अ‍ॅड. हर्षल प्रधान
‘भाजप आज राम मंदिराचे श्रेय लाटू पाहात आहे, मात्र मशीद पाडली गेली तेव्हा भाजप नेत्यांनी शोक व्यक्त केला होता. त्या वेळी या कृतीची जबाबदारी शिवसेनाप्रमुखांनी घेतली. त्यामुळे मंदिर उभारणीतील शिवसेनेच्या योगदानाविषयी प्रश्नचिन्ह उभे करण्याऐवजी भाजपने स्वत:च्या सहभागाचे पुरावे द्यावेत..’ ‘प्राणप्रतिष्ठेपूर्वी मुक्ताफळांचे लंगर’ या ‘पहिली बाजू’चा (९ जानेवारी) प्रतिवाद करणारा लेख..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशाच्या स्वातंत्र्यलढय़ात, संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ात रक्ताचा तर दूरच अगदी घामाचा एकही थेंब न गाळलेले आज रामजन्मभूमी आंदोलनात शिवसेनेच्या सहभागाविषयी प्रश्न विचारताहेत. रामजन्मभूमीच्या इतिहासातून शिवसेनेला बाजूला सारण्याचे प्रयत्न सध्याचे सत्ताधारी आणि त्यांच्या समर्थकांकडून सुरू आहेत. इतिहासाशी त्यांचा काहीही संबंध नसल्याने इतिहास बदलता येऊ शकत नाही, हे त्यांना ज्ञात नसणे स्वाभाविकच आहे.

मंदिर निर्माण करण्याचे श्रेय लाटू पाहणाऱ्यांनी शिवसेनेच्या योगदानाबद्दल प्रश्न उपस्थित करू नयेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेची वाटचाल प्रगतीच्या दिशेने सुरू आहेच. रामजन्मभूमी आंदोलनात शिवसेना सहभागी होती आणि या लढय़ात शिवसेनेने महत्त्वाची कामगिरी बजावली हे जगजाहीर आहे. तरीसुद्धा रोज त्यावर शंका उपस्थित केल्या जात आहेत. असे करणाऱ्यांना काही घटनांची आठवण करून देणे गरजेचे आहे. म्हणून हा लेखनप्रपंच.

हेही वाचा >>>मियाँ तानसेनच्या घराण्याचा वारसदार; विलंबित ख्याल गायकीवर प्रभुत्व

एखादे आंदोलन यशस्वी होवो वा त्यात अपयश येवो, जे काही होईल, त्याची जबाबदारी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्यांनी घ्यायची असते. ही जबाबदारी गर्वाने आणि अभिमानाने स्वीकारणाऱ्यांकडे त्याचे श्रेय आपसूकच जाते, असा आजवरच्या जागतिक स्तरावरील आंदोलनांचा इतिहास आहे. आज मंदिराचे श्रेय लाटू पाहणारे बाबरी मशीद पाडली गेली तेव्हा ती कृती शिवसेनेने केल्याची विधाने करत होते. लालकृष्ण अडवाणी, बाळासाहेब देवरस या मंडळींनी मशीद पाडली गेली तेव्हा शोक व्यक्त केला होता. त्यावेळी उत्स्फूर्तपणे झालेल्या या कृतीची जबाबदारी मात्र शिवसेनाप्रमुखांनी घेतली. रामजन्मभूमी आंदोलनात बाबरी पाडल्यावर असो अथवा त्या पश्चात उसळलेली दंगल असो, शिवसेनेने कारसेवकांना, दंगलग्रस्तांना दिलेला आधार कदापि नाकारता येणारा नाही.

