‘The eternal silence of these infinite spaces terrifies me.’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

— Blaise Pascal

बाहेर डोकावून पाहिल्यावर अनंताचं दर्शन घडतं. स्वत:च्या आत डोकावल्यावरदेखील अनंताचीच अनुभूती येते. मात्र या दोन अनंतांच्या तुलनेत माणसाच्या क्षमता सान्त- अर्थात मर्यादित- ठरतात. माणसाच्या क्षमता कितीही मर्यादित असल्या, त्यानं स्वत:ला दैनंदिन जीवनापुरतं कितीही सीमित करण्याचा आणि अनंतांचा विसर पाडण्याचा प्रयत्न केला तरी ब्लेज पास्काल म्हणतो त्याप्रमाणे, ‘द इटर्नल सायलेन्स ऑफ इन्फिनिट स्पेसेस’ची अनुभूती होत असते… आणि ते ‘अकारण’ भय (angst) निर्माण होतं. तिथंच जन्म होत असतो अध्यात्म, धर्मश्रद्धा, धर्मव्यापार इत्यादी गोष्टींचा. तिथंच निर्माण होतात कला, साहित्य, तत्त्वज्ञान, विज्ञानदेखील. आणि तिथंच गरज उद्भवते अफू, सोमरस, फार्माकोन, सेक्स सारख्या ‘कृत्रिम स्वर्गांकडे’ नेणाऱ्या कशाचीतरी!

पंधराव्या शतकाच्या अखेरीस आधुनिक पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाच्या मुळाशी असलेला व्यक्तिवाद आणि समाजशीलता यांचं पुनरुत्थान होताना दिसून येतं. गेल्या ५०० वर्षांचा आधुनिकतेचा प्रवास म्हणजे धार्मिक आणि पारंपरिक कुबड्यांच्या मदतीशिवाय पाश्चात्त्य माणसानं उपरोक्त अनंताच्या दिशेनं स्वतंत्रपणे केलेली धाडसी कृती. या धाडसी कृतीमुळे एका बाजूला आधुनिक व्यक्तिवादाच्या- खासगी- आणि दुसऱ्या बाजूला समाजशीलतेच्या- सार्वजनिक- अवकाशाची निर्मिती झालेली दिसते. प्रस्तुत लेखात या धाडसी कृतीतल्या सॉक्रेटिक पाऊलखुणांची चर्चा केली जाईल.

(अ) मध्ययुगीन पॅस्टोरल तर्क : इसवी पाचव्या शतकात पाश्चात्त्य रोमन साम्राज्याचा शेवट झाला. त्यानंतर युरोपीय समाज कॅथोलिक चर्चच्या अधिपत्याखाली आला. मध्ययुगीन माणसाला चर्चनं आखून दिलेल्या बंदिस्त शिवारातच स्वत:च्या अंतरंगातील मनोव्यापार आणि बाहेरील लोकव्यापार करावा लागत असे. कुठलाही विचार किंवा कृती चर्चने आखून दिलेल्या कुंपणाबाहेर जात असेल तर त्याला ‘सैतानाचा आवाज’ किंवा ‘सैतानी कृती’ समजलं जात असे. ख्रिास्ती धर्मशास्त्रांनुसार जन्माला आलेला प्रत्येक माणूस जन्मत:च पापी ठरतो. ऐहिक जीवन पापमय समजलं जातं. अशा क्षणभंगुर आणि दु:खमय लोकयात्रेतून माणसाच्या आत्म्याच्या मुक्तीचं ज्ञान, जबाबदारी आणि सर्वस्वी अधिकार चर्चकडे होता. त्यामुळे प्रत्येक आत्म्याची आध्यात्मिक काळजी वाहणं आणि अंतिमत: त्याला मुक्त करणं ही चर्चची मक्तेदारी असे. त्यामुळे, चर्चच्या बाहेर मुक्ती नाही, हे धार्मिक हत्यार उगारत चर्चने मध्ययुगीन युरोपमध्ये मानसिक, सामाजिक इंजिनिअरिंग घडवून आणलं होतं. फ्रेंच विचारवंत मिशेल फुको त्याच्या ‘चिकित्सा म्हणजे काय?’ या निबंधात नमूद करतो की उपरोक्त इंजिनिअरिंगच्या मुळाशी ‘पॅस्टोरल’ तर्क काम करत असे.

