देवेश गोंडाणे
रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे गंभीर परिणाम युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना भोगावे लागत आहेत. तूर्तास युद्ध थांबण्याची कुठलीही चिन्हे नसल्याने युक्रेनच्या वैद्यकीय विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांवर अभ्यासक्रम पूर्ण कसा करायचा या प्रश्नाची टांगती तलवार आहे.
मुलाला डॉक्टर होताना पाहायचे म्हणून खासगी सेवेत असलेल्या स्वप्निल देवगडेच्या वडिलांनी त्याला युक्रेनच्या वैद्यकीय विद्यापीठात शिक्षणासाठी पाठवले. परंतु, रशिया आणि युक्रेनमध्ये संघर्ष पेटला आणि स्वप्निलला अभ्यासक्रम सोडून मायदेशी परतावे लागले. काही दिवसांत युद्ध थांबेल असे वाटत होते. परंतु, युद्ध संपण्याची कुठलीही चिन्हे नसल्याने अभ्यासक्रम कसा पूर्ण करावा असा प्रश्न आता त्यांच्यापुढे आहे. फक्त स्वप्निलच नाही तर युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या हजारो भारतीय विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना अर्धवट राहिलेला अभ्यासक्रम पूर्ण कसा करता येईल, हा प्रश्न सतावतोय.
स्वप्निल युझहॉर्ड राष्ट्रीय विद्यापीठामध्ये तिसऱ्या सत्रात शिकतो आहे. तो म्हणाला, की दोन सत्रांमध्ये त्याचे दहा लाख खर्च झाले आहेत. दुसरे सत्र नुकतेच संपले असून तिसरे सत्र १ सप्टेंबरपासून सुरू झाले आहे. या सत्राचे शुल्कही भरून झाले. मात्र, युक्रेनमधील परिस्थिती पुन्हा चिघळत आहे. ही परिस्थिती बघता मला वाटत नाही की सध्या आम्हाला परत जाता येईल. यामुळे मला माझे ‘करिअर’ पूर्ण अंधारमय दिसत आहे. मला आता डॉक्टर बनता येईल का?
फक्त स्वप्निल एकटाच नाही तर त्याच्यासारखे १८ हजार विद्यार्थी युद्धामुळे युक्रेन सोडून भारतात परतले. कुणाचे दुसरे वर्ष सुरू होते तर कोणी चौथ्या सत्रात शिकत आहेत. युद्ध थांबण्याची चिन्हेच नसल्याने आता फक्त प्रश्न उरतो तो राहिलेले शिक्षण पूर्ण कसे करायचे? त्यांना भारतात किंवा अन्य देशात अर्धवट शिक्षण पूर्ण करायची संधी मिळेल का? की या विद्यार्थ्यांनी युक्रेनमधील युद्धजन्य परिस्थिती निवळेपर्यंत वाट बघावी, असे अनेक प्रश्न उभे आहेत.
नियम आहेत, पण…
यावर राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग अर्थात ‘नॅशनल मेडिकल कमिशन’ यांनी एक परिपत्रक प्रसिद्ध केले होते. त्यानुसार युक्रेनमधून आलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना एक वर्षाची अनिवार्य असलेली आंतरवासिता भारतात करण्यासाठीची परवानगी देण्यात आली. मात्र, त्यासाठी विद्यार्थ्यांना ‘फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एग्झामिनेशन’ ही परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागेल. त्याचप्रमाणे ‘फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट लायसन्स रेग्युलेशन २०२१’ लागू झाल्यापासून काही विद्यार्थ्यांना नोंदणीसाठी अडचणी येत आहेत. विद्यार्थ्याने १८ नोव्हेंबर २०२१ या तारखेआधी ‘परदेशी वैद्यकीय पदवी’ किंवा ‘प्राथमिक शिक्षण’ पूर्ण केले असेल अथवा १८ नोव्हेंबर २०२१ या तारखेआधी परदेशात वैद्यकीय पदवीसाठी प्रवेश घेतला असेल अथवा केंद्र सरकारने विशेष परिपत्रक काढून ज्यांना सवलत दिली होती अशा विद्यार्थ्यांना ‘फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट लायसन्स रेग्युलेशन्स २०२१’ लागू होणार नाही.
