एक काळ होता जेव्हा इलॉन मस्क जगासाठी एक ‘अजुबा’च होते. खासगी अंतराळ मोहिमा काय, विनाचालक वाहनं काय… कल्पनेपलीकडची स्वप्न दाखवणारा अतिश्रीमंत, कल्पक आणि धाडसी उद्योजक अशी त्यांची प्रतिमा होती. सिलिकॉन व्हॅलीतल्या एका छोट्याशा स्टार्टअपला त्यांनी अवघ्या दोन दशकांत जगाच्या वीजवाहन उद्योगाच्या केंद्रस्थानी आणलं. टेस्लाची गाडी बाळगणं हे कालपरवापर्यंत केवढं मोठं स्टेटस सिम्बॉल होतं. मग आज असं काय झालं की टेस्लाच्या गाड्या लोक फोडू लागले. टेस्ला बाळगणाऱ्यांना आपली गाडी रस्त्यांवर आणण्याचीही भीती वाटू लागली आहे.

अमेरिकेत ‘टेस्ला टेकडाऊन प्रोजेक्ट’ने जोर धरला आहे. चित्रपट निर्माता अॅलेक्स विंटर आणि बॉस्टन विद्यापीठातील प्राध्यापक जुवान डॉनोव्हन यांनी ही नियोजनबद्ध आंदोलनं सुरू केली असली, तरी त्याला मिळणाऱ्या प्रतिसादावरून सामान्य जनतेत इलॉन मस्क यांच्याविषयी किती असंतोष खदखदतो आहे, याची कल्पना येते. टेस्लाच्या गाड्या आणि शेअर विकून टाका आणि रस्त्यांवर उतरून निषेध करा, असं आवाहन करणारी आंदोलनं ठिकठिकाणी जोर धरू लागली आहेत. काही ठिकाणी आंदोलनकर्ते हिंसक झाले असून त्याचा टेस्लाच्या डिलर्सना मोठा फटका बसला आहे. गाड्या फोडल्या जात आहेत. टेस्लाची चार्जिंग स्टेशन्स पेटवून देण्यात येत आहेत. पार्किंमधल्या गाड्यांवर ग्रॅफिटीच्या माध्यमातून अपमानास्पद संदेश लिहिले जात आहेत. रस्त्यावर टेस्लामधून फिरणाऱ्यांचा हातवारे करून निषेध करण्यात येत आहे.

लोक आपल्या टेस्ला कारवर ‘मी ही गाडी इलॉन मस्क वेडा होण्यापूर्वी खरेदी केली होती’ अशा आशयाचे स्टिकर्स लावू लागले आहेत. किया ही कंपनी मस्कविरोधी स्टिकर्स बाजारात आणून वाहत्या गंगेत हात धुवून घेत आहे. ‘इलॉन मस्क वेडा झाल्यानंतर मी ही कार घेतली’ अशा आशयाची ही स्टिकर्स आहेत. अॅमेझॉनवर अशी हजारभर स्टिकर्स विकली गेल्याची वृत्तं प्रसिद्ध झाली आहेत.

स्वतःला लोकशाही म्हणविणाऱ्या देशात सरकारचे वा सर्वोच्च नेत्यांचे लाडके उद्योजक असणं आणि अशा लाडक्यांना देशातली साधनसंपत्ती आंदण दिली जाणं, त्यांच्यासाठी कायदे वाकवले जाणं किंवा सर्व निर्णय हे जनतेच्या नव्हे, तर या मोजक्या लाडक्यांच्या हितासाठी घेतले जाणं यात काही नवीन नाही. आपण आपल्यासाठी निवडलेलं आपलंच सरकार आहे, म्हणून जनता हे सारं खपवून घेते. अनेक देशांत असं घडतं, पण हे लाडके स्वतः प्रत्यक्षरित्या सरकारचा घटक झाले, सरकारी कार्यालय आपल्या मालकीचं घरच असल्यासारखे वावरू लागले, एकतर्फी निर्णय घेऊन मोकळे होऊ लागले तर? जनतेच्या संयमालाही मर्यादा असतात.

