अक्षय जोशी

अल्फाबेट (गुगलची पालक कंपनी), ॲपल, मेटा आणि एनविडिआ, या कंपन्यांमध्ये एक गोष्ट समान आहे : या सर्व कंपन्या अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅलीत आहेत. जागतिक तंत्रज्ञानविषयक नवोद्योगांची (स्टार्ट-अप) आणि अभिनवतेची मातृभूमी म्हणता येईल असा हा प्रदेश. भारतीय संदर्भात बंगळुरू हे नवोद्योगांचं केंद्र मानलं जाण्याची शक्यता आहे, पण अमेरिकेसारखं भारतात असं एकच एक केंद्र दाखवता येत नाही. भारतात नवोद्योगांचा विस्तार दिल्ली-एनसीआर, हैदराबाद, मुंबई, पुणे आणि इतर लहान शहरांमध्येही झाला आहे.

ब्लूम व्हेन्चर्स ही व्हेन्चर कॅपिटलच्या क्षेत्रात कार्यरत असणारी भारतीय कंपनी आहे. ते भारतातील संपूर्ण नवोद्योगांच्या जाळ्याला ‘इंडस व्हॅली’ असं संबोधतात. दर वर्षी ते ‘इंडस व्हॅली रिपोर्ट’ प्रकाशित करतात. त्यामध्ये भारतीय नवोद्योगांच्या सद्यस्थितीबद्दल काही मार्मिक निरीक्षणं नोंदवलेली असतात. प्रस्तुत लेखात आपण २०२५ या वर्षातील ‘इंडस व्हॅली रिपोर्ट’मधून समोर येणाऱ्या काही कळीच्या निष्कर्षांची चर्चा करणार आहोत. त्यातून आपल्याला भारतीय नवोद्योगांची परिस्थिती अधिक चांगल्या रीतीने समजून घ्यायला मदत होईल.

भारतीय उपभोग क्षेत्राविषयीचं आकलन

या अहवालातील भारतीय उपभोक्ता बाजारपेठेचं आकलन मांडणारा भाग सर्वांत कळीचा आहे. सदर अहवालाच्या लेखकांनी उपभोगविषयक आकृतिबंधांच्या आधारे भारताचं तीन क्षेत्रांमध्ये विभाजन केलं. ही संकल्पना मुळात किशोर बियानी (बिग बझारचे संस्थापक) यांनी मांडली. ते म्हणतात, “उपभोगविषयक पातळ्यांच्या आधारे भारताचं भारत-१, भारत-२ व भारत-३ अशा तीन भागांमध्ये विभाजन करता येतं. भारत-१ हा उपभोक्ता वर्ग आहे; घरकामासाठी मदतनीस ठेवणारे सर्वच उपभोक्ता वर्गात येतात, असं मी मानतो. इथे उपभोग या शब्दाचा अर्थ केवळ साधा उपभोग असा नसून काहीएक मूल्यवाढ करणारा उपभोग (प्राथमिक गरजांपलीकडच्या गोष्टींवरील खर्च) असा आहे. भारत-२ हा सेवक वर्ग आहे, तो आपलं (भारत-१) जगणं अधिक सुकर करतो- उदाहरणार्थ, मदतनीस, शिपाई, रखवालदार, इत्यादी. भारत-१ आणि भारत-२ यांचं परस्परांशी असणारं गुणोत्तर एकास तीन-साडेतीन इतकं आहे. दुर्दैवाने भारत-१ मधील लोक भारत-२ मधील लोकांना प्राथमिक गरजांपलीकडच्या उत्पादनांचा उपभोग घेण्यासाठी वापरता येईल इतपत पैसा देत नाहीत. यानंतर भारत-३ हा भाग येतो; यामध्ये शेतमजूर येतात आणि सरकारी सहाय्यावर जगणारे लोक येतात.’ ब्लूम व्हेन्चर्सच्या अहवालकर्त्यांनी किशोर बियानींच्या या मांडणीचा विस्तार केला. याचा सारांश मी पुढील तक्त्याद्वारे देतो आहे.

