राहुल तिवरेकर

असे म्हटले जाते की, जगात पाण्यानंतर जर एखाद्या वस्तूला मागणी असेल तर ते म्हणजे सिमेंट. या पृथ्वीवर कोणत्याही ठिकाणी जे काही बांधकाम केले जाते त्यात सिमेंट हाच सर्वात महत्त्वाचा घटक असतो. अगदी घराच्या बांधकामापासून ते धरणाच्या भिंतीपर्यंत सिमेंटचा वापर अनिवार्यपणे केला जातो. आणि बहुधा याचमुळे सिमेंट उद्योगावर टीका होत असते. कारण यातून उत्सर्जित होणारे कार्बन-डाय-ऑक्साईड. जगात होणाऱ्या सर्व प्रदूषणापैकी एकट्या सिमेंट उद्योगाचा वाटा आठ टक्के आहे.

india exports contract 1 percent in december 2024
डिसेंबरमध्ये देशाच्या निर्यातीत घसरण; नेमके कारण काय?
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
grand alliance government accelerate the shaktipeeth highway work after election victory
निवडणुकीत प्रचंड बहुमत… आता महायुती सरकारकडून शक्तिपीठ महामार्गाला गती?
what is the genome india project why it matters
विश्लेषण : जिनोमइंडिया प्रकल्प भारतासाठी किती महत्त्वाचा?
portfolio, investment , Alphaportfolio Concept ,
चला अल्फापोर्टफोलिओ तयार करूया
Dr. K. Kathiresan fears marine carbon sequestration collapse from 2025 due to plastic pollution
समुद्रात कार्बन शोषणारी यंत्रणा कोलमडण्याची शक्यता, शास्त्रज्ञ डॉ. के. कथीरेसन यांनी व्यक्त केली भिती
Union Carbide waste disposal issue
‘युनियन कार्बाईड’च्या कचऱ्याचा प्रश्न उग्र का झाला? हा कचरा मूळ वायूइतकाच अतिधोकादायक? दुर्घटनेची शक्यता किती?
Agriculture Commissioner, traders ,
शेतीमाल हमीभावाने खरेदी न करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करा, कृषी आयुक्तांचे आदेश

‘बॅकवर्ड इंटिग्रेशन’ची प्रक्रिया…

आपल्या उद्योगातील नफा वाढवण्यासाठी जेव्हा किरकोळ विक्रेत्याचा वितरक बनतो व एखाद्या उद्योगातील वितरण प्रणाली हातात घेतो तेव्हा त्याला बॅकवर्ड इंटिग्रेशन म्हटले जाते. यामुळे इतर किरकोळ विक्रेत्यांपेक्षा कमी किमतीत एखादी सेवा किंवा वस्तू विक्री करणे या नवीन विक्रेता- वितरकाला शक्य होते. यामुळे नफ्याची टक्केवारी प्रत्येक पायरीवर वाढते व त्या उद्योगामधील किमती नियंत्रित करता येतात. याहीपुढे जाऊन जेव्हा हा वितरकच उत्पादक बनतो तेव्हा वस्तू व सेवेचे उत्पादन ते अंतिम विक्री या पूर्ण साखळीवरच नियंत्रण प्रस्थापित करता येते आणि मागणी व किमती नियंत्रित करता येतात. अदानी समूहावर सिमेंटच्या बाबतीत हा आक्षेप घेण्यात आला, पण त्याचे समर्पक उत्तरही मिळाले. झाले असे की, मे २०२२ मध्ये भारतातील अग्रगण्य अदानी उद्योग समूहाने साडेदहा अब्ज डॉलरमध्ये केलेली होल्सिम या जगातल्या सर्वात मोठ्या सिमेंट कंपनीची खरेदी. या कराराला अलीकडेच सर्व अधिकृत मान्यता मिळाल्यामुळे अदानी उद्योग हा भारतातला दुसऱ्या क्रमांकाचा सिमेंट उत्पादक ठरला. (पहिला क्रमांक आदित्य बिर्ला समूहाच्या ‘अल्ट्राटेक’चा).

अदानी उद्योग समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांनी अलीकडेच दिलेल्या मुलाखतीनुसार उपरोक्त करारानंतर, त्यांच्या उद्योग समूहातील बांधकाम कंपन्याच या नव्याने निर्माण झालेल्या सिमेंट उद्योगाच्या ग्राहक असतील. केंद्र सरकार व त्यांची जवळीक पाहता हे शक्यही असावे. कारण प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सर्वांसाठी परवडणारी घरे, १०० नवीन स्मार्ट शहरे, अनेक नवीन एअरपोर्ट यांचे बांधकाम आगामी काळात होणार आहे. याव्यतिरिक्त रस्ते, महामार्ग व नवीन बंदरे यांची कामेसुद्धा अदानी समूहाजवळ असू शकतात. यामुळे अदानी उद्योग समूहाने त्यांचे सिमेंट उद्योगाचे फॉरवर्ड व बॅकवर्ड एकत्रीकरण पूर्ण केले आहे.

होल्सिमने या उद्याेगातून अंग का काढले?

या पार्श्वभूमीवर असा प्रश्न पडतो की, जर भारतातील सिमेंट उद्योग इतका वाढणार आहे तर नेमक्या याच टप्प्यावर होल्सिमसारख्या जागतिक पातळीवरील सिमेंट कंपनीने आपला भारतातील उद्योग का विकला? इतकेच नाही तर आशिया खंडात असणारे सर्व सिमेंटनिर्मिती कारखाने व रशियातील कारखानेसुद्धा या कंपनीने विकून टाकले आहेत.

याचे कारण म्हणजे होल्सिम ही स्विस कंपनी आहे आणि जगातील ७७ देशांनी, ज्यात स्वित्झर्लंडचाही समावेश आहे त्यांनी २०५० पर्यंत ‘नेट झिरो एमिशन’ म्हणजेच कार्बनचे उत्सर्जन शून्यावर आणणे याकरिता करार केला आहे. सिमेंट उद्योग हा अमेरिका व चीनमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा ग्रीन हाऊस गॅसेस उत्सर्जन करणारा उद्योग आहे आणि वीस टक्क्यांच्या प्रमाणासह भारतात चौथ्या क्रमांकावर आहे.

याहीपुढे जाऊन युरोप व अमेरिका यांनी ‘कार्बन बॉर्डर टॅक्स’ लागू करण्याचे धोरण अवलंबिले आहे. ज्याच्या अंतर्गत युरोप किंवा अमेरिकन कंपनीला आफ्रिका किंवा आशियामध्ये