श्रीकांत कुलकर्णी
मला आठवतंय ते त्यांच्याकडचं शांत सोज्वळ वातावरण. कुठलाही भडकपणा नाही की सवंगपणा नाही. सारं कसं मंदसं आल्हाददायक, प्रसन्न. घरात फार शोभेच्या वस्तू नव्हत्या पण होत्या त्या सुबक नीटनेटक्या, चंदनी, संगमरवरी किंवा हस्तीदंती. एक कलाकृती तर सांबरशिंगातनं घडवलेली होती. खाणंसुद्धा अगदी साधंसं, पण दूधदुभत्याचं प्रमाण तसं बऱ्यापैकी होतं. दही-ताक-तुपाची रेलचेल. त्यावेळी, लहानपणी, सत्व- रज- तम असे गुण वगैरे काही माहीत नव्हते. नंतर जसजसा मोठा होत गेलो तसतसं हे कानावर पडून व नंतर थोड्याफार वाचन व अभ्यासातनं उमगत गेलं. त्यावेळी त्यांच्याकडचं अनुभवलेलं, स्मरणात असलेलं वातावरण हे ‘सात्विक’ गटात मोडणारं होतं हे कळत होतं. जशजशी उमज वाढत गेली तसतसा आता गोंधळ वाढू लागला, प्रश्न पडू लागले. रुजलेल्या कल्पनांना तडे जाऊ लागले.
सात्विकतेच्या पारंपरिक संकल्पना व आता नव्यानं आकळत जाणारी त्यामागील नैतिकता, यातील विरोधाभास जाणवू लागला. आपण जे सात्विक म्हणतो ते खरोखरच तात्विकदृष्ट्या सात्विक असतं का? भारतीय संस्कृतीत सात्विक आहार व जीवनशैली यांचं एक विशेष असं महत्त्व आहे. त्याची दैवी शुचिर्भूतता व पावित्र्याशी सांगड घातली गेली आहे. सात्विकता ही शुद्ध, शांत आणि अहिंसात्मक जीवनशैलीशी जोडली गेली आहे, मात्र आपण सात्विक मानल्या जाणाऱ्या गोष्टींचा उगम वा निर्मितीप्रक्रीया जाणून घेतली तर त्या नेहमीच पूर्णतः अहिंसक अन पर्यायानं सात्विक असतात का, हा प्रश्न उपस्थित होतो.
नमुन्यादाखल आपण एखाद्या पूजेचं उदाहरण पाहू. पूजा म्हटलं की साधारणतः रेशमी वस्त्र, दूध-तूपमध आदी आलंच. पण या साऱ्या गोष्टींचं उत्पादन किंवा प्राप्ती प्रक्रियेत काही प्रमाणात हिंसा अंतर्भूत असतेच.दूध – भारतीय परंपरेत गायीला मातेसमान मानलं गेलं आहे व गायीचं दूध सात्विक. पण दुग्ध व्यवसायाचा विचार केला तर बहुतांश गायी अन अर्थात म्हशीपण कृत्रिमरीत्या गाभण केल्या जातात. त्यांच्या वासरांना त्यांच्यापासून तोडलं जातं. अशाप्रकारे दुधासाठी त्यांच्या नैसर्गिक जीवनक्रमातच हस्तक्षेप होत असतो. जर ही प्रक्रिया नैसर्गिक नाहि आणि तिच्यात प्राण्यांना वेदनाही होताहेत, तर हे खरोखरच सात्विक ठरू शकतं का? आणि गायीम्हशीच कशाला, ज्या ज्या प्राण्यांचं दूध मनुष्य वापरू लागला त्या सर्वांच्याच बाबतीत हे लागू होतं.
मध – मध सात्विक आणि आरोग्यासाठी लाभदायक मानला जातो. मात्र, मध गोळा करताना मधमाश्यांची संपूर्ण पोळी काढली जातात किंवा आग व धूर करून माश्यांना पळवून लावलं जातं. व्यावसायिक स्तरावर मध गोळा करताना माश्यांचं अस्तित्वच धोक्यात येतं आणि बरेचदा त्यांचा नाशही केला जातो. जर हा मध मधमाश्यांच्या जीवनावरच घाला घालत असेल, अन्याय करत असेल, तर आपण तो सात्विक कसा मानू शकतो.
रेशीम – रेशमी वस्त्र हे सात्विक तसंच समृद्धीचंही प्रतीक मानलं जातं. पण रेशीम उत्पादनासाठी हजारो रेशीम किड्यांना जिवंतपणी उकळत्या पाण्यात टाकून मारलं जातं, जेणेकरून तंतु अखंड राहतात. जर एखाद्या जिवाचा जीव घेऊन हे धागे, ही वस्त्रं तयार होत असतील, तर ती कशी बरं सात्विक ठरावी? जर धर्म आणि श्रद्धेच्या नावाखाली जीवांचा बळी द्यावा लागत असेल, तर तो कितपत नैतिक ठरावा? दसऱ्याचं सोनं लुटणं – सोनं लुटणं या नावाखाली आपण आपट्याची पानं वाटतो. आज मुळात एकंदरीत झाडंच नाहिशी होत चालली आहेत तर त्यात आपट्याची अशी कितीशी झाडं असतील? आणि सोनं वाटणारी मंडळी, वाढत्या लोकसंख्येमुळे कोट्यवधींत असतील. म्हणजे दरवर्षी किती आपट्याची झाडं ओरबाडून आपण हे सोनं वाटण्याचा आनंद घेतो? वाटून झाल्या क्षणानंतर ती वाळकी पानं केवळ केरकचराच ठरतात.
