हजारो कोटी रुपयांचे मेफेड्रोन पुणे आणि नाशिकमध्ये तयार होते. त्याची रीतसर देशभर आणि परदेशातही रवानगी होते आणि हे सगळे दिवसाढवळ्या घडतानाही सर्व संबंधित यंत्रणा ढिम्म राहतात, याचा संबंध यंत्रणांच्या ढिसाळपणाबरोबरच सर्व संबंधितांच्या हितसंबंधांशी आहे, हे उघड आहे. कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील ज्या कारखान्यात मेफेड्रोनचे उत्पादन होत होते, त्याची माहिती आसपासच्या उद्योगांना तर असेलच, परंतु नियमितपणे तपासणीसाठी येणाऱ्या अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनाही असायलाच हवी. गेल्या काही दशकांत राज्यात ठिकठिकाणी उभारल्या गेलेल्या औद्योगिक वसाहतींमध्ये गुंडगिरीचा जो सुळसुळाट झाला आहे, त्याचे हे परिणाम आहेत. या गुंडगिरीला राजकीय आश्रय मिळत राहिल्यामुळेच ती उदंड फोफावत राहिली आणि त्याचे दुष्परिणाम बऱ्याच काळानंतर समोर आले. कोणत्याही परिसरात उद्योग आले, की कामगार आले, मग कामगार संघटना आली. त्या पाठोपाठ दैनंदिन कामासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळही आले. स्थानिक पातळीवर असे मनुष्यबळ पुरवणारी यंत्रणा सहसा गावातील दादागिरी करणाऱ्या गुंडाच्या हाती असते. त्याची माणसे घेतली नाहीत, तर कारखान्यात मालच येऊ दिला जात नाही किंवा जे कुणी असा माल आणण्याचा प्रयत्न करत असतील, तर त्यांना दहशत आणि मारामारीला सामोरे जावे लागते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा