उज्ज्वला देशपांडे

“मी रात्री दोन वाजता येऊन बसतो तुझ्या घराखाली, बघू तू काय करतेस, हा रस्ता सार्वजनिक आहे”. मी राहते त्या हौसिंग सोसायटीमधले साधारण पासष्ठी उलटलेले सभासद माझ्या अंगावर धावून येत म्हणाले. पस्तिशी उलटलेला त्यांचा मुलगा रात्री साडेअकरा वाजता आमच्या घराखाली छोट्या पोरांना जमवून गप्पा मारत होता (छोट्यांच्या घरच्यांना रात्री या वेळेला आपली पोरं कुणासोबत आहेत याची काही फिकीर नसावी). मी घरातून सांगितलं की तुम्ही दुसरीकडे बसा आम्ही झोपलो आहोत. ती छोटी मुलं (अजून छोटीच असल्यामुळे) म्हणाली “दादा चल सोसायटीच्या बागेत बसू”, तर हा ‘दादा’ म्हणाला “बसा इथेच, काही होत नाही”. मग मी साडेअकराला रात्री खाली जाऊन – कसं दुसऱ्याला त्रास होईल असं वागणं चुकीचं आहे (रात्रीच्या वेळेस तर जास्तच) हे – त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. पोलिस पेट्रोलिंगची गाडी मी हात दाखवून थांबवली होती, सोसायटीचे रात्रपाळीवरचे सुरक्षारक्षक (जे मी खाली येण्याआधी निवांत झोपले होते ते) आणि इतर आठ-दहा असेच (त्रास देणारे) निशाचर; असे आम्ही रात्री पावणेबारा वाजता सोसायटीमधल्या रस्त्यावर वाद घालत होतो.

Allu Arjun House Attack
Allu Arjun House Attack : अल्लू अर्जुनच्या घरावर हल्ला, घरात घुसून तोडफोड; आठ जण ताब्यात
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Loksatta editorial Dr Babasaheb Ambedkar Lok Sabha Elections Constitution Convention
अग्रलेख: कोणते आंबेडकर?
loksatta editorial Donald Trump 2024 presidential campaign
अग्रलेख: सुज्ञ की सैतान?
ancient Indian mathematician Bhaskaracharya
भारतीय अर्वाचीन गणिती: भास्कराचार्य
Loksatta editorial Donald Trump won US presidential election
अग्रलेख: तो परत आलाय…
loksatta editorial Supreme court verdict on madrasa
अग्रलेख: मदरसे ‘कबूल’
Loksatta editorial about investment decline in Maharashtra
अग्रलेख: महाराष्ट्र मंदावू लागला…

‘तुम्ही तक्रार द्यायला चला’ असं दोन पोलीस मला म्हणाले. मी नेहमीच कशी अपरात्री गप्पा मारत बसणाऱ्यांना हे सांगत असते याबद्दल आठ-दहा निशाचर एकमेकांना सांगत होते आणि पस्तिशीच्या ‘दादा’नं त्याच्या पासष्ठीच्या आई-वडिलांना मोबाईलवरून “खाली या” म्हणून बोलावून घेतलं होतं. पोलिसांनी मला “घरी जा” असं सांगितलं आणि बाकीच्यांनासुद्धा “निघा” म्हणून पांगवलं. परंतु ती ‘रात्री दोन’ची धमकी काही केल्या माझ्या डोक्यातून जाईना. पुणे पोलीस आयुक्तांच्या कार्यालयाला फोन केला आणि घडलेलं सर्व काही सांगितलं. “तुम्ही काळजी करू नका, ते दोनला आलेच आणि तुम्हाला समजलं तर फोन करा आम्हाला, आम्ही पोलीस पाठवतो”, असा दिलासाही मिळाला. मला झोप लागली. ते सभासद त्या रात्री पुन्हा आले की नाही माहिती नाही, ते आले असते, मला कळलं असतं तर मी नक्की पोलिसांना परत कळवलं असतं.

हेही वाचा…भारतीय अर्वाचीन गणिती: भास्कराचार्य

या सर्व घटनाक्रमात ती लहान मुलं तिथेच डोळे विस्फारून हे सर्व बघत होती. शाळेत नागरिकशास्त्रात शिकवलेले नियम सार्वजनिक जीवनात नाही पाळले तरी चालतं हा धडा त्यांना ‘दादा’कडून मिळाला होता. ‘दादागिरी’ कशी करायची याचा लाईव्ह डेमोच त्यांना ‘दादा’कडून आणि दादाच्या बाबांकडून मिळाला होता.

नरहर कुरुंदकरांच्या ‘अभयारण्य’ पुस्तकात (१९८५) ‘स्वातंत्र्य आणि जबाबदारी’ या लेखात अतिशय परिणामकारकरित्या या विषयावर विवेचन आहे. ते वाचताना मला वर सांगितलेली घटना आठवली. त्यांचा त्या लेखातले विचार इतके महत्त्वाचे आहेत, किंबहुना प्रत्येक वाक्यच इतकं महत्वाचं आहे की त्या प्रत्येक वाक्यावर एक वेगळा लेख किंवा लेखमाला लिहिता येईल. खरंतर आपल्याला खूप लहान वयात, प्राथमिक शाळेतच, नागरिकशास्त्रात खूप महत्त्वाचं – जे सामाजिक जीवनात शिस्त, जबाबदारी आणेल असं – शिकवलं जातं. परंतु आपण इतके लहान असतो की ते शिकणं फक्त त्या-त्या इयत्तांपुरतं, गुणांपुरतंच मर्यादित राहतं आणि आपण जसजसे मोठे होत जातो तसतसा नियम मोडणारा समाजच आपल्याला अधिक दिसतो. या समाजाला स्वातंत्र्य उपभोगायचं माहीत असतं, तो तर हक्कच असतो परंतु त्या हक्काबरोबर एक जबाबदारीही आपल्यावर आलेली आहे हे समाजातल्या अशा घटकांच्या कधी लक्षातच येत नाही किंवा लक्षात आलं तरी सोयीस्कररित्या त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं.

