– श्रीपाद जोशी

ॲलोपॅथी श्रेष्ठ की आयुर्वेद, आयुर्वेदिक डॉक्टरांनी ॲलोपॅथीची औषधं देणं योग्य की अयोग्य हे वाद नेहमीच सुरू असतात, मात्र आयुर्वेद हे प्राचीन आहे. त्याला काही मर्यादा आहेत. त्या कोणत्या, आयुर्वेदाच्या क्षेत्रात संशोधनाच्या शक्यता किती, ते आजच्या काळात व्यवहार्य आहे का या प्रश्नांची उत्तरे शोधणे गरजेचे आहे.

Cyber ​​thieves rob senior citizen who advertised for remarriage Pune news
Pune Cyber Crime: पुनर्विवाहासाठी जाहिरात देणाऱ्या ज्येष्ठाला सायबर चोरट्यांचा गंडा
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
process of regularizing project affected constructions gained momentum after return of mahayuti government
गरजेपोटी बांधकामांच्या नियमितीकरण प्रक्रियेला वेग; तांत्रिक मूल्यमापनाचे काम अंतिम टप्प्यात
artificial intelligence
कुतूहल : चुकांची जबाबदारी निश्चित करण्याचे आव्हान!
Devendra Fadnavis Nagpur visit cancelled
प्रथम १२, नंतर १३ आणि आता १५, फडणवीसांच्या नागपूर दौऱ्याचा मुहूर्त का लांबला ?
maharashtra vidhan sabha mpsc
MPSC मंत्र : महाराष्ट्र विधानसभा; पारंपरिक आणि तथ्यात्मक प्रश्न
speeding luxury car collide straight into grade
भरधाव अलीशान कार थेट गॅरेजमध्‍ये घुसली; तिघे गंभीर जखमी, अलिबाग चोंढी येथील घटना
public health department target tb screening of 1 crore people
३ कोटी लोकांची क्षयरोग तपासणी

कुठलीही चिकित्सापद्धती उदयाला येऊन विकसित होण्याच्या प्रवासात वैद्यकीय माहितीचे चार टप्पे पडतात. जेव्हा माणूस नुकताच जंगलातून, गुफांतून बाहेर पडून शेतीभाती करू लागला होता, तेव्हा त्याने आजुबाजूच्या परिसराचं आणि निसर्गातील घटनांचं निरीक्षण सुरू केलं होतं, हा पहिला टप्पा होता निरीक्षणाचा. वारंवार निरीक्षणं करून त्याला काही गोष्टी एकसारख्या घडतात हे कळलं, हा झाला दुसरा टप्पा अनुभवाचा. त्याने अनुभवांवर आधारित काही प्रयोग करून बघितलेत आणि त्यात त्याला आढळलेले निष्कर्ष म्हणजे तिसरा टप्पा ज्ञानाचा. आणि चौथा म्हणजे पायाभूत विज्ञानाचा विकास झाल्यावर त्यावर आधारित तंत्रज्ञानाचा रोगनिदान आणि उपचार दोहोंमध्ये कौशल्यपूर्ण वापर करणे, हा झाला चौथा टप्पा तंत्रज्ञान आणि कौशल्याचा.

हेही वाचा – गेमिंग कंपन्यांशी रडीचा डाव खेळल्याने भारताच्या प्रतिमेलाच धक्का!

आयुर्वेदाला निरीक्षण आणि अनुभव या दोन टप्प्यांतच बंदिस्त होऊन रहावं लागलं. आधुनिक वैद्यकाला आयुर्वेदापेक्षा पायाभूत विज्ञान तंत्रज्ञानाची साथ अधिक मिळाली, तसंच आधुनिक वैद्यकाचं ज्ञानाधारित स्वरूप रोगनिदानाच्या क्षेत्रात क्रांती करून गेलं. इथून पुढचं युग केवळ आधुनिक वैद्यकाचंच असणार आहे. निरीक्षण आणि अनुभवांवर आधारित असल्यामुळे आयुर्वेदातील काही गोष्टी खऱ्या असल्याचा भास होतो कधीमधी आणि आधुनिक ज्ञानाचं सोयिस्कर पाठबळ घेऊन आयुर्वेदातले काही काल्पनिक सिद्धांत खरे ठरवण्याचे प्रयत्न अभिनिवेशी आयुर्वेद समर्थकांकडून होत असतात. पण उधारीत मागून आणलेले कपडे कधीच अंगानेटके बसत नसतात, तसंच आयुर्वेदात आधुनिक ज्ञानाचं पाठबळ घेण्याचा प्रयत्न अपुरा पडतो.

