के. चंद्रकांत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पाकिस्तानच्या अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागलेले माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांचे इरादे नेक होते की नव्हते, याची शंका भारतीयांना नेहमीच येत राहील. पण जगानेच काय, इतिहासानेही संशयच घ्यावा असे त्यांचे निर्णय होते. मृत्यूनंतर मुशर्रफ यांच्याहीबाबत इस्लामी विश्वासाप्रमाणे ‘कयामत’चा फैसला होईलच, पण इतिहासालाही त्यांची किमान पाच पापे विसरता येणार नाहीत.

(१) कारगिलनंतरचा खोटेपणा : पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी १९९८ च्या ऑक्टोबरात मुशर्रफ यांना पाकिस्तानच्या लष्करप्रमुखपदी नेमल्यानंतर आठच महिन्यांत- ३ मे १९९९ पासून मुशर्रफ यांच्या फौजांनी भारताच्या कारगिल क्षेत्रात घुसखोरी सुरू केली. त्यापूर्वी अतिरेक्यांच्या छोट्या गटांना पाकिस्तानी लष्करामार्फत भारतीय हद्दीत घुसवले जाई, पण मे १९९९ मधील घुसखाेरीत पाक लष्कराचा भरणा अधिक होता. याला भारतीय सेनादलांनी चोख प्रत्युत्तर दिले, विशेषत: एअर चीफ मार्शल अनिल यशवंत टिपणीस यांच्या नेतृत्वाखालील भारतीय हवाईदलाने ‘ऑपरेशन सफेद सागर’मध्ये ५७५ हून अधिक हवाई हल्ले करून पाकिस्तानी फौजा व अतिरेकी यांना जेरीस आणले, तर सहा जूनपासून भारतीय स्थलसेनेच्या जवानांनी घुसखोरीचा टापू परत मिळवण्यास सुरुवात केली. याच वेळी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बिल क्लिंटन हे शरीफ यांना फौजा मागे घेण्याचे आवाहन करीत होते, पण पराभव स्पष्ट दिसत असूनही मुशर्रफ परस्पर चीनची मदत मागत होते. अखेर १३ जून रोजी द्रासच्या लढाईत पराभव थेटच दिसू लागला, तेव्हा शरीफ यांना फौजा मागे घेण्याचा आदेश देण्याखेरीज गत्यंतर उरले नाही. मात्र मुशर्रफ याहीनंतरच्या अनेक मुलाखती वा पत्रकार परिषदांत स्वत:च्या लष्करी नेतृत्वातील उणीवा मान्य न करता, ‘शरीफ यांनी अमेरिकेचे ऐकले नसते तर पाकिस्तानी फौजा पुढे गेल्या असत्या’ अशी खोटी बढाई मारत राहिले.