भारत ही विभिन्न आर्थिक वर्गांची एक महाकाय रचना आहे. वरील तीन विभाग समजून घेतल्यास आपल्याला भारतीय अर्थव्यवस्थेचा कल अधिक चांगल्या रीतीने समजून घेता येईल.

यातील एक मुद्दा नोंदवणं आवश्यक आहे : भारत-२ व भारत-१ या विभागातील लोक भारत-३ मधील ॲपही वापरतात. त्याचप्रमाणे भारत-२ मधील ॲप भारत-१ मधील लोक वापरतात. परंतु, यात उलटा क्रम मात्र दिसत नाही. भारत-२ व भारत-३ या विभागातील लोक भारत-१ मधील ॲप वापरत नाहीत. भारतातील ९० टक्के (सुमारे १०० कोटी) लोकांकडे प्राथमिक गरजांव्यतिरिक्त इतर गोष्टींवर खर्च करण्याची आर्थिक ताकद नाही. केवळ सर्वोच्च स्तरावरील १० टक्के (१३ ते १४ कोटी) लोकच अर्थव्यवस्थेचे व उपभोगाचे प्राथमिक चालक आहेत.

भारत-१चं दृढ होत जाणं

भारत-१ मधील लोकांची संख्या वाढत नसल्याचं महत्त्वाचं निरीक्षण या अहवालात नोंदवलं आहे. उलट, भारत-१, भारत-२ आणि भारत-३ यांमधील तफावत विस्तारते आहे. निराळ्या शब्दांत सांगायचं तर, श्रीमंत आणखी श्रीमंत होत आहेत पण श्रीमंतांची संख्या वाढतं नाही आहे. उदाहरणार्थ, भारतातील चारचाकी गाड्यांची विक्री फारशी वाढलेली नाही. याचा अर्थ, भारतात चारचाकी गाड्या विकत घेणाऱ्या उपभोक्त्यांची कमाल मर्यादा गाठली गेली आहे. त्याचप्रमाणे झोमॅटोवरील सरासरी मासिक सक्रिय वापरकर्त्यांची संख्याही होती तिथेच राहिली आहे, ती अपेक्षेप्रमाणे वाढलेली नाही. देशांतर्गत हवाई वाहतूक करणाऱ्या प्रवासीसंख्येच्या बाबतीतही अशीच कुंठितावस्था दिसून येते. कोव्हिड-१९ साथीच्या आधी होती तितकीच प्रवासीसंख्या आहे. याउलट, एसयूव्ही कार व इतर चैनीच्या वस्तूंची विक्री वाढली आहे. उदाहरणार्थ, किफायतशीर घरांच्या तुलनेत महागड्या घरांची विक्री वाढली. कोव्हिड-१९च्या जागतिक साथीतून भारतीय अर्थव्यवस्था सावरली तरी त्यातील प्रत्येक क्षेत्रासाठी हे सावरणं अत्यंत भिन्न प्रकारचं असेल (K-shaped recovery), ही अनेक अर्थशास्त्रज्ञांनी व्यक्त केलेली भीती प्रत्यक्षात येते आहे.

अर्थव्यवस्थेचा हा कल लक्षात घेऊन नवोद्योगांनी समाजातील संपन्न घटकावर लक्ष केंद्रित केलं आहे. त्यामुळे विविध उत्पादनं विशेष रूपांमध्ये सादर केली जाण्याकडे कल वाढलेला दिसतो. उदाहरणार्थ, ५०० रुपये ते दहा हजार रुपये या दरम्यान किंमत असलेल्या ‘प्रिमियम’ आयुर्वेदिक उत्पादनांची विक्री करणारा ‘फॉरेस्ट इसेन्शिअल्स’ किंवा आरोग्यविषयक निर्देशांकांचा माग ठेवणाऱ्या आणि कमीतकमी २८ हजार रुपये इतकी किंमत असलेल्या फिटनेस रिंगचे निर्माते ‘अल्ट्राह्यूमन’ यांसारख्या भारतीय ब्रॅण्डची संख्या वाढते आहे.