ट्रम्प निवडून आल्यानंतरचा मस्क यांचा नाझी सलाम जगभर निंदेचा विषय ठरला होताच. राष्ट्राध्यक्षाचा काही एक आब राखला जाणं अपेक्षित असतं. शिष्टाचार असतात. पण ट्रम्प यांच्या कार्यालयात इलॉन मस्क मुलाबाळांसह वावरताना दिसू लागले. औपचारिक बैठकांत मुलाला खांद्यावर घेऊन मध्येच त्याची समजूत काढताना दिसू लागले. डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी म्हणजेच डॉजच्या अध्यक्षपदी विराजमान झाले. हे डॉज म्हणजे सरकारी खर्च कमी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेलं खातं. त्यांनी लगोलग सामाजिक सुरक्षा आणि सार्वजनिक आरोग्यावरच्या खर्चात मोठी कपात करण्याचा इरादा व्यक्त केला. या कपातीचे समाजातल्या आर्थिक दुर्बलांवर विपरित परिणाम होतील, हे स्पष्टच आहे. त्यांनी कर्मचारी कपातीचे फतवे काढले. यूएस ए़जन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट हा जगभरातल्या दुर्बळ देशांना अर्थसाहाय्य करणारा विभाग बंद करण्यात आला. कन्झ्युमर फायनान्शियल प्रोटेक्शन ब्युरो ही ग्राहकांना संरक्षण देणारी संस्था बंद करण्यात आली. आजच्या उद्रेकामागची ही तात्कालीक कारणं.

टेस्ला, एक्स, एक्स एआय, स्पेसएक्सची जबाबदारी आधीच खांद्यांवर असताना मस्क यांना आणखी डॉजची जबाबदारी कशासाठी देण्यात आली, असा प्रश्न जनतेला पडला नसेल, तरच नवल. एका मुलाखतीत मस्क यांना – हे सारं कसं सांभाळता, असा प्रश्न विचारला गेला असता, त्यांनी एक दीर्घ निःश्वास टाकत कसंबसं सांभाळत असल्याचं कबूलही केलं. पण ज्या उद्योगाच्या जोरावर मस्क इथवर पोहोचले, त्या उद्योगाची प्रतिमाच आज पणाला लागली आहे. सत्ताधारी झालेल्या उद्योजकाचा जीव ज्या कंपनीत गुंतलेला आहे, तिला फटका बसला, तरच तो वठणीवर येईल, असा या आंदोलनकर्त्यांचा कयास.

पण इलॉन मस्क यांच्या विरोधात हे एवढं टोकाचं जनमत केवळ गेल्या तीन-चार महिन्यांत निर्माण झालं असेल का? मस्क उद्योजक म्हणून कितीही महान वाटत असेल, तरी माणूस थोडा चक्रम तर नाही ना, असा प्रश्न त्यांना ट्वविटर वर फॉलो करणाऱ्यांना खूप पूर्वीपासून म्हणजे साधारण २०१८ पासून पडू लागला होता. ७ ऑगस्ट २००१८ रोजी त्यांनी एक ट्विट केलं. त्यात म्हटलं होतं की ‘टेस्लाला प्रायव्हेट कंपनीत परिवर्तित करण्यात येणार आहे. त्यासाठी फंडिंगसुद्धा मिळालं आहे. प्रत्येक शेअर ४२० डॉलर्सचा असेल.’ या एका ट्वीटने टेस्लाच्या समभागांची किंमत गगनाला भिडली. पण खासगीकरण शक्य नसल्याचं मस्क यांनी आठवड्याभरात स्पष्ट केलं आणि समभाग धडाधड कोसळले. गुंतवणुकदारांचं लाखों डॉलर्सचं नुकसान झालं. मस्क यांच्यावर खटला भरला गेला. अमेरिकेच्या सिक्योरिटीज अँड एक्सचेंज बोर्डने त्यांना आणि टेस्लाला प्रत्येकी २० मिलियन डॉलर्सचा दंड तर ठोठावलाच शिवाय टेस्लाविषयी कोणतंही ट्विट करताना परवानगी घ्यावी लागेल, असंही एक्सचेंज बोर्डने बजावलं.

पण त्याने वर्तनात सुधारणा करतील, तर ते मस्क कसले. २०२१ मध्ये त्यांनी डॉजकॉइनला पाठिंबा देणारं ट्विट केलं. टेस्ला व्यवहारांसाठी हे कॉइन स्वीकारणार असल्याचंही म्हटलं. परिणामी डॉजकॉइन्सचे भाव वधारले. पण प्रत्यक्षात मस्क यांचा हा दावाही पोकळच असल्याचं उघड झालं आणि गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला. त्यानंतरही मस्क यांनी क्रिप्टो करन्सी संदर्भात अशी विधानं करणं सुरूच ठेवलं आणि गुंतवणूकदारही फसत राहिले. केवळ करमणूक म्हणून गुंतवणूकदारांना वारंवार खड्ड्यात घालणाऱ्या व्यक्तीविरोधात प्रचंड असंतोष निर्माण होणं स्वाभाविकच आहे. तुम्ही असाल कोट्यधीश पण आम्हीही तुमचं आर्थिक नुकसान करू शकतो, हे दाखवण्याचा प्रयत्न होणारंच.

