अ‍ॅड. राजा देसाई

ऋषी सुनक यांच्या निवडीनिमित्तानं, पश्चिमेला उद्देशून केलेलं हे प्रकट चिंतन अर्थातच स्वामी विवेकानंदांची वाट अनुसरणारं..

BJP office bearers in Maval asserted their position to campaign for Bapu Bhegde of NCP Ajit Pawar party Pune news
देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतरही ‘मावळ पॅटर्न’…!
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Queen Nefertiti bust
Queen Nefertiti bust: ३,३७० वर्षे प्राचीन इजिप्तची राणी परंतु तिचा पुतळा जर्मनीत; नेफरतितीचा अर्धपुतळा इजिप्तला परत मिळणार का?
maha vikas aghadi face rebels Challenges in yavatmal district
बंडखोर नामांकन परत घेण्याची महाविकास आघाडीला अपेक्षा; पुसदमध्ये ययाती नाईक माघार घेणार?
Ratan Tata Successful businessman with social consciousness
रतन टाटा : सामाजिक जाणीव राखणारा यशस्वी उद्योगपती
Indian origin Kamala Harris Rishi Sunak President Election
कौतुक कमला हॅरिसचं आणि..
Indian Context of Federalism Loksatta Lecture Dhananjay Chandrachud
संघराज्यवादाचे भारतीय संदर्भ
congress mallikarjun kharge on ups
‘पंतप्रधान मोदींचा हलक्या दर्जाचा प्रसिद्धीचा प्रयत्न’, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची टीका; ‘एक्स’वरील पोस्टवरून दोघांमध्ये उडाले खटके

प्रिय पश्चिम, भारतीयाचा दंडवत.

 तू गौरेतर वंशाच्या, ख्रिश्चनेतर व सेमिटिक धर्माच्याही बाहेरील धर्मातील व्यक्तीला ब्रिटनच्या पंतप्रधानपदी बसवून मानवी ऐक्याला वेग तर दिलासच; पण त्याचबरोबर ‘मदर ऑफ डेमॉक्रसी’ हे ब्रिटनचं विशेषणही सार्थ केलंस. तुझं अभिनंदन कसं करावं हेच कळत नाही. बरं ऋषी सुनक यांनी आपला धर्म लपवलाही नाही (मनगटावर सहज दिसणारं ‘कलवा’ – पवित्र सूत, बांधतात व मागच्या मंत्रीपदाची शपथ भगवद्गीतेवर हात ठेवून घेतली होती), त्याच्यातही ना ब्रिटिशांचा धर्माभिमान दुखावला ना त्यांचा (ब्रेग्झिटनं दिसून आलेला) राष्ट्रवाद!

प्रत्येक मानवी समूहानं आपल्यात काही ना काही अत्यंत चांगल्या गोष्टींचा विकास केला; तर (कदाचित त्याचाच परिणाम म्हणून) समूह अंग म्हणून त्याच्यात काही अत्यंत वाईट गोष्टी रुजल्या. मग त्यांचा आधार वंश, धर्म, राष्ट्र, भाषा इत्यादी काहीही असो. त्या वाईट गोष्टींचं अस्तित्व स्वीकारणं सोडाच, पण त्यांचं केवळ किलकिलं दर्शनही स्वत:ला होण्याच्या वाटेतच त्या आधारांच्या लेबलांचा अभिमान येत गेला. 

पश्चिमे, विशेषत: वंश आणि धर्म या जीवनांगांत श्रेष्ठत्वाची भावना टाकून उदारतेचा आणि म्हणून सहिष्णुतेचा विकास करणं हे काम मध्ययुगापूर्वीच्या इतिहासात तुझ्याकडून फार घडलं होतं असं म्हणणं कठीण वाटतं. ‘मला सुळी देणाऱ्यांना क्षमा करा कारण ते अज्ञानी आहेत’ असं सांगणाऱ्या महात्म्याचा धर्म तू स्वीकारलास; पण त्याच धर्माच्या नावावर तू पृथ्वीतलावर सर्वात जास्त रक्त सांडलंस असं म्हटलं तर त्यावर विचार करण्याइतकी सहिष्णुता तुझ्यात नक्कीच आहे, हे मला आजच्या भारताच्या संबंधात विशेष जाणवत आहे.

आणखी वाचा – धर्म नाही, कुटिल राजकारणच जबाबदार!

तुझं खरं मोठेपण. इतिहासक्रमात आपल्याकडून जे काळं घडलं ते स्वीकारण्यात (संहार केलेल्या मूलवासी स्थानिकांची क्षमा मागणं व त्यांच्या विकासासाठी विशेष कायदे करणं वगैरे) त्या त्या समूहाच्या प्रगतीची वाट दडलेली आहे. ब्रिटनमध्ये तर तू आता भारतीय वंशाच्या ऋषी सुनक यांना पंतप्रधानपदी बसवलंस; कमाल आहे तुझी. मात्र ब्रिटनने धर्मश्रद्धा आणि पदासाठीची क्षमता या दोन गोष्टींची मिसळ करण्याची गल्लत केली नाही.

