मुस्लीम समाजातील पाच जण रा. स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना भेटल्याची बातमी उघड झाल्यानंतर प्रसारमाध्यमांतून, ‘उलटसुलट चर्चा’ म्हणजे काय याचे प्रत्यंतरच येऊ लागले. भागवत यांना भेटणाऱ्यांत प्रस्तुत लेखकाचा समावेश होता, तसेच दिल्लीचे माजी नायब राज्यपाल नजीब जंग, हॉटेल व्यावसायिक सईद शेरवानी, लेफ्टनंट जनरल (निवृत्त) ज़मीरउद्दीन शाह आणि पत्रकार शाहिद सिद्दिकी हे अन्य चौघे होते. भागवत यांना भेटण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय सर्वस्वी आमचा होता. आम्ही पाचही जण समविचारी, संवादाच्या प्रक्रियेवर विश्वास ठेवणारे आहोत आणि मुस्लीम समाजातील असुरक्षिततेच्या भावनेबद्दल आम्हाला काळजी वाटते, म्हणून आम्ही सरसंघचालकांना भेटलो. या भेटीची बातमी आल्यापासून आम्हा प्रत्येकाला, मुस्लीमच नव्हे तर बिगरमुस्लिमांकडूनही जे संदेश आले, ते संवाद हाच पुढला मार्ग असल्याचे सुचवणारे होते.

पण काही प्रतिक्रियांमध्ये टीकेचा सूरही होता. उदाहरणार्थ आम्हाला मुस्लिमांचे प्रतिनिधित्व करण्याचा ‘अधिकार’ कोणी दिला असा यापैकी काहींचा सवाल होता. त्याखेरीज काही जणांना आम्ही एका जातीयवादी संघटनेशी ‘संबंध ठेवल्या’मुळे आमची आजवरची धवल प्रतिमा डागाळेल, अशी चिंता होती तर काही जणांच्या मते आम्ही ‘जाळ्यात पकडले गेलो’. मात्र, संवाद हाच पुढे जाण्याचा एकमेव मार्ग आहे यावर कुणीही प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले नाही, हेही नमूद केले पाहिजे. आम्हाला जे प्रश्न विचारले गेले, त्यांची सरळ उत्तरे देण्यासाठी हा लेखनप्रपंच आहे.

readers comments on Loksatta editorial
लोकमानस : आम्ही गावकी, भावकी कधीच सोडली
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Abdul Sattar
Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांची मोठी घोषणा; “निवडणुकीत जात आणि धर्म आणला जातो, त्यामुळे यापुढे….”
Shashi Tharoor on Nitesh Rane
नितेश राणेंच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावरून शशी थरूर यांचा संताप; म्हणाले, “या लोकांना…”
Image of Yogi Adityanath
Mandir-Masjid Debate: “वक्फ बोर्डाच्या नावाखाली घेतलेल्या प्रत्येक इंच जमिनीचा ताबा परत घेणार”, योगी आदित्यनाथ यांचा इशारा
Image of Ajit Pawar
Ajit Pawar : “पक्ष वगैरे न बघता…” धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांची मोठी प्रतिक्रिया
Ajit Pawar discussion with Amit Shah in Delhi
अजित पवारांची दिल्लीत अमित शहांशी चर्चा
Delhi minority areas delhi assembly election
‘आमच्या जगण्या-मरण्याचा प्रश्न’, दिल्लीतील मुस्लीमबहुल मतदारसंघातील मतदार भाजपाला दूर ठेवणार?

ही भेट आणि चर्चा एकंदर कशी होती? सरसंघचालकांचे कार्यालय साधेसेच होते. वक्तशीरपणे अगदी ठरल्या वेळी- सकाळी दहाला ते आले. सुमारे तासभर आम्ही पाचही जण बोलत होतो आणि ते फक्त ऐकत होते, आम्हाला आडकाठी करत नव्हते की व्यत्यय आणत नव्हते, हेही वाखाणण्याजोगे. त्या वेळी त्यांच्या कार्यालयात अन्य एक व्यक्ती होती ती म्हणजे त्यांचे निकटचे सहकारी क्रिशन गोपाल.