रामजन्मभूमी आंदोलनात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने जे आरोपपत्र दाखल केले त्यात शिवसेनाप्रमुख, शिवसेनेचे नेते, शिवसैनिक अशा १०० हून अधिक व्यक्तींची नावे होती. पवनकुमार पांडे, चोपडा, सतीश प्रधान, शिवसेनेचे खासदार मोरेश्वर सावे, सुभाष देशमुख, मधुकर सरपोतदार, मनोहर जोशी इत्यादी अनेकांवर गुन्हे दाखल झाले होते. शिवसेनेच्या स्थानिक आणि इतर राज्यांतील नेत्यांची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने चौकशी केली. त्यांच्या घरांवर छापे टाकले, या सर्व नोंदी आजही उपलब्ध आहेत. संघाची मुखपत्रे असलेल्या ‘ऑर्गनायझर’, ‘पांचजन्य’ या प्रसारमाध्यमांत शिवसेनाप्रमुखांच्या नेतृत्वाचा गौरव करणारे लेख प्रसिद्ध झाले होते, ते आजही स्मरणात आहेत.

हेही वाचा >>>शिक्षक-प्राध्यापकांचे ‘समीना’करण अराजकतेच्या वाटेवर!

शिवसेनेला सहभागाविषयी प्रश्न विचारणारे आज कानामागून गोळी गेल्याच्या वल्गना करतात तेव्हा या कानामागून येऊन शहाणपणा सांगणाऱ्यांची कीव करावीशी वाटते. स्वत: कायद्याचे ज्ञानी असलेले फडणवीस हे विसरतात की ऐकीव माहितीला कायद्यात कुठेही स्थान नाही. इथे तर फडणवीस स्वत:च स्वत:ची पाठ थोपटून घेण्याच्या प्रयत्नात हास्यास्पद ठरत आहेत. हजारो कारसेवकांचे रक्त सांडले गेले आणि रामजन्मभूमी आंदोलनाला वेगळीच कलाटणी मिळाली. फडणवीस, मोदी, शहांच्या अंगावर साधा ओरखडाही आला नाही. आला असेल तर त्यांनी तसा पुरावा उपलब्ध करून द्यायला हवा.

अस्मितेचे आंदोलन म्हणून शिवसेनेने श्रद्धेने रामजन्मभूमी आंदोलनाचा मुद्दा लावून धरला. रामजन्मभूमीबाबत कायदा करावा, ही मागणी शिवसेनेने सातत्याने लावून धरली, मात्र नरेंद्र मोदींनी सत्ता असूनही ती कधी मान्य केली नाही. न्यायालयात प्रदीर्घ काळ सुनावणी झाल्यानंतर रामजन्मभूमीच्या बाजूने निकाल आला. त्यानंतर मात्र न्यायालयीन निकाल जणू आपल्या सरकारमुळेच आला आहे, असे भासवण्यासाठी एका निवृत्त सरन्यायाधीशांना खासदारकी बहाल करण्यात आली. न्यायालयीन निकालाचे श्रेय लाटण्याचे उद्योग करणारा भारतीय जनता पक्ष आज शिवसेनेला प्रश्न विचारतो तेव्हा भाजपच्या आजच्या नेतृत्वाकडे त्यांच्या योगदानाबद्दल सांगण्यासारखे काहीच नाही, हे स्पष्ट होते. श्रेय शिवसेनेचे असो अथवा न्यायालयाचे इतरांच्या श्रेयावर स्वत: दावा करत भाजपची केविलवाणी वाटचाल सुरू आहे.

हेही वाचा >>>डझनावारी कामगार संघटना एसटी कर्मचाऱ्यांसाठी काय करतात?

