अमेरिकेतील मुक्त लोकशाही आणि दर्जेदार उच्चशिक्षणाचा लाभ घेऊन तेथील कॉर्पोरेट, राजकीय किंवा प्रशासकीय क्षेत्रात उच्चपदांपर्यंत पोहोचणाऱ्यांमध्ये भारतीयांचे प्रमाण वाढत आहे. येथे लक्षात घेण्यासारखी आणखी एक बाब म्हणजे, अनेकदा अशा भारतीयांच्या नियुक्त्या या चाकोरी मोडणाऱ्याही ठरल्या आहेत. अशीच एक नियुक्ती सध्या चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरत आहे, ती डॉ. आरती प्रभाकर यांची जो बायडेन प्रशासनाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान धोरणविषयक विभागाच्या (ओएसटीपी) संचालकपदी झालेली नियुक्ती. हा बहुमान मिळवलेल्या त्या पहिल्याच गौरेतर, स्थलांतरित, महिला आहेत.

डेमोक्रॅटिक पक्षाच्या उदारमतवादी राजकीय धोरणांशी त्यांची विशेष जवळीक आहे. त्यामुळेच यापूर्वी बिल िक्लटन आणि बराक ओबामा यांच्या प्रशासनातही त्यांनी महत्त्वाची पदे भूषवली होती. नावीन्यपूर्ण संशोधनाच्या क्षेत्रात अनेक गुंतागुंतीच्या प्रश्नांची उकल त्या करतील आणि अशक्य ते शक्य करून दाखवतील, असे व्यक्तिश: अग्रिम प्रशस्तिपत्र दस्तुरखुद्द बायडेन यांनीच त्यांना दिले आहे.

डॉ. प्रभाकर यांनी विद्युत अभियांत्रिकी आणि उपयोजित भौतिकशास्त्रात उच्चशिक्षण घेतल्यानंतर अमेरिकी सरकारचे संरक्षण, तंत्रज्ञान विभाग तसेच नावीन्य संशोधन क्षेत्रात अनेक वर्षे काम केले. त्या तीन वर्षांच्या होत्या तेव्हा त्यांचे पालक दिल्लीतून अमेरिकेत प्रथम शिकागो आणि नंतर टेक्सास येथे स्थलांतरित झाले. आरती यांनी टेक्सास विद्यापीठातून विद्युत अभियांत्रिकीची पदवी मिळवली. पुढे ‘कॅलिफोर्निया इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’ अर्थात ‘कॅलटेक’ या संस्थेतून त्यांनी विद्युत अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली. त्याच संस्थेतून उपयोजित भौतिकशास्त्र विषयात त्यांनी पीएच.डी. संपादित केली. अशी कामगिरी करणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या!

नवीन तंत्रज्ञान विकसित करण्याच्या अनेक मोहिमांचे आरती प्रभाकर यांनी नेतृत्व केले. ओबामा प्रशासनाच्या दुसऱ्या कार्यकाळात त्या संरक्षण संशोधन प्रकल्प संस्थेच्या (डीएपीआरए) संचालक होत्या. या संस्थेच्या वतीने दहशतवाद्यांकडील किरणोत्सारी आणि अण्वस्त्रपूरक पदार्थ हुडकून काढण्याचा प्रकल्प, तसेच वेबच्या माध्यमातून मानवी तस्करीचा छडा लावण्याचा प्रकल्प अशा अनेक मोहिमांचे नेतृत्व त्यांनी केले. बिल िक्लटन प्रशासनात त्या वयाच्या ३४ व्या वर्षी मानक तंत्रज्ञान विभागाच्या संचालक झाल्या. ते पद भूषवणाऱ्याही त्या पहिल्याच महिला होत.

प्रशासकीय जबाबदाऱ्यांदरम्यानच्या काळात १७ वर्षे त्यांनी सिलिकॉन व्हॅलीमध्ये कॉर्पोरेट क्षेत्रातही उत्तम काम केले आहे. हरित तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान, नावीन्य संशोधनासाठी पाठबळ देणाऱ्या साहसवित्त कंपन्या अशा अनेक क्षेत्रांत डॉ. आरती प्रभाकर यांनी ठसा उमटवला. प्रशासकीय आणि कॉर्पोरेट अशा दोन्ही क्षेत्रांना नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि सक्षम धोरण आखणीची गरज असते. यासाठी तंत्रज्ञानाची जाण, भविष्याचा वेध आणि प्रशासनावर पकड ही गुणत्रयी आरती यांच्या ठायी आढळल्यामुळेच तीन-तीन राष्ट्राध्यक्षांनी त्यांच्याकडे महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या. कमला हॅरिस यांच्यानंतर बायडेन प्रशासनातील त्या दुसऱ्या महत्त्वाच्या भारतीय वंशाच्या उच्चपदस्थ ठरल्या आहेत. समाजोपयोगी प्रकल्पांसाठी नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर वाढावा यासाठी ‘अ‍ॅक्चुएट’ ही सामाजिक संस्थाही त्या चालवतात. भविष्यात अमेरिकी प्रशासनात त्यांच्याकडे आणखी मोठी जबाबदारी सोपविली गेल्यास ते अजिबात आश्चर्यजनक ठरणार नाही.