मुंबईत अत्याधुनिक पायाभूत सुविधांचा विकास करण्याच्या दृष्टीने अनेक पायाभूत सुविधा विकास प्रकल्प मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून राबविले जात आहेत. मात्र त्याचवेळी या प्रकल्पाच्या कामाचा मोठा फटका मुंबईला, मुंबईकरांना बसत आहे. विकास प्रकल्पांसाठी खाडी, समुद्रकिनारे, पाणथळ जागा अशा ठिकाणी भराव टाकत कामे केली जात आहेत. परिणामी पावसाचे पाणी जाण्यास जागा नसल्याने मुंबईतील पाणी साचण्याच्या ठिकाणांमध्ये वाढ होताना दिसत आहे. आतापर्यंत कधीही पाण्याखाली न गेलेले परिसरही यंदाच्या पावसात पाण्याखाली गेल्याचे चित्र आहे. मुंबईत प्रामुख्याने मेट्रो आणि सागरी किनारा रस्ता प्रकल्पामुळे पाणी साचत असल्याचा आरोप पर्यावरणतज्ज्ञांकडून केला जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पालिकेच्या सागरी किनारा मार्गाच्या कामासाठी मोठ्या प्रमाणावर समुद्रकिनारी भराव टाकत बांधकाम करण्यात आले आहे. परिणामी आजच्या घडीला हाजीअली, ब्रीच कॅन्डी येथे मागील एक-दोन वर्षांपासून पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. यंदा पहिल्यांदाच वरळी सी फेसलाही पाणी साचले. तर दुसरीकडे पालिकेकडून मुंबईभर नवीन रस्त्याची वा रस्ता दुरुस्तीची, रुंदीकरणाची आणि काँक्रीटीकरणाची कामे सुरू आहेत. या कामासाठी रस्ते खोदून ठेवल्यानेही अनेक ठिकाणी पाणी साचत आहे.

हेही वाचा >>> बीकेसीतील एमटीएनएल-एलबीएस मार्ग उन्नत रस्त्यावर खड्डे; उन्नत रस्ता वाहतुकीसाठी बंद, कंत्राटदाराला ५० लाखांचा दंड

मेट्रो ३ प्रकल्पाच्या कामाचा सर्वाधिक फटका पावसाळ्यात मुंबईला बसत आहे. या प्रकल्पासाठी आरे वसाहतीतील ३३ हेक्टर जागेवर भराव टाकण्यात आला आहे. तर कारशेडच्या हद्दीत एक भिंत उभारण्यात आली आहे. त्यामुळे आरेतील रस्ते जलमय होत आहेत. आरे वसाहत आणि अंधेरी पूर्वला जोडणारा मरोळ-मरोशी रस्ता आणि आरे-पवईला जोडणारा मुख्य रस्ता जलमय होतो आहे. महत्त्वाचे म्हणजे आरे कारशेडच्या कामामुळे पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण झाल्याने मिठीनदी मुसळधार पावसात तुडुंब भरून वाहत असून याचा फटका क्रांतीनगर आणि आसपासच्या परिसराला बसत आहे. मुंबई विमानतळ परिसरात २६ जुलै २००५ वगळता कधीही पाणी भरले नव्हते. पण यंदा तेथे पाणी भरले असून आरे कारशेडच्या कामामुळे पाणी साचल्याचा आरोप होत आहे.

मेट्रो ६ च्या कामामुळे जोगेश्वरी-विक्रोळी जोडरस्ता, मेट्रो ४ च्या कामामुळे घाटकोपर, मुलुंड येथे पाणी साचत आहे. मुख्य रस्त्यावर, फुटपाथलगत मेट्रोच्या खांबाचे बांधकाम करण्यात आल्याने वा करण्यात येत असल्यानेही पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण होतो आहे. त्यामुळे मेट्रोची कामे सुरू असलेल्या ठिकाणी रस्ते जलमय होत आहेत. सांताक्रूझ-चेंबूर जोडरस्ता विस्तारीकरण प्रकल्पाच्या कामामुळेही सांताक्रूझसह अन्य भागात पाणी साचते आहे.

mangal.hanavater.@expressindia.com

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Waterlogging in mumbai due to metro and coastal road projects zws