मेहमूद राद्झी अबू हसन

काविळीच्या ‘हेपाटायटिस- सी’ या प्रकाराला रोखणारे औषध म्हणजे सोफोस्बुविर, असेच सन २०२२ पर्यंत मानले जाई. त्या औषधाचा गुण येण्यासाठी १२ आठवडे ठराविक काळाने ते घ्यावे लागे आणि या औषधापायी रुग्णाला प्रचंड- म्हणजे ७० हजार ते ८० हजार डॉलर (६० ते ७० लाख रुपये) खर्च करावे लागत. याऐवजी एक नवे औषध २०२२ पासून वापरासाठी उपलब्ध झाले. हे होते. रविदासविर- आणि या औषधाचा उपचारखर्च आहे ५०० डॉलर (फार तर ६० हजार भारतीय रुपये)…. पण खर्च दसपटीपेक्षाही कमी एवढे एकच या औषधाचे वैशिष्ट्य नाही- या औषधाची निर्मिती मलेशिया, थायलंड आणि इजिप्त या देशांनी मिळून केली! म्हणजेच, पूर्णत: बिगरपाश्चात्त्य आणि ‘विकसनशील’ म्हणवल्या जाणाऱ्या देशांनी विकसित केलेले हे औषध आहे.

मलेशिया आणि थायलंड या देशांच्या आरोग्य मंत्रालयांनी एकत्र येऊन या औषधनिर्मितीचा खर्च उभारला, तर इजिप्तने औद्योगिक पाठबळ दिले. आजघडीला या औषधाने कैक रुग्ण बरे झालेले आहेतच, पण त्याहीपेक्षा, विकसनशील देशही औषध संशोधन आणि निर्मितीसाठी परस्परांशी यशस्वी सहकार्य करू शकतात, अशी उमेद या प्रयोगाने जागवली आहे. या वर्षी ‘आसिआन’ (असोसिएशन ऑफ साउथईस्ट एशियन नेशन्स) या विभागीय संघटनेचे नेतृत्व मलेशियाकडे असल्याने, याच प्रकारचे सहकार्य वैद्यकीय क्षेत्रात आणखी वाढावे, ते केवळ औषधांपुरते न राहाता निदानशास्त्रापर्यत जावे, मुख्य म्हणजे ‘ग्लोबल साउथ’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विकसनशील देशांच्या गरजा ओळखणाऱ्या वैद्यकीय संशोधनाचे नवे पर्व परस्परांच्या सहकार्याने सुरू व्हावे, असे आवाहन मलेशिया करत आहे.

विकसनशील देशांतील आजार वेगळे असू शकतात, त्यामुळे त्यांच्या वैद्यकीय गरजाही निराळ्या असतात. यादृष्टीने ‘ड्रग्ज फॉर निगलेक्टेड डिसीझेस इनिशिएटिव्ह’ (डिन्डी) हा उपक्रम मलेशियाने सुरू केला. त्यामुळेच या औषधाचा मूळ रेणू जरी अमेरिकेत विकसित झालेला असला तरी तो औषधांसाठी वापरण्याच्या दृष्टीने पुढील संशोधन झालेच नव्हते, ते ‘डिन्डी’च्या पुढाकाराने होऊ शकले. दुसरे म्हणजे, या संशोधनातून गुणकारी आणि तुलनेने परवडणाऱ्या औषधाची निर्मिती होऊ शकेल असे निष्कर्ष दिसताच मलेशियाने अन्य देशांशी भागीदारी केली. यात पूर्णपणे विकसनशील आणि बिगरपाश्चात्त्य देशांचाच सहभाग असणे हा काही केवळ योगायोग मानता येणार नाही.

उलट, आपण विकसित केलेले औषध कुणा पाश्चात्त्य देशातील बहुराष्ट्रीय कंपनीच्या ‘मालकीचे’ नसून ‘आपले’ असणार, या भावनेमुळे मलेशियामध्ये हालचालींचा जोर वाढला, सरकारी विभागांमधील अडथळे कमी झाले आणि पारंपारिक विचारसरणीला फाटा मिळाला. उदाहरणार्थ, मलेशियाचे औषध प्राधिकरण हे कठोर नियामक प्राधिकरणाच्या मंजुरीशिवाय रविदासवीर आणि सोफोस्बुविर यांचे संयोजन नोंदणीकृत करणारे पहिले ठरले. मलेशियन जेनेरिक-औषध उत्पादक फार्मानियागा यांनी नवीन रासायनिक घटकासाठी नोंदणी दस्तऐवज तयार करण्याचे आव्हान स्वीकारून या प्रयत्नांना पाठिंबा दिला.