आपल्या सगळ्यांना या ‘जबाबदारी शिवाय स्वातंत्र्य उपभोगणाऱ्यांचा’ अनुभव असतो, त्यांच्याबद्दल आपण वाचत असतो (पुण्यात कोरेगाव पार्कमधल्या पोर्शेची घटना). दोन अप्रिय, पण वास्तव अशा अपसमजांचा ऊहापोह ‘स्वातंत्र्य आणि जबाबदारी’ या लेखात नरहर कुरुंदकरांनी केलेला आहे- इथे गृहीतक म्हणजे एक गृहीत धरलेली कल्पना, या अर्थानं हे अपसमज म्हणजे ‘गृहीतकं’च ठरतात. ‘जबाबदारीच्या जाणिवेशिवाय स्वातंत्र्य असू शकते’ हे यापैकी पहिलं गृहीतक. कुरुंदकरांनी सांगितलेलं दुसरं गृहीतकदेखील खूप महत्त्वाचं आणि विचार प्रवृत्त करणारं आहे, ते म्हणजे ‘स्वातंत्र्याचा हक्क न देता सुद्धा लोकांवर जबाबदारी असू शकते’. परंतु या गृहीतकाबद्दल नंतर कधीतरी.आपल्याला समाजात/ जगात प्रचंड प्रमाणात अंदाधुंदी दिसते, कारण बहुसंख्य लोक वर नोंद केलेल्या या दोन्ही गृहीतकांना ‘सत्य’ समजतात. संशोधन पद्धतीच्या फार खोलात जात नाही. परंतु कोणत्याही चिकित्सेशिवाय किंवा अभ्यासाशिवाय गृहीतकच जेव्हा सत्य म्हणून मान्य होतं, तेव्हा ते मान्य करणारा समाज फक्त स्वतःच्या फायद्याचा भाग लक्षात घेतो. ‘आम्हाला स्वातंत्र्य आहे, अधिकार आहेत’ हे लक्षात ठेवून वागायला जाणारे मग त्या स्वातंत्र्यांबरोबर जबाबदारीसुद्धा येते हे लक्षात घेत नाहीत. आपल्या स्वातंत्र्याच्या हक्काने आपण दुसऱ्याच्या जगण्याच्या अधिकारांवर कुरघोडी करत असतो, जबाबदारीने वागत नसतो, हे अशा लोकांना मान्यच नसते. मग तो कल्याणमधल्या एका सोसायटीत, निव्वळ धूपाच्या धुरावरून वाढत गेलेला वाद का असेना.

हेही वाचा…चंद्रपूरचे मनोहर सप्रे

वैयक्तिक स्तरावर जसं हे होताना दिसतं, त्याचप्रमाणे सामाजिक स्तरावर व्यक्ती/ समूह ही जबाबदारी समजून घेण्यास कमी पडतात. त्यांना त्याची गरज वाटत नाही. मग (कोणत्याही जाती-धर्माच्या) वेगवेगळ्या सणांनिमित्त निघणाऱ्या मिरवणुका, त्यातले डीजे, लेझर शोज असोत किंवा निवडणुका जिंकल्यावर कोणत्याही पक्षाकडून होणारा उन्मादी जल्लोष असो. झुंडीच्या मानसशास्त्रात कोणालाच आपण काही चुकीचं वागत आहोत, इतर सर्वसामान्य माणसं, ज्यांच्याकडे तुम्हाला विरोध करायची हिंमत नाही त्यांना आपल्या वागण्यानं त्रास होतो याची फिकीर बेजवाबदारीने स्वातंत्र्य भोगणाऱ्यांना नसते. कठोर कायदे, त्यांचं तंतोतंत पालन, ते मोडणाऱ्यांना ते कोणीही असले तरी शिक्षा, या सर्वांविषयी जनजागृती वगैरे करून हळूहळू बदल घडून येऊ शकतो. नाहीतर सुसंस्कृत, प्राचीन परंपरा असलेला समाज पुन्हा रानटी व्हायला वेळ लागत नाही.

कोणताही देश, कुठल्याही क्षेत्रात किंवा एक राष्ट्र म्हणून सुद्धा जेव्हा महासत्ता होण्याची स्वप्नं बघतो, तेव्हा त्या देशातल्या प्रत्येक नागरिकाला आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे किंवा मिळत आहे, आपण जे उपभोगत आहोत त्याबरोबरच आपल्यावर एक खूप मोठी जबाबदारीसुद्धा आहे याचे भान येणं अतिशय महत्त्वाचं आहे. तरच महासत्तेची स्वप्नं प्रत्यक्षात येऊ शकतात.आपण सर्वसामान्य माणसं आणि आपण निवडून दिलेले (किंवा न दिलेले) राजकारणी लोकं ते कष्ट, ती जबाबदारी घेण्यासाठी तयार आहोत का? ujjwala.de@gmail.com

Story img Loader