– कर्नल अभय बाळकृष्ण पटवर्धन (निवृत्त)

एमक्यू नाइन रीपर प्रिडेटर ड्रोन्स हा विनाचालक हवाई वाहनाचा (अनमॅन्ड एरियल व्हेईकल) अत्यंत प्रगत प्रकार आहे. जनरल ॲटॉमिक एरोनॉटिकल सिस्टिम ही अमेरिकी कंपनी हे लष्करी ड्रोन्स निर्माण करते. हे ड्रोन २४० नॉट्स वेगाने आणि ५० हजार फूट उंचीपर्यंत उड्डाण करू शकतात. त्यांचे वजन १७४० किलो असून त्यापैकी ३१४ किलो वजन ड्रोनचे आणि १३६१ किलो बाह्य सामुग्रीचे असते. हे ड्रोन सलग २७ तास (स्थळ /वायुसेना रीपर व्हर्जन) आणि ३५ तास (नौसेना सी गार्डियन व्हर्जन) हवेत राहू शकतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हे ड्रोन आपल्या ताफ्यात असले पाहिजे ही मागणी भारतीय लष्कर अनेक वर्षांपासून करत आहे. पण ‘मेक इन इंडिया’अंतर्गत ते देशातच तयार करावेत, हा वर्तमान शासनाचा आग्रह असल्यामुळे ही मागणी बाजूला ठेवण्यात आली. ‘सरकार लवकरच लष्कराची ही मागणी मान्य करेल’ अशा वावड्या अधूनमधून उठत आणि लष्कराच्या आशा परत एकदा पल्लवित होत. पण, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि अमेरिकन संरक्षण सल्लागार जेक सलिव्हन यांच्या दिल्लीत नुकत्याच झालेल्या मीटिंगनंतर या वावड्या परत सुरू झाल्या आणि शेवटी १९ जून २०२३ रोजी संरक्षणमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत डिफेन्स ॲक्विझिशन काऊन्सिलनी २९ हजार कोटी रुपयांच्या ३१ एमक्यू ९ रीपर प्रिडेटर हाय अल्टीट्युड लाँग अ‍ॅण्ड्यूरन्स रीपर/सी गार्डियन ड्रोन व्यवहारांना मान्यता दिली. याला कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीची लगेचच मंजुरी मिळाली नाही, पण येत्या काही दिवसांत ती मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सध्याच्या अमेरिकी दौऱ्यात या करारावर स्वाक्षऱ्या होतील असा संरक्षणतज्ज्ञांना विश्वास आहे. तसे झाल्यास, एमक्यू ९ रीपर/सी गार्डियन प्रिडेटर ड्रोन्स् लवकरच लष्करात येतील.

हेही वाचा – बोलाचीच ‘शाश्वत शेती’?

यापैकी काही ड्रोन भारतात तयार होतील. भारत फोर्ज लिमिटेड आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या कंपन्या या निर्मितीत अग्रेसर असतील. तसेही भारत फोर्ज आणि जनरल ॲटॉमिक्स एरोनॉटिकल सिस्टिम यांनी जानेवारी २३ मध्ये या ड्रोन्सचे मेन लँडिंग गियर काम्पोनंटस्, सब असेंब्लीज आणि असेंब्लीज निर्मितीसंबंधीच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. त्याचप्रमाणे, एचएएल आणि जनरल ॲटॉमिक्स एरोनॉटिकल सिस्टिम यांनी या ड्रोन्ससाठी मेंटेनन्स, रिपेयर अँड ओव्हर ऑल फॅसिलिटी (एमआरओ), यांना चालना देणारे टीपीई ३३१ -५ इंजिने बनवण्यासंबंधी करारावर एरो इंडिया शो २०२३ दरम्यान स्वाक्षऱ्या केल्या आहेत. या ३१ ड्रोन्सपैकी १० ड्रोन्स हत्याराविना लगेच भारतात येतील. उर्वरित २१ वर, लेसर गायडेड बॉम्ब आणि मिसाइल असतील. भारतीय नौसेनेने मे, २०२० च्या गलवान घुसखोरीनंतर दोन एमक्यू ९ रीपर प्रिडेटर ड्रोन्स लिझवर घेतले होते. नौसेना आजही तेच वापरते आहे. मागील २० महिन्यांत यांनी प्रत्येकी दहा हजार तासांचे उड्डाण पूर्ण केले आहे. गलवान घटनेनंतर भारतीय सेनेने यांचा वापर लडाखमधील चिनी जमाव आणि चिनी सैन्याच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी केला होता.

