– हुसेन दलवाई

नागपूर शहरामध्ये १७ मार्चला हिंदू मुसलमानांमध्ये दंगल झाली. दंगलीची कारणे काय? लोकांचे यासंबंधी म्हणणे काय? शासनाची व पोलिसांची भूमिका काय? यासंबंधी प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल तयार करावा म्हणून काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी माणिकराव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन केली. या सत्यशोधन समितीचा मीही एक सदस्य होतो. समिती ज्या दिवशी नागपूरला गेली, त्या वेळी मी जाऊ शकलो नाही. परंतु नंतर मी व प्रा. प्रकाश सोनवणे २४ मार्चला नागपूरला गेलो. काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, काही कामगार संघटना, काही सामाजिक संघटना व महिला संघटना यांच्याशी बोलून काय घडले, याची माहिती घेतली. ही माहिती घेत असताना दोनही समाजातील कार्यकर्त्यांशी बोलून नेमके काय घडले? याबद्दलही जाणून घेतले. दुसऱ्या दिवशी आम्ही ज्या ज्या ठिकाणी दंगल घडली त्या -त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट दिली.

इथे एक गोष्ट नमूद करणे आवश्यक आहे की, दंगल संपूर्ण नागपूर शहरात झाली नाही. सहा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ती घडली आणि विशेष म्हणजे त्याला व्यापक स्वरूप प्राप्त झाले नाही. ‘औरंगजेबाची कबर आम्ही उखडून टाकू’ अशी भूमिका विश्व हिंदू परिषद व बजरंग दल या हिंदुत्ववादी संघटनांनी जाहीर केली होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही औरंगजेबाचे उदात्तीकरण नको, असे वक्तव्य केले होते. महाराष्ट्रात एकूण २२ ठिकाणी औरंगजेबाच्या प्रतिमा हिंदुत्ववादी संघटनांनी जाळल्या. त्यासंबंधी मुसलमानांनी अवाक्षरही केले नाही. पूर्णपणे या घटनेकडे दुर्लक्ष केले. इतकेच नव्हे तर नागपूर शहरामध्येही वेगवेगळ्या सहा ठिकाणी त्यादरम्यान औरंगजेबाच्या प्रतिमा जाळण्यात आल्या. त्यासंबंधीही मुसलमानांनी कुठेही प्रतिकार केला नाही. उलट पूर्णपणे दुर्लक्ष केले.

इतके सगळे करूनही मुस्लिम शांत आहेत व दंगल पेटत नाही, असे लक्षात आल्यावर त्यांनी नागपूरला शिवाजी महाराजांचा पुतळा असलेल्या गांधी गेट येथे औरंगजेबाचा पुतळा जाळला. विशेष म्हणजे यासंबंधी आधीच या संघटनांनी कोतवाली पोलीस ठाण्याची परवानगी घेतली होती. परंतु प्रत्यक्षात औरंगजेबाचा पुतळा जो जाळण्यात आला, ते ठिकाण गणेश पेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत येते. याला पोलिसांनी परवानगी कशी काय दिली? इतकेच नव्हे तर कधीही पोलीस जाळपोळ करण्यास परवानगी देत नाहीत. ती कशी दिली गेली? प्रत्यक्ष घटना घडत असतानाही थांबवण्यात का आले नाही? इतकेच नव्हे तर औरंगजेबाच्या पुतळ्यावर हिरवी चादर टाकण्यात आली जी साधारणत: पिरांच्या ‘मजारीवर’ टाकण्यात येते त्यापैकी चादर होती व त्यावर ‘कलिमा’ व ‘कुराण शरीफ’च्या आयती लिहिलेल्या होत्या. ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. पोलिसांच्या देखतच त्याला आग लावण्यात आली, त्याला नंतर लाथा आणि चपला मारण्यात आल्या. हे सर्व तेथे उपस्थित असलेल्या ५० पोलिसांदेखत घडले. जे घडलं ते जेव्हा मुस्लिमांनी पाहिले, त्याचे व्हीडिओ चित्रणही काहींनी केले. तेव्हा त्या संबंधातला त्यांचा रोष निर्माण झाला.