आज वंशाभिमान- धर्माभिमान यांना जगभरच पुन्हा ‘चांगले’ दिवस येत असताना हे धाडस, पश्चिमे, तू केलंस म्हणून अधिकच आश्चर्य वाटतं; खरं तर विश्वासच बसत नाही. दोनएक महिन्यांपूर्वीच राज्यकर्त्यां हुजूर पक्षाच्या नेतृत्व लढतीत सुनक हरले होते. संसदीय पक्षात त्यांना बहुमत मिळालं होतं पण पक्षसदस्यांत ते मिळालं नाही; याचं एक कारण ते ब्रिटिश गोरे नाहीत हे निश्चितच होतं असं काही अभ्यासकांचं तरी मत आहे (या वेळी पक्षसदस्यांचं मतदान घेतलं गेलं नाही) ते बरोबर असेल तर आता पुन्हा संसद सदस्यांनी लगेचच दाखवलेलं धाडस अधिकच लक्षणीय आहे.

अर्थात, पश्चिमे, हा तुझा प्रवास काही काळापासून सुरू आहेच.१९६० साली केनेडी हे गोरे ख्रिश्चन पण कॅथलिक असूनही अध्यक्ष म्हणून निवडून आल्याचं आश्चर्य मानलं गेलं होतं. अमेरिका तेव्हा तरी भारी बहुमतानं प्रॉटेस्टंट होती. (आज चित्र वेगानं बदलतंय : त्यातील नवी पिढी फार मोठय़ा संख्येनं कोणताच धर्म न मानणारी होत आहे.) ब्लॅकना (जे बहुतांशानं ख्रिश्चनच!) समता देणारी काही पावलं उचलल्यामुळं त्यांचा अडीच वर्षांतच खून झाला. पण त्याच अमेरिकेनं २००८ साली मिश्रवंशीय (आई गोरी, वडील ब्लॅक) ओबामांना अध्यक्ष निवडलं तर २०२० साली ‘अमेरिका फर्स्ट’ (म्हणजे अमेरिका गोऱ्यांची ) सारख्या ट्रम्पिझमच्या घोषणांचा प्रचंड जोर कायम असतानाही कमला हॅरिस (आई भारतीय वंशाची तर वडील ब्लॅक) यांना उपाध्यक्ष उमेदवार म्हणून सोबत घेण्याचं धाडस बायडन यांनी दाखवलं. अमेरिकेनं त्यांना निवडूनही दिलं. गेल्या दशकभरात अमेरिकेनं अनेक सरकारी तसेच खासगी आस्थापनांतील अत्यंत महत्त्वाच्या वा अगदी सर्वोच्च अशा पदांवर केवळ भारतीय वंशाचेच नव्हे तर नव्यानं स्थलांतरित झालेले ख्रिश्चनेतर, मुख्यत: बहुधा हिंदू, विराजमान केले आहेत.

आणखी वाचा – स्वामी विवेकानंद सर्वव्यापी धर्मविचार!

फिजी, मॉरिशसची उदाहरणं सोडून देऊ; तिथे भारतीय वंशाचे लोक प्रचंड संख्येनं आहेत. तेही पिढय़ान् पिढय़ा. पण इतर पश्चिमही कुठं चालल्येय? कॅनडाच्या कॅबिनेटमध्ये एकाच वेळी चारचार मंत्री, अगदी महत्त्वाच्या खात्यांचेही, भारतीय वंशाचे ( प्रामुख्यानं शीख) राहिले आहेत. पण तुलनेनं अधिक कट्टरपणा असलेल्या कॅथलिक राष्ट्रांतूनही हे घडत आहे. पोर्तुगालमध्ये भारतीय वंशाचे कोस्टा (वडील गोव्यात जन्मले/वाढलेले तर आई पोर्तुगीज : अर्थात दोघंही ख्रिश्चन) हे २०१७ पासून पंतप्रधान आहेत. २०१७ ते २० या काळात आयर्लंडचे पंतप्रधान राहिलेले भारतीय वंशाचे लिओ वराडकर ( ख्रिश्चन, कुटुंबाचं गाव वराड हे सिंधुदुर्गमध्ये, वडिलांचा जन्म मुंबईत तर लिओंची वैद्यकीय इन्टर्नशिप केईएम् मध्ये ).