हे खरे की, भागवत बोलत असताना त्यात अधिकारवाणीचा भाव होता. पण तो जाणवेल- न जाणवेलसा होता आणि त्यांची एकूण देहबोली शिरजोरीची नव्हती- आम्ही चलबिचल वा अस्वस्थ व्हावे, असे काहीही त्यात नव्हते. त्यांच्या त्या प्रास्ताविक वक्तव्यातून तीन गोष्टी स्पष्ट झाल्या त्या अशा : (१) हिंदुत्व ही समावेशक संकल्पना आहे आणि त्यात सर्व (धर्म/जातींच्या) समाजांसाठी समान जागा आहे, असे सांगून ते म्हणाले : देशाची प्रगती तेव्हाच होईल जेव्हा साऱ्या समाजांत एकोपा असेल. (२) आपली राज्यघटना पवित्र आहे आणि तिचे पालन संपूर्ण देशाला करावे लागेल, यावर त्यांनी दिलेला भर हे त्यांचे महत्त्वाचे विधान होते. (३) राज्यघटना निष्प्रभ करण्याची संधीच रा. स्व. संघ शोधत आहे आणि त्यातून मुस्लीम समाजाला दुय्यम नागरिक ठरवायचे आहे, ही भीती निराधार ठरवण्याचा त्यांचा मनोदय दिसून आला.

हिंदू समाज दोन मुद्द्यांबद्दल अत्यंत संवेदनशील आहे, असे भागवत म्हणाले. यापैकी पहिला मुद्दा गाय.

यावर आम्ही म्हणालो की, मुस्लीम समाजाला या मुद्द्याचे पूर्ण आकलन आहे, विशेषत: भारताच्या बहुतेक राज्यांमध्ये गोहत्याबंदीचे कायदे लागू असल्यामुळे तर गायीबद्दल हिंदू समाज किती संवेदनशील आहे याची कल्पना मुस्लिमांना आलेलीच आहे आणि यापुढेही एखाद्याने बेकायदा वर्तन केले, तर त्याला शिक्षा देण्यासाठी कायदे आहेतच.

भागवत यावर असे सुचवू पाहात होते की, ज्या राज्यांमध्ये गोहत्याबंदीचे कायदे नाहीत, तेथील मुस्लिमांनी देखील स्वयंस्फूर्तीने गोमांस खाणे सोडून द्यावे. यातून त्या (मुस्लीम) समाजाची सुरक्षितता वाढणार असल्यामुळे हा स्वयंस्फूर्त निर्णय घेणे सुकर आहे, असेही भागवत यांचे अनुमान होते.

भागवत यांनी सांगितलेला हिंदूंचा (मुस्लिमांशी एकोप्यास संभाव्य अटकाव ठरू शकणारा) दुसरा संवेदनशील मुद्दा म्हणजे, हिंदूंना ‘काफिर’ म्हटले जाते. ‘काफिर’ म्हणजे ‘ज्यांचा विश्वास (इस्लामवर) नाही ते’, ‘भाविकेतर’ लोक. हा या मूळ अरबी शब्दाचा अर्थ आहे. परंतु तरीही, जर त्यात काही अवमानकारक वाटत असेल, तर मुस्लिमांनी तो शब्द वापरण्याचे पूर्णत: टाळणे हा मार्ग आहे आणि ते सहज शक्य आहे, असे यावर आम्ही म्हणालो. कुरआननुसार सर्वशक्तिमान अल्लाह म्हणजे केवळ ‘रब्बुल मुस्लिमीन’ (मुस्लिमांचा त्राता) नसून तो ‘रब्बुल आलमीन’ (विश्वाचा त्राता) आहे. ‘तुमचा धर्म तुम्हाला, माझा मला’ हेही कुरआन सांगते.

याखेरीज आम्ही हेही निदर्शनास आणून दिले की, जवळपास सर्वच मुस्लिमांना ‘जिहादी’, ‘पाकिस्तानी’ म्हटले जाते आणि हे शब्ददेखील तितकेच अवमानकारक ठरतात. हे ताबडतोब थांबलेच पाहिजे, यावर भागवत सहमत झाले.

