‘आजवर कोणत्याही वसाहतवाद्यांनी जेवढं गोव्याचं नुकसान केलं नव्हतं, तेवढं दिल्लीतून आलेले लोक करत आहेत. गोव्याची अवस्था दिल्लीच्या वसाहतीसारखी झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून आमची शेत, टेकड्या, किनारे, पुळणी सारं काही उद्ध्वस्त केलं जात आहे आणि आता आमची शांतताही हिरावून घेण्यात येऊ लागली आहे. डोप पार्ट्या, ट्रान्स म्युझिक, वेश्याव्यवसाय, अंमली पदार्थांचं सेवन वाढलं आहे. आम्ही सनबर्नला विरोध करत होतो, पण प्रत्यक्षात सध्या रोजच रात्री सनबर्न सुरू आहे…’ या प्रतिक्रिया आहेत अंजुना किनारा परिसरातील रहिवाशांच्या. १५ ऑगस्टपासून तिथे एक वेगळाच ‘मुक्तीसंग्राम’ छेडला गेला आहे. गोवेकरांना मुक्तता हवी आहे ती मध्यरात्री सुरू होणाऱ्या डीजेच्या दणदणाटापासून, डोळ्यांवर आक्रमण करणाऱ्या लेझर शोपासून आणि तरुणाईचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या अंमली पदार्थांपासून.
गोवा नेहमीच पर्यटकांचं खुल्या दिलाने स्वागत करत आला आहे. पर्यटन हाच या राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा. गोव्याचं रात्रजीवन तर देशात सर्वाधिक लोकप्रिय. इथल्या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी जेवढे पर्यटक येतात त्यापेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात पर्यटक येथील मुक्त वातावरणाचा आनंद घेण्यासाठी येतात. रात्री उशिरापर्यंत बीच शॅकवर, क्लब्जमध्ये मौजमजा करण्याची मुभा असते. कसिनो तर पहाटेपर्यंत खुले असतात. उशिरापर्यंत भटकंती, नृत्य, मद्यपान याचं गोव्याला कधीच वावडं नव्हतं. मात्र गेल्या काही महिन्यांत गोव्यात अशा स्वैर पर्यटनाविरोधात आंदोलन जोर धरू लागलं आहे. या रोषाच्या केंद्रस्थानी आहे ध्वनी आणि प्रकाशप्रदूषण.
हेही वाचा – ‘लॅटरल एण्ट्री’ची पद्धत राबवायचीच असेल तर…
आंदोलनाची सुरुवात झाली ती १५ आणि १६ ऑगस्टच्या मध्यरात्री अंजुना बीचपासून. खरंतर गोव्यात रात्री १० पर्यंतच मोठ्या आवाजात संगीत वाजविण्याची परवानगी आहे. त्यानंतरही क्लब्ज सुरू असतात, मात्र संगीताचा आवाज क्लबच्या बाहेर जाणार नाही, याची काळजी घेतली जाणं अपेक्षित असतं. मात्र गेल्या दोन वर्षांपासून हा नियम धाब्यावर बसविला जाऊ लागल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. वृद्ध, रुग्णांची झोपमोड होणं, विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अडथळा येणं अशा समस्या स्थानिकांना भेडसावू लागल्या होत्या. त्याविरोधात स्थानिक न्यायालयात गेले. न्यायालयाने पोलिसांना या उच्छादावर नियंत्रण ठेवण्यासाठी नियमावली तयार करून तिची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले होते.