(२) राक्षसी सत्ताकांक्षा : नवाझ शरीफ आणि बेनझीर भुत्तो यांनी १९८८ ते १९९८ या दशकात पाकिस्तानमध्ये लोकशाहीचे वातावरण रुजवण्याचे प्रयत्न सुरू केले असतानाच्याच काळात मुशर्रफ लष्करात स्वत:चा जम बसवत होते. पाकिस्तानी लष्करात १९९१ मध्ये मेजर जनरलपदी आलेले मुशर्रफ, दोनच वर्षात लष्करी संचालनालयाचे प्रमुख झाले. लष्करप्रमुखच्याां खालोखाल मानले जाणाऱ्या या पदावरून त्यांनी दहशतवाद्यांशी नेहमीच गुफ्तगू असणाऱ्या ‘आयएसआय’ या पाकिस्तानी गुप्तहेर संघटनेशी संबंध वाढवण्याची सुरुवात केली, त्याद्वारे तत्कालीन पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांचाही विश्वास संपादन केला आणि पुढे, विशेषत: १९९५ पासूनच बेनझीर यांचा पराभव अटळ दिसू लागला तेव्हा पाकिस्तानच्या राजकारण्यांवर- भुत्तो आणि शरीफ यांच्यावरही- त्यांनी उघडपणे तिखट टीका सुरू केली. तरीही १९९६ मध्ये सत्तेवर आलेल्या शरीफ यांना मुशर्रफ यांना धक्का तर लावता आला नाहीच, शिवाय त्यांना लष्करप्रमुख पदही द्यावे लागले, इतका ‘आयएसआय’मध्ये मुशर्रफ यांचा दबदबा होता. मग कारगिलमध्ये पाक लष्कराची फजिती झाल्यावर शरीफ यांच्यावरले शाब्दिक हल्ले आणखी वाढवून, त्यांना टोकाची भूमिका घेण्यास भाग पडेल आणि आपल्या लष्करी साथीदारांच्या मदतीने आपण सत्तेवर येऊ, असा हिशेबच मुशर्रफ यांनी मांडून तो यशस्वीही केला असल्याचे, १२ ऑक्टोबर १९९९ च्या ‘रक्तहीन लष्करी उठावा’मधून दिसून आले. मुशर्रफ स्वत: श्रीलंकेत आणि त्यांचे विमान तेथून पाकिस्तानात उतरेपर्यंत सरकारी प्रसारमाध्यमे तसेच अध्यक्षीय निवासस्थानावर लष्कराचा कब्जा अशी ही मोर्चेबांधणी होती. लगोलग ‘आयएसआय’च्या तत्कालीन प्रमुखांना लष्करी सरकारात संरक्षण सचिवपद (त्या खात्याचे मंत्री खुद्द मुशर्रफच) मिळाले. तर मुशर्रफ यांचे श्रीलंकेहून येणारे विमान उतरू देण्यास मज्जाव करणाऱ्या नवाझ शरीफ यांच्यावर ‘अपहरणाचा आणि हत्येचा प्रयत्न, देशद्रोह…’ आदी कलमांखाली गुन्हे दाखल करून त्यांना लंडनमध्ये परागंदा होणे मुशर्रफ यांनी भाग पाडले. यथावकाश, २००७ मध्ये बेनझीर यांच्याशी मैत्रीच्या वाटाघाटी करून त्यांना ऑक्टोबर २००७ मध्ये लंडनहून पाकिस्तानात मुशर्रफ यांनीच आणले खरे, पण यानंतर नोव्हेंबरमध्ये मुशर्रफ यांनी पद सोडले आणि त्याच डिसेंबरात बेनझीर यांचाही बॉम्बस्फोटात मृत्यू झाला.

(३) तालिबान व ‘अल काइदा’शी संशयास्पद संबंध : अफगाणिस्तान-पाकिस्तान यांच्या सीमावर्ती प्रदेशात जम बसवलेल्या ‘अल काइदा’कडे जरी न्यू यॉर्कमधील ट्विन टॉवर्सवरील ९ सप्टेंबर २००१ च्या (९/११) हल्ल्यानंतर जगाचे लक्ष वेधले गेले असले, तरी त्याहीआधी या ‘अल काइदा’ला उपयुक्त ठरणाऱ्या दहशतवाद्यांची सुटका भारताकडून करवून घेण्याच्या प्रकरणाशी मुशर्रफ यांचाही संबंध आलाच. ‘आयसी १८४’ या काठमांडूहून दिल्लीकडे जाणाऱ्या विमानाचे अपहरण २४ डिसेंबर १९९९ रोजी झाले, ते विमान अमृतसरमध्ये इंधन भरण्यासाठी उतरवण्यात आले तेव्हा भारताने, आधी अपहरणनाट्य थांबवून प्रवाशांची सुटका करा अशी मागणी केली होती. परंतु दहशतवाद्यांनी विमानातील प्रवासी व कर्मचाऱ्यांना धम्क्या देऊन हे विमान लाहोरकडे नेणे भाग पाडले. हे कळताच, भारताने मुशर्रफ यांना विमान रोखण्याची विनंती करून पाकिस्तानातील तत्कालीन भारतीय उच्चायुक्त गोपालस्वामी पार्थसारखी यांना हेलिकॉप्टरने लाहोरकडे धाडले… पण पार्थसारथी लाहोरमध्ये पोहोचण्याच्या आत, विमानात इंधन भरले जाऊन त्या विमानाच्या दुबईकडे उड्डाणाची सारी तजवीज तडीस गेलेली होती. पुढे याच अपहरणकर्त्यांपैकी (भारतीय कैदेतून नाईलाजाने सोडावे लागलेला) दहशतवादी मसूद अझर हा ‘९/११’ च्या कटातील प्रमुख सूत्रधार ठरला.