पॅस्टर शब्दाचा मूळ अर्थ मेंढपाळ आहे. आजदेखील चर्चच्या परिभाषेत याच अर्थानं हा शब्द वापरला जातो. ख्रिास्ती धर्मशास्त्रात माणसांना मेंढरांची उपमा दिली जाते; आणि माणसांच्या आत्म्याच्या मुक्तीचं ज्ञान आणि जबाबदारी असणाऱ्या धर्मगुरूला पॅस्टर म्हणजे मेंढपाळाची उपमा. पॅस्टोरल तर्कानुसार मेंढरांच्या जीवनाचं काटेकोर नियमन आणि मार्गदर्शन करून त्यांना खऱ्या म्हणजे ‘ईश्वरी’ जगाकडे ( Saint Augustine’ s ‘ City of God’) नेण्याची जबाबदारी या ‘मेंढपाळां’वर असे. अनंताच्या जाणिवेमुळे निर्माण होणाऱ्या ‘अकारण’ भयाची कारणमीमांसा आणि उत्तर शोधण्याची मक्तेदारी चर्चला स्वत:कडे राखण्यात आणि त्या अनुषंगाने पॅस्टोरल तर्क सर्वसामान्यांवर बिंबवण्यात यश आलेलं असल्यामुळे तब्बल हजार वर्षे युरोपियन माणसाची बाल्यावस्था टिकून राहिली. थोडक्यात, मध्ययुगीन पॅस्टोरल तर्कानुसार मनुष्याला स्वतंत्रपणे आपल्या स्वत्वाचा आणि समाजशीलतेचा शोध घेण्याची परवानगी नाकारलीच गेली. स्वतंत्रपणे वेगळा विचार करणाऱ्याला ‘सैतानाचा आवाज’ किंवा ‘भरकटलेली मेंढी’ समजलं जात असे.

पंधराव्या शतकात सुरू झालेली पाश्चात्त्य आधुनिकता म्हणजे उपरोक्त पॅस्टोरल तर्काचा शेवट होण्याची दीर्घ प्रक्रिया; त्यामुळे युरोपियन माणसाचं बाल्यावस्थेतून प्रौढावस्थेत पदार्पण आणि वेगवेगळ्या पातळीवर युरोपियन माणसाची वयात येण्याची कृती. ही दीर्घ संक्रमणावस्था धार्मिक, तत्त्वज्ञानात्मक, सांस्कृतिक, कलात्मक, राजकीय, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात झालेल्या क्रांतींद्वारे अविष्कृत होते. उदाहरणार्थ, मार्टिन ल्युथर (१४८३- १५४६) कॅथोलिक चर्चनं निषिद्ध ठरवलेल्या ‘सैतानाच्या आवाजा’ला सदसद्विवेकबुद्धीचा आवाज घोषित करून धार्मिक क्षेत्रातील मेंढपाळांची मक्तेदारी मोडीत काढतो आणि ‘स्व’चं पुनरुत्थान करतो. पुनरुत्थान (रेझरेक्शन), कारण मध्ययुगात पाश्चात्त्य समाजाला विसर पडला होता की कोणे एके काळी प्राचीन ग्रीक परंपरेत सॉक्रटिक वळणादरम्यान मनुष्याच्या स्वत्वाचा आविष्कार झालेला होता.