एमक्यू ९ रीपर/सी गार्डियन प्रिडेटर ड्रोन्स् हे अमेरिकन एअर फोर्स/संरक्षण विभागाच्या भात्यातील ब्रह्मास्त्र आहे, असे म्हटल्यास वावगे होणार नाही. एमक्यू ९ रीपर/सी गार्डियन प्रिडेटर ड्रोन्स् ही अति सुधारित आवृत्ती आहे. याची निर्मिती १९९० मध्ये सुरू झाली. हे शस्त्र त्याचा टिकाऊपणा, हाय अल्टीट्युड सर्व्हेलंस आणि स्ट्राईक कॅपेबिलिटीसाठी विख्यात आहे. इंटलिजन्स गॅदरिंग, सर्व्हेलंस आणि रिकॉनिसन्स (आयएसआर) ही याची प्राथमिक ध्येये आहेत. त्यात, असंख्य सेन्सर्स आणि कॅमेरे असल्यामुळे हा ड्रोन त्याच्या लक्ष्याची ‘रियल टाइम इमेजरी’ घेऊन त्वरित पृथ:करणासाठी त्याच्या ग्राउंड कंट्रोल स्टेशनकडे पाठवतो. या पृथ:करण क्षमतेमुळे मिलिटरी ऑपरेशन्स, बॉर्डर सर्व्हेलन्स आणि काउंटर टेरर स्ट्राईक्समध्ये अतिशय मोलाची मदत मिळते. प्रिडेटर ड्रोन्स, सहा इंचाच्या अचूकतेने लक्ष्यभेद (प्रिसिजन स्ट्राईक) करतात. यावर एजीएम ११४ हेल फायर मिसाइल्स ते जीबीयू १२ पेव्ह वे टू लेसर गाईडेड बॉम्बसारखी विध्वंसक शस्त्र नेली जातात. अमेरिकेने कुवेत, अफगाणिस्तान, इराक आणि सिरियात प्रिडेटर ड्रोनचा अतिशय अचूक वापर केला होता. त्याचा ‘किल रेट’ ९९.५ टक्के होता. आता ती हेच ड्रोन युक्रेनलाही देणार आहे.

माहिती गोळा करण्याची क्षमता (इंटलिजन्स गॅदरिंग), सतत टेहाळणी (पर्सिस्टंट सर्व्हेलन्स), शत्रूवर अत्यंत अचूक मारा (टार्गेटेड प्रिसिजन स्ट्राईक), मोठी उड्डाण क्षमता (लाँग अ‍ॅण्ड्यूरन्स) आणि विविध हत्यारे नेण्याची क्षमता यामुळे प्रिडेटर ड्रोन शत्रूचा काळ असल्याचे सिद्ध होत आहेत. शत्रूचे नेटवर्क्स, कारवाया शोधून त्यांना उद्ध्वस्त करत असतानाच हे ड्रोन्स ग्राउंड फोर्सेसना ‘क्लोज एअर सपोर्ट’ही देतात. अशा सपोर्टसाठी जवळपास सलग २७ तास हवेत राहण्याची क्षमता या ड्रोन्समध्ये आहे. चीनकडे, सईहाँग ४, विंग लूंग २ आणि इतर शस्त्रे वाहून नेणारी ड्रोन्स आहेत आणि त्यांनी ती मुबलक प्रमाणात पाकिस्तानला दिल्यामुळे भारतासाठी असंतुलित सामरिक परिस्थिती (असिमिट्रिकल स्ट्रॅटेजिक सिच्युएशन) निर्माण झाली आहे. त्याला शह म्हणून, भारताला एमक्यू ९ रीपर/सी गार्डियन प्रिडेटर ड्रोन्सची नितांत आवश्यकता आहे.