मे महिन्यात पोलिसांनी सर्व रेस्टॉरंट्स आणि क्लब्जना नोटिसा बजावल्या होत्या. त्यानुसार निवासी भागात क्लब, रेस्टॉरंट्सना परवानगी नसावी, सर्व आवश्यक परवानग्या मिळाल्याशिवाय कोणतेही नवे रेस्टॉरंट अथवा क्लब सुरू केले जाऊ नयेत, अशा स्वरूपाच्या अस्थापनेत ध्वनिप्रदूषण मापन यंत्रणा बसविण्यात यावी आणि आवाजासंदर्भातील नियमांचं पालन करण्यात यावं, अशी नियमावली तयार करण्यात आली. अंमली पदार्थांचं सेवन निषिद्ध आहे, असंही त्यात स्पष्ट नमूद केलं होतं. मात्र क्लब मालकांनी या नियमांना केराची टोपली दाखविली.
१५ ऑगस्टच्या मध्यरात्री अंजुना किनाऱ्यावर जेव्हा ११ वाजल्यानंतर दणदणाट सुरू झाला, तेव्हा स्थानिकांनी पोलीस ठाण्यासमोर मेणबत्ती मोर्चा काढला. हळूहळू आसागांव, शिवोली, कलंगुट अशा अन्य किनाऱ्यांवरील रहिवासीही त्यांना पाठिंबा देऊ लागले. तक्रार केली की पोलीस येतात, तेवढ्यापुरता आवाज बंद केला जातो. पोलिसांची पाठ फिरली की पुन्हा दणदणाट सुरू होतो, तो पहाटे तीन-चारपर्यंत थांबत नाही, असं स्थानिकांचं म्हणणं आहे. या दणदणाटामुळे अनेकांना आरोग्याच्या समस्या उद्भवल्या असून तीन व्यक्तींचा मृत्यू झाल्याचा आरोप रहिवासी करत आहेत. ते जेवढे क्लब मालकांवर चिडले आहेत, त्याहून अधिक ते पोलीस आणि राज्य सरकारवर संतापल्याचं स्थानिक वृत्तवाहिन्या आणि समाजमाध्यमांवरच्या त्यांच्या प्रतिक्रियांतून दिसतं. गोव्यातल्या काही मोठ्या क्लब्जचे मालक दिल्लीस्थित आहेत. स्थानिकांनी ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा लावून धरल्यानंतर पोलिसांनी काही क्लब्जचा वीजपुरवठा खंडीत केला. परवानग्या रद्द केल्या, मात्र त्यानेही क्लबमालक बधले नाहीत. त्यांनी जनरेटर लावून दणदणाट सुरूच ठेवला. पोलीस केवळ परवानग्या रद्द करून हातावर हात ठेवून का बसले आहेत? राज्य सरकार दिल्लीकरांच्या पाठीशी उभं आहे का? पोलीस काहीच करू शकत नसतील, तर कशाला हवं आहे पोलीस ठाणं, असा प्रश्न आंदोलक करत आहेत. अदानींच्या बंदरांतून आलेले अंमली पदार्थ गोव्यात वितरित केले जात आहेत का, असा संशयही व्यक्त केला जात आहे. राज्यात वेश्या व्यवसाय वाढला आहे.
हेही वाचा – ‘बहिणीं’नो, दीड हजार रुपयांसाठी ‘भावां’ना प्रश्न विचारण्याची ताकद गमावू नका…
या साऱ्याला मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा वरदहस्त असल्याचा आरोप रहिवासी करू लागले आहेत. कायदा सुव्यवस्था प्रस्थापित करता येत नसेल, तर उत्तर गोव्याच्या आमदार डेलिला लोबो यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलक करत आहेत. आंदोलनात काँग्रेस आणि आपच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतल्याचं दिसतं. पोलिसांचं काम आहे कायद्यांची अंमलबजावणी करणं, पण पोलीस लक्षच देत नाहीत. ते न्यायालयाच्या आदेशालाही जुमानत नाहीत, मग काय गरज आहे या पोलीस ठाण्याची?