हे जेव्हा घडत होते तेव्हा बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेने जमवलेल्या जमावातील काही जणांनी मुसलमानांना उचकवण्यासाठी धार्मिक भावना दुखावतील अशा घोषणाही दिल्या. ही घटना साधारण दुपारी बारा-साडेबाराला घडली. पोलिसांनी या संबंधांत काहीच कारवाई केली नाही म्हणून मुसलमानांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली. त्यानंतरही पोलिसांनी काही कारवाई केली नाही म्हणून सुमारे पाचशे मुसलमान पोलीस ठाण्यात गेले आणि या प्रकरणी ताबडतोब कारवाई होणे आवश्यक आहे अशी त्यांनी मागणी केली. विशेष म्हणजे विश्व हिंदू परिषदेचे आणि बजरंग दलाचे महाराष्ट्राच्या बाहेरचेही कार्यकर्ते नागपुरात उपस्थित होते. गोव्याचे भाजपचे विश्व हिंदू परिषदेचे समन्वयक नागपुरात आले होते. या संबंधात मुख्यमंत्र्यांनी, जे गुन्हेगार असतील त्यांची घरे उद्ध्वस्त करू. त्यांच्या घरावर बुलडोझर फिरवू या तऱ्हेचे निवेदन देऊन एका अर्थाने लोकांना अधिक उसकावण्याचं काम केलेले होते, असे आम्हाला तिथल्या हिंदू- मुसलमान समाजातल्या लोकांनी कथन केले. त्यानंतर आम्ही राम मंदिर गल्ली भागात, जिथे काही वाहने जाळण्यात आली होती तेथे गेलो. जाळण्यात आलेल्या त्या गाड्या हिंदू आणि मुसलमान दोन्ही समाजांच्या होत्या आणि तिथल्या लोकांचे म्हणणे असे होते की, या भागातल्या लोकांनी काही केलेले नाही. उलट त्यांनी काही करू नका असे सांगितले. परंतु बाहेरचे लोक इथे आले होते त्यांनी हे कृत्य केले. जिथे जिथे हे प्रकार घडलेले आहेत, तिथे तिथे बाहेरचे लोक येऊन इथे कुरापत करून गेल्याचेच स्थानिक रहिवासी सांगत होते. मग साहजिकपणे प्रश्न पडतो की, बाहेरचे लोक आले तेव्हा पोलीस काय करत होते? हा प्रश्न आम्ही पोलीस आयुक्तांना परत परत विचारला परंतु आयुक्तांना त्याचे उत्तर काही देता आले नाही.

तिथून आम्ही चिटणीस पार्क चौक ला गेलो. तिथे मशिदी जवळच मुस्लिम लोकांशी चर्चा केली. विनोद घाटे नावाच्या इसमास भेटलो जे दुग्धालय चालवतात. त्यांनी स्पष्ट सांगितले की या प्रकरणी इथल्या हिंदू मुसलमानांचा काही एक संबंध नाही. आमचे संबंध अतिशय चांगले आहेत. हीच गोष्ट तिथल्या अनेक हिंदू आणि मुसलमानांनी सांगितली. त्यानंतर आम्ही भालदरपुरा येथे बरीच गडबड झाली होती म्हणून तिथे गेलो. तिथल्या ज्या ‘राजीव किराणा स्टोअर्स’ वर दगडफेक झाली होती. तिथे भेट दिली. तिथे एका ७० वर्षे वयाच्या नागरिकास मारहाणही झाली होती. परंतु हे करणारे लोक इथले नव्हते, बाहेरचे लोक होते, हेच आम्हाला सांगण्यात आले.

तिथल्या लोकांच्याबद्दल जराही त्यांची तक्रार नव्हती. खरे म्हणजे बरेच काही घडले अशी प्रतिक्रिया तिथल्या लोकांची होती. आलेले लोक हे बाहेरचे होते. यासंदर्भात आयुक्तांना आम्ही भेटलो आणि आयुक्तांचे म्हणणे एक आणि मुख्यमंत्री म्हणतात ते निराळेच- म्हणजे शासन आणि प्रशासन यांच्यामध्ये ताळमेळ नसल्याचे लक्षात आले. मुख्यमंत्री म्हणालेले आहेत की घटना पूर्वनियोजित होती. याउलट तिथले पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल यांच्या म्हणण्यानुसार असे पूर्वनियोजित काही झालेले नाही. रवींद्र सिंघल यांनी आमच्याशी सविस्तर चर्चा केली. त्यांचे म्हणणे असे की, पूर्व नियोजित काही नव्हते आणि ही उत्स्फूर्तपणे घडलेली घटना आहे. त्यामुळे स्पष्ट प्रश्न एवढाच उरतो की, मुख्यमंत्री जर ही दंगल पूर्वनियोजितच असल्याचा इतका ठाम दावा करत आहेत तर त्याचे नियोजन हे बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेने केले होते अशी माहिती त्यांच्याकडे आहे काय?

