भारतीय हवामान शास्त्र विभागाने म्हणजे (आयएमडी) ने २५ मे रोजी मान्सूनचा सुधारित अंदाज व्यक्त केला. त्यानुसार यंदाच्या मान्सून हंगामात देशात सरासरी ९६ टक्के पावसाची शक्यता आहे. तर महाराष्ट्रात जून महिन्यामध्ये सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस पडू शकतो. जून महिन्यात देशातील बहुतांश ठिकाणी कमाल तापमानात सरासरीपेक्षा वाढ होईल. महाराष्ट्रात बहुतांश भागांमध्ये पाऊस सरासरीपेक्षा कमी होईल असा तो अंदाज आहे.
भारताच्या विविध भागात जानेवारीपासून पाण्याचे दुर्भिक्ष अनेक ठिकाणी जाणवू लागले आहे. या पार्श्वभूमीवर ५ जून या ‘जागतिक पर्यावरण दिनाकडे आपण पाहिले पाहिजे. तसेच लोकशाहीचा महोत्सव असलेल्या १७ व्या लोकसभा निवडणुका होऊन नवे सरकारही पूर्ण बहुमताने सत्तेवर आलेले आहे. प्रदूषणाचे वाढते प्रमाण आणि पर्यावरणाचा वाढता ऱ्हास हा प्रश्न आज केवळ भारतच नव्हे तर जगापुढील अव्वल बनलेला आहे. तसेच दिवसेंदिवस वैचारिक प्रदूषणही वेगाने वाढताना दिसत आहे.
आपण विज्ञान युगात वावरतो पण वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारत नाही हे वास्तव आहे. समाज आणि विज्ञान यांचा परस्पर संबंध अतिशय जवळचा आहे. निसर्ग आणि मानव यांचे सहजीवनही अनादी काळापासून अस्तित्वात आहे. एकात्म जीवनाचेच ते घटक आहेत. माणूस निसर्गावर मात करण्याचे जसजसे प्रयत्न करू लागला तसतसा पर्यावरण विरुद्ध प्रदूषण हे द्वंद्व वाढत गेले. माणसाचे निसर्गावर हल्ले वाढले की निसर्गाचे माणसावरील हल्ले वाढणारच. दुष्काळ, भूकंप, सुनामी, जंगली प्राणी मानवी वस्त्यांत येणे यासारखी उदाहरणे त्याचेच द्योतक आहेत. वातावरणात वाढणारा उष्मा, जादा पडणारी थंडी, संततधार पाऊस, ऋतुचक्रात होणारे बदल, वाढणारे नवनवे रोग, साथीचे आजार यामागेही हीच कारणे आहेत. अर्थात या अस्मानी संकटाच्या वाढीला लोक प्रबोधनाच्या अभावाबरोबरच सुलतानी राज्यकर्त्यांची धोरणेही कारणीभूत असतात.
हेही वाचा – आजच्या दुर्गदिनी दुर्गसाहित्याचे उत्खनन!
शेती हा पूर्वी मुख्य व्यवसाय होता. औद्योगिक क्रांतीनंतर समाजजीवनात सर्व स्तरांवर बदल झाले. हे बदल निसर्गातच नव्हे तर मानवी संबंधातही होत चालले. नफ्याची प्रेरणा आणि शोषणाची हत्यारे यांनी तीव्र संघर्ष निर्माण केला. गेल्या काही वर्षांत ऋतुचक्रात मोठे बदल झालेत. पूर्वी जी नक्षत्रे हमखास पडायची ती आता कोरडी जाऊ लागली. आणि जी तुलनेने कोरडी असायची ती कोसळू लागली आहेत. याचे कारण निसर्ग आणि मानव यांच्या परस्पर संबंधात वेगाने अंतर पडू लागले आहे. त्यातूनच वैश्विक तापमान वाढ ‘ग्लोबल वॉर्मिंग’ सुरू झाले. त्याचे भयावह परिणाम सर्वांनाच भोगावे लागत आहेत. वाढत्या तापमानाने हिवाळा कमी आणि उन्हाळा व पावसाळा जास्त होतो आहे. अन्नधान्य दूषित होण्याचे प्रमाण वाढत आहे. मानवी अनारोग्यात संख्यात्मक व गुणात्मक वाढ होते आहे. वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी माणसाला घ्याव्या लागणाऱ्या औषधांचे प्रमाण वाढले आहे. रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली आहे. त्यातच भांडवली अर्थनीतीने ‘आहे रे ‘आणि ‘नाही रे ‘ यांच्यातील तफावत वाढत चालली आहे.
