हवामान, वातावरण आणि पाणी यावर भाष्य करणारी अधिकृत जागतिक हवामानशास्त्र संघटना (डब्ल्यूएमओ) ही एक आंतरसरकारी संघटना आहे जी २३ मार्च १९५० रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या व्यवस्थेतून तिची स्थापना झाली. ही संघटना संयुक्त राष्ट्रांची एक विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे. आंतरराष्ट्रीय हवामानशास्त्र संस्था (आयएमओ) या नावाने एक अशासकीय स्वयंसेवी संस्था १८७३ सालापासून कार्यरत होती. या संस्थेचे २३ मार्च १९५० रोजी जागतिक हवामानशास्त्र संघटनेत रूपांतर झाले. या महत्त्वपूर्ण घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी २३ मार्च रोजी एक विशिष्ट संकल्प विषय घेऊन हवामान दिवस जागतिक स्तरावर साजरा केला जातो.

२०२५ सालाचा विषय आहे ‘हवामानाच्या पूर्वसूचनांमधील अंतर सर्वांनी मिळून मिटविणे’. हा विषय हवामान, वातावरण व पाणी यांच्या संबंधींच्या आपत्तीजनक घटनांचे पूर्वानुमान आणि धोक्यांचे इशारे देणाऱ्या संस्था, संघटना व सामान्य जनता यांच्या आपापसातील सहयोगाचे महत्त्व अधोरेखित करतो. जागतिक हवामानशास्त्र संघटनेचे एकूण १९३ सदस्य आहेत ज्यामध्ये १८७ देश व सहा राज्यांचा (टेरिटरीज) यांचा समावेश आहे. या संघटनेच्या सर्व सदस्य देशांच्या व राज्यांच्या हवामानशास्त्र, जलशास्त्र व तत्सम सेवांमधील सहकार्य वृध्दिंगत करून मानवी जीवन सुरक्षित करणे, जनतेचे नैसर्गिक आपत्तींपासून संरक्षण करणे तसेच मानवी हस्तक्षेपाचे पृथ्वीवरच्या वातावरणावर होत असलेले विपरीत परिणाम रोखणे, त्यासाठी जनजागृती करणे हे या सहयोगाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

जागतिक हवामानशास्त्र संघटनेला २३ मार्च २०२५ रोजी ७५ वर्षे पूर्ण झाली. हा अमृतमहोत्सवी सोहळा संघटनेचे सचिवालय तसेच जगभरातील १९३ सदस्य देश व राज्ये साजरा करत आहेत. या सोहळ्याचा विषय आहे ‘विज्ञानासाठी कार्य’. ७५ वर्षांच्या वाटचालीत जागतिक हवामानशास्त्र संघटनेने हवामानशास्त्र, जलशास्त्र आणि भूभौतिकशास्त्र या क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करून प्रगतीदर्शक कामगिरी केलेली आहे. त्यात सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या संघटनेने तिच्या सदस्य देशांना व राज्यांना आंतरराष्ट्रीय सहकार्याची मार्गदर्शक चौकट आखून दिली आहे. जागतिक हवामानशास्त्र संघटना वैज्ञानिक माहिती तिच्या राष्ट्रीय सेवा विभागाद्वारे आणि सदस्य देशांच्या व राज्यांच्या संशोधन व सेवा संस्था यांच्या संपर्कजाळ्याद्वारे पोहचवत असते. यामध्ये हवामानाच्या घटकांच्या नोंदी, हवेचे पूर्वानुमान, हवामान विश्लेषण अहवाल आणि शाश्वत सामाजिक व आर्थिक विकासासाठीची धोरणे यांचा समावेश असतो. यासाठी नैसर्गिक आपत्तींच्या धोक्यांमध्ये घट, हवामान सेवांसाठी जागतिक धोरणात्मक मार्गदर्शन, एकात्मिक निरीक्षण प्रणालीचा विकास, हवाई उड्डाण हवामान सेवा, ध्रुवीय व पर्वतीय क्षेत्रासाठी हवामान सेवा, क्षमता विकास आणि शासन या महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागतिक हवामानशास्त्र संघटनेने धोरणात्मक योजना आखल्या आहेत.

हवामान बदलाचे वाढते धोके लक्षात घेऊन जागतिक हवामानशास्त्र संघटनेने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या कार्याच्या भूमिकेत योग्य ते बदल केले आहेत. यामध्ये समाजाचे स्वास्थ्य व कल्याण यासाठी प्रत्येक देशाच्या हवामानशास्त्र, जलशास्त्र व भूभौतिकशास्त्र यासंबंधीच्या राष्ट्रीय सेवा व संशोधन संस्थांच्या योगदानाला महत्त्व दिले आहे. नैसर्गिक आपत्तींमुळे होणारी जीवितहानी टाळण्यासाठी, जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि त्यांचे भवितव्य उत्तम राखण्यासाठी जागतिक हवामानशास्त्र संघटनेचे कार्य उपयुक्त ठरले आहे.