थोडक्यात वंश, धर्म, राष्ट्र या लेबलांपासून, पश्चिमे, तू वेगानं दूर जात आहेस. माणसाकडे केवळ माणूस व त्याचे गुण/क्षमता पाहाण्याचे धडे जगाला देण्यात तू आघाडीवर आहेस असं दिसतं.

वंशश्रेष्ठत्व व धर्माच्या नावावरून रक्त सांडण्याच्या संबंधात पश्चिमे, तू आज किती बदलते आहेस हे पाहाताना मोठा आनंद होतो. याच पश्चिमेतील मुख्यत: अमेरिकेनं आफ्रिकेतून काळय़ांना लाखोंच्या संख्येनं पकडून वा आमिषं दाखवून अमेरिकेत आणून गुलाम म्हणून अमानुषपणं राबवून घेतलं होतं व ते ख्रिश्चन झाले तरीही त्यांची गुलामीतून सुटका होत नव्हती, युरोपच्या आशिया/आफ्रिकेतील साम्राज्यवादी तसेच गोऱ्या अहंकारी वृत्तीविषयी आणि अत्याचारांविषयी तर बोलावं तेवढं थोडंच. केवळ धर्माविषयी पाहावं तर युरोपात तर अगदी कॅथलिक-प्रॉटेस्टंट पंथांनीही एकमेकांत असंख्य युद्धं केली, अत्याचार केले. अमेरिकेत तर काळय़ांना गोऱ्यांच्या चर्चमध्ये ( आमच्याकडे हरिजनांना मंदिरप्रवेश नव्हता तसा ) प्रवेश नव्हता.

आणखी वाचा – जयंती विशेष: स्मरणशक्ती वाढवण्यासाठी करा ध्यानधारणा! विवेकानंदांचा संदेश

आता मात्र, पश्चिमे, तू हा सारा काळा इतिहास पुसून टाकायचा जणू चंग बांधलेला दिसतो. अशा प्रत्येक बदलात परिस्थितीचा वाटा जरूर असतो, पण म्हणून तुझ्या बदलेल्या अंत:करणातला तुझ्या विचारांचा/ प्रयत्नांचा/ संघर्षांचा अनमोल वाटा आम्ही कसा बरं नाकारू?

पण खरं सांगू का? हे पत्र तुझ्या केवळ कौतुकासाठी लिहीत नसून, किंबहुना त्याला असलेल्या एका तीव्र दु:खाची किनारच हे जबरदस्तीनं लिहून घेतेय. सुनक यांच्या निमित्तानं आज आठवण येतेय ती एका गोष्टीची :  विसावं शतक संपता संपता  भगवे वस्त्रधारी एक तरुण भारतीय संन्यासी तुझ्याकडे आला होता. वेग कमी पण  विज्ञान- तंत्रज्ञानाच्या दौडीला तेव्हा सुरुवात होऊन गेली होती व भौतिक विकास वेगानं होत होता. त्यातून  आकाराला आलेली एक नवी जीवनशैली आज जगभरच पुढे गेली आहे व वायुवेगानं पुढे जातेही आहे. अमेरिका- युरोपमध्ये अनेक ठिकाणी व्याख्यानं देताना, पश्चिमेच्या पराक्रमाचं त्या संन्याशानं (आध्यात्मिक नाकं वगैरे अजिबात न मुरडता) खुल्या दिलानं स्वागत केलं होतं व त्यासाठी लागणाऱ्या आपल्यातल्या अनेक गुणांचं कौतुकही. ते करताना आपल्या मातृभूमीवरील चालू असलेल्या गोऱ्या साम्राज्यवादाच्या जखमा त्यानं वाटेत येऊ दिल्या नाहीत-  जसं भारताला आत्मपरीक्षण करायला सांगताना व त्याच्या भयाण सामाजिक विषमतेवर कोरडे ओढताना त्यानं मध्ययुगीन मुस्लीम राजवटीतील अनेक घटनांनी आपली दृष्टी व उदारता कलुषित होऊ दिली नव्हती. मात्र ‘व्होट-कारणी’ व्यापाराशी देणंघेणं नसल्यामुळं व धर्म-दृष्टीवर कोणा ईझम्सची वा दुरभिमानाची तिळमात्रही झापडं नसल्यामुळं पश्चिमेच्या जीवनदृष्टीतील त्रुटी तसंच तिथल्या व्यवहारातल्या निर्घृण ‘शायलॉक’पणावर कोरडे ओढायलाही या स्वामींनी मागेपुढे पाहिलं नव्हतं.

