संतोष प्रधान
अंधेरी पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणुकीत महाराष्ट्राची उच्च परंपरा आणि संस्कृती लक्षात घेता भाजपने माघार घ्यावी या मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या आवाहनानंतर भाजपने माघार घेत असल्याची घोषणा केली. त्यानुसार संवेदनशील राजकारण आणिउच्च परंपरा जपण्यासाठी भाजप निवडणुकीतून माघार घेत आहे, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केले. भाजपच्या माघारीमुळे शिवसेनेचा विजय सोपा झाला असला तरी भाजपला निवडणुकीत दणका देण्याचे शिवसेनेचे स्वप्न साकार होणार नाही. भाजपने आता संस्कृती जपण्याचा दावा केला असला तरी गेल्या दीड वर्षांत राज्यात झालेल्या तीन विधानसभा पोटनिवडणुका भाजपने ताकदीने लढविल्या होत्या व त्यापैकी पंढरपूरची जागा जिंकली होती. या पार्श्वभूमीवर भाजपने अंधेरीत घेतलेली माघार बरेच काही सूचित करते.
आवताडे यांचा ताकदवान विजय!
विधानसभेच्या २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर आतापर्यंत चार आमदारांचे निधन झाले. यापैकी तीन मतदारसंघांत पोटनिवडणूक झाली. अंधेरीत होते आहे ती चौथी पोटनिवडणूक. पंढरपूर, कोल्हापूर उत्तर आणि नांदेड जिल्ह्यातील देगलूर मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुका झाल्या. या तिन्ही पोटनिवडणुका भाजपने लढविल्या होत्या. नुसत्या लढविल्या नाहीत तर भाजपने सारी ताकद पणाला लावली होती. विशेषत: पंढरपूरचे राष्ट्रवादीचे आमदार भालक भालके यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसची जागा खेचून विजय संपादन केला होता. भालके यांच्या मुलाला राष्ट्रवादीने उमेदवारी दिली होती. भाजपने समाधान आवताडेयांना रिंगणात उतरविले होते. विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढविताना आवताडे यांना ४० हजारांच्या आसपास मते मिळाली होती. यो पोटनिवडणुकीत भाजपचे आवताडे निवडून आले. म्हणजेच १४व्या विधानसभेच्या पहिल्याच पोटनिवडणुकीत भाजपने सारी ताकद पणाला लावून विजय संपादन केला होता.
हेही वाचा… फेसबुक खरंच ‘अतिरेकी’ आहे का?
नांदेड जिल्ह्यातील देगलूरचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक झाली होती. तेव्हा भाजपने शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांना पक्षात प्रवेश देऊन उमेदवारी दिली होती. भाजपने ही पोटनिवडणूक गांभीर्याने घेतली होती. देवेंद्र फडणवीस यांनी नांदेडचा दौरा केला होता. तेव्हा भाजपमधील अंतर्गत गटबाजी मिटविण्याकरिता फडणवीस काही प्रमुख नेत्यांच्या भेटीला गेले होते. भाजपने सारी ताकद पणाला लावूनही भाजपचा पराभव झाला. काँग्रेसने जागा कायम राखली होती.
कोल्हापुरात मागणी फेटाळली…
कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनाने पोटनिवडणूक झाली होती. भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरमधील पोटनिवडणूक असल्याने सारी शक्ती पणाला लावली होती. काँग्रेसच्या माजी पदाधिकाऱ्याला भाजपमध्ये प्रवेश देऊन उमेदवारी दिली होती. विशेष म्हणजे कोल्हापूरमधील पोटनिवडणूक बिनविरोध करावी म्हणून सतेज पाटील, हसन मुश्रीफ आदी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपला आवाहन केले होते. चंद्रकांत पाटील यांनी पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची मागणी फेटाळून लावली होती. शेवटी प्रत्यक्ष निवडणूक झाली व काँग्रेसने जागा कायम राखली होती. भाजपचा पराभव झाला होता.
हेही वाचा… ‘जिनपिंगॉनॉमिक्स’चे भवितव्य..
पंढरपूर, कोल्हापूर उत्तर किंवा देगलूरमध्ये भाजपने पोटनिवडणुका प्रतिष्ठेच्या केल्या होत्या. यापैकी पंढरपूरमध्ये भाजपला विजय मिळाला तर कोल्हापूर आणि देगलूरच्या पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला. अंधेरीत राज्यातील उच्च संस्कृतीची भाजपला आठवण झाली असली तरी कोल्हापूर, देगलूर आणि मध्ये ही संस्कृती कुठे होती, हा प्रश्न निर्माण होतो.
मुंबईवर परिणाम नको, म्हणून?
अंधेरीत पराभव समोर दिसत होता. अंधेरीत पराभव झाल्यास त्याचा आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीवर परिणाम होण्याची भाजपला अधिक भीती होती. भाजपचे सारे लक्ष्य हे मुंबई महानगरपालिका निवडणुकीवर आहे. कोणत्याही परिस्थितीत मुंबई जिंकयाचीच, असा निर्धार भाजपने केला आहे. शिवसेनेने निवडणुकीत भाजपला पराभूत केल्यास शिवसेनेचा विश्वास बळावला असता तसेच मुंबई महानगरपालिका निवडणुूकीत त्याचा परिणाम झाला असता. पक्षाचे नाव आणि चिन्हावरून शिवसेनेला सहानुभूती निर्माण झाली आहे. पोटनिवडणूक होऊन भाजपचा पराभव झाला असता तर शिवसेनेला त्याचा अधिक फायदा झाला असता. भाजपला हे सारे टाळायचे होते.
शरद पवार किंवा राज ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानंतर माधार घेतल्याचा दावा भाजपने केला आहे. तसेच डाॅ. पतंगराव कदम किंवा आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपने उमेदावर उभे केले नव्हते याकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष वेधले. अंसे असले तरी अंधेरीची पोटनिवडणूक भाजपने आधीपासूनच तयारी केली होती. मुरजी पटेल यांची उमेदवारी निश्चित केली होती. उच्च परंपरा जपण्याकरिता माघार घेतली असे भाजपने जाहीर केले असले तरी भाजपने पडद्याआडून बऱ्याच खेळ्या केल्या होत्या. ऋजूता लटके यांचा मुंबई महानगरापालिका सेवेतील राजीनामा मंजूर होऊ नये म्हणून भाजपनेच सारे दबावाचे राजकारण केले होते, असा शिवसेनेचा आरोप होता. लटके यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्याने भाजप आणि शिंदे गटाचे आवसान गळाले. अंधेरीत पराभव झाल्यास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) महानगरपालिका निवडणुकीत सरस ठरू शकते हे लक्षात आल्यानेच भाजपने एक पाऊल मागे घेऊन भविष्यातील लढ्यासाठी तयारी केली आहे.
भाजपची ही खेळी यशस्वी होते का, हे महापालिका निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट होईल. पण सध्या तरी भाजपने माघार घेतली हे अधोरेखित झाले.
santosh.pradhan@expressindia.com