अनेक विषारी घटकांचे उत्सर्जन करून जल, वायू, मृदा प्रदूषित करणारे, अनेक विकारांना आमंत्रण देणारे, बालकांना मजुरीला जुंपून तयार केले जाणारे फटाके फोडणे हे आनंद साजरा करण्याचे माध्यम कसे ठरू शकते, यावर विचार व्हायला हवा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पर्यावरण, प्रदूषण या संदर्भात गेल्या काही वर्षांपासून फटाक्यांची चर्चा होत आहे. खरे तर वायू, ध्वनी, जलप्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या फटाक्यांवर पूर्णपणे बंदी घातली जाणे गरजेचे आहे. अनेक जण याच्याशी मुळीच सहमत होणार नाहीत. आनंद, धार्मिक स्वातंत्र्य, व्यक्ती स्वातंत्र्य, रोजगार अशी बरीच कारणे पुढे केली जातील. ही सर्वच कारणे ‘सबब’ या एका वर्गात मोडणारी आहेत.

व्यापारी आणि व्यावसायिक असोत किंवा सर्वसामान्य व्यक्ती, फटाके फोडताना कुरघोडी हा एक मोठा घटक असतो. आपण अधिक किमतीचे, अधिक मोठे, अधिक आवाजाचे, अधिक प्रकाशाचे फटाके अधिक प्रमाणात आणि अधिक वेळ फोडले हे दाखवण्याचा इरादा नसतो का, याचे आत्मपरीक्षण प्रत्येकाने अतिशय प्रामाणिकपणे केले पाहिजे. फटाके फोडण्याचा आनंद हा आसुरी आनंदच असतो. त्यापेक्षाही महत्वाचे म्हणजे, स्वत:ला आणि इतरांना त्रास देणारी गोष्ट आनंद साजरा करणारी असूच शकत नाही.

फटाक्यांचे समर्थन करताना धर्माचा आधारही घेतला जातो. एक तर हिंदूंच्या सणाच्या वेळीच पर्यावरण वगैरे आठवते का, असा एक आक्षेप असतो. हा युक्तिवाद मुळातच तकलादू आहे. हिंदू समाजाची एकजूट घडवून आणण्यासाठी आणि या समाजाला सशक्त करण्यासाठी इतक्या उथळ मुद्याची गरज नाही. हिंदू समाज शक्तिमान करण्यासाठी त्याच्या शक्तिस्थानांवर जोर द्यायला हवा. देशकाल परिस्थितीनुसार तर्कपूर्ण गोष्टींना कुणाचाही विरोध असू शकत नाही.

हेही वाचा : इस्रायल- संघर्षांपुढे जगातील नेते हतबल?

दुसरा युक्तिवाद असतो- फटाके फोडणे ही धार्मिक प्रथा आहे. या युक्तिवादात तथ्य नाही. अगदी रामायण काळातसुद्धा अयोध्येत फटाके फोडले होते, असे सांगितले जात असले तरी त्याचा लिखित पुरावा कुठेही दिसत नाही. रामायणात फार तर रामाच्या अयोध्या आगमनानिमित्त लक्षावधी दिवे लावून तो आनंद साजरा केला होता, असे वर्णन आढळते. म्हणून दिवाळीला दीपावली असे म्हणतात. भारतात असंख्य सण-उत्सव सतत साजरे होत असतात. त्यांना शेकडो-हजारो वर्षांची परंपरा आहे. फटाके फोडणे हा जर धर्माचा भाग असेल तर अन्य कोणत्याही सण उत्सवाशी फटाके का जोडले गेले नाहीत? हल्ली फटाके फोडण्यासाठी कोणतेही निमित्त चालते, ही गोष्ट आलाहिदा.

भारतातील अन्य अनेक उद्योग व्यवसायांना शेकडो वर्षांचा इतिहास आहे. असे असताना फटाका व्यवसायात आघाडीवर असलेल्या शिवकाशीला फक्त शे-दोनशे वर्षांचाच इतिहास का असावा? शिवाय येथे या व्यवसायात बालमजुरांना मोठ्या प्रमाणात जुंपलेले दिसते. हा मुलांवर अन्याय करणारा आणि बेकायदा व्यवसाय आहे. भारतात फटाके म्हणजे शोभेची दारू मोठ्या प्रमाणात फोडण्याची सुरुवात ब्रिटीशांच्या काळात झाली. तेव्हापासून आजतागायत फटाके हा निव्वळ व्यावसायिक प्रकार आहे, त्यात धार्मिकता काहीही नाही, धर्माचा संबंध नाही. याउप्परही समजा फटाके आणि धर्माचा संबंध लावला तरीही, हिंदू समाजाने योग्य-अयोग्य विवेक करून अनेक प्रथा आणि परंपरांमध्ये बदल केले आहेत. तीच हिंदू धर्माची शिकवण आहे, तेच त्याचे वैशिष्ट्यही आहे आणि त्याचे शक्तिस्थानही.

हेही वाचा : कधी बिबट्या, कधी नीलगायी, अस्वल, माकडे… शेतीतला उच्छाद थांबवायचा कसा?

