्या ज्ञानदातृत्वाचा लाभ सर्व लोकांपर्यंत पोहोचविणारा ज्ञानयोगी म्हणजेच युग पुरुष विनोबा. अशा तऱ्हेने १९२० ते १९५० या तीन दशकांत ज्ञानसंग्रह आणि व्रतसंग्रह विनोबांनी केला त्याबद्दल अनेकजण अनभिज्ञ आहेत. हा संग्रह व्यक्तिगत न राहता त्याचा संसर्ग लोकाभिमुख करण्याचा विनोबांचा प्रयत्न निश्चितच स्पृहणीय आहे.

hvmone@gmail.com