एमक्यू ९ रीपर/सी गार्डियन प्रिडेटर ड्रोनस् लष्करात दाखल झाल्यानंतर भारताला अनेक सामरिक फायदे मिळतील. त्यात:-

१) कट्टर शत्रू असलेल्या चीन व पाकिस्तानसमवेत सात देशांशी आंतरराष्ट्रीय सीमा असणाऱ्या भारताला; सीमापारहून होणारा दहशतवादी हल्ला, घुसखोरी, तस्करी आणि सीमावादासारख्या आव्हानांना सदैव तोंड द्यावे लागते. प्रिडेटर ड्रोन्समुळे सीमेवर/समुद्रात टेहाळणी करत लक्ष ठेवणे (बॉर्डर/सी सर्व्हेलंस) सोपे होईल, तेथून होणाऱ्या धोक्यांची पूर्वसूचना मिळेल आणि लष्कराला सदैव सद्यपरिस्थितीची खरी जाणीव होत राहील.

२) सततच्या टेहळणीमुळे सीमेच्या आत, सीमेवर व सीमापारहून तसेच समुद्रात होणाऱ्या दहशतवादी कारवायांवर लक्ष ठेवणे शक्य होईल.

३) भारताच्या सात हजार किलोमीटर लांबीच्या सागरी सीमेवर आणि समुद्रकिनाऱ्यांवर टेहळणीद्वारे लक्ष ठेवून सागरी सुरक्षेची हमी घेता येईल. सततच्या टेहळणीमुळे समुद्रकिनाऱ्यांवर/समुद्रातून होणारी घुसखोरी, तस्करी, समुद्र लुटीसारख्या अवैध कारवायांवर आळा घालता येईल. त्याचप्रमाणे समुद्रातील आपत्ती निवारण करणेदेखील सोपे होईल.

४) हानीचे वास्तव अनुमान, पीडित इलाक्यावर सतत नजर, पीडितांची सुटका आणि त्यांना मदत; देशांर्गत दुष्काळ, पूर, भूकंप, चक्रीवादळ यांच्यासारख्या नैसर्गिक आपत्तींचे निवारण करण्यात प्रचंड मदत होईल.

५) भारतीय लष्कराच्या सामरिक सामर्थ्याची वृद्धी तसेच चीन आणि पाकिस्तानचे मनसुबे असफल करण्याच्या दृष्टिकोनातून लष्कर बलदंड बनेल.

६) एमक्यू ९ रीपर/सी गार्डियन प्रिडेटर ड्रोन; लष्कराला चीन व पाकिस्तानी सेनेच्या सीमेवरील आणि त्यांच्या सीमेलगत क्षेत्रातील सामान्य व सामरिक हालचालींवर (नॉर्मल/स्ट्राटेजिक मुव्हमेंट्स) तसेच चिनी नौदलाच्या लढाऊ जहाजांच्या हिंद महासागरातील हालचालींवर (फ्लिट मुव्हमेंट) बारीक नजर ठेवण्यात मदत/सहाय्य करतील.

७) या ड्रोन्समध्ये गरजेप्रमाणे; वाईड एरिया मेरिटाईम रडार्स, ऑटोमॅटिक आयडेंटिफिकेशन सिस्टिम, इलेक्ट्रॉनिक सपोर्ट मेझर्स, सेल्फ कंटेंड अँटी सबमरीन वॉर फेयर किट माऊंट केले जातात. आपण या हत्यारांच्या सुट्या भागांची निर्मिती भारतात व्हावी हा आग्रह केला असता, ६० टक्के भाग भारतात निर्माण करण्यावर एकमत झाले आहे. यामुळे भारतात अनेक छोटे कारखाने स्थापन होऊन अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