संघटना हवामान बदलाच्या समस्येवर मात करण्यासाठी हवामान, वातावरण, पाणी आणि पर्यावरण यांचा एकत्रितपणे विचार करून कार्य करण्यामध्ये जागतिक मार्गदर्शकाची भूमिका बजावते. परिणामकारक पूर्वानुमान प्रणाली तयार करण्यासाठी हवेतील घटकांच्या क्लिष्ट आंतरक्रिया समजून घेणे महत्त्वाचे असते. आता पूर्वानुमानाच्या तंत्रज्ञानात बरीच प्रगती झाली आहे. हे तंत्रज्ञान अविकसित आणि विकसनशील देशांपर्यंत पोहचवणे हे जागतिक पातळीवर सुरक्षा व आर्थिक स्थैर्य निर्माण करण्यासाठी महत्त्वाचे आहे. हे महत्त्व जागतिक हवामानशास्त्र संघटनेने आपल्या कार्याने सिद्ध केले आहे. जागतिक हवामानशास्त्र संघटनेच्या सदस्य देशांनी व राज्यांनी निरीक्षण प्रणालीचे जाळे निर्माण केले आहे आणि त्याद्वारे समर्पण वृत्तीने हवेच्या घटकांच्या नोंदींची देवाणघेवाण करून उत्तम दर्जाचे पूर्वानुमान तयार करण्यात व ते जलदगतीने पुरवण्यात प्रगती केली आहे. या कार्यात सातत्यही राखलेले आहे.

हवामान बदलांवर मात करण्यासाठीचे विशेष प्रयत्न

जागतिक हवामानशास्त्र संघटनेने पहिली जागतिक हवामानशास्त्र परिषद स्वित्झर्लंड मधील जिनिव्हा शहरात १२ आणि १३ फेब्रुवारी १९७९ रोजी आयोजित केली होती. त्यात मानवनिर्मित हवामान बदलांवर प्रथमच चर्चा झाली. या चर्चेनुसार हवामान बदलाच्या समस्येवर मात करण्यासाठी सर्व सदस्य देश व राज्ये यांच्यासाठी मार्गदर्शक धोरण ठरवणारे जागतिक हवामान कार्यक्रम आणि जागतिक हवामान संशोधन कार्यक्रम तयार झाले. याचे श्रेय जागतिक हवामानशास्त्र संघटना व १९७२ साली सुरू झालेल्या संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमास संयुक्तपणे मिळते.

हवामानातील बदल आंतरराष्ट्रीय पातळीवर अधिकारवाणीने वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध करून त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी आंतरराष्ट्रीय करार, नियमावली, परिषदा, संयुक्त कार्यक्रम इत्यादींची निर्मिती करण्यात आली. यामध्ये तीन करार (प्रोटोकॉल/ॲग्रीमेंट) अतिशय महत्त्वाचे आहेत.

(१) ओझोन स्तर वाचवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर करण्याच्या उपाययोजना निश्चित करण्यासाठी व्हिएन्ना इथे झालेल्या अधिवेशनात २२ मार्च १९८५ रोजी मॉन्ट्रीयल प्रोटोकॉल तयार करण्यात आला व तो २२ सप्टेंबर १९८८ पासून अंमलात आणला गेला.
(२) पूर्णतः मानवनिर्मित हरितगृह परिणामांमुळे होणारे जागतिक हवामान बदल व तापमान वाढ रोखण्यासाठी ११ डिसेंबर १९९७ रोजी जपानमधील क्योटो शहरात झालेल्या परिषदेत क्योटो प्रोटोकॉल नावाचा एक महत्वपूर्ण करार झाला.
(३) अनेक बाजू असणाऱ्या हवामान बदलांचा मुकाबला करण्याच्या एकाच महत्वकांक्षी उद्देशाने सर्व देशांना एकत्र आणण्यासाठी पॅरिस इथे झालेल्या बैठकीत १२ डिसेंबर २०१५ रोजी एक अधिकृत आंतरराष्ट्रीय करार झाला, तो म्हणजे पॅरिस करार. हवामान बदलांना रोखण्यासाठीचे प्रयत्न व उपाययोजना, त्यासाठी कालमर्यादा व वैज्ञानिक मार्गदर्शन दिल्यामुळे या तीनही आंतरराष्ट्रीय करारांनी जागतिक स्तरावर एक वेगळाच ठसा उमटवला. या करारांना वैज्ञानिक आधार देण्याची महत्त्वपूर्ण भूमिका जागतिक हवामानशास्त्र संघटनेची होती.

हवामान बदलांचे मूल्यांकन अहवाल

संयुक्त राष्ट्रांचा पर्यावरण कार्यक्रम आणि जागतिक हवामान परिषद यांनी संयुक्तपणे हवामान बदलांसंबंधीची आंतरसरकारी समिती (आयपीसीसी) १९८८ साली स्थापन केली. त्याचे मुख्यालय स्वित्झर्लंडमधील जिनीव्हा येथे आहे. आयपीसीसी हा संयुक्त राष्ट्रसंघाचा मुख्य भाग आहे.