मोरपिसं – भारतात मोराला पवित्र मानलं जातं. श्रीकृष्णाशी जोडलं असल्यामुळे मोरपिसांचं महत्व अधिकच. अनेक धार्मिक विधींमध्ये आणि सजावटीसाठी त्यांचा उपयोग होतो. नैसर्गिकरित्या गळून पडलेली पिसं गोळा करणं सात्विक असू शकतं, पण प्रत्यक्षात मोरांना जबरदस्ती पकडून, त्यांची पिसं उपटली जातात, आणि त्यामुळे त्यांना वेदनाही होतात. अशा प्रकारे मिळवलेली मोरपिसं कुठल्या आध्यात्मिक व सात्त्विकतेच्या व्याख्यांत बसतील?
हस्तीदंत – हस्तीदंताचा उपयोग मूर्ती, दागिने, वाद्यं आणि सजावटीच्या नानाविविध वस्तूंसाठी केला जातो. प्राचीन काळी हस्तीदंताला राजस, सात्विक व समृद्धीचं प्रतीक मानलं जात असे. मात्र, हत्तींना ठार मारल्याशिवाय किंवा घायाळ केल्याशिवाय हे दात मिळत नाहीत. आणि त्यामुळे अनेक ठिकाणी हत्ती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. नैतिकदृष्ट्या विचार केला तर ही गोष्ट सात्विकतेच्या कुठल्या व्याख्येत बसू शकते?
सांबरशिंग – सांबर किंवा इतर हरणांच्या शिंगांना भारतीय परंपरेत व आयुर्वेदात महत्त्व आहे. हरणांच्या नैसर्गिकरित्या गळून पडणाऱ्या शिंगांऐवजी, अनेकदा त्यांना मारून किंवा जखमी करून शिंगे काढली जातात. जर प्राण्यांना वेदना देऊन आणि जीव घेऊन काही साध्य करावं लागत असेल, तर तो खरोखर सात्विक मार्ग ठरेल का?
अशा अजून अनेक गोष्टी आहेत, अगदी मोती, प्रवाळ, कस्तुरी किंवा मृगाजीन घ्या.. की ज्या पारंपारिक व सांस्कृतिकदृष्ट्या धार्मिक, आध्यात्मिक, श्रेष्ठ, पवित्र अन सात्विक मानल्या जातात, पण त्यांच्या प्राप्तीप्रित्यर्थ जे काही करावं लागतं त्या साऱ्यांत हिंसा, शोषण किंवा अन्याय अंगभूत असतो, दडलेला असतो. सात्विकता ही केवळ शुद्धता किंवा धार्मिक महत्त्वावर आधारित नसून, त्यामागील प्रक्रिया किती नैतिक आहे, हेदेखील महत्त्वाचं आहे. यात चूक-बरोबर वा उच्च-नीच दाखवणं वा ठरवणं हा उद्देश नाहि. उद्देश हा आहे की आमच्या मनी हा विचार यावा की इतका अन्याय, हत्या करूनही, काही जीव दुखवूनही करावं इतकं खरोखरच महत्वाचं वा अत्यावश्यक असं काही आम्ही करतो का? आणि अगदी आवश्यक असेल तर आज अनेक पर्यायी मार्ग उपलब्ध आहेत, जसं देवाऐवजी नारळ वा सुपारीनंही काम भागवता येतं तसं – प्राण्यांना हानी न पोहोचवणारे शाकाहारी पर्याय, नैतिक पद्धतीनं करता येइल असा दुग्धव्यवसाय, मधाऐवजी गूळ वा फळांचा अर्क, कृत्रिम किंवा प्लांट-बेस्ड रेशीम वगैरे.
या विषयास धरुन काही चिकीत्सक विद्वान मंडळी हा विषय मनुष्याच्या शाकाहार-मांसाहार या वादाकडेही नेऊ शकतील ही शक्यता गृहीत धरून खालील मुद्देप्रपंच. यावर खोलात जाऊन समजून घेण्यासारखं खूप काही आहे. ‘जीवो जीवस्य जीवनं’ या उक्तीचा अर्थही साकल्यानं आकळणं आवश्यक आहे. एकतर, केवळ वाद घालायचा म्हणून, रक्ताच्या चिळकांड्या, चिरलेल्या गळ्याच्या वेदनेनं तडफडत आचके देणारे पशूपक्षी यांची तुलना भाजीपाला व फळफळावळ चिरण्याशी करणं, बालीशपणाचं अन अयोग्यही ठरतं. कारण, मेंदूचं असणं व नसणं हा यातला प्रमुख फरक आहे. ही आध्यात्मिक उमज, वैज्ञानिक ज्ञान फार उपयुक्त ठरतं. तसंच, जीव व प्राण यातला भेद कळणंही महत्वाचं ठरतं.
दुसरं असं की, उदाहरणार्थ, फळं ही पक्वावस्थेत गळून पडून अन पशूपक्ष्यांनी (मनुष्यप्राण्यासह) खाऊन त्यांच्या बिया वा बीजं इतस्ततः विखुरल्या जाव्या हीच निसर्गाची योजना आहे. प्रजनन व वंशवर्धन होण्यास्तव. हीच गोष्ट लागू आहे धान्य वा भाजीपाल्यासही. असो, सारांश हा की शक्य असेल तर, अन शक्य असेल त्यांनी, हा जरुर विचार करावा की सात्विकता अन नैतिकता व भूतदया यात परस्परसंबंध असावा की नाही. sk3shrikant@gmail.com