महाराष्ट्राच्या राजकारणात एक असा पक्ष आहे की त्या पक्षातील नेते मंडळी आपल्याच पक्षासोबत असावीत असे इथल्या प्रत्येक प्रमुख राजकीय पक्षाला वाटत असते! आणि बऱ्याचदा तर, ‘आम्ही जिथे जातो तिथे सत्ता असते’ असा दावासुद्धा या पक्षातील नेत्यांकडून केला जात असतो! हाच तो पक्ष, जो वेगवेगळ्या गटांमार्फत राजकारणात निरनिराळ्या पक्षांशी युती आघाडी करून निळा झेंडा हातात घेत आपली राजकीय ताकद दाखविण्याचा प्रयत्न करत असतो. ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’ असे या पक्षाचे नाव. या पक्षाचे अनेक गट राजकारणात दिसत असतात, त्यापैकी एका मोठ्या गटाकडे तर केंद्रातील मंत्रिपदही आहे. पण सत्तेत याच पक्षाच्या गटाचा सहभाग असला तरी, न्याय मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरणे, अनेक आंदोलने करणे, मोर्चा काढणे हे या पक्षासाठी व नेत्यांसाठी काही नवीन नाही. या पक्षाची आठवण आजच्या महाराष्ट्राला- आजच्या राजकारणाच्या संदर्भात- नव्याने करून देणे आवश्यक आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रिपब्लिकन पक्षाचे वेगवेगळे गट पाहायला मिळत असले तरी ‘दलित पँथर’च्या काळात हेच नेते आक्रमक भूमिका घेत अन्यायाच्या विरोधात लढत होते. ही धार कालांतराने गटातटांत विभागली गेली. एकीवर आधारलेले उत्तम संघटन तयार होत असते तेव्हा त्यास छेद देणारे अनेक फोडाफोडीचे प्रकारही घडत असतात. हे प्रकार रिपब्लिकन नेत्यांच्या बाबतीत तर अनेकदा घडलेले आहेत. सांगण्याचा मुद्दा हा की, ज्या रिपब्लिकन पक्षाबद्दल आज अनेक गट-तट असल्याचे बोलले जाते, तशीच गट- तट पडण्याची प्रक्रिया जणू इतर पक्षांमध्ये होऊ लागलेली आहे. जो सवाल रिपब्लिकन पक्षाबाबत येतो, तोच आता महाराष्ट्रातल्या अन्य पक्षांनाही सतावणार आहे.

हेही वाचा – जिंकणार भाजपच, पण शक्तिपात होतोय तो भाजपचाच…

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाशी नाते सांगणारे कुणी भेटले की, नेमका तुमचा गट कोणता, तुम्ही कोणत्या गटाचे असे नेते कार्यकर्ते पदाधिकारी यांना विचारले जात असते. तेव्हा हाच प्रश्न आता आजच्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात झालेल्या या दोन गटांबाबत लागू होऊ लागला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतून स्थापन झालेल्या रिपब्लिकन पक्षाबद्दल त्या पक्षातून काम करणाऱ्या नेत्यांना कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना नेमके तुम्ही कोणत्या गटाचे असे म्हटले जाते तेव्हा ते आपापला गट सांगतातच, पण ‘हा पक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा आहे’ हे सांगायला ते अजिबात विसरत नाहीत.

आज दोन्ही गटांतील शिवसेना म्हणते आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन जात आहोत. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट शरद पवारांचाच आशीर्वाद आमच्या पाठीशी असल्याचे म्हणत आहेत. पक्ष तोच असतो परंतु पक्षाचे गट पडतात, तेव्हा पक्षाची काही वैशिष्ट्ये कायम ठेवूनच काम करावे लागत असते. कारण ज्या विचारातून पक्ष उदयास आलेला असतो त्या विचारांची बांधिलकीसुद्धा त्या पक्षाशी जोडलेली असते. पक्षाचे कितीही गट झाले तरी पक्षाची विचारसरणी मात्र तीच राहात असते. परंतु पक्ष गटातटात विभागून जात असतो, तेव्हा पक्षाचे अस्तित्व मात्र धोक्यात येत असते. मीच नेता, मलाच सर्व हवे अशा मानसिकतेने पक्ष आणि नेतापण मर्यादित कक्षेपर्यंत राहत असतो. त्यामुळे, रिपब्लिकन पक्ष वाढलाच नाही.