आयुर्वेदात संशोधन, शक्यता आणि व्यावहारिकता :-

आपल्या पूर्वजांकडे तीव्र निरीक्षण बुद्धी होती. त्यांच्या अवतीभवती चालणाऱ्या सृष्टीक्रमाचं सूक्ष्म निरीक्षण ते करत गेले. अनेक निरीक्षणांमधून त्यांना ज्या सृष्टीक्रमांचं सातत्य जाणवलं, त्यांचं स्पष्टीकरण शोधायला त्यांनी काही सिद्धांत मांडले. सिद्धांत मांडून झाल्यावर, त्या सिद्धांतांची यथार्थता तपासण्यासाठी काही प्रयोग करून बघितले आणि प्रयोगाअंती जे सिद्धांत प्रत्यक्षाच्या कसावर खरे उतरले त्याला शास्त्राचं रूप आलं.

आयुर्वेदाचे सिद्धांतदेखील याच प्रकारे, सतत निरीक्षणाअंती मांडले गेले आहेत. आयुर्वेदात सुश्रुताने मानवी शरीररचनेच्या अभ्यासाचा पाया घातला आहे. पण त्याची शरीर विच्छेदनाची पद्धत, त्याच्या काळात सूक्ष्मदर्शक उपलब्ध नसल्याची मर्यादा या बाबींमुळे आयुर्वेदाच्या शरीर रचनेच्या अभ्यासावर फारच मर्यादा आल्या.

शरीररचना व्यवस्थित न कळल्यामुळे शरीर क्रियेच्या माहितीवरदेखील आपसुकच मर्यादा आल्या. आजारपण म्हणजे मानवी शरिराची रचना आणि क्रिया या दोहोंपैकी एकात किंवा दोन्हींमध्ये आलेली विकृती असते, हे मुलभूत तत्त्वच आयुर्वेद ओळखू शकला नाही.

आयुर्वेदाचा अभ्यास करणाऱ्या पूर्वजांना मानवी शरीराचे क्रियाव्यापार समजण्यासाठी सिद्धांत मांडावे लागले होते. क्रिया विकृत झाली की आजार होणार म्हणून आजारांच्या विकृतीचा विचार करताना, सिद्धांत ओघानेच येणार आणि मग वनस्पती औषधी घेऊन आजार बरा होणार याचा अर्थ औषधींनी क्रियाविकृती दूर होणार. त्यामुळे वनस्पतींचे काम शरीरात नेमके कशावर होते हे सांगण्यासाठीही सिद्धांत आवश्यकच होते.

सिद्धांत मांडणीचा पाया एखादी गोष्ट प्रत्यक्षात वारंवार घडताना बघणं हा असावा लागतो. वारा, सूर्य आणि चंद्राला बघून शरीर क्रिया, रोगनिर्मिती आणि वनौषधींचा रोगलक्षणांवर होणारा परिणाम या निरीक्षणांचं स्पष्टीकरण देण्यासाठी आयुर्वेदाने त्रिदोष सिद्धांत वापरला आहे.

वात, पित्त, कफ हे तीन दोष आयुर्वेदाने मानले आहेत. या पैकी वाताचे चरकाने तर पित्त आणि कफाचे सुश्रुताने पाच पाच प्रकार करून त्यांची नावं आणि शरीरातील कामं सांगितली आहेत. सुश्रुताने कफ दोषाचे पाच प्रकार मानून त्यांचे शरीरातील काम सांगितले असले तरीही त्यांची नावं मात्र वाग्भटांनी दिली आहेत.