मलेशियाच्या आरोग्य मंत्रालयाने या उपचार पर्यायाला पुढे नेणे सुरू ठेवले आहे. फेब्रुवारीमध्ये मंत्रालयाने एका क्लिनिकल चाचणीचे निकाल जाहीर केले ज्यामध्ये असे दिसून आले की सोफोस्बुविर- रविदासविर यांच्या संयुक्त उपचारांमुळे कमी कालावधीत – १२ आठवड्यांऐवजी आठच आठवड्यांत, सिऱ्हॉसिस नसलेल्या ‘हेपॅटायटिस सी’ रुग्णांमध्ये फरक दिसून आला. विकसनशील देशांत या आजाराने ग्रस्त असलेल्यांसाठी हा एक मोठा विजय आहे, कारण यामुळे उपचारात्मक खर्च आणखी कमी होतो आणि गुणही येतो, हे आता सिद्ध झालेले आहे.

उपचार परवडणारे आणि सुलभ असावेत, हे ‘हेपॅटायटिस सी’ नामशेष करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल असले तरी, रोगनिदानाच्या साधनांसाठीही असेच सहकार्य सुरू करणे आवश्यक आहे. पारंपारिक प्रयोगशाळेतील चाचण्या महाग असतात आणि आग्नेय आशियात मोठ्या प्रमाणात तपासण्या करणे नेहमीच कठीण असते. त्यामुळेच, यावर उच्च-उत्पन्न असलेल्या देशांनी उपाय विकसित करण्याची वाट पाहण्याऐवजी ग्लोबल साउथने – विकसनशील देशांनीच- स्वस्त आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर शक्य होणाऱ्या सर्वच वैद्यकीय सुविधांसाठी पुढाकार घेतला पाहिजे. त्यातही सध्या, अमेरिकेने ‘जागतिक आरोग्य संघटने’तून अंग काढून घेण्याची घोषणा केलेली असतानाच्या काळात तर, हे असे सहकार्य आवश्यकही ठरते.

आजच्या काळाची ही गरज ओळखून, आता अधिकाधिक आग्नेय आशियाई देशांनी पुढल्या क्लिनिकल चाचण्यांना पाठिंबा देण्याची आणि वैद्यकीय उपकरणे तसेच औषधांच्या स्थानिक उत्पादनाला चालना देण्याची तयारी दाखवली आहे. या प्रयत्नांमध्ये मलेशियाने मध्यवर्ती भूमिका बजावली आहे. जुलै २०२४ मध्ये, मलेशियन सरकारने आग्नेय आशियाई देशांतील सहकार्यासाठीच युनायटेड किंग्डमच्या अकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सेसच्या सौजन्याने एक कार्यशाळा आयोजित केली होती. कार्यशाळेतील उपस्थितांनी सरकारे, शैक्षणिक संस्था आणि उद्योगांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी उत्पादन-विकास भागीदारी स्थापित करण्याची शिफारस केली. येत्या मे महिन्यात मलेशियाचे आरोग्य मंत्रालय, अधिक प्रभावी औषधांच्या कमीत कमी वापरातून किंवा डोसचे प्रमाण कमी करून गुण कितपत येतो, हे पाहाण्यासाठी सीआरएम (कन्टिन्युअल रीॲसेसमेंट मेथड) चाचण्याही अन्य देशांच्या सहकार्याने सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवणार आहे. त्यासाठी एक परिषद बोलावली जाईल, त्यात वैद्यकीय संशोधक, शिक्षक, उद्योजक आणि धोरणकर्ते अशा एकंदर एक हजार जणांचा सहभाग असेल. हे सहकार्य फक्त आग्नेय आशियापुरते न ठेवता आखाती देश आणि चीनशीही सहकार्य करण्यास मलेशियाची तयारी आहे. अन्य देशांनी रस घेतल्यास, त्यांच्याशीही सहकार्य केले जाईल.

रविदासविर या औषधाचा विकास हा एक प्रयोग आहे- तो केवळ औषध संशोधनाचा प्रयोग नसून, प्रादेशिक सहकार्य आणि किफायती गुंतवणूक यांतून भरारी घेणाऱ्या अनेक वैद्यकीय नवकल्पनांची ती सुरुवात ठरू शकते. जर विकसनशील देश एकत्रितपणे कार्य करण्यास सहमत झाले, तर ते अन्य अनेक दुर्लक्षित आणि असंसर्गजन्य रोगांवर मात करण्यात यश मिळवू शकतात. औषधनिर्मितीचीच नव्हे तर एकंदर वैद्यकाची दिशा बदलू शकते. ॲलोपॅथी हे केवळ पाश्चात्त्य शास्त्र नसून ते आमचेही आहे, असे आपण सारे मिळून म्हणू शकतो!

लेखक मलेशियाचे आरोग्य महासंचालक असून हा लेखक ‘प्रोजेक्ट सिंडिकेट’ च्या सौजन्याने अनुवादित करण्यात आला आहे.