‘अल काइदा’ शी मुशर्रफ यांचे संबंध आणखी उघड झाले, ते ओसामा बिन लादेन याला (२०११ मध्ये) आबोटाबाद येथील राहात्या घरात अमेरिकी खास पथकाने ठार केल्यानंतर… याच ठिकाणी गेली पाच वर्षे – म्हणजे मुशर्रफ १८ ऑगस्ट २००८ रोजी पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षपदावरून खाली आले त्याच्या किमान दोन वर्षे आधीपासूनच- लादेन राहात होता, हेही अमेरिकी तपासपथकांनी स्पष्ट केले. त्याहीआधी १९९३ सालीच, ‘तालिबानशी जुळवून घ्या’ असा नुसता सल्ला न देता आयएसआय प्रमुखांशी तालिबानच्या ‘अनौपचारिक वाटाघाटी’ घडवून आणण्यात तेव्हाच्या पाकिस्तनी लष्करी संचालनालयाचे प्रमुख म्हणून मुशर्रफ यांचाच हात होता.

(४) अमेरिकेशी संधीसाधूपणा : भारतातील दाऊद इब्राहीमप्रमाणेच लादेनलाही आश्रय देणारे मुशर्रफ हे ‘९/११’च्या हल्ल्यानंतर मात्र, तेव्हाचे अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यु. बुश (धाकटे) यांच्या ‘वॉर ऑन टेरर’च्या हाकेला तत्पर प्रतिसाद देऊ लागले होते. अमेरिकेला पाकिस्तानातील हवाई तळ वापरू देण्याचा निर्णय मुशर्रफ यांचा होता. शिवाय तत्कालीन अफगाण सत्ताधाऱ्यांशी ते अमेरिकेची रदबदली करत होते. हे सारे करणारे मुशर्रफ लष्करशहाच आहेत, हे माहीत असूनही बुश यांनी ‘धाडसी नेता आणि अमेरिकेचा मित्र’ अशी स्तुती ज्यांची केली, त्या मुशर्रफ यांनी अमेरिकी बहुराष्ट्रीय कंपन्यांशीही संधान बांधून पाकिस्तानची आर्थिक भरभराट करण्याचा प्रयत्न केला आणि ‘हल्ली पाकिस्तानी विमानतळांवर टॅक्सी रांगेतच उभ्या असतात’ – असल्या क्षुद्र गोष्टींवर पाश्चिमात्त्यही भाळू लागले. १२ जानेवारी २००२ रोजी ‘धर्माला सार्वजनिक जीवनात आणू नका- धर्म घरातच ठेवा’ असे फर्डे भाषण मुशर्रफ यांनी चित्रवाणीवरून केले खरे, पण त्याची प्रतिक्रिया काय होणार याची पूर्ण कल्पना ‘आयएसआय’ला हाताळणाऱ्या मुशर्रफ यांना होती. घडलेही तसेच. परंतु पाकिस्तानात धर्मकडव्यांकडून होणारा हिंसाचार, जाळपोळ आदी थोपवण्यासाठी या लष्करशहाने कधी आवाहनेसुद्धा केली नाहीत, मग आंदोलकांशी चर्चा वगैरे दूरच. मुशर्रफ हे तेव्हा अमेरिकेच्या मर्जीत राहाण्यात इतके मग्न होते की, पाकिस्तानी कडवे लोक त्यांना ‘बुशर्रफ’ म्हणत. पण २००७ मध्ये पाकिस्तानी राज्यघटना स्थगित करून मुशर्रफ यांनी आणीबाणी लादली, तेव्हा बुशदेखील बुचकळ्यात पडले होते.
‘पाकिस्तानी अणुबॉम्बचे जनक’ म्हणून गवगवा झालेल्या अब्दुल कादिर खान यांनी चीनशी संगनमताने अणुबॉम्बचे तंत्रज्ञान इराण आणि कदाचित तालिबानलाही पोहोचवल्याचा आरोप पुरेशा आधारानिशी अमेरिकेनेच केला, तेव्हा मुशर्रफ यांनी या खान यांना केवळ ‘नजरकैदेत’ ठेवले होते.