कफ दोषाच्या पाच प्रकारांपैकी तर्पक, बोधक आणि श्लेषक हे तीन वगळता क्लेदक आणि अवलंबक कफ, वाताचे प्राण उदान व्यान समान अपान आणि पित्ताचे साधक, भ्राजक, रंजक, आलोचक आणि पाचक पित्त शरीरात प्रत्यक्ष दाखवता येणे अवघड आहे. क्वचित ‘ॲसिडिटी झाल्यावर उलटीतून पडणारं आंबट कडू पाणी पित्त म्हणून बोलीभाषेत सांगितलं जातं.

ग्रंथांनी वर्णन केलेली रोगलक्षणं ही प्रत्यक्ष आहेत, तसेच वनस्पतींचा रोगलक्षणांवर दिसणारा परिणामसुद्धा. आयुर्वेदाने मानलेले सात धातू रस, रक्त मांस, मेद, अस्थि, मज्जा शुक्र, तीन मल, स्वेद, मूत्र आणि पुरीष (विष्ठा) तसेच उपधातू, स्तन्य, आर्तव इ. हे शरीरात प्रत्यक्ष उपस्थित असणारे घटक आहेत.

आयुर्वेदाने वापरलेल्या औषधींपैकी काहींचे ग्रंथांनी सांगितलेल्या लक्षणांमध्ये परिणाम दिसतात, हे वास्तव आहे. परंतु त्या लक्षणांच्या उद्भवण्याची आणि पर्यायाने त्यावरच्या वनौषधींच्या होणाऱ्या परिणामांची कारणमीमांसादेखील त्रिदोषांच्या सैद्धांतिक पातळीवरच मांडली जाते. हे सिद्धांत म्हणजे आयुर्वेदाचा पाया म्हणा किंवा आत्मा आहेत.

आयुर्वेद भारतीय उपखंडात विकसित झालेली सुमारे अडीच तीन हजार वर्षं जुनी पद्धत आहे. ती तत्कालीन भूप्रदेशातील कृषिआधारीत जीवनपद्धतीशी निगडीत आहे. त्याला तत्कालीन साधनसंपदेच्या मर्यादेमुळे एक विशीष्ट पायामांडणी स्वीकारावी लागली आहे. थोडक्यात, आयुर्वेद एका अतिविशाल परंतु मर्यादीत भूभागातील एका संस्कृती/ जीवनपद्धतीचं, त्या काळाशी सुसंगत असं उपचारांचं शास्त्र आहे. आयुर्वेदाची भाषा, पारिभाषिक शब्दावलीसुद्धा विशिष्ट भूकेंद्रित अर्थातच संस्कृत आहे.

आयुर्वेद आकाराला येऊ लागला होता, तोवर पायाभूत विज्ञानाचा जसे भौतिकशास्त्र, जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र यांचा जन्मही झाला नव्हता. त्यामुळे आयुर्वेदात पायाभूत विज्ञानाशी निगडीत बाबी दिसत नाहीत. पायाभूत विज्ञानाचा विकास पाश्चात्य जगतात अधिक झाल्यामुळे त्या विज्ञानाची आणि त्यातून निर्माण झालेल्या तंत्रज्ञानाची भाषा वेगळी झाली आणि सध्या ती इंग्रजी आहे. आयुर्वेदाचे पायाभूत संदर्भ ग्रंथ जसे चरक, सुश्रुतादी संहिता या संस्कृतमधून लिहिलेल्या असल्यामुळे आयुर्वेद शिक्षणाची भाषा संस्कृत असणं अपरिहार्य आहे.

आधुनिक वैद्यकाचा नेत्रदीपक विकास का झाला? कारण त्यांनी पायाभूत विज्ञानातील आणि तदाधारित तंत्रज्ञानाच्या विकासाचा पुरेपुर वापर करून घेतलाय म्हणून. मात्र आधुनिक वैद्यकाचा विकास रोगलक्षणांचा आणि विकृतीविज्ञानाचा एका मर्यादेपर्यंतचा अभ्यास वगळता, क्लिनिकल प्रॅक्टिस करणाऱ्या डाॅक्टरांनी केलेला नसून, वैद्यकेतर विषयातील वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी आणि तंत्रज्ञांनी घडवून आणला आहे. डाॅक्टर्स त्या विकासाचा वापर तेवढा करून घेत आहेत.