मुस्लिमांची हिंसक प्रतिक्रिया

औरंगजेबाचे प्रतीक जाळताना पिराची चादर वापरली जाऊनही पोलिसांनी काही कारवाई केली नाही, यातून मुस्लिमांचा रोष अधिक वाढला. अर्थात त्यांनी प्रतिक्रिया हिंसक पद्धतीने दिल्या, याचे समर्थन होऊ शकत नाही. आम्ही पुन्हा पुन्हा लोकांना सांगितले की गांधीजींच्या अहिंसक पद्धतीने त्या दिवशी प्रतिक्रिया द्यायला हव्या होत्या. तर काही मुसलमानांचे म्हणणे होते की ‘पोरं चिडली होती. आम्ही त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला.’ ॲडव्होकेट आसिफ कुरेशी आणि स्थानिक नगरसेवकांचे म्हणणे असे होते की, ज्या कुणी गडबड केली ते लोक बाहेरचे होते. आमच्या भागातले नव्हते. आम्ही आमच्या भागातल्या लोकांना अतिशय व्यवस्थितपणे ओळखतो.

बाहेरचे लोक कोण आले, कसे आले, का आले याची तरी चौकशी करणे आवश्यक आहे. या संपूर्ण परिसरात दोन दिवस आम्ही फिरल्यानंतर, लोकांशी बोलल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की, नागपूर हे शहर हिंदू मुसलमान एकतेचे प्रतीक आहे. महाराष्ट्राची जी परंपरा, संस्कृती आहे ती या भागामध्येही दिसते. तिथे मोहम्मद पैगंबर दिनाच्या निमित्ताने निघणाऱ्या मिरवणुकीमध्ये हिंदू समाजाचे लोकही सामील होतात. इतकेच नव्हे त्यांचे वेगवेगळ्या विभागात मोठ्या प्रमाणात स्वागत केले जाते आणि राम नवमीच्या वेळेला मुस्लिम समाजाचा प्रतिसादही असाच सहिष्णु असतो. हे आम्हाला सर्वांनीच सांगितलं. मी स्वत: हिंदू- मुस्लिम दंगलीच्या भागांमध्ये काम केलेले आहे. आम्हाला एक गोष्ट जाणवली की वितुष्ट निर्माण करण्याच्या दृष्टीने जो प्रयत्न केला जातो तो आज फार मोठ्या प्रमाणात हा केला जात आहे. सत्ताधारी या प्रयत्नांकडे दुर्लक्ष करतात ही अतिशय दुःखद गोष्ट आहे. परंतु समाजाची एकता अजूनही ढळलेली नाही, ही अतिशय आनंदाची बाब आहे. आम्ही असंख्य लोकांना भेटलो, अनेक कार्यकर्त्यांशी बोललो, त्या प्रत्येकाचे म्हणणे होो की, सरकार एकतर्फी भूमिका घेत आहे, पोलिसांवर कुठे ना कुठे दबाव होता. त्यामुळे हे जे घडलं हे महाराष्ट्राच्या दृष्टीने चांगलं नाही.

मी प्रत्येक ठिकाणी हे सांगितले की औरंगजेबाचा आणि आमचा काहीही संबंध नाही आणि मुसलमानांना औरंगजेबाच्या बद्दल काहीही प्रेम नाही. ज्या चादरीचा अपमान झाला त्यामुळे या प्रतिक्रिया मुसलमानातर्फे देण्यात आल्या. परंतु त्याच्याही ज्या मुसलमानांनी फार मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतला आणि ते घडवण्याचा प्रयत्न केला त्यांची नावे आहेत आणि ते संबंधित लोक आहेत.

महाराष्ट्र हा शिवाजी महाराजांनी घडवलेला महाराष्ट्र आहे. त्यांनी एतद्देशीय मुसलमानांना बरोबर घेतलं होतं. उलट औरंगजेबाने कधीच इथल्या मुसलमानांना जवळ केले नाही. त्यांनी ज्यांना सरदार केले ते सगळे बाहेरचे मुसलमान होते. त्यामुळेच इथल्या मुसलमानांना जो आदर आहे शिवाजी महाराजांबद्दलच आहे. एकमेकांच्या सणांमध्ये भाग घेणे, एकमेकांचा आदर करणे ही महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती आहे. ती कायम राहील या दृष्टीने सर्वांनीच प्रयत्न करायला हवेत. पूर्वापार हिंदू-मुस्लीम ऐक्य आहे. एकमेकांच्या धर्माचा आदर करण्याची संस्कृती व परंपरा आहे. तिचे जतन केले गेले पाहिजे.

लेखक माजी खासदार तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष आहेत.

dalwaih@yahoo.com