देवाला त्राता म्हटलं जातं पण काही वेळा अशा येतात की देवाच्या दारात पोहोचलेले भाविक जीव गमावून बसतात. आयुष्याचा अर्थ समजून घेण्यासाठी अनेकजण अध्यात्माची वाट धरतात, मात्र या वाटेवरच्या अपघातात आयुष्यला मध्येच पूर्णविराम मिळतो. असं का होतं? अकोला आणि खारघमध्ये लागोपाठ घडलेल्या दोन भीषण घटनांनी हा प्रश्न अधिक ठळक केला आहे. मंदिराच्या रांगेत चेंगराचेंगरी होऊन, यात्रेकरूंच्या वाहनाला अपघात होऊन, कधी छत कोसळून तर कधी आग भडकल्यामुळे अपघात होतात आणि अनेकांना हकनाक जीव गमावावा लागतो. नुकत्याच झालेल्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर यातल्या काही ठळक घटनांविषयी आणि त्यामागच्या कारणांविषयी जाणून घेणं, अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये म्हणून काळजी घेणं गरजेचं ठरेल…
मांढरदेवी येथील रेंगराचेंगरी (बळी- ३००)
साताऱ्यातील वाई तालुक्यातील मांढरदेवी किंवा काळूबाई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या देवस्थानची दर जानेवारीतली होणारी यात्रा प्रसिद्ध आहे. यात्राकाळात लाखो भाविक दर्शनासाठी येतात. मंदिर डोंगरावर आहे आणि तिथे जाण्यासाठी चिंचोळा रस्ता आहे. २५ जानेवारी २००५ रोजी सुमारे तीन लाख भाविक जमलेले असताना यात्रामार्गावरच्या स्टॉलमध्ये अचानक सिलिंडर स्फोट झाला. काहींच्या मते आधी आग लागली आणि नंतर सिलिंडरचा स्फोट झाला. तर काहींच्या मते देवीपुढे वाढवण्यात (फोडण्यात) येणाऱ्या नारळांच्या पाण्यामुळे ओल्या झालेल्या दगडांवरून काही भाविक घसरले आणि धक्काबुक्कीतून वाट काढण्यासाठी काही भाविक मंदिर परिसरातील स्टॉलमध्ये घुसले. त्या गडबडीत आग लागली. स्फोटाच्या आवाजाने भाविकांमध्ये घबराट पसरली आणि सर्वजण अस्ताव्यस्त पळू लागले. गर्दीत लहान मुलं आणि महिलांचं प्रमाणही मोठं होतं. चेंगराचेंगरी झाली. गुदमरून, आगीत होरपळून ३०० भाविकांचा मृत्यू झाला आणि अनेक भाविक जखमी झाले. दुर्घटनेनंतर मात्र यात्रेचं योग्य व्यवस्थापन करण्यासाठी समिती नेमली जाऊ लागली. मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आणि यात्राकाळात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येऊ लागला.
तुळजाभवानी मंदिरातील चेंगराचेंगरी (बळी- १९)
तुळजाभवानी मंदिरात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी ज्योत प्रज्वलित करून घेण्यासाठी हजारो भाविक गर्दी करतात. ५ ऑक्टोबर २०१३ रोजी नवरात्रीचा पहिला दिवस होता. त्यामुळे ४ ऑक्टोबरच्या मध्यरात्री मंदिरच्या वाटेवर हजारो भाविकांची गर्दी झाली होती. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शहाजी महाद्वार बंद करण्यात आलं. तेव्हा भाविकांमध्ये धक्काबुक्की सुरू झाली आणि चेंगराचेंगरीत १९ भाविकांचा मृत्यू झाला. तुळजापूरमध्ये घडलेली ही पहिलीच दुर्घटना नव्हती. त्याआधीही १९७७साली अजाबळीच्या वेळी म्हणजेच बोकडाचा बळी देताना दत्त मंदिरावरील पत्र कोसळून सात भाविक ठार झाले. त्यानंतर १९९४ साली अश्विन पौर्णिमेच्या यात्रेत याच परिसरातील गोमुख तीर्थावर चेंगराचेंगरी झाली होती. या घटनांनंतर मंदिराकडे जाणारा १० फूट रुंदीचा रस्ता ४० फूट रुंद करण्यात आला, मात्र तरीही २०१३ साली पुन्हा दुर्घटना घडलीच.
जोधपूरच्या चामुंडादेवी मंदिरातील दुर्घटना (बळी- २५०)
जोधपूरमधल्या मेहरानगडावरच्या चामुंडादेवीच्या मंदिरात नवरात्रकाळात जागर होतो. ३० सप्टेंबर २००८ रोजी जागरासाठी शेकडो भाविकांनी गर्दी केली होती. मंदिराचं प्रवेशद्वार उघडताच भाविक आत घुसण्यासाठी धक्काबुक्की करू लागले. त्यात झालेल्या चेंगराचेंगरीत २५० भाविकांचा बळी गेला.