(ब) लुथेरियन क्रांती आणि सॉक्रटिक क्षणाची पुनरावृत्ती : मार्टिन ल्युथर हा स्वत: धर्मशास्त्रांचा अभ्यासक, प्रोफेसर आणि देवभीरू पुरोहित होता. पण सोबतच तो रेनेसाँचं अपत्यदेखील होता. खरंतर, सुरुवातीला ल्युथरने दीर्घ काळ स्वत:च्या आतल्या आवाजाला ‘सैतानचा आवाज’ समजून दमन केलं होतं. त्याच्या अंतर्मनातली कुजबूज सरळसरळ प्रस्थापित धर्मशक्तीच्या विरोधात जात होती. प्रस्थापित धर्मशास्त्र आणि ‘आतला आवाज’ यात भीषण द्वंद्व चालत होतं. शेवटी त्यानं त्याच्या सदसद्विवेकबुद्धीच्या बाजूनं कौल देऊन कॅथोलिक चर्चला सुरुंग लावला आणि धार्मिक क्षेत्रात लुथेरियन क्रांती घडवून आणली. त्यामुळे चर्चनं आखून दिलेल्या कुंपणाला तोडून पूर्वाश्रमीच्या देवभीरू मेंढ्या मेंढपाळाला न जुमानता स्वेच्छेने ‘भरकटायला’ लागण्याचा मार्ग मोकळा झाला. स्वेच्छेने स्वीकारलेली ही ‘भटकी’ अवस्था पाश्चात्त्य आधुनिकतेतील ‘स्वातंत्र्य’ या मध्यवर्ती मूल्याचं द्याोतक आहे. त्यामुळे ‘मानव’ या संकल्पनेचा विस्तार होऊन एकाच वेळी व्यक्तिवाद आणि समाजशीलता उदयास येऊ लागली.

ल्युथरनं दाखविलेलं ऐतिहासिक नैतिक आणि तत्त्वज्ञानात्मक मनोबल म्हणजे सॉक्रेटिक क्षणाची पुनरावृत्ती समजली जाते. खरंतर, पाश्चात्त्य परंपरेत सॉक्रेटिसपूर्व काळातदेखील पायथागोरस, हेराक्लिटस, थेअलिझ, पार्मेनेडिझ सारखे महत्त्वाचे तत्त्वज्ञ होऊन गेले आहेत. मात्र प्रस्थापित साहित्यात सॉक्रेटिसचा उल्लेख पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचा जनक म्हणून केला जातो. सॉक्रेटिस सर्वार्थानं जनक नसला तरी ज्ञानमीमांसा, राजकीय तत्त्वज्ञान आणि नीतीशास्त्राच्या बाबतीत तो प्रारंभबिंदू ठरतो. प्रसिद्ध रोमन तत्त्वज्ञ सिसेरोच्या मते सॉक्रेटिसनं तत्त्वज्ञानाला स्वर्गातून जमिनीवर आणून, लौकिक मानवी व्यवहाराला मध्यवर्ती स्थान देऊन पाश्चात्त्य राजकीय तत्त्वज्ञान आणि नीतिशास्त्राची पायाभरणी केली आहे.

सॉक्रेटिसपूर्व तत्त्ववेत्त्यांचे विषय इंद्रियगोचर भौतिक जगाच्या अंतिम तत्त्वांचा शोध घेणारे असत. त्यामुळे त्यांना ‘फिजिओलोग’ म्हटलं जात असे. म्हणजे भौतिक जगाच्या मूलद्रव्यांचा शोध घेणारे. त्यातल्या त्यात, त्यांची अभिजनवादी ज्ञानात्मक प्रक्रिया एकाकी, बंदिस्त आणि गूढ पद्धतीने चालत असे. सॉक्रेटिसनं मात्र तत्त्वज्ञानाच्या विषयासोबतच पद्धतीशास्त्रातही बदल केला. त्यानं सर्वप्रथम स्वत:च्या अज्ञानाच्या जाणिवेला ज्ञानप्रक्रियेचा प्रारंभबिंदू मानलं. हा जहाल ज्ञानात्मक प्रयोग स्वत:पुरता मर्यादित न ठेवता सॉक्रेटिस प्रस्थापित विद्वानांचं ज्ञान तपासण्याची मोहीम हाती घेतो. प्रस्थापित विद्वजनांच्या ज्ञानाला तो अगोरा (agora) म्हणजे सार्वजनिक अवकाशात खेचत असे. त्याअर्थी प्राचीन ग्रीक परंपरेतील ‘अगोरा’ या संकल्पनेत आधुनिक ‘पब्लिक स्फिअर’ची मुळं दिसून येतात.