हा संवाद यापुढेही अव्याहत राहावा, अशी सूचना आम्ही केली आणि तुमच्या सहकाऱ्यांपैकी ज्यांच्याशी आम्ही पुढला संवाद करू शकतो अशी काही नावे तुम्ही सुचवावीत, अशी विनंतीही केली. भागवत यांनी चार व्यक्तींची नावे सुचवली. शिवाय, ‘माझ्याशी बोलणे आवश्यक वाटले तर मीही उपलब्ध राहीन,’ अशी तयारी त्यांनी दाखवली.

ही भेट संपवण्यापूर्वी ‘ द पॉप्युलेशन मिथ : इस्लाम, फॅमिली प्लॅनिंग ॲण्ड पॉलिटिक्स इन इंडिया’ या मी लिहिलेल्या पुस्तकाची प्रत सरसंघचालकांना भेट देण्याची अनुमती मी माझ्या अन्य चौघा सहकाऱ्यांकडून घेतली होती, त्याप्रमाणे एक प्रत भागवत यांच्याकडे सुपूर्द करताना मी पुस्तकाबद्दल चार मुद्दे मांडले. पहिला मुद्दा म्हणजे मुस्लीम समाजाची लोकसंख्यावाढ सर्वाधिक असल्याचे आकडे असले, तरी वाढीचा हा दर अतिशयोक्तच म्हटला पाहिजे. हिंदूंमधील लोकसंख्यावाढीपेक्षा मुस्लिमांमधील लोकसंख्यावाढीचा दर किती जास्त, याची टक्केवारी ३० वर्षांपूर्वी ‘१.१’ अशी होती, परंतु आता ती ‘०.३’ अशी झालेली आहे कारण मुस्लीम समाजातील लोकांनी हिंदूंपेक्षा अधिक प्रमाणात कुटुंबनियोजनाचा अंगीकार केला आहे. दुसरा मुद्दा असा की, लोकांचा समज काहीही असला तरी मुस्लीम समाजात ‘बहुपत्नीत्वा’चे प्रमाण सर्वांत कमी असल्याचा निर्वाळा भारत सरकारचा अहवाल तसेच आधीच्या जनगणनांमधील आकडेवारीच देते आहे. तिसरा मुद्दा दुसऱ्याशी संबंधित. तो असा की, ‘एकापेक्षा अधिक विवाह करणे’ हे सर्व मुस्लीम पुरुषांना निव्वळ अशक्यच आहे, कारण भारतीय मुस्लिमांतील स्त्री-पुरुष प्रमाण हे दर एक हजार पुरुषांमागे ९४० स्त्रिया असे आहे. याचा अर्थ असा की, दर हजार मुस्लीम पुरुषांपैकी ६० पुरुषांना एकसुद्धा पत्नी मिळणे मुष्कील! या माझ्या सांगण्यावर भागवत खळखळून हसले आणि त्यांना हा मुद्दा भिडला असल्याची साक्ष त्या हास्यातून मिळाली. मी मांडलेला चौथा मुद्दा असा की, पुढल्या एक हजार वर्षांतसुद्धा भारतीय मुस्लीम समाज कधीही भारतातील हिंदूंपेक्षा बहुसंख्य होऊच शकणार नाही, असे गणितीय प्रतिरूप सांगते. हे गणितीय प्रतिरूप, दिनेश सिंह आणि अजय कुमार या गणित विषयाच्या दोघा प्राध्यापकांनी माझ्या विनंतीनंतर बनवले आहे.

या भेटीची निव्वळ ‘गंधवार्ता’ प्रसारमाध्यमांना लागण्याचा अवकाश, लगेच बातमीवर उड्या पडू लागल्या. प्रतिक्रियांचे तर मोहोळ उठले. या प्रतिक्रिया गडगंज सकारात्मक होत्या, पण तरीही एक काळजीचा मुद्दा होता तो हा की रा. स्व. संघ काही अशाने बदलणार नाही… कदाचित नाही बदलणार, पण कदाचित बदलेलही.

याच प्रतिक्रियांमध्ये एक तीव्र आक्षेपही होता. तो असा की आम्हा पाच जणांच्या या कृतीतून रा. स्व. संघ, सरसंघचालक यांना ‘अधिमान्यता’ मिळते आहे. मुळात त्या संघटनेला वा तिच्या प्रमुखांना आमच्या अधिमान्यतेची काही गरज नाही. ती जगातल्या बहुसंख्य आणि शक्तिशाली संघटनांपैकी एक आहे आणि आम्ही पाचच जण असे कोण? सारे जरी आपापल्या क्षेत्रात यशस्वी किंवा कार्यक्षम असलो, देशाची आणि समाजाची आम्ही काहीएक सेवा बजावल्याचे सर्वमान्य जरी असले तरी आम्ही पाचही जण आता निवृत्त आहोत.

आम्ही समाजाचे प्रतिनिधित्व करतो का? कदाचित नाही. कोणीही आम्हाला निवडलेले किंवा नियुक्त केलेले नाही. पण आम्ही एका समाजाचा भाग आहोत. आमची काही निरीक्षणे आहेत आणि त्यावर आधारित काही मतेदेखील आहेत. त्यानुसार आम्ही काहीएक पुढाकार घेतला आहे. यातून आम्हाला कदाचित अभिजनवादी ठरवले जाईलही. पण हा आरोप करणारे तर आमच्यापेक्षा भल्यामोठ्या प्रासादतुल्य घरात राहातात, याकडेही लक्ष जाऊ शकते. असो. मुद्दा हा की, आम्ही काही अडाणी माणसे नाही.. आजच्या काळात काय घडते आहे, याची आम्हाला कल्पना आहे. झुंडबळीच्या घटना आम्हाला माहीत आहेत. वारंवार कुठे ना कुठे मुस्लिमांबद्दल द्वेषपूर्ण वक्तव्ये केली जाताहेत, मुस्लिमांचा विच्छेद करा, मुस्लीम महिलांवर बलात्कार करा, मुस्लीम समाजावर आर्थिक बहिष्कार घाला, त्यांचा मताधिकार काढून घ्या अशी आवाहने करण्यापर्यंत मजल जाते आहे आणि घरे घेताना किंवा नोकऱ्या मिळवताना तर मुस्लिमांना भेदभावाचा कटु अनुभव येतो आहे, हे सारे आम्हाला माहीत आहे. तरीही संवादाच्या प्रक्रियेवर आमचा विश्वास आहे.

प्रसारमाध्यमांचे काय करायचे, त्यांच्यापुढे कितपत जायचे, हा आमच्यापुढील प्रश्न आहे खरा. आधी आम्हाला वाटत होते की याबाबत प्रसारमाध्यमांशी काहीही बोलूच नये. पण मग लक्षात आले की, आपल्याकडे लपवण्यासारखे तर काहीच नाही! आणि जर आमच्यावर टीका करून कुणी सवंग प्रसिद्धी मिळवू पाहात असेल, तर त्यांना उत्तर देण्याचे कर्तव्य करण्यासाठी आम्हाला आमची प्रसिद्धीपराङ्मुखता बाजूला ठेवावीच लागेल.

पुन्हा सांगतो, आम्हा साऱ्यांचा ठाम विश्वास आहे की, संवाद हाच पुढे जाण्याचा एकमेव मार्ग ठरू शकतो. आमच्याकडे गमावण्यासारखे काहीच नाही, त्यामुळे झाला तर समाजाचा लाभच. आम्ही आमच्या भावना पंतप्रधानांपर्यंतही पाेहोचवू इच्छितो, त्याही विनाविलंब. कदाचित आम्हाला ते भेटीची वेळ देतील, अशी आम्हाला आशा आहे.

लेखक भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त आहेत तसेच निवडणूक प्रक्रियेबद्दलचे त्यांचे ‘ॲन अनडॉक्युमेन्टेड वण्डर : द मेकिंग ऑफ द ग्रेट इंडियन इलेक्शन’ हे पुस्तकदेखील प्रसिद्ध झालेले आहे.

टि्वटर : @DrSYQuraishi

Story img Loader