आम्हाला सनबर्न फेस्टिव्हलही नको
जुलैच्या अखेरीस दक्षिण गोव्यातल्या सात ग्रामपंचायतींनी एक ठराव केला. प्रसिद्ध सनबर्न फेस्टिव्हल यापुढे गोव्यात घेतला जाऊ नये, अशा आशयाचा हा ठराव होता. खरंतर दरवर्षी हा संगीत आणि नृत्य महोत्सव उत्तर गोव्यात आयोजित केला जातो. मात्र यंदा तो दक्षिण गोव्यात होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ग्रामपंचायतींनी आधीच हा ठराव संमत केला. ट्रॅव्हल अँड टुरिझम असोसिएशन ऑफ गोवा (टीटीएजी) ने याला विरोध दर्शवला. ‘महोत्सवाच्या आयोजकांनी अद्याप परवानगीचा अर्ज केलेला नाही, त्यामुळे महोत्सव नेमका कुठे होणार हे निश्चित नाही, मात्र महोत्सवातून मिळणार महसूल तब्बल २०० कोटींच्या घरात जातो. त्यामुळे तो रद्द करणं योग्य ठरणार नाही,’ अशी भूमिका टीटीएजीने घेतली.
अन्य पर्यटनग्रस्त शहरे
बेशिस्त आणि अतिपर्यटन ही समस्या आता जगभरात अनेक ठिकाणी उद्भवू लागली आहे. अनेक पर्यटनस्थळे सध्या पर्यटनग्रस्त होताना दिसू लागली आहेत. अलीकडचंच उदाहरण द्यायचं तर स्पेनमधले स्थानिक रहिवासी एप्रिल २०२४ मध्ये अतिपर्यटनाविरोधात रस्त्यावर उतरले होते. ॲमस्टरडॅममध्ये २०२३ साली केवळ पार्टीसाठी येणाऱ्या तरुणांना दूर ठेवण्यासाठी ‘स्टे अवे’ हे जाहिरात अभियान राबवण्यात आलं होतं. तिथे नव्या हॉटेल्सना परवानगी न देण्याचं धोरणही अवलंबण्यात आलं. भूतानमध्ये २०१९ पासून पर्यटकांना त्यांच्या वास्तव्याच्या प्रत्येक दिवसासाठी कर आकारण्यात येऊ लागला. न्यूझिलंडने पर्यटकांवर नियंत्रण ठेवण्याचे प्रयोग केले, मात्र त्याचा तिथल्या अर्थकारणाला फटका बसला. युरोपातली अनेक शहरं पर्यटकांमुळे पायाभूत सुविधांवर पडणारा भार आणि पर्यटकांचं बेशिस्त वर्तन याची बळी ठरत आहेत. महाराष्ट्रात केवळ रिल्स पोस्ट करण्यासाठी गडकिल्ल्यांवर गर्दी करून कचऱ्याचे डोंगर उभारणारे हौशे नवशे असोत वा हिमालयातील प्लास्टिकचा खच पाडणारे असोत, हे सारेच बेजबाबदार पर्यटक आहेत.
पर्यटन म्हणजे केवळ हवापालट, मौजमजा, समाजमाध्यमांवर मिरवण्याची संधी आहे का? की नवे अनुभव गोळा करण्याचा, नव्या माणसांना भेटण्याचा, त्यांची संस्कृती, पेहराव, खानपान, भाषा, वृत्ती जाणून घेण्याचा, नवं काही शिकण्याचा हा प्रवास आहे, याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. आपल्याला जो अनुभव मिळाला तो आपल्यामागून येणाऱ्यांनाही मिळावा, अशीच इच्छा खऱ्या पर्यटकाच्या मनात असली पाहिजे. तिथली शांतता, सौंदर्य, स्वच्छता ओरबाडून नेण्यापेक्षा आपण येण्यापूर्वी ती जागा जशी होती तशीच ठेवणं, जाताना उत्तमोत्तम अनुभव सोबत घेऊन जाणं, हा पर्यटनाचा उद्देश असेल, तर स्वतःच्या अर्थकारणावर घाला घालून पर्यटक नकोत, असं कोण म्हणेल?
vijaya.jangle@expressindia.com