हर्ष मंदर
दिल्लीच्या ‘राष्ट्रीय राजधानी क्षेत्रा’पासून शंभर किलोमीटरहून कमी अंतरावर हरियणातला नूह जिल्हा आहे. नीती आयोगाने २०१८ मध्ये देशातील ‘अतिमागास जिल्ह्यां’ची जी यादी केली, त्यांत हा नूह जिल्हादेखील होता. टोलेजंग चकाचक इमारतींच्या गुरुग्रामलगतच असणारा हा नूह जिल्हा आजही आरोग्य, पोषण, शिक्षण आणि मूलभूत पायाभूत सुविधांमध्ये राष्ट्रीय स्तरावर तळागाळातच आहे.
याच अतिमागास (राहिलेल्या) जिल्ह्याचे जवळपास ८० टक्के रहिवासी मुस्लिम आहेत हा योगायोग म्हणावा का? पण हल्ली नूहच्या कुख्यातीत आणखी एक भर पडली आहे. देशातील गाय-संबंधित द्वेषपूर्ण हिंसाचाराचा हा केंद्रबिंदू ठरत आहे.
बजरंग दलाच्या गोरक्षकांनी कथितपणे जुनैद आणि नसीर या दोघांची निर्घृण हत्या केल्याच्या बातम्या याच जिल्ह्यातून १७ फेब्रुवारी रोजी आल्या. पण त्याआधी, २८ जानेवारीच्या मध्यरात्रीनंतर झालेला आणखी एक मृत्यू म्हणजे वारिस खानचा. नूहचे जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणतात की, ‘कत्तलीसाठी गाय घेऊन जाण्याच्या प्रयत्नात रस्ता अपघातात त्याचा मृत्यू झाला’. पण जेव्हा ‘कारवाँ- ए मोहब्बत’चे पथक नूह जिल्ह्यात त्याच्या कुटुंबाला भेटायला गेले, तेव्हा वारिसच्या घरच्यांनी पोलिसांच्या म्हणण्यावर प्रश्न उपस्थित केले. जुनैद आणि नसीर यांच्या हत्येबाबत ज्याच्यावर आरोप केला जात आहे त्याच मोनू मानेसर याचा संबंध वारिसच्याही हत्येशी असल्याचे त्याचे कुटुंबीय सांगतात. मोनू मानेसर या भागातील एक प्रमुख गोरक्षक असून त्याच्या नेतृत्वाखाली गोरक्षक म्हणून ‘पोलिसांच्या मदतीसाठी’ बजरंग दलाच्या सदस्यांचे पथकच काम करते आहे.
हरियाणा सरकारने राज्य पोलीस महानिरीक्षकांच्या अध्यक्षतेखाली ‘गो संरक्षण कार्य दला’ची स्थापना केलेली आहे. पोलिसांना स्थानिक कार्यकर्त्यांनी माहिती पुरवावी, अन्य स्वरूपाची मदत लागल्यास तीही करावी, अशी अपेक्षा आहे म्हणून या दलात स्वयंसेवकांचाही समावेश असतो. पण प्रत्यक्षात या दलाची शक्ती पोलिसांकडून हिंसक गटांकडे सरकलेली दिसते. हे गट टोळ्यांसारखेच काम करतात, उघडपणे लोकांना घाबरवतात. हल्ली तर या स्वयंसेवकांना गणवेशधारी पोलिसांपासून वेगळे करणाऱ्या सीमारेषाही अस्पष्ट झाल्या आहेत.
वारिसचा मृत्यू कसा झाला?
वारिस हा २२ वर्षे वयाचा एक मोटार मेकॅनिक. वर्षभरापूर्वीच त्याचे लग्न झाले होते आणि त्याला तीन महिन्यांची मुलगी होती. ‘रात्रभर कामात असेन ’ असे सांगून त्या संध्याकाळी तो घराबाहेर पडला. त्यामुळे आईला, घरच्यांना रात्रभरात त्याची काळजी नव्हती. पण दुसऱ्या दिवशी पहाटे घाबरलेल्या शेजाऱ्यांनी वारिसच्या भावांना फोन केला. कुख्यात मोनू मानेसरच्या नेतृत्वाखालील गोरक्षकांनी वारिस आणि दोन सहकाऱ्यांना पकडले आणि धमकावले याचे व्हीडिओ ‘लाइव्ह स्ट्रीम’ केले जात होते. कुटुंबाचा आरोप असा आहे की, याच पहाटे आम्हाला ‘त्यांचे’ फोन आले… मुलाला सोडण्यासाठी टोळीला भरघोस मोबदला देण्याची मागणी करण्यात आली.
त्याच सकाळी, वारीस जबर जखमी असल्याची माहिती प्रथम एका फोनकॉलने त्याच्या कुटुंबाला दिली; नंतर थोड्याच वेळात आणखी एक कॉल आला … वारिसचा ‘अपघातात मृत्यू’ झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
वारिसच्या सख्ख्या, चुलत भावांनी हताशपणे सरकारी रुग्णालयात धाव घेतली आणि त्यांना पोलिसांनी घेरले. एकजण हॉस्पिटलच्या आत जाण्यात यशस्वी झाला. डॉक्टरांनी त्याला सांगितले की त्याचा मृतदेह शवागारात आहे आणि त्याचा साथीदार आयसीयूमध्ये आहे, असे डॉक्टरांनी त्याला सांगितल्याचे हा भाऊ सांगतो. मात्र या भावाचे पुढले म्हणणे असे की, पहारेकऱ्यांना दूर ढकलून तो आत (आयसीयूत) गेला जबर जखमी झालेल्यापण शुद्धीवर असलेल्या त्या माणसाने जे सांगितले ते वारिसच्या भावाने गुप्तपणे रेकॉर्ड केले. खरोखरच अपघात झाला होता. ते वेगात होते. कारण ते म्हणाले, त्यांचा एका गोरक्षक गटाने पाठलाग चालवला होता. या गडबडीत त्यांनी भाजीपाला घेऊन जाणाऱ्या टेम्पोला धडक दिली. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झालेला आहे.