वेगवान पोहोचवणीची (क्विक-कॉमर्स) ऑनलाइन सेवा देणाऱ्या कंपन्यांची आणि त्यांच्या कोठारांची संख्याही वाढत असल्याचं दिसतं. ‘ब्लिन्किट’, ‘इन्स्टामार्ट’ आणि ‘झेप्टोस’ यांसारख्या कंपन्या दहा मिनिटांमध्ये वस्तू घरपोच मिळेल, असं आश्वासन देतात. ही पोहोचवणीची प्रक्रिया कोठारांच्या (black stores) माध्यमातून पार पडते. या दुकानांची कोठारं मोठ्या प्रमाणात वस्तू साठवून ठेवतात आणि तिथून वेगवान पोहोचवणीची सेवा पुरवली जाते. दहा मिनिटांमध्ये वस्तू संबंधित ग्राहकापर्यंत पोहोचण्यासाठी या कंपन्या अनेक शहरांमध्ये अशी कोठारं उघडतात. ब्लिंन्किट सध्या ५०० हून अधिक कोठारं चालवते. या कंपन्यांनी किराणा सामान ग्राहकाला घरपोच द्यायला सुरुवात केली. परंतु, नफ्याचा वाटा वाढवण्यासाठी या कंपन्या एसीपासून चश्म्यांपर्यंत सगळ्या वस्तू घरपोच पुरवतात.

भारतात वस्तूपोहोचवणी करणारे कामगार कमी वेतनावर मिळत असल्यामुळे आणि पाश्चात्त्य देशांपेक्षा भारतीय शहरांमधील लोकसंख्येची घनता जास्त असल्यामुळे ऑनलाइन माध्यमातून काम करणाऱ्या या कंपन्या भारतात परिणामकारक ठरतात. प्रत्येक भागातील कोठाराच्या वा केंद्राच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना ही परिस्थिती उपयोगी पडते. या क्विक-कॉमर्समुळे जुन्या किराणा दुकानांना मोठ्या प्रमाणात फटका बसला. या दुकानांमधील ग्राहकांची संख्या कमी झाली, तसंच सरासरी विक्रीवर नकारात्मक परिणाम झाल्यामुळे त्यांची नफादायकताही खालावली. विशेषतः महानगरांमध्ये हे चित्र दिसतं.

अशा रीतीने ऑनलाइन खरेदी करणारा बहुतांश उपभोक्ताही भारत-१ या विभागातील आहे. वेगळ्या शब्दांत सांगायचं तर हा व्यापार उच्चस्तरावरील १० टक्के लोकांवर लक्ष केंद्रित करणारा आहे. इतर क्षेत्रांप्रमाणे हे क्षेत्रही लवकरच कमाल मर्यादेपर्यंत पोचेल. दरम्यान, कमी वेतनावर, कोणतंही नियमन नसलेल्या अवकाशात काम करणारे कामगार (भारत-२) या क्विक-कॉमर्स क्षेत्राचा कणा आहेत. किराणा दुकानांवर अशा व्यापाऱ्याचा नकारात्मक परिणाम होत असून त्यांच्या उपजीविकेला याचा मोठा फटका बसेल. वाढत्या विषमतेचं हे कठोर वास्तव आहे!