८) भारताच्या अंतर्गत ड्रोननिर्मिती प्रकल्पाला अपेक्षित यश मिळालेले नाही. निशांत मिलिटरी ड्रोन निर्मितीची सुरुवात करून भारताने या क्षेत्रात १९९०च्या मध्यात पाऊल टाकले खरे, पण तो प्रयत्न अयशस्वी झाला. त्यामुळे भारताने आपला पहिला मिलिटरी ड्रोन अमेरिकेकडून २००० मधे कारगिल युद्धानंतर आयात केला. दोन दशकांहून जास्त काळ लोटल्यावर या प्रकल्पाच्या अडचणींवर आपल्या डीआरडीओ आणि मिलिटरी इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्सला मात करता आलेली नाही. प्रिडेटरसारखे मीडियम/हाय अल्टीट्युड लाँग अ‍ॅण्ड्यूरन्स ड्रोन तर दूरच पण आपण साधे फंक्शनल मिलिटरी ड्रोनही निर्माण करू शकलेलो नाही.

९) नाविक (NavIC) हा सेकंड जनरेशन उपग्रह अवकाशात पाठवून भारताने स्वत:ची जीपीएस सिस्टिम कार्यान्वित केली आहे. त्यामुळे येणाऱ्या प्रिडेटर ड्रोन्सना जीपीएसद्वारे आपल्या टार्गेट्सपर्यंत पोहोचण्यात सुविधा मिळेल.

डोक्यावर चीन आणि पाकिस्तानचा धोका असताना; एमक्यू ९ रीपर प्रिडेटर ड्रोन्स भारतीय सुरक्षा प्रणाली आणि सामरिक सज्जतेत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतील यात शंकाच नाही. हा आपल्या ताफ्यातील खरा ‘गेम चेंजर’ सिद्ध होईल. २९ हजार कोटी रुपयांचा हा व्यवहार, खास करून चीन सीमेवरील भारतीय टेहाळणी क्षमतेत लक्षणीय वृद्धी करेल. या एमक्यू ९ रीपर प्रिडेटर ड्रोन्सपैकी १५ भारतीय नौदल आणि प्रत्येकी आठ पायदळ आणि वायुसेनेच्या हत्यारांच्या साठ्यात जातील. यामुळे आपल्या पश्चिम व उत्तर सीमेला, हिंद महासागरातील लक्ष्यांसाठी आवश्यक मारक क्षमतेला (स्ट्राईक कॅपेबिलिटी) आणि लांब पल्ल्याच्या टेहाळणी क्षमतेला (लाँग रेंज सर्व्हेलंस कॅपेबिलिटी) अभूतपूर्व बळ मिळेल. भारतीय लष्करात; एअर टू ग्राउंड मारा करणाऱ्या, स्मार्ट बॉम्ब असणाऱ्या आणि सलग ३५ तास आकाशात राहू शकणाऱ्या, फायटर साइज ड्रोनची वानवा होती. ती एमक्यू ९ रीपर प्रिडेटर ड्रोनस् भरून काढतील.

हेही वाचा – युगांडातील दहशतीची भारतालाही झळ

भारतीय संरक्षणतज्ज्ञ आणि लष्कर चिनी व पाकिस्तानी विनाचालक हवाई वाहनाचा सामना करण्यासाठी एमक्यू ९ रीपर प्रिडेटर ड्रोन घेण्यासाठी उतावळे झाले होते. २०१९च्या लडाखमधील चिनी घुसखोरीनंतर बॉर्डर सर्व्हेलन्ससाठी आणि हिंद महासागरातील चिनी युद्ध हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी यांची नितांत आवश्यकता आहे. मल्टी रोल ऑपरेशन्ससाठी जगविख्यात असलेल्या एमक्यू ९ रीपर प्रिडेटर ड्रोन व्यवहारावर स्वाक्षरी करून पंतप्रधान, भारतीय लष्कराच्या मारक व टेहाळणी क्षमतेला अनेक पटींनी वाढवतील.

(abmup54@gmail.com)

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What are the benefits of mq nine reaper predator drones for india ssb