सार्वजनिक अवकाशात विवेकाधिष्ठित (logos) पद्धतीशास्त्राचा वापर करून सॉक्रेटिस विद्वानांच्या अंतर्विरोधांवर नेमकेपणाने बोट ठेवत असे आणि त्यांच्या तोंडून त्यांचं अज्ञान वदवून घेत असे. विद्वानांच्या मोनोलॉजिकल म्हणजे आपापल्या मनकी-बात आधारित ज्ञानाला सॉक्रेटिस ‘डायलॉजिकल’ म्हणजे सार्वजनिक तर्काची कसोटी लावत असे. या डॉक्ससफीच्या- म्हणजे प्रस्थापित मतांच्या- सार्वजनिक पडताळणीच्या कृतीत सॉक्रेटिसचं धाडसी राजकीय तत्त्वज्ञान दिसून येतं. दुसऱ्या बाजूला, सॉक्रेटिसनं स्वत:च्या अंतरंगाला देखील डायलॉजिकल विचारशीलतेचा निकष लावलेला दिसतो. उदाहरणार्थ, सॉक्रेटिसच्या खटल्याच्या शेवटी त्याच्या विरोधात मतदान होतं तेव्हा सॉक्रेटिसला आपला अपराध कबूल करून माफी मागण्याची संधी दिली जाते. मात्र तो ठामपणे म्हणतो की माफी मागणं म्हणजे माझ्यातील daemon म्हणजे आतल्या आवाजाशी द्रोह करणं ठरेल. सॉक्रेटिसच्या ‘डायमोन’ या संदिग्ध संकल्पनेचा प्रस्थापित धार्मिक भाषेत ‘सैतानाचा आवाज’ असा नकारात्मक अर्थ लावला जातो. आजच्या दैनंदिन व्यवहारातील भाषेत देखील हाच अर्थ घेतला जातो. पण तत्कालीन संदर्भाच्या परिप्रेक्ष्यात मात्र सॉक्रेटिसच्या ‘डायमोन’चा अर्थ सदसद्विवेकबुद्धी, आतला आवाज आणि दैवी प्रेरणा असा होतो. एकूणच सॉक्रेटिसनं स्वत:ला दैवतीकरणापासून वाचवलं असल्याने त्याच्या ‘डायमोन’ संकल्पनेत प्राचीन ग्रीक परंपरेतल्या ‘स्व’चा तत्त्वज्ञानात्मक अविष्कार दिसतो.

थोडक्यात, नैसर्गिक आणि सामाजिक शक्तींच्या तुलनेत जन्माला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं मनोबल तोकडं ठरतं. त्यामुळे बहुतांशी लोक उपरोक्त अनंतांच्या वाटेनं स्वतंत्रपणे प्रवास करण्याऐवजी प्रस्थापित बहुमताचा निमूटपणे स्वीकार करणं पसंत करतात. प्लेटो लिहितो की, पारंपरिक मतांना चिकटून राहणं मानवी सहजप्रवृत्ती आहे. भ्रमात का असेना लोकांना मानसिकरीत्या सुरक्षित वाटणं अधिक महत्त्वाचं असतं. फक्त भ्रमाची सवय झाली पाहिजे.

याउलट सॉक्रेटिस म्हणतो की, प्रस्थापित मतांना प्रश्नांकित न करता त्यांचा स्वीकार करत जगणं मनुष्याला अशोभनीय आहे.

मार्टिन ल्यूथरचे व्यक्तिचित्र (१५२९), चित्रकार ल्युकास करान्च