केरळमधल्या उप्पापुरा येथील अपघात (बळी- १०२)
शबरीमला मंदिराजवळच्या उप्पापुरा येथील अय्य़प्पा मंदिराच्या परिसरात मकरसंक्रांतीला मकरज्योतीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. डोंगरावरील या मंदिराकडे जाणारा रस्ता चिंचोळा आहे. १४ जानेवारी २०११ रोजी जमलेल्या गर्दीतून वाट काढणाऱ्या जीपचालकाचं नियंत्रण सुटलं आणि जीप रिक्षावर आदळली. दोन्ही वाहनं गर्दीत घुसल्यामुळे भाविकांमध्ये घबराट पसरली आणि चेंगराचेंगरी झाली. त्यात १०२ जणांचे बळी गेले तर ५७ जखमी झाले.
वैष्णोदेवी चेंगराचेंगरी (बळी- १२)
१ जानेवारी २०२२ रोजी जम्मू काश्मीर येथील वैष्णोदेवी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत १२ जणांचा मृत्यू झाला. रात्री पावणेतीनच्या सुमारास भाविकांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यातून ढकलाढकली सुरू झाली. तिचं पर्यवसान चेंगराचेंगरीत होऊन त्यात १२ जणांचा मृत्यू झाला.
मंदिरातली नाणी मिळताना धक्काबुक्की (बळी- १२)
तामिळनाडूतील मुथय्यापालयम कुरुपुसामी मंदिरात दान करण्यात आलेली नाणी एका विशिष्ट दिवशी भाविकांना वाटण्यात येतात. हे नाणे घरातील तिजोरीत ठेवल्यास भरभराट होते, असा समज आहे. या मंदिरात २२ एप्रिल २०२२ रोजी नाणी वाटण्यात येणार होती. ती मिळविण्यासाठी भाविकांची रांग लागली होती. एका विशिष्ट ठिकाणी महिलांची आणि पुरुषांची रांग वेगवेगळी करण्यात आली होती. त्याच ठिकाणी एक महिला अडखळून पडली. तिच्या मागोमाग अन्यही काही भाविक पडले आणि चेंगराचेंगरी झाली. त्यात सात भाविकांचा मृत्यू झाला, तर १२ भाविक जखमी झाले.
इंदूरमध्ये विहिरीचं छत कोसळून अपघात (बळी- ३५)
मध्य प्रदेशाच्या इंदूरमधल्या बेलेश्वर मंदिरात अलीकडेच भीषण अपघात झाला. ३० मार्च २०२३ रोजी रामनवमीचा उत्सव सुरू असताना पुरातन विहिरीचं छत कोसळून अनेक भाविक विहिरीत पडले. त्यापैकी ३५ भाविकांचा मृत्यू झाला.
अकोल्यात छतावर झाड कोसळून अपघात (बळी- ७)
९ एप्रिल २०२३ रोजी अकोल्यातील बाळापूर तालुक्यातील पारस इथे समर्थ बाबूजी महाराज संस्थान मंदिराच्या छतावर कडुनिंबाचं जुनं झाड कोसळलं. मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे अनेकांनी पत्र्याच्या छताखाली गर्दी केली होती. यात सात जणांचा मृत्यू झाला, तर सुमारे ३० ते ४० जण जखमी झाले. या मंदिरात दर आठवड्याला दरबार भरत असे. या दरबारात कोणत्या स्वरूपाचे उपचार केले जात होते, याचा तपास करण्याची मागणी अंनिसने केली होती.
रांगेत हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू
२९ मार्च २०२३ रोजी मंदिराच्या दर्शनरांगेत हृदयविकाराचा झटका आल्याने रामनाथ जाधव या ६२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. १० जानेवारी २०१८ रोजी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या दर्शनरांगेत ७२ वर्षीय साखराबाई जिरजे यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ५५ वर्षीय सदाशिव बारड यांचाही ३ फेब्रुवारी २०२३ रोजी याच मंदिरात प्रदक्षिणा घालताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या झाल्या ठळक घटना. याव्यतिरिक्तही यात्रेकरूंच्या वाहनांना अपघात होऊन, पदयात्रेला निघालेल्या यात्रेकरूंना अवजड वाहनाने धडक दिल्यामुळे अशा विविध कारणांनी बळी जात असतात.
देवाच्या दारातलं हे मरण टाळणं काही अंशी शक्य आहे. प्रसिद्ध देवस्थानी जेव्हा वार्षिक जत्रा- यात्रा भरतात तेव्हा तिथे गर्दीवर नियंत्रण ठेवणं हे प्राथमिक काम मंदिर प्रशासनाला करावं लागेल. स्थानिक स्वराज्य संस्थांनाही त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. यात्रा, उत्सव काळात पोलीस बंदोबस्त, रांगेची शिस्त, प्रथमोपचार व रुग्णवाहिकांची सोय, अग्निशमन दलाच्या गाड्या तैनात ठेवणं, अग्निसुरक्षेचे नियम पाळले जातील याची दक्षता घेणं, परिसरातील स्टॉल्स आणि विक्रेत्यांवर नियंत्रण ठेवणं आदी उपाययोजना अपरिहार्य आहे.
भाविकांनीही विवेकीवृत्तीने वागणं गरजेचं आहे. देव तोच असतो आणि वर्षभर तिथेच असतो. एका विशिष्ट दिवशी त्याच्या भेटीला गेलो तरच तो खूश होईल असं काही असतं का? याचा विचार करायला हवा. शक्य झाल्यास अशा विशेष दिवसांऐवजी अन्य एखाद्या दिवशी देवळात गेल्यास यंत्रणेवरचा ताण कमी होईल आणि माणुसकीला हातभार लागेल.