आपल्या उत्पादनाविषयीही बढाचढा के दावे करण्याची सवय मस्क यांना आहे. २०१९मध्ये त्यांनी ट्वीट केलं होतं की २०२० पर्यंत रस्त्यांवर एक मिलियन पूर्णपणे स्वयंचलित रोबोटॅक्सीचं जाळं पसरलेलं असेल, मात्र २०२५ उजाडलं तरी टेस्लाला अद्याप पूर्णपणे स्वयंचलित वाहन तयार करण्यात यश आलेलं नाही. टेस्लाच्या गाड्यांमध्ये स्टिअरिंग, ब्रेकिंग, अॅक्सेलरेशन वगैरे बाबी स्वयंचलित असल्या, तरीही त्यात चालक लागतोच. चालकरहित कार निर्मितीपासून मस्क यांची ही कंपनी अद्याप कित्येक मैल दूर आहे.

जनमानसावर मोठा प्रभाव असणाऱ्या व्यक्तीने कोणतंही विधान पूर्ण विचारांती केलं पाहिजे, कारण अनेकजण त्यावर सहज विश्वास ठेवतात, अनुकरण करतात. मात्र मस्क यांनी या जबाबदारीचं भान कधीही राखलं नाही. कोविडकाळातली त्यांची वक्तव्य हा बेजबाबदारपणाचा कळस होता.साथीची भीती कपोलकल्पित आहे, टाळेबंदी लावणं हे फासिस्ट वृत्तीचं लक्षण आहे, असं बिंबवणारी ट्वीट्स त्यांनी त्या काळात केली.

इलॉन मस्क यांनी अर्धे अधिक वाद हे खोडसाळ ट्वीट्समुळेच ओढावून घेतलेले दिसतात. ज्या ट्विटरवरून त्यांनी हे उद्योग केले, ते ट्विटरच खरेदी करण्याचा त्यांचा निर्णय जगासाठी धक्कादायक ठरला. रोज व्यक्त होण्याचं माध्यम अशा चक्रम प्रतिमेच्या व्यक्तीच्या हाती जाणार या विचाराने अनेक ट्विटराइट्स हादरले. त्यात या व्यवहारांतही आधी घोषणा करून नंतर माघार घेणं आणि अखेर ट्वविटर खरेदी करणं या निमित्ताने मस्क यांनी जगाला बराच काळ चर्चेचा विषय मिळवून दिला. ट्विटर खरेदी केल्यानंतर धडाधड कर्मचारी कपात करणं, ऑफिशियल हँडलच्या हिरव्या टिकसाठी पैसे आकारणं, ट्वविटर हे नाव आणि त्याची ओळख असलेला चिमणीचा लोगो बदलणं यासारख्या त्यांच्या निर्णयांनी खळबळ माजवली.

हिटलर, मुसोलिनीचा पुरस्कार त्यांनी अनेकदा जाहीररित्या केला आहे. ट्रम्प यांच्या शपथविधीत ते नाझी सॅल्युट करताना दिसले. सर्वशक्तिमान नेत्यांची त्यांना भुरळ पडलेली असल्याचं त्यांच्या वक्तव्यांतून दिसतं. कधी ते चीनची भलामण करतात, तर कधी पुतिन यांच्या युक्रेनवरच्या हल्ल्याचं समर्थन. अलीकडेच त्यांनी हिटलरसारखा हेअरकट केला आणि त्याचा फोटो एक्सवर अपलोड केला. हा खोडसाळपणा त्यांनी याआधीही केला होता आणि त्यावर संतप्त प्रतिक्रियाही उमटल्या होत्या.

अशा रितीने अवघ्या दोन दशकांत इलॉन मस्क यांनी अतिशय कल्पक धाडसी आणि अमेरिकेला अभिमान वाटावा असा उद्योजक, ते हुकूमशाहीचा पुरस्कर्ता, लोकांच्या नोकऱ्या हिरावून घेणारा आणि अमेरिकेला स्वतःचीच मालमत्ता समजणारा विक्षिप्त माणूस असा प्रवास केला. आजवरची त्यांची वाटचाल पाहता, या आंदोलनांचा त्यांच्या मदमत्ततेवर काही परिणाम होण्याची शक्यता धूसरच, मात्र तुम्ही कितीही श्रीमंत, शक्तिशाली, प्रभावशाली असलात, तरीही वाट्टेल ते निर्णय घेऊन मोकळे होऊ शकत नाही, हे बजावणारे आवाज कोणत्याही लोकशाहीसाठी आवश्यक असतात, त्यामुळे ते महत्त्वाचेच.

vijaya.jangle@expressindia.com

Story img Loader