ब्राझीलमधील रिओ डि जानेरो येथे ३-१२ जून १९९२ या कालावधीत संयुक्त राष्ट्रसंघाची पर्यावरण व विकास या विषयावर एक परिषद भरवण्यात आली होती. या परिषदेत संयुक्त राष्ट्रसंघाच्या अखत्यारीत असणाऱ्या संयुक्त राष्ट्र हवामान बदल रूपरेखा संमेलन या नवीन विभागाची स्थापना करण्यात आली. या विभागाचे अहवाल तयार करण्याची जबाबदारी आयपीसीसीवर सोपवण्यात आली. आयपीसीसीला वैज्ञानिक माहिती देण्याचे काम जागतिक हवामानशास्त्र संघटना करते. यासाठी हवामानाच्या घटकांच्या नोंदी मिळवून त्यांचे विश्लेषण करणे आणि तज्ज्ञांच्या गटांना एकत्र आणून हवेच्या गुणवत्तेचा मूल्यांकन अहवाल वेळोवेळी करून घेणे व आवश्यक वैज्ञानिक व तांत्रिक सल्ला देणे हे महत्त्वाचे काम जागतिक हवामानशास्त्र संघटना करते.

हवामान बदलांचा सध्या होणारा परिणाम, त्याचे भविष्यातील धोके आणि ते टाळण्यासाठी किंवा कमी करण्यासाठीचे उपाय या सर्वांचे मूल्यमापन आयपीसीसी करते. आजपर्यंत आयपीसीसीचे सहा मूल्यांकन अहवाल प्रसिद्ध झाले आहेत. याशिवाय आयपीसीसीने हवामान बदलांसंबंधीच्या विशिष्ट विषयांवरही खास अहवाल प्रसिद्ध केले आहेत. नैसर्गिक व मानवनिर्मित हवामान बदलांविषयीची वैज्ञानिक माहिती देणे आणि त्यांच्या सामाजिक व आर्थिक परिणामांच्या धोक्यांचे इशारे देणे व त्यावरील उपाय सुचवणे हे आयपीसीसीचे प्रमुख कार्य आहे. हवामानविषयक धोरण ठरविण्यासाठी लागणारी माहिती सर्व स्तरांवरील शासनाला आयपीसीसी पुरवते. अशाप्रकारे जागतिक हवामानशास्त्र संघटना आयपीसीसीद्वारे ज्ञान व कृती यांची सांगड घालते.

जगभरातील शास्त्रज्ञांच्या संशोधनांचे विश्लेषण करणे, हवामान बदलांच्या घातक परिणामांचे इशारे देणे व ते परिणाम टाळण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी उपाययोजना सुचविणे आणि त्यांच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवणे; तसेच शास्त्रज्ञ, निरीक्षक व धोरणकर्ते या सर्वांमध्ये समन्वय साधून ठराविक कालावधीने होणाऱ्या बैठकीत त्यांच्या विचारांची देवाणघेवाण घडवून आणणे यामध्ये जागतिक हवामानशास्त्र संघटनेचा सक्रिय सहभाग असतो.

कौशल्य विकास व प्रोत्साहन कार्यक्रम

हवामान व वातावरण या क्षेत्रांतील सेवा व संशोधन यांच्या गुणवत्तेत वाढ होण्यासाठी हवामानशास्त्रज्ञ, जलविज्ञानशास्त्रज्ञ आणि तत्सम विषयातील तज्ज्ञ यांच्या ज्ञानाचा व कौशल्याचा सर्वांगिण विकास होणे आवश्यक असते. त्यासाठी जागतिक हवामानशास्त्र संघटना जगभरातील शास्त्रज्ञांसाठी अत्याधुनिक शिक्षण व प्रशिक्षण आयोजित करत असते. याचा लाभ विकसनशील देशांतील शास्त्रज्ञांनाही व्हावा म्हणून संघटना त्यांना शिष्यवृत्ती देते. तसेच ही संघटना शास्त्रज्ञांच्या विशेष शोध निबंधांना व त्यांच्या विशेष कार्याला/सेवेला प्रोत्साहन मिळावे म्हणून पारितोषिके व पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करते. त्यामध्ये अनुभवी शास्त्रज्ञांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल जीवनगौरव पुरस्कार तसेच तरुण शास्त्रज्ञांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष पुरस्कार यांचा समावेश आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध उपक्रमांद्वारे हवामान क्षेत्रात विज्ञान, तंत्रज्ञान आणि आपत्ती व्यवस्थापन यांमध्ये होत असलेली प्रगती, वृध्दिंगत होत असलेले सहकार्य, विश्वाचा शाश्वत विकास व कल्याण यामध्ये जागतिक हवामानशास्त्र संघटनेचे योगदान महत्त्वाचे आहे. संघटनेला या वर्षीचा जागतिक हवामान दिवस आणि अमृतमहोत्सवी सोहळा या निमित्ताने तिच्या यशस्वी वाटचालीसाठी व उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा.

(लेखिका भारतीय उष्णदेशीय हवामानशास्त्र संस्थेतील (पुणे) निवृत्त वैज्ञानिक अधिकारी आहेत.)

anaghashiralkar@gmail.com

Story img Loader