रिपब्लिकन पक्षाच्या गटाबद्दल सांगण्याचा हाच हेतू होता की, ज्या रिपब्लिकन पक्षातील नेत्यांना कधीही एकत्र येऊ दिले जात नव्हते ते सर्व गट आजही कुठे काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना या प्रत्येक पक्षासोबत संसार थाटलेले आहेत. रिपब्लिकन पक्ष हा गटातटांमध्येच विखुरलेला राहिला पाहिजे. तो कधीच एकीमध्ये येऊच नये, याची काळजीसुद्धा इथल्या प्रमुख राजकीय पक्षांनीच वेळोवेळी घेतलेली आहे. पक्ष हा फुटीर स्वरुपात ठेवण्याची किमया वारंवार प्रत्येक निवडणुकीत पार पाडली गेली.

हेही वाचा – ‘जननी’ची जरब हवी!

इथे फुटाफुटीनंतर ‘आमचा गट हाच खरा पक्ष’ असा दावा करणारी मानसिकताही आहे. वर्षभरापूर्वी ज्या पद्धतीने शिवसेना फुटीच्या नाट्यमय घडामोडी घडल्या किंवा घडवल्या गेल्या त्यानंतर हेच झाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेतेसुद्धा हेच म्हणत आहेत. ज्या पक्षात सर्वांनी एकत्रित राहून काम केले त्यांनाच एकमेकांच्या विरोधात आरोप प्रत्यारोप, टीकाटिप्पणी करावी लागते आहे. याचे कारण म्हणजे पक्षाची झालेली दुफळी व विभागले गेलेले दोन गट होय.

मूळ पक्ष इतिहासजमा होऊन गट पडल्याने पक्षाची ताकद तर कमी झालीच. परंतु पक्ष संपविण्याची यंत्रणा काम करायला लागते तेव्हा आपापल्या गटाचेच अस्तित्व कसे टिकवून ठेवावे लागेल यासाठीही संघर्ष करावा लागतो. आज राज्यातील गाव, शहर, मोहल्ला या ठिकाणी ‘तुमचा नेमका गट कोणता?’ असे विचारले जाते तेव्हा तुमचे संघटन हे कमकुवत होत चाललेले आहे, हे सत्य स्वीकारावे लागते, तेच आता शिवसेना आणि राष्ट्रवादीबद्दलही होऊ लागले आहे, होत राहील.

‘गट कोणता?’ हा प्रश्न आधी जणू रिपब्लिकन पक्षासारख्या, शोषित समाजाला राजकीय आवाज देणाऱ्या पक्षांसाठी होता. पण आता तो केवळ शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेसपुरताही राहिलेला नाही. आज अनेक राज्यांत अनेक प्रादेशिक पक्षांपुढे फुटीची आव्हाने उभी राहू लागलेली आहेत. याची कारणे अनेक असली तरी पक्षफोडीचे प्रयोग सुरू झालेले आहेत. ज्या पद्धतीने, ज्या हेतूंसाठी हे सारे केले जाते आहे ते घातक राजकारण आहे. विचार तरी टिकतो का?

हेही वाचा – गर्भातील बाळाच्या हृदयाचे ठोके – गर्भपात करण्याचा नवा व्यवसाय ?

‘आम्हीच (आमचाच गट) मूळ विचार पुढे नेतो आहे’ असा दावा कितीही केला जावो, वास्तव हे असते की गटा-तटांमुळे पक्षाची ताकद कमी झालेली असते. दुसऱ्या पक्षांवर अवलंबून राहावे लागते. मग विचारही कमकुवत होऊ लागतो. राजकीय तडजोडी कराव्या लागतात. अत्याचार घडले तरी त्याकडे न पाहाता, मंत्रीपद सांभाळण्यास प्राधान्य द्यावे लागते. विचार मानणारे कार्यकर्ते असतात, त्यांच्यामुळे विचार टिकून राहातो खरा, पण त्या विचाराला राजकीय आवाज नसतो. म्हणजे ज्यासाठी पक्ष स्थापन झाला, तो हेतूच निष्फळ ठरतो.

महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादीवर आलेली वेळ, मूळ पक्ष आणि त्याचे अस्तित्व पूर्णपणे गटात विभागल्याने व हे असेच चित्र पुढेही राहिले तर या पक्षांची राजकीय अवस्था येणाऱ्या काळात कशी असू शकते याचे विचारमंथन होणे अपेक्षित आहे. कारण कोणत्या परिस्थितीत कोणते निर्णय घेऊन, कोणती राजकीय उलथापालथ झाली, यातूनच पुढे पक्षाचे भवितव्य ठरणार आहे. नाहीतर यांची तीनचाकी रिक्षा की त्यांची तीनचाकी रिक्षा एवढाच प्रश्न मतदारांपुढे राहील!

(sushilgaikwad31@gmail.com)

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What will shiv sena ncp learn from the republican party ssb