भारत-२ व भारत-३ यांची अवस्था

काही ब्रँडनी भारत-२ मधील उपभोक्त्यांपर्यंत पोहोचण्यातही यश मिळवलं आहे. भारतीय उपभोक्ता वर्ग मूल्याविषयी जागरूक असतो. उदाहरणार्थ, माझ्या मित्राने विकत घेतलेल्या नेटफ्लिक्सचाच वापर मी अजूनही करतो. आपल्यापैकी अनेकांचा वस्तूंचा वापर असा असतो. आपल्याला एखाद्या गोष्टीत काही मूल्य आढळलं तरच आपण ती वस्तू विकत घेतो. आधी नमूद केल्याप्रमाणे भारत-२ मधील लोकांची प्राथमिक गरजांव्यतिरिक्त खर्च करण्याची क्षमता मर्यादित आहे, आणि सर्व भारतीय उपभोक्त्यांप्रमाणे तेही मूल्याविषयी जागरूक आहेत. त्यामुळे भारत-२ मध्ये यशस्वी ठरेल असा ब्रँड उभा करणं हे उल्लेखनीय यश आहे. सदर अहवालात या संदर्भातील दोन लक्षणीय दाखले दिले आहेत. भारतातील बहुसंख्य लोकांच्या दृष्टीने मानसिक आरोग्य ही अजूनही निषिद्ध मानली जाणारी गोष्ट आहे. शिक्षित व अभिजन वर्गांमध्ये याबाबत जागरूकता वाढते आहे. परंतु, भारत-२ व भारत-३ या विभागांमध्ये याबाबतची जागरूकता फारशी नाही. ‘ॲस्ट्रोटॉक’ हे ॲप सकृत्दर्शनी एखाद्या ज्योतिषाशी फोनवरून संभाषणाची सोय करून देते आणि तो ग्राहकांच्या भविष्याविषयी भाकितं नोंदवतो. भारतीय व्यक्तीसाठी सामाजिकदृष्ट्या स्वीकारार्ह असणाऱ्या या अवकाशात संवादाची सेवा उपलब्ध करून देऊन लोकांना भावनांचा भार हलका करायला हे ॲप सोयीचं वाटत असल्याचं अहवालात नमूद केलं आहे. ॲस्ट्रोटॉकमध्ये दहा रुपये ते २०० रुपये, इतकं कमी शुल्क आकारलं जातं. भारत-२ मधील लोकांची सुरक्षित अवकाशाची अपुरी गरज भागवण्याचं आणि त्याभोवती व्यवसाय उभारण्याचं काम या ब्रँडने केलं. त्याचप्रमाणे मूल्याविषयी जागरूक असणाऱ्या भारतीय उपभोक्त्यावर लक्ष केंद्रित करून विविध उत्पादनांना भारतीय रूप दिलं जाताना दिसतं. उदाहरणार्थ, रेड-बुल या १०५ रुपये किंमत असणाऱ्या शीतपेयाचं भारतीय रूप म्हणून २० रुपयांमध्ये स्टिंग उपलब्ध आहे.

एका विशिष्ट वर्गाच्या स्वत:ला विश्वगुरु समजण्याच्या अवडंबरातून हल्ली भारत चीनच्या बरोबरच आहे हे दाखवण्याच्या प्रघात वाढत चालला आहे. पण एकंदरीत या अहवालातून सूक्ष्मपणे पाहिल्यास भारतास चीनची बरोबरी करण्यास अजूनही अवकाश आहे असे लक्षात येईल. वरच्या वर्गातील दहा टक्केच लोकांमध्ये बंदिस्त झालेला अर्थव्यवहार, बहुतांश उपभोग व्यवहाराने संचलित होणारी अर्थव्यवस्था, घटते बचत दर आणि वाढता कर्जबाजारीपणा भारतीय या अर्थव्यवस्थेच्या मर्यादा दर्शवत आहेत.

अर्थव्यवस्थेतील मूलभूत दोष निवारणे आणि भारतासाठी नवोद्योग निर्माण करणे हाच बहरणाऱ्या सिलिकॉन व्हॅलीशी स्पर्धा करू शकणाऱ्या इंडस् व्हॅलीचा मार्ग आहे.

akshayjoshi6090@gmail.com