अल्बर्ट श्वाईसझर यांनी म्हटले होते की ‘माणसाने दूरदृष्टी दाखवून वेळीच थांबायची क्षमता गमावली आहे. तो पृथ्वीचा विनाश करूनच थांबेल.’ पण आपण विनाशाच्या उंबरठ्यावर येऊनही त्यापासून काहीच बोध घेत नाही. पर्यावरणाचा अभ्यास सक्तीचा केला हे खरे असले तरी त्यातून पर्यावरणस्नेही मानसिकता घडवण्यात यश आले नाही हे वास्तव आहे. वैचारिक पर्यावरणाकडेही लक्ष देणे किती गरजेचे आहे त्याचे प्रत्यंतर इथे येते.
गेल्या काही वर्षांत भोगवाद, चंगळवाद वाढतो आहे. जीवनशैली बदलत चालली आहे. हितसंबंध जपणाऱ्या चुकीच्या परंपरा निर्माण करून त्या रूढ केल्या जात आहेत. प्रेमभावनेपेक्षा द्वेषभावना वाढीस लागली आहे. हे सारे असेच वाढत राहावे यासाठी संघटितपणे प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष प्रयत्न केले जात आहेत. या मानवताविरोधी शक्तींमुळे वैचारिक पर्यावरणात अनेक तणाव निर्माण होत आहेत. माणसांच्या भावना क्षुल्लक कारणांवरून दुखू व भडकू लागल्या आहेत. माणसे हिंस्र बनू लागली आहेत. माणूसकी नष्ट होत चालली आहे. नैसर्गिक पर्यावरण आपल्या चुकीच्या वर्तन व्यवहारामुळे ढासळलेले आहेच आहे. पण त्याहून जास्त वैचारिक पर्यावरण ढासळल्याचे अस्वस्थ वर्तमान आहे.
प्राचीन भारतीय संस्कृतीतील उदार तत्त्वांचा, मूल्यांचा आपल्याला विसर पडत चालला आहे. अनेक धर्मांची निर्मिती व विकास झालेली ही भूमी आहे. विविध धर्मातील अनेक संत, महंत, गुरू, आचार्य यांच्या वैचारिक योगदानाने हा देश उन्नत झाला आहे. विविधतेतून एकतेची अभिमानास्पद शिकवण आपण जगाला दिली आहे. पण आज आपल्याच देशातील असंख्य माणसे अस्वस्थ झाल्याचे दिसते आहे. माणसे माणुसकीपेक्षा जात, पात, पंथ, धर्म यात विभागली जात आहेत. विचार, संस्कार व आचार यांना एका संकुचित कोंडीत बंदिस्त करण्याचे पद्धतशीर प्रयत्न सुरू आहेत. विचारातील व्यापकता हरवत चालली आहे. स्वधर्मप्रेम परधर्माच्या द्वेषावर आधारित होऊ लागले आहे. वैचारिक प्रदूषणातून अतिरेकी विकृती फोफावते आहे. वैचारिक पर्यावरण चांगले ठेवायचे असेल तर सर्वांनीच राज्यघटनेच्या सरनाम्याचा अंगीकार केला पाहिजे. राज्यकर्त्यांनी आपली धोरणे आखताना, राबविताना आणि जनतेने वर्तन व्यवहार करताना घटनेच्या तत्त्वज्ञानाचा अवलंब केला पाहिजे. त्यातील विचार आत्मसात केला पाहिजे. तो कृतीत उतरविला पाहिजे. भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे आणि त्याचा जर कोणता धर्मग्रंथ असेल तर तो भारतीय राज्यघटनाच आहे. नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाची छायाचित्रे पाहिली की ही भारतीय संसद आहे की धर्म संसद आहे असा प्रश्न पडतो. व्यक्तीला धर्म असेल पण राष्ट्राला धर्म असणार नाही या धर्मनिरपेक्षतेच्या गाभा घटकालाच आव्हान दिले जात आहे. तेही ज्यांच्यावर राज्यघटनेच्या स्वीकाराची, अंमलबजावणी, संवर्धनाची जबाबदारी आहे त्यांच्याकडून घडते आहे. हे विकृत आहे.
