आज देशातील राजकारण प्रचंड मोठ्या प्रमाणावर गढूळ झाले आहे. सत्तेत आहेत त्या राजकारण्यांनी देशाच्या राज्यघटनेनुसार देशातील सर्व जनतेची सेवा करणे, त्यांचे कल्याण करणे, त्यांना सुविधा देणे हे त्यांचे आद्य कर्तव्य असते. भारतीय संविधानाला मानवी कल्याण अपेक्षित आहे. त्याप्रमाणे राज्यकर्त्यांनी वागून देशातील माणसांचे कल्याण व सर्वांगीण विकास साधणे महत्त्वाचे आहे. जनतेने आपल्याला मतदान केले आहे त्या मतदानाला जागून जनतेची सेवा करणे महत्त्वाचे असते. सर्व जातीतील, धर्मातील लोकांना समान न्याय मिळणे हेही अपेक्षित आहे. या देशातील जे विविध धर्म आहेत त्याचे संरक्षण करणे हेही राज्यघटनेनुसार देशातील राज्यकर्त्याचे कर्तव्य आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

परंतु आज आपल्या देशात व काही राज्यांमध्ये विशेषत: महाराष्ट्रामध्येही जाती-धर्माचे राजकारण फार मोठ्या प्रमाणावर बोकाळले आहे. राजकारणातला प्रत्येक माणूस विकास नावाचा शब्द वापरतो. वृत्तपत्रातून आणि टीव्हीच्या माध्यमातून जाहिरातीचा नुसता भडीमार करतो. त्या शब्दाच्या भोवती आणि जाहिरातीच्या भोवती सगळ्यांना गुंडाळण्याचा प्रयत्न करतो. वस्तुस्थितीत मात्र विकासाच्या नावानं जिकडे तिकडे बोंब आहे. आज देशात महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, तरुणांच्या हाताला काम नाही, खासगीकरण, खून, मारामाऱ्या, दरोडा, बलात्कार, अन्याय, अत्याचार, पक्ष बदलणे, सत्तेचा मलिदा खाण्यासाठी वाटेल ते करणे, खोटे बोलणे अशा अनेक प्रश्नांनी थैमान घातले आहे. याकडे मात्र सत्तेतील प्रत्येक माणूस डोळेझाक करतो आहे. खरेतर तो या सर्व गोष्टींचा कायद्याने बंदोबस्त करू शकतो, परंतु तसे होताना दिसत नाही. या महागाईमुळे व इतर समस्यांमुळे अनेकांचे जीवन उद्ध्वस्त होत चालले आहे. केवळ फक्त मंदिर, जात, धर्म, हिंदुत्व, भोंगे, प्रश्न सभा, उत्तर सभा, आंदोलन, यावर राजकारण खेळले जाते आणि आम्ही हिंदुत्वासाठी काम करतो आहोत असे फक्त बोलले जाते.

हेही वाचा – कुठे आहे ‘महारेरा’चा वचक?

या देशात राहणाऱ्या विविध जाती धर्मातील लोकांनी जातीपातीचा, धर्माचा विचार न करता मतदान केले आहे. तरीही जाती-धर्माचे राजकारण करून सर्वसामान्यांना त्यामध्ये अडकून टाकले जात आहे. हिंदुत्वाच्या किंवा जाती-धर्माच्या राजकारणामुळे खेड्यापाड्यात सामान्य माणसाला जगणे अवघड होत चालले आहे. स्वतःने केलेला भ्रष्टाचार व खोटेनाटे लपवण्यासाठी पक्ष बदलणे हेही भयंकर आहे. गाव पातळीवरचा जो माणूस मिळून मिसळून राहून, सगळ्यांना बरोबर घेऊन जगण्याचा व कामे करण्याचा प्रयत्न करत होता तो माणूस आज टीव्हीवरच्या बातम्या ऐकून, राजकीय लोकांची भाषणे ऐकून, राग द्वेषाची भाषा ऐकून फार बिघडला आहे. बिघडत आहे. तोही गावागावात जाती-धर्माचे राजकारण खेळत आहे. भेदाभेद, विषमता निर्माण करत आहे. एकमेकांकडे पाहताना प्रत्येक जण दूषित नजरेने पाहत आहे. जातीय, धर्मीय दृष्टीने पाहत आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या मनातील एकमेकांविषयीचा मानवतेचा भाव कमी होत चालला आहे. विषमता वाढत चालली आहे. शाळेमधील लहान मुलंही एकमेकांना जात विचारू लागली आहेत. एवढं जातीयतेचं विष या राजकीय लोकांनी व प्रसारमाध्यमांनी भाषणाच्या आणि बातम्यांच्या माध्यमातून पेरलं आहे. ज्याचा परिणाम लहान मुलांवर, तरुण कार्यकर्त्यावर, शाळा, विद्यालय, महाविद्यालय, कार्यालयांवर होताना दिसतो आहे. एवढेच काय तर विविध कार्यालयांमध्ये, सामाजिक क्षेत्रात व शैक्षणिक क्षेत्रातही या राजकारणांच्या वागण्या बोलण्याचे लोण पसरले आहे. शासकीय, शैक्षणिक क्षेत्रातील व विविध कार्यालयांमधील नोकरदार माणूसही मोठ्या प्रमाणावर जातीयतेने वागू लागला आहेत. हे सरकार आमचेच आहे. म्हणून आम्ही कसेही वागलो, काहीही केले, कुणावरही अन्याय अत्याचार केला तरी आमचे कुणीच काही वाकडे करू शकणार नाही, बिघडवू शकणार नाही अशी उर्मटपणाची, अहंकाराची व अहंपणाची भावना त्याच्या मनात घर करून बसली आहे. त्यामुळेच आपले सामाजिक वातावरण, सलोखा बिघडत चालला आहे. विषमतेची दरी वाढत चालली आहे.