आता आयुर्वेदात संशोधन व्हायला हवं म्हणून फार बोललं जातं. आयुर्वेदात विकास कुठे कुठे व्हायला हवा याची आधी जाणीव असायला हवी. आयुर्वेदाने जेवढी म्हणून प्रत्यक्ष शरीररचना सांगितली त्या रचनेचा आयुर्वेदिक रोगनिदानात फार काही उपयोग करून घेतलेला नाही. शिवाय ती अत्यंत आदीम आणि प्राथमिक स्तरावरची शरीर रचना आहे.

शरीर क्रिया पूर्णपणे सैद्धांतीक आणि अत्यंत तोकडी आहे. प्रत्यक्षात घडणाऱ्या शरिरक्रियेचादेखील आयुर्वेदिक विकृतीविज्ञानाशी काहीही संबंध नाही. परिणामी रोगांचे कारक त्रिदोष मानले आहेत, त्यामुळे रोगजंतूंमुळे काही रोग होतात हेच माहिती नाही. त्रिदोषांव्यतिरिक्त इतरही बाह्य कारणांमुळे आजार उद्भवू शकतात असा थोडाफार अंदाज चरक सुश्रतांना आला असावा, असं संहितांमधील वर्णन वाचून जाणवतं, पण त्या दिशेने ठोस असा काही विचार आयुर्वेदात झालेला दिसत नाही. त्यामुळे आयुर्वेदात रोगांच्या बाबतीत किमान तीन पातळ्यांवर बदल व्हायला हवा आहे. सर्वांत प्रथम रचना आणि क्रिया तसेच विकृतीविज्ञान आणि सूक्ष्मजीवशास्त्र यांचा अभ्यास आयुर्वेदात व्हायला हवा. मात्र हा अभ्यास केल्यास आयुर्वेदाचा डोलारा ज्या पायावर उभा आहे- त्रिदोष सिद्धांत- त्यालाच बाधा पोहोचते.

आता आधुनिक वैद्यकाप्रमाणे आयुर्वेदातही रोगनिदानाच्या आधुनीक पद्धती वापराव्यात, अशी अपेक्षा ठेवली जाते. विशेषतः मिश्र उपचार करणारे आयुर्वेदिक पदवी आणि पदव्युत्तर पदवीधारक हिरीरीने हा विचार मांडतात. आयुर्वेदिक सभा संमेलनांतील वक्ते आधुनिक विज्ञान ही काही आधुनिक वैद्यकाची मक्तेदारी नाही, आयुर्वेदीकांनीही त्याचा वापर करून घ्यावा, असे वक्तव्य करून टाळ्या मिळवतात. पण ही सगळी मंडळी एका गोष्टीकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत असतात, ती म्हणजे, कोणत्या आजारात कोणत्या तपासण्या करायच्या, त्यांचे निष्कर्ष काढण्याची पद्धत, बायोकेमेस्ट्री, मायक्रोबायाॅलाॅजी, इमेजिंग टेक्निक्स यासाठी शरीररचना आणि रेडियोलाॅजीचं ज्ञान असणं अत्यंत आवश्यक असतं. विज्ञान आणि तंत्रज्ञानांच्या फायद्यांवर सर्वांचा अधिकार असतो मात्र विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी त्या त्या क्षेत्रातीले प्रशिक्षित तज्ज्ञच आवश्यक असतात हे आयुर्वेदिक लोकांनी लक्षात घ्यायला हवं. रोगनिदानाच्या आधुनिक तंत्राचा उपयोग घ्यायचा असेल तर आयुर्वेदीकांना रचना, क्रिया, विकृतीविज्ञान, सूक्ष्मजीवशास्त्र आणि जीवरसायनशास्त्र, रेडियोलाॅजी शिकायलाच हवी.

म्हणजे आयुर्वेदात किमान रचना, क्रिया, विकृतीविज्ञान, सुक्ष्मजीवशास्त्र आणि जीवरसायनशास्त्र आणि रेडियाॅलाॅजी एवढे विषय नव्याने शिकावे लागतील. मात्र या सर्व क्षेत्रात आधुनिक वैद्यकाने आधीच गगनभरारी मारून ठेवली आहे. त्यामुळे याक्षेत्रात संशोधनासाठी आयुर्वेदीकांना काही वाव उरलेला नाही. याउलट, इथे संशोधनाचे प्रयत्न करणे म्हणजे वेळ, पैसा, परिश्रम आणि मानवी संसाधन वाया घालवण्यासारखं होईल.