फटाक्यांना विरोध का? त्याने रोजगाराची हानी होणार नाही का? हा दुसरा प्रश्न केला जातो. एक म्हणजे, फटाक्याने होणारे नुकसान आणि फटाके व्यवसाय बुडाल्याने होणारे नुकसान यातील, फटाके फोडल्याने होणारे नुकसान अधिक आहे. दुसरे म्हणजे, अशा गोष्टी अपरिहार्य असतात आणि त्यांनी फारसा फरक पडत नाही. मोबाइलफोनमुळे हजारो पीसीओ बूथधारक बेरोजगार झालेतच ना? स्वयंचलित दुचाकी वाहने वाढल्याने सायकलनिर्मिती आणि दुरुस्ती यातील रोजगार घटलाच ना? संगणक वापरणे सुरू झाल्यावर अनेक लोक बेरोजगार झाले ना? त्यामुळे हा मुद्दा गैरलागू आहे. बंद पडणाऱ्या उद्योगांना पर्यायी उद्योगांची निर्मिती अल्पावधीतच होते.

फटाक्यांना विरोध होतो कारण त्यामुळे आरोग्य आणि पर्यावरणाची हानी होते. आवाज आणि वायूप्रदूषण किती होते हे वेगळे सांगण्याची गरज नाही. विविध सणांच्या वेळी आपण ते प्रत्यक्ष अनुभवतो आहोतच. डोळे चुरचुरण्यापासून, डोके बधीर होण्यापर्यंत आणि चिडचिडेपण वाढण्यापासून जखमा होण्यापर्यंत अनेक समस्या उद्भवतात शिवाय. हृदयविकार, श्वसनविकार असणाऱ्यांचा त्रास अधिकच वाढतो. एक गोष्ट आवर्जून सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे की, फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण झाडे लावल्यामुळे कमी होत नाही. कारण फटाके फोडण्यातून निर्माण होणारा धूर कागद, लाकडे वा काडीकचरा यांच्या धुरासारखा साधा नसतो. कागद, लाकडे, काडीकचरा जाळला तर त्यातून फक्त कार्बन डायऑक्साइड निर्माण होतो. हा वायू झाडांचे अन्न आहे. त्यामुळे झाडे लावली की त्याचे प्रदूषण कमी होईल. तसेही प्रत्येक माणूस रोज २४ तास कार्बनडायऑक्साइडचे उत्सर्जन करतच असतो. हे प्रदूषण झाडे लावून कमी होते. मात्र फटाक्यांच्या ज्वलनात (फटाके आवाजाचे असोत की प्रकाशाचे) अनेक रसायने आणि धातू असतात. वेगवेगळ्या रंगांच्या निर्मितीसाठी अनेक विषारी धातू वापरले जातात. झाडे ही रसायने आणि धातू शोषून घेऊ शकत नाहीत.

हेही वाचा : ‘आपल्या माणसां’साठी एक निवृत्त पोलीस अधिकारी तुरुंगात जातो..!

लाल रंगासाठी लिथियम, नारिंगी रंगासाठी कॅल्शियम, पिवळ्या रंगासाठी सोडियम, हिरव्या रंगासाठी बेरियम, निळ्या रंगासाठी कॉपर, जांभळ्या रंगासाठी पोटॅशियम आणि रुबिडीयम, सोनेरी रंगासाठी कोळसा आणि लोखंड, पांढऱ्या रंगासाठी टिटॅनियम, ॲल्युमिनियम, बेरिलियम, मॅग्नेशियम आदी धातू वापरले जातात. याशिवाय झिंक, सल्फर, फॉस्फरस यांचाही वापर केला जातो. झाडांच्या प्रकाशसंश्लेषणाच्या प्रक्रियेत कार्बन डायऑक्साइड ग्रहण करून ऑक्सिजन बाहेर सोडला जातो. अन्य धातू वा रसायने हवेत तशीच राहतात. हवेत मिसळलेले हे धातू आणि रसायने हवा, पाणी आणि जमीन कायमस्वरूपी प्रदूषित करतात.

फटाक्यांप्रमाणेच सर्व प्रकारच्या स्वयं वातानुकूलन यंत्रणा (एसी), डिओडरंट्स, स्वयंचलित वाहनांचा धूर अशा काही गोष्टींनी होणारे प्रदूषण केवळ झाडे लावून दूर होणारे नाही. या ज्वलनातून उत्सर्जित होणारे क्लोरो-फ्लोरो कार्बन व अन्य घटक पर्यावरण आणि आरोग्याची मोठी हानी करतात. यावरही बंधने आणणे आवश्यक आहेच. शिवाय या सर्व गोष्टी पोटात घेऊन त्यांचे अन्य उपयुक्त घटकांत परिवर्तन करण्याची स्वयंसिद्ध क्षमता असलेल्या मातीशी आपण वैर धरले आहे. त्यामुळे पर्यावरणाचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. म्हणूनच फटाक्यांना पूर्ण फाटा देण्याची आवश्यकता आहे.

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is the point to celebrate diwali by bursting crackers which pollute the environment css