याआधी एका वैद्यकीय विद्यापीठातून दुसऱ्या वैद्यकीय विद्यापीठात विद्यार्थ्यांना आपले प्रवेश बदली करता येत होते. यात युक्रेनमधून कझाकस्तान, किर्गिस्तान किंवा जॉर्जिया या देशात विद्यार्थी बदली करून घेत होते. मात्र, नोव्हेंबर २०२१ मध्ये भारत सरकारने नियमांमध्ये केलेल्या बदलांनुसार विद्यार्थ्यांना आपले वैद्यकीय शिक्षण कोणत्याही एकाच वैद्यकीय विद्यापीठामधून पूर्ण करता येईल. फिलिपाइन्स आणि अन्य काही कॅरेबियन देश या नियमांना डावलताना दिसल्यावर भारत सरकारने या देशांवर बंदी घातली आहे. एकीकडे युद्ध थांबण्याची चिन्हे नाहीत, तर दुसरीकडे भारतात किंवा अन्य देशात समावेश करण्यासंदर्भात राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग कुठलाही ठोस निर्णय घेत नसल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
युक्रेनमधून परत आलेला पवन मेश्राम सांगतो की, तो सध्या तिसऱ्या सत्रामध्ये आहे. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या काही नियमांनुसार केवळ १४ महिने ऑनलाइन अभ्यासक्रम पूर्ण करण्याची परवानगी आहे. युद्धजन्य परस्थितीमुळे आतापर्यंत १० महिने ऑनलाइन शिक्षण झाले. पुढचे चारच महिने उरले आहेत. त्यामुळे यापेक्षाही अधिक काळ ऑनलाइन शिक्षण घेतल्यास आमचे काय होणार, असा प्रश्न उभा आहे.’ वैद्यकीय शिक्षण हा ५४ महिन्यांचा अभ्यासक्रम आहे. मात्र, ऑनलाइनमुळे प्रात्यक्षिक अभ्यासक्रमात अडचणी येत असल्याने दोन वर्षे आंतरवासिता पूर्ण करण्याची परवानगी द्यावी, असे पवन म्हणतो. सध्या इतर देशातील विद्यापीठांमध्ये बदली केली तर नव्याने प्रवेश घेणे अडचणीचे असून तेथील खर्चही वाढणार आहे. त्यामुळे डॉक्टर व्हायचेच असेल तर आहे तेथील रुग्णालयांमध्ये वैद्यकीय सराव करावा लागेल. परिस्थिती गंभीर असल्याने जमेल त्या स्थितीत अभ्यास पूर्ण करावा व यशस्वी डॉक्टर बनून दाखवावे, अशी पवनची भावना आहे.
रेबेका सोमकुंवर ही द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी असून युद्ध थांबत नसल्याने सध्या प्रचंड चिंतेत असल्याचे तिच्या आईने सांगितले. रेबेकाची आई सांगते की, तिसरे सत्र संपल्यावर त्यांच्या मुलीला चौथ्या सत्रात प्रवेश देण्यासाठी युक्रेनमधील विद्यापीठाने अडचणी निर्माण केल्या आहेत. त्यामुळे सर्वांच्या नजरा या आयुर्विज्ञान आयोगाच्या निर्णयावर लागू आहेत. यासाठी काही विद्यार्थी न्यायालयात गेले असून १५ सप्टेंबरला यासंदर्भात निर्णय येण्याची अपेक्षा असल्याचे त्या म्हणाल्या. युक्रेनमध्ये वैद्यकीय प्रवेश घेण्यावर विद्यार्थ्यांना विचारले असता भारतातील खासगी महाविद्यालयातून वैद्यकीय शिक्षण घेणे तुलनेने खर्चीक असल्याचे सर्वांनी सांगितले.
जगभरात कुठेही शिक्षण घ्यायचे झाले तर पैसा लागतो. युक्रेनमध्ये शिक्षणाचा खर्च भारतापेक्षा कमी आहे. म्हणजेच, सहा वर्षांच्या वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी युक्रेनमध्ये २० ते २५ लाख रुपये खर्च होणार असेल, तर भारतात खासगी वैद्यकीय महाविद्यालयात तोच खर्च ८० लाख ते एक कोटीपर्यंत जातो. त्यात युक्रेनमध्ये ३० हून अधिक वैद्यकीय महाविद्यालये असून पायाभूत सुविधांवर त्या सरकारने जास्त भर दिला आहे. त्यामुळे कमी खर्चात आणि उत्तम सुविधांमध्ये युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण पूर्ण करता येते. त्यामुळे विद्यार्थी युक्रेनसारख्या देशात वैद्यकीय शिक्षणाचा पर्याय निवडतात. मात्र, आता युद्धामुळे विद्यार्थी, पालक सारेच चिंतेत असून भारत सरकारच्या निर्णयावरच या सर्वांचे भविष्य अवलंबून आहे.
gondanedevesh@expressindia.com