याशिवाय आयुर्वेदाला माहिती नसलेली असंख्य रोगलक्षणं आहेत. त्या रोगलक्षणांची कारणं, त्यामागचं विकृती विज्ञान, त्याचं रोगनिदान करणं हे सगळं आयुर्वेदाला माहीत करून घ्यावं लागेल. मात्र इथेही आधुनिकांनी आधीच फार लांबचा पल्ला गाठला आहे. इथेसुद्धा आयुर्वेदिकांना फारसा वाव उरलेला नाही.

रहाता राहिलं ते आयुर्वेदिक औषधींचे रोगलक्षणांवर दिसणारे परिणाम. त्यात दोन भाग पडतात. वनौषधींचे घटक माहिती करून घेणं आणि त्यांची शरीरात होणारी क्रिया तपासणं आणि दुसरा त्या वनौषधींचे तसेच खनिज आणि धातू, रत्न उपरत्न, विषं इत्यादींचे ग्रंथोक्त तसेच ग्रंथात माहिती नसलेल्या रोगलक्षणांवर होणारे परिमाण तपासून निश्चित करणं.

यातला पहिला भाग, घटक निश्चिती आणि शरीरातील क्रिया तपासणं हा फार्माकाॅलाॅजीच्या अभ्यासाचा आहे आणि तो अभ्यास करता यावा असं शिक्षण आयुर्वेदिकांना दिलंही जात नाही. उरतो दुसरा भाग, ग्रंथोक्त रोगांवर त्यांचे परिणाम तपासणं. आयुर्वेदाचे आजार हे खरे तर रोगलक्षणं आहेत. उदा. कावीळ हा आयुर्वेदाने आजार मानला आहे आणि त्याची चिकित्सा सांगितली आहे. मात्र आधुनिक वैद्यकात कावीळ हे रोगलक्षण आहे आणि त्याची कारणं रक्ताचे आजार, यकृताचे आजार किंवा पित्त वाहून नेणाऱ्या नळीतील अडथळा अशी वेगवेगळी असू शकतात. आयुर्वेदिक ग्रंथात असलेलं कावीळचं औषध नेमकं कोणत्या कारणामुळे उद्भवलेल्या कावीळवर काम करत हे ठरवायचं झालं, तर प्रथम काविळचं रोगनिदान नक्की करावं लागेल. आणि ते रोगनिदान नक्की करण्यासाठी आपल्याला सध्या तरी आधुनिक वैद्यक तज्ञांची मदत घ्यावी लागेल (सध्याच्या आयुर्वेदिकांना आधुनिक रोगनिदानाचं पायाभूत शिक्षण मिळून ते त्यातले तज्ज्ञ होण्यास अजून बराच वेळ लागणार आहे) उपचार करायला आयुर्वेदीक प्रॅक्टिशनर लागेल. मात्र रोगलक्षणात औषधींचा होणारा परिणाम तपासायला आधुनिक प्रॅक्टीशनरच असायला हवा.

आयुर्वेदातील काही लोकांना संशोधनाचं आधुनिक वैद्यकातलं प्रारूप मान्य नसतं. त्यांचं म्हणणं असतं की आयुर्वेदाचं संशोधन आयुर्वेदाच्या पद्धतींनी व्हायला हवं. परंतु त्यापद्धती कोणत्या असाव्यात किंवा कशा विकसित करायला हव्या या दिशेने त्यांच्याकडून फारसा काही प्रयत्न झाल्याचं दिसतच नाही.

मुळात अडचण ही आहे की आयुर्वेदिकांचा बारावी सायन्सनंतर पायाभूत विज्ञान, त्याची परिभाषावली, त्यांचे उपायोजन (application) आणि त्यांची भाषा याबाबींशी काहीही संबंध उरत नाही. मग आधुनिक विज्ञानाला मान्य असलेल्या संशोधनाच्या रितीभाती आयुर्वेदिकांना माहिती पडतीलच कशा?