व्हीडिओ प्रसृत केले, काढून टाकले!
मोनूच्या नेतृत्वाखालील बजरंग दलाची टीम या धडकेनंतर काही मिनिटांतच तिथे पोहोचली, त्यांनी तिघांना बाहेर काढले, त्यांना त्रास दिला आणि विजयीपणे त्यांच्यासोबत फोटो काढले. हे सर्व मोनूने त्याच्या फेसबुक पेजवर लाईव्ह-स्ट्रीम केले (या फेसबुक पानाचे ८० हजारपेक्षा पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत). त्यानंतर पुन्हा काय झाले, तेही सीसीटीव्ही आणि व्हिडिओ फुटेजमध्ये दिसत आहे. हातांत बंदुका असलेले काही गोरक्षक, अपघातग्रस्त तिघाजणांना बोलेरोमध्ये बसवत आहेत, असे ते नाट्य फक्त २०० मीटर अंतरावर असलेल्या पोलिस चौकीच्या जवळच घडत होते.
बघ्यांपैकी एका स्थानिक महिलेने सांगितले की वारिसने त्याच्या त्रास देणाऱ्यांना त्याला रुग्णालयात नेण्याची विनंती केली कारण त्याला त्याचा मृत्यू होईल अशी भीती होती. तो वाचल्यानंतर तो म्हणाला, ते त्याला तुरुंगात पाठवू शकतात. एक रुग्णवाहिका आली, पण ती जखमी माणसांना वाचवण्यासाठी नव्हती. त्याऐवजी, अपघातग्रस्त वाहनातून ते ज्या गायीला नेत होते तिच्यासाठी ही पशु-रुग्णवाहिका होती.
वारीस अधिकच जखमी दिसल्यानंतर मात्र गोरक्षक बावचळले आणि त्यांनी तिघांना पोलिसांच्या स्वाधीन केले. मोनूने तो लाइव्ह-स्ट्रीमिंग केलेले व्हिडिओ फोसबुक पानावरून काढून टाकले.
वारिसच्या भावांनी यानंतर पोलीस ठाण्यात जाऊन वारिसबाबत अपहरण, दुखापत आणि हत्येचा गुन्हा नोंदवण्याचे प्रयत्न केले, पण ते निष्फळच ठरल्याचे या भावांचे म्हणणे आहे. त्याऐवजी पोलिसांनी पीडितांवरच, बेशिस्तपणे वाहन चालवून आणि गोहत्या केल्याचा आरोप नोंदवला. त्यांच्या हल्लेखोरांविरुद्ध काहीही केले नाही.
कुठून येते हे सगळे?
मी मोनू मानेसरची फेसबुक पाने स्कॅन करत असताना शहारून जातो आहे. तो आणि त्याच्या टोळीचे सदस्य खुलेआम अत्याधुनिक बंदूक, पोलिसांच्या जीपसारख्याच हुबेहूब आवाजाचे सायरन आदी वापरतात, वाहनांवर गोळीबार करताना आणि त्यांनी पकडलेल्या माणसांना क्रूरपणे मारहाण करत असतानाचे व्हीिडओही या पानांवर आहेत.
या महाग बंदुका आणि त्यांचे परवाने या स्वयंसेवकांनी कसे मिळवले हे कोणीही विचारत नाही. स्वयंसेवकांच्या नेत्यांनी प्रचंड संपत्ती, संपत्ती आणि सत्ता कशी मिळवली हेही कोणीच विचारत नाही. जिल्ह्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह मोनू मानेसर आणि त्याच्या सहकाऱ्यांची अनेक छायाचित्रे समाजमाध्यमांवर दिसतात, कारण गायींना वाचवण्याच्या त्यांच्या ‘शूर’ प्रयत्नांसाठी अनेकदा त्यांना पुरस्कार देण्यात आले आहेत. मोनू मानेसरचा खाकी गणवेश पोलिसांसारखाच दिसला, तरी प्रत्यक्षात तो नागरी संरक्षण अधिकाऱ्याचा गणवेश आहे.
अलीकडच्या काही वर्षांत, संघटित द्वेषाचे अनेक बळी याच नूह जिल्ह्यात गेले आहेत. सन २०१७ मध्ये अल्वार इथे जमावाकडून झुंडबळी ठरलेला पेहलू खान हा त्यापैकी पहिला. परंतु तेव्हापासून द्वेष आणि भीती अधिकच वाढली आहे. रॉड आणि लाठ्याकाठ्या घेऊन सज्ज झालेल्या जमावाने पेहलू खानला बेदम मारहाण केली आणि मारहाणीचा व्हिडिओ चित्रित केला. त्यानंतर, पोलिसांनीही द्वेषमूलक हल्ल्यांच्या लक्ष्यांवर गुन्हे दाखल केले हे खरे आहे… पण आज जणू सगळे मुखवटे बाजूला झाले आहेत. स्वयंसेवक-गोरक्षकच आता बंदुका घेऊन फिरतात, त्यांचे हल्ले ‘लाइव्ह स्ट्रीम’ करतात… तरीही अनेकदा पोलिस बघ्याची भूमिका घेतात. हरियाणातले भीतीचे साम्राज्य वाढते आहे, याची खात्री पटू लागते. गोरक्षकांना इथे कुणीही आवरत नाही, असे दिसते.
( मंदर हे मानवी हक्क आणि शांतता कार्यकर्ते तसेच अनेक पुस्तकांचे लेखक आहेत. )