(५) भारताचा राजनैतिक अवमान : शेजारी देश म्हणून भारताशी संबंधवृद्धीला मुशर्रफ यांनी कसे प्राधान्य दिले, एक संधीच कशी दोन्ही देशांपुढे त्या काळात होती, याचे गोडवे भरपूर गायले जातील आणि भारत-पाकिस्तान क्रिकेट सामने सुरू होणे आदी दाखले त्यासाठी दिले जातील. दिल्लीतील मुशर्रफ यांचे मूळ घर असलेली ‘नहरवाली हवेली’, ताजमहालच्या ‘प्रेमिक बाका’वर पत्नी सेहरा यांच्यासह त्यांचे छायाचित्र, पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मुशर्रफना भेट म्हणून दिलेला ‘जन्मदाखला’ यांचेही उमाळे काढावे तितके कमीच. परंतु जुलै १४ ते १६ जुलै २००१ या दिवसांत (म्हणजे संसद भवनाच्या प्रांगणात १३ डिसेंबरचा हल्ला होण्याच्या पाच महिने आधी) मुशर्रफ यांनी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यासह ‘आग्रा शिखरबैठकी’चा घाट घालून, वाटाघाटींच्या तिसऱ्या फेरीआधी भारतीय व अन्यदेशीय प्रसारमाध्यमांसाठी रीतसर पत्रकार परिषद बोलावून ‘काश्मीरबाबत माझा चारसूत्री कार्यक्रम हा असा आहे’ असे पत्रकारांना सांगत मुशर्रफ यांनी भारतासारख्या शेजाऱ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. तो भारताने केविलवाणा ठरवला खरा, पण काश्मीरची जी काही चतु:सूत्री मुशर्रफ यांनी मांडली होती, ती काश्मीरप्रश्नी भारताने घेतलेल्या सातत्यपूर्ण भूमिकेचा आणि भारतीय व्यवहाराचा पूर्णत: अवमान करणारीच होती. पाकिस्तानी आणि भारतीय काश्मीर या दोन्हीकडून सैन्य काढून घेऊ, या अखंड काश्मीरला एक स्वायत्त प्रदेश मानू, पण तिथला सरकारी कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी भारत, पाकिस्तान आणि काश्मीर अशी एक त्रिपक्षीय समिती नेमू… असल्या कल्पना मुशर्रफ मांडत होते आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग नसल्याचेच आडून सुचवत होते.

स्वत:च्या प्रतिमेचे अतोनात प्रेम, विचित्र स्पष्टवक्तेपणा आणि इतरांवर कुरघोडी करण्याची वृत्ती या वैशिष्ट्यांमुळेच मुशर्रफ सत्तास्थानापर्यंत गेले खरे, पण तेथून उतरण्यासाठी त्यांनी पाकिस्तानात फुलवलेला धर्मवेडाचा अंगार पुरेसा होता. नोव्हेंबर २००७ पासून त्यांच्या देशाने त्यांना महत्त्व दिले नाही, पुढे देशद्रोह, फाशी वगैरे शिक्षा पाकिस्तानी न्यायालयाकडून फर्मावल्या गेल्याने त्या वरच्या न्यायालयातून रद्द करवाव्या लागल्या, पण तेव्हापासून मायदेशाला मुशर्रफ जे मुकले, ते कायमचेच. मुशर्रफ यांचे घराणे उच्चविद्याविभूषित (आईदेखील पदवीधर), त्यांचे कुटुंब चौकोनी, आदी व्यक्तिगत तपशील त्यांच्याबाबत मानवी आदर निर्माण करणारे असले तरी, सार्वजनिक जीवन कधीही स्वकेंद्रित ठेवायचे नसते हा मोठा धडा मुशर्रफ यांचे दिवंगत व्यक्तित्व नेहमीच देत राहील.