आयुर्वेदाचं आयुर्वेदिक स्वरूप टिकवायचं झालं तर त्रिदोष सिद्धांत मान्य करावाच लागतो. रोग होण्याचं कारण त्रिदोष असतात हे नाकारलं तर आयुर्वेदाचं आधुनिक वैद्यकात रुपांतर अटळ होतं. आणि त्रिदोषांचं शरीरात अस्तित्व तुम्ही एक तर मान्य करू शकता किंवा अमान्य एवढाच एक मार्ग उपलब्ध आहे. कारण अद्यापतरी कुठलीही रक्ताची चाचणी त्रिदोषांचं शरीरातील अस्तित्व सिद्ध करू शकत नाही, ना एखाद्या इमेजिंग टेक्निकमध्ये त्रिदोष दिसू शकतात आणि ते अस्तित्वात नाहीत, हे आयुर्वेदिकांना मान्य होण्यासारखं नाही.

आयुर्वेदाच्या अभ्यासाची भाषा वेगळी आहे, अभ्यासाच्या विषयाचा सध्या सर्वमान्य विषयांशी फारसा संबंध नाही. त्या सर्वमान्य विषयांच्या अध्ययन आणि संशोधनपद्धतींशी जुळवून घेण्याची आयुर्वेदिकांची फारशी इच्छाही नाही. तसंच त्यांना त्या पद्धतींशी जुळवून घेण्यासाठी लागणारी निर्णयक्षमता, त्यांनी ते तसं जुळवून घेण्यासाठी लागणारी राजमान्यता आणि त्यासाठी लागणारा निधी सगळ्या गोष्टींची वानवा आहे.

हेही वाचा – बहुजनांनो, सरकारने आरक्षण ठेवलेच आहे कुठे?

क्लिनीकल प्रॅक्टीशनरचं काम इतरांनी केलेल्या संशोधनाचं रुग्णाच्या उपचारात उपायोजन करणं इतकंच असतं, संशोधन करणं नव्हे हे विसरून सगळे जण आयुर्वेदीक प्रॅक्टीशनरकडून आयुर्वेदातील संशोधनाची अपेक्षा करतात, हे पाण्यात रहाणाऱ्या माशाला हवेत उडण्याचं संशोधन करायला लावण्यासारखं अमानवी आहे.

आयुर्वेदाने वापरलेल्या वनौषधींमधील, आयुर्वेदाला ज्या आजाराचं रोगनिदान करता येणार नाही, अशा आजारावर परिणामकारक तत्त्वं, अनायुर्वेदीक मंडळी शोधून काढतात आणि आयुर्वेदिकांचं त्यात काही योगदान असू शकत नाही याचं कारण वर उल्लेख केलेल्या बाबींमध्ये कुठे आढळतं का याचा विचार करायला हवा.

आयुर्वेदिक ग्रंथातील वर्णनाचे मुख्य दोनच वर्ग आहेत

१) निरीक्षण आणि आनुभविक क्लिनीकल वर्णनं

२) काल्पनिक सिद्धांत

निरीक्षण आणि क्लिनिकल अनुभवांचं शरीर रचना आणि क्रियेच्या स्तरावर स्पष्टीकरण देता येण्याजोगा मानवी शरीराच्या रचनेचा आणि क्रियेचा अभ्यास तेव्हा आयुर्वेदाला झाला नव्हता, म्हणून त्यांना त्यांचे तत्कालीन निरीक्षण आणि क्लिनिकल अनुभवांचं स्पष्टीकरण देण्यासाठी त्रिदोषादी सिद्धांत मांडावे लागलेत.

आयुर्वेदात आता थोडा फार उपयुक्त भाग काही उरला असेल तर तो निरीक्षण आणि आनुभविक क्लिनिकल वर्णनाचाच आहे, तोदेखील फार अधिक नाही. सिद्धांत सगळेच्या सगळे कालबाह्य झाले आहेत. हे लक्षात घेऊन आयुर्वेदाचं आजच्या चिकित्सा क्षेत्रातील स्थान निश्चित करावं लागेल.

(लेखक एमडी आयुर्वेद आहेत.)

इमेल पत्ता – vdshri28@gmail.com

Story img Loader