भारतीय राज्यघटनेने आपल्या प्रत्येकाला सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय देण्याचे, विचार – अभिव्यक्ती – श्रद्धा – उपासना यांचे स्वातंत्र्य दिलेले आहे. दर्जाची व संधीची समानता दिलेली आहे. व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता, एकात्मता राखणारी ही राज्यघटना मानवतावादी विचारांचे सार आहे. तिला जगातील सर्वश्रेष्ठ सामाजिक दस्तऐवज मानले जाते. शिवाय ही राज्यघटना आपण लोकांनीच तयार करून ती स्वतःलाच अर्पण केलेली आहे. भारतीय संस्कृती, भारतीय स्वातंत्र्यलढा, त्याचा विकासक्रम आणि आशय या सर्व वास्तवाचा विचार करताना तयार झालेली भारतीय राज्यघटना आणि तिच्या सारनाम्याचे तत्त्वज्ञान आपल्यातील वैचारिक पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मदतकारी ठरू शकते.
संपूर्ण स्वातंत्र्य, धर्मनिरपेक्षता, लोकशाही, समाजवाद, संघराज्यीय एकात्मता, लोकांचे सार्वभौमत्व या भारतीय परंपरेचा घटक असलेल्या मूल्यांचा आपण जेवढ्या अधिक प्रमाणात प्रसार व प्रचार करू, समर्थ भारताचा नागरिक म्हणून ती मूल्ये जेवढी आत्मसात करू तेवढ्या प्रमाणात आपले वैचारिक पर्यावरण स्वच्छ, निकोप, पारदर्शक राहणार आहे. त्यासाठी प्रत्येकाने प्रयत्नशील राहणे ही देशाची मूलभूत गरज आहे.
हेही वाचा – महिला अधिकाऱ्यांनो, तुमची ‘सॉफ्ट पॉवर’ हीच तुमची ताकद…!
‘मानवाभोवतीची सर्व परिणामकारक परिस्थिती म्हणजे पर्यावरण’ अशी पर्यावरणाची व्याख्या केली जाते. वैचारिक पर्यावरणाचा विचार करतानाही आपण आपल्या सभोवतीची वास्तव परिस्थिती आणि अभ्यासात्मक परिस्थिती यांचे यथायोग्य भान ठेवले पाहिजे. तसेच वैचारिक पर्यावरणाबरोबरच आपले सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक पर्यावरणही चांगले राखले पाहिजे. नैसर्गिक पर्यावरणाचा विचार करताना या सर्व पर्यावरणीय पैलूंचाही विचार करून आपण वागलो तर निसर्ग आणि माणूस, माणूस आणि माणूस यांच्यातील द्वंद्व संपुष्टात येईल. विचारांच्या पर्यावरणाला आचाराच्या पर्यावरणाची साथ दिली की सर्वार्थाने प्रदूषणमुक्त समाजाचे स्वप्न साकार होईल. ती आपली आणि येणाऱ्या पिढ्यांची गरज आहे. प्रबोधनाची त्यासाठी नितांत गरज आहे. शेवटी आपल्या विकासाचा मार्ग आपली मनोवृत्ती, आपली जीवनशैली, आपली विचारशैली आणि आपली आचारशैली ठरविणार आहे. श्रीमंत राष्ट्रांच्या श्रीमंतीकडे पाहात असताना त्यांनी केलेल्या गंभीर चुका आणि दिलेली किंमत लक्षात घेणे आणि मग देश म्हणून आपली धोरणे आखणे, नागरिक म्हणून आपला व्यवहार करणे दीर्घकालीन सर्वांगीण चिरस्थायी विकासासाठी आवश्यक आहे. ५ जूनचा पर्यावरण दिन नैसर्गिक व वैचारिक पर्यावरणाच्या जागरणासाठी विचारात घ्यायचा तो त्यासाठीच असे म्हणावेसे वाटते.
(लेखक समाजवादी प्रबोधिनी, इचलकरंजीचे १९८५ पासून कार्यकर्ते आहेत. तसेच गेली ३४ वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती’ मासिकाचे संपादक आहेत.)
(Prasad.kulkarni65@gmail.com)