त्या संन्याशाला ‘वेदांमध्ये शिर व इस्लाम धड’ असलेला भारत जसा हवा होता तसाच पूर्व-पश्चिम संस्कृतींचा संगमही हवा होता. सुनक यांचं उदाहरण हे पश्चिम त्या स्वप्नाकडेच वाटचाल करीत आहे का, या शंकेनं त्या संन्याशाचे पश्चिमेला संबोधून पश्चिमेतच उच्चारलेले पुढील अर्थाचे चार शब्द आठवले आणि मन कातर झालं : ‘विज्ञानाचे धडे आम्ही आपल्या पायाशी बसून घेऊ, पण हृदयां-हृदयांमधला द्वेष-सुडाचा, श्रेष्ठ-कनिष्ठ भावाचा हिजाब हटवून मानवमात्रातील ऐक्य आणि जीवनात शांती- समाधान मिळवण्यासाठी आजच्या विज्ञानयुगात धर्म-श्रद्धेला विज्ञानविरोधी नसलेला आधार मिळवून देणाऱ्या मार्गासाठी आपल्याला पूर्वेकडेच (भारताकडे) यावं लागेल!’ समृद्ध समाजात वंश/धर्म इत्यादींच्या भेदाभेदांची तीव्रता वेगानं कमी होत असली तरी मानवी मनाच्या अंत:करणात वाढत जाणारा भकासपणा व  असंतुलितपणा यातून निर्माण होणाऱ्या नव्या भयाण प्रश्नांकडे पाहिलं की वरील विचाराचा निदान अर्थ/महत्त्व तरी लक्षात येईल.

प्रिय पश्चिमे, भारताला क्षमा कर. स्वामीजींचा तो धर्माहंकार नव्हता, भरतभूच्या दार्शनिक विचारांवरचा तो विश्वास होता. पण  आम्ही स्वामीजींना आज खोटं ठरवलं. विश्वगुरू होण्याच्या २४ तासांच्या कंठशोषातच विश्वगुरुत्वाचा जसा पराभव लपलेला आहे तसंच ओठांवरील ‘सबका साथ’चा रात्रंदिनाचा घोषही (पश्चिमे, तुझ्याकडूनच शिकलेलं) येनकेनमार्गे  सत्ताकारण व त्यामागचा हृदय भरभरून ओतू जाणारा द्वेष या भावांना झाकू शकत नाही एवढंही आम्हाला आता कळेनासं झालं आहे. (तुला ज्या पश्चात्तापातून धडा मिळाला त्या हृदयं तोडण्याचाही अनुभव घ्यावा असं भारत म्हणतोय बहुधा!) रामाच्याही नावानं जिथं मतांचं राजकारण झालं, तिथं स्वामीजींच्या  शब्दांची आठवण तरी कशी उरणार? ते म्हणाले होते : ‘भारताचा धर्म हा विज्ञानाला सामोरं जायला तयार असलेल्या सृष्टीच्या सनातन (अविनाशी) सत्यावर आधारलेला आहे; कोणाही व्यक्तीच्या ऐतिहासिकतेवर तो अवलंबून नाही.’

आणखी वाचा – विवेकानंदांचा ‘ईश्वरवाद’

पण पश्चिमे, काळ हा अखेर अनंत आहे व म्हणून सापेक्षही. वर उमटलेला क्षणिक निराशभाव जाऊ दे; त्या संन्याशाचे शब्द अजूनही जिंकू शकतील. हृदयांच्या विकासात पूर्वी परधर्म संकल्पना भारताला अडवू शकली नाही आणि ‘र्सव खल्विदं ब्रह्म’च्या जीवनदायी प्रकाशात आम्ही पुढे जात  होतो , आज तू पुढे जात आहेस! हे चालायचंच. उद्या आम्ही पुढे जाऊ..  मात्र भारत त्याच्या धर्माचं जगणं/मरणं विज्ञानाशिवाय कोणाकडेही सोपवणार नाही (‘नहि ज्ञानेनसदृशं पवित्रमिह विद्यते’) आणि विज्ञानात तर ‘आम्ही’ आणि ‘ते’ला स्थान कुठून? त्यामुळे कितीही बलाढय़  वाटणारे सत्ताधीश येवोत- जावोत ; हे पूर्वीही घडलंय. काळ बदलणारच. आजचं चित्र काहीही असलं तरी भारत आपलं धर्म-मरण सत्ताकारणाच्या हाती सोपवणार नाही एवढं निश्चित. ‘आता विश्वात्मके देवे..’ची या भूमीतील हजारो वर्षांची सशक्त बीजं मानवाला विश्वधर्माकडे नेणाऱ्या पूर्व-पश्चिम संगमातील भारताला त्याची मोलाची भूमिका बजावण्यापासून कोणती बरं सत्ता रोखू शकेल?

तुझा(ही),  भारतीय लेखकाचे ‘स्वामी विवेकानंद  : धर्म आणि राष्ट्रवाद’ हे पुस्तक प्रकाशित झालेले आहे.