राजकीय क्षेत्रातील माणसे जशी दादागिरीने वागतात, अरेरावीने वागतात, बिनधास्तपणे शिव्या देतात, एकमेकांची खालच्या पातळीवर जाऊन टिंगलटवाळी करतात, एकमेकांविषयी अपशब्द वापरतात, महापुरुषांचा अपमान करतात, खोटे बोलतात या सर्वांचा परिणाम देशाच्या भावी नागरिकांवर होताना दिसतो आहे. अधिकारी, कार्यकर्तेही तसेच वागू लागले आहेत. सामाजिक क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रात व विविध कार्यालयात नीतिमता, मानवता कुठेही राहिलेली दिसत नाही. एवढेच काय तर चांगल्या अधिकाऱ्यांना, चांगल्या कार्यकर्त्यांना, चांगल्या तरुणांना, चांगल्या समाज कार्य करणाऱ्यांना समाजात काम करणे अवघड झाले आहे. कारण राजकीय क्षेत्रातील अभद्र वागणाऱ्या अनेक माणसांचे, मंत्र्यांचे संस्कार तरुणांवर आणि कार्यकर्त्यावर होत आहेत. चांगले काम करणाऱ्या माणसाला प्रचंड दडपून टाकले जात आहे. जातीच्या मुद्द्यावर, धर्माच्या मुद्द्यावर लोक एकत्र येत आहेत. हेच देशासाठी, लोकशाहीसाठी धोकादायक आहे. म्हणून राजकीय सत्तेत असणाऱ्या किंवा सत्तेत नसणाऱ्या विविध पक्षातील राजकारण करणाऱ्या कार्यकर्त्यांनी, अधिकाऱ्यांनी बोलताना प्रत्येक शब्द काळजीपूर्वक वापरायला हवा. खरे तर टीव्हीवर त्यांचे बोलणे- वागणे पाहिल्यानंतर राजकारणातील माणसं किती खालच्या स्तरावर जाऊन पोहोचतात हे दिसून येते. नीटनेटकेपणा, वैज्ञानिक दृष्टिकोन, संवेदनशीलता, राष्ट्रहित, देशहित, राष्ट्रीय एकात्मता, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय अशा अनेक जीवनमूल्यांची पेरणी राज्यकर्त्यांच्या व इतर प्रशासकीय माणसांच्या कृतीतून, आचरणातून आणि वाणीतून व्हायला हवी. तरच देशातील तरुणांवर, कार्यकर्त्यावर संस्कार रूजतील आणि देश महासत्ता होण्याकडे वाटचाल करील. आपले वागणे, बोलणे आणि कृती हे निश्चितच इतरावर छाप पाडेल, प्रभावित करेल असे प्रत्येकाने असायला हवे, हे त्यांनी सतत ध्यानात ठेवायला हवे.

हेही वाचा – संवादाच्या दुव्यांवर घाला!

संस्कार हे मानवी जीवनाला आकार देणारे, घडवणारे असतात. संस्कारावरच तरुणांचे जीवन अवलंबून असते. संस्कारामुळे तरुणांचा कायापालट होऊन मानवी जीवन सुखमय होण्यास मदत होत असते. संस्कारशील तरुणांमुळे व विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या माणसांमुळेच देशाची उंचीही वाढत असते. पण आजचे जे सामाजिक, राजकीय, आर्थिक, वैचारिक, शैक्षणिक, कौटुंबिक, नैतिक वातावरण प्रचंड गढूळ झालेले आहे. त्यामुळे प्रत्येकाने प्रयत्न करून ते स्वच्छ करणे गरजेचे आहे. त्यासाठी आपली भूमिका, आपले विचार हे सत्य असायला हवेत. ते इतरांना दिशा देणारे असायला हवेत. हे प्रत्येकाला आपले वाटायला हवेत. आज कुणालाच कुणाचा धाक राहिलेला नाही. कायद्याचा धाक तर कुठेच दिसत नाही. कायद्याची अंमलबजावणी करणारेही अनेक ठिकाणी मूग गिळून बसलेले दिसतात. त्यामुळे कायद्याची योग्य आणि कडक अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळेच प्रत्येक माणूस त्याला जसे वाटेल तसे तो वागताना दिसतो आहे. सामान्य जनतेच्या कामाला, तक्रारीला केराची टोपली दाखवली जाते. अनेक तक्रारी करून करून सामान्य माणूस दमून जातो. तरी कुठलाच अधिकारी, मंत्री, पोलीस अधिकारी कुणाचीही दखल घेताना दिसत नाही. म्हणूनच की काय अनेकजण अनेक बोगस कामे, भ्रष्टाचार करताना दिसतात. अशांनाच अधिकारीही पाठिंबा देताना दिसतात व केस दाबून टाकतात. उलट न्याय मागणाऱ्याच्या पाठीमागे लागून त्यालाच नामोहरम करतात. हे सारे मानव हिताचे अजिबात नाही. या साऱ्या गोष्टी लक्षात घेऊन राजकारणातील व इतर विविध क्षेत्रातील व्यक्तीने चांगले वागणे, चांगले काम करणे, न्याय मिळवून देणे, कुणावरही अन्याय अत्याचार होणार नाही, जातीय धर्मीय भावना भडकणार नाही असे वागणे महत्त्वाचे आहे. हेच संस्कार घेऊन आजचा तरुण देशाचे भवितव्य घडवू शकेल.

प्रा. डॉ. सतीश मस्के, मराठी विभागप्रमुख, कर्म. आ. मा. पाटील वरिष्ठ महाविद्यालय, पिंपळनेर ता. साक्री जि धुळे

(dr.satish_maske@rediffmail.com)

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is in the society and what should be ssb