विलेपार्ले येथील निवडणुकीदरम्यान हिंदूुत्वाचा आधार घेऊन प्रचार केला म्हणून शिवसेनाप्रमुखांवर मतदान करण्यास सहा वर्षे बंदी घालण्यात आली होती. श्रीकृष्ण आयोगाचा अहवाल, मुंबईतील बॉम्बस्फोटांच्या काळात शिवसेना भवनाला लक्ष्य करण्यात आले होते. शिवसेनेच्या तव्यावर स्वत:ची पोळी भाजणारा भाजप किती असंवेदनशील आहे, याचे अनेक दाखले देता येतील. शिवसेनाप्रमुखांना अगदी सातत्याने अतिरेक्यांकडून पत्रे येत, मात्र अशा धमक्यांनी न डगमगता शिवसेना त्याही परिस्थितीत भाजपच्या खांद्याला खांदा लावून राष्ट्रहितासाठी हिंदूुत्वासाठी उभी राहिली. भाजपनेदेवेगौडा, मुफ्ती मोहम्मद, नितीश कुमार,व्ही. पी. सिंग यांसारख्या रामजन्मभूमी आंदोलनाला विरोध करणाऱ्यांसमवेत राजकीय संसार थाटले. परंतु स्वत:च्या राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी आणि अस्तित्व जपण्यासाठी झगडणाऱ्या भाजपला हिंदूुत्वाचा जाज्वल्य अभिमान बाळगणारी शिवसेना नकोशी झाली.

रामजन्मभूमी आंदोलनाला आणि भाजपला कोणत्याही अटी-शर्तीविना पािठबा देणारी शिवसेनाच होती आणि ‘गर्व से कहो हम हिंदू है’चा जयघोष करणारीही शिवसेनाच होती. पण पुलोदचा प्रयोग झाला तेव्हा मात्र शिवसेना नव्हती. असे असताना भाजप कोणत्या हक्काने शिवसेनेच्या हिंदूुत्वावर प्रश्नचिन्ह उभे करू शकतो? इतर पक्षांतून आलेले, तेव्हा रामजन्मभूमी आंदोलनाला विरोध करणारे आज भाजपमध्ये प्रवेश करून मानाच्या पदांवर विराजमान झाले आहेत. ते शिवसेनेच्या हिंदूुत्वाविषयी प्रश्न विचारतात तेव्हा भाजपचे झालेले आणि होत असलेले अध:पतन प्रकर्षांने समोर येते. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्येला जाऊन रामलल्लांच्या चरणी नतमस्तक होऊन आले. ‘पहले मंदिर फिर सरकार’ची घोषणा देणारे उद्धव ठाकरेच होते. मात्र भाजपने त्यांना राम मंदिराचे श्रेय मिळू नये म्हणून आटोकाट प्रयत्न केले.

असा श्रेय नाकारण्याचा प्रकार केवळ उद्धव ठाकरे यांच्याबाबतीतच घडला आहे, असे नाही. रामजन्मभूमी आंदोलनात योगदान होते अशा लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशींनाही प्राणप्रतिष्ठेपासून दूर ठेवण्यात आले. अडवाणींच्या रथयात्रेत भोंगे धरणाऱ्यांच्या हस्ते रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. मंदिराचे बांधकाम अर्धवट, संसदेचे बांधकाम अर्धवट. कामे पूर्णत्वास गेलेली नसतानाही, केवळ निवडणुका डोळय़ांसमोर ठेवत राजकीय श्रेय घेण्याची मानसिकता म्हणजे जनतेचा विश्वासघातच ठरतो.

राम मंदिर हा आस्थेचा, अस्मितेचा आणि श्रद्धेचा विषय आहे. लाखो लोकांच्या बलिदानातून राम मंदिर पूर्णत्वास जात आहे, हा शिवसेनेसाठी आनंदाचा क्षण आहे. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेत राजकीय स्वार्थापायी मर्यादांचे उल्लंघन होऊ नये, हीच शिवसेनेची अपेक्षा आहे. शिवसेनेचा रामजन्मभूमी आंदोलनातील सहभाग संपूर्ण जगाने पाहिला आहे. आता मोदी, शहा, फडणवीस यांनी त्यांचे योगदान सिद्ध करावे.

लेखक शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रवक्ते आहेत.

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is bjp contribution to ram temple in ayodhya amy
Show comments