हरिहर सारंग
आजकाल आमच्या भावना कशानेही दुखावतात. त्यांचा भडका उडण्यास अल्पसे कारण पुरेसे होते. एकीकडे आपल्या अस्मिता अत्यंत टोकदार झाल्या आहेत, तर दुसरीकडे चिकित्सावृत्तीचा संपूर्ण अभाव होण्याकडे आपली वाटचाल सुरू आहे.
बालपणापासूनच मुलांमध्ये चिकित्सावृत्ती बिम्बविण्याचे काम शिक्षणाद्वारे होणे अपेक्षित आहे. स्वातंत्र्य, समता,बंधुता, मानवतावाद, आणि धर्मनिरपेक्षता या मूल्यांची शिकवण देता देता मुलांमध्ये अशी चिकित्सावृत्ती बिंबविणे शक्य होऊ शकते. मात्र आता, प्राथमिक शिक्षणापासूनच शिक्षणाचा सबंध केवळ करिअरशी जोडण्यात आलेला आहे. शिक्षणाचा जीवनाशी सबंध तुटून बराच काळ लोटलेला आहे. (अशा वेळी महात्मा गांधींच्या ‘नयी तालीम’ या मोहिमेचे महत्त्व प्रकर्षाने जाणवत राहाते.) सध्याच्या काळात शिक्षणाचा बाजार भरलेला असला तरी चांगले शिक्षण अपवादानेच मिळते. आधुनिक मूल्ये रुजविण्याच्या कामाबरोबरच विद्यार्थ्यांचा सबंध प्रत्यक्ष जीवनाशी जोडण्याचा प्रयत्न होताना दिसत नाही.
त्यामुळेच या मूल्यविहीन पोकळीत धार्मिक कट्टरता रुजविण्याचा मार्ग मोकळा होतो. राजकीय नेते या परिस्थितीचा फायदा घेण्यात कायम पुढे असतात. धार्मिक प्रसंगाचा, उत्सवांचा फायदा घेऊन ही मंडळी सामान्यांच्या मनांतील धार्मिक भावना कुरवाळतात आणि त्यांचे धार्मिक नेतृत्व करण्यास सिद्ध होतात. यातूनच आपल्या धार्मिक-सांस्कृतिक भावना टोकदार बनविण्याचे कामही सुरू होते. स्वातंत्र्यादि मूल्यांचा प्रभाव कमी झाल्यामुळे आणि धार्मिक कट्टरता वाढल्यामुळे चिकित्सेचा पराभव होण्यास सुरुवात होते.
मुस्लिमांमध्ये या कट्टरतेचा प्रभाव हिंदूंच्या तुलनेत अधिक आहे यावर कोणाचे दुमत होण्याचे कारण नाही. इस्लामच्या उदयाची पार्श्वभूमी, त्याचा प्रसार व त्या धर्माचा मुस्लिमांच्या जीवनाला पूर्णतया व्यापणारा प्रभाव या कारणांमुळेच ही कट्टरता निर्माण होऊन जोपासली गेली असावी, असे वाटते. एवढेच नव्हे तर त्यामध्ये मुसलमानांतील आधुनिक शिक्षणाचे कमी प्रमाण, दुर्लक्षितता आणि दारिद्र्य या कारणांचाही समावेश होतो. दोन्हीकडील राजकारण्यांनी हिंदू- मुसलमानांतील या कट्टरतेचा सातत्याने फायदा उठविलेला आहे. देशातील कॉंग्रेस सरकारांनी मुसलमानांतील दारिद्र्यावर उपाययोजना करण्याऐवजी किंवा त्यांच्यात आधुनिक शिक्षणाचा प्रसार करण्याऐवजी त्यांचा धार्मिक अनुनय करण्यातच आपली सत्ता वापरलेली आहे.
सध्याच्या काळात मुसलमानांतील कट्टरतेचा फायदा घेण्याचे स्वरूप बदलले आहे. त्यांच्या कट्टरतेचा गाजावाजा करून हिंदूंची धार्मिक भावना अधिकाधिक चेतविण्याचा प्रकार सुरू आहे. हा भावना पेटविण्याचा प्रकार राजकीय नेत्यांच्या फायद्याचा असला तरी त्यामुळे हिंदू धर्मीय लोकदेखील कट्टरतेमध्ये मुसलमानांशी स्पर्धा करीत असल्याचे दिसून येत आहे. स्वातंत्र्य, समता आदी आधुनिक मूल्यांशी सर्वच धर्मांच्या ‘कट्टर अभिमान्यां’चे जणू कायमचे वैर असल्याने या मूल्यांच्या परिणामी वाढू शकणारी चिकित्सावृत्ती सध्याच्या काळात संताप व तिरस्कारास पात्र होत आहे.
त्यामुळेच धर्माची, धार्मिक तत्त्वज्ञानाची किंवा धार्मिक नेत्यांची चिकित्सा सुरू झाली की भावना दुखायला सुरुवात होते. धार्मिक लोक स्वतःच्या धर्माच्या चिकित्सेला घाबरतात; पण दुसऱ्यांच्या धर्माच्या चिकित्सेच्या नावावर दुसऱ्या धर्मांचा व धर्मीयांचा अवमान करण्यास मागे-पुढे पाहत नाहीत. अशा स्वरूपाची चिकित्सा ही खऱ्या अर्थाने चिकित्सा नसतेच. त्यामागे चिकित्सेऐवजी दुसऱ्या धर्मीयांना तुच्छ लेखण्याचा किंवा त्यांचा अवमान करण्याचा उद्देश असतो. त्यामुळे कोणताही धार्मिक माणूस अशा चिकित्सेकडे सकारात्मक दृष्टीने पाहूच शकत नाही. अशा प्रकारे वाढती धार्मिक कट्टरता ही आधुनिक मूल्यांच्या प्रसाराला अटकाव करते. त्यामुळे चिकित्सेला केवळ विरोधच केला जातो असे नव्हे तर चिकित्सा वृत्तीचा तिरस्कार केला जातो. अशा चिकित्सेच्या अभावी कट्टरता अधिकच वाढण्याची, पर्यायाने ज्ञानाची व सामाजिक परिवर्तनाची गती कुंठित होण्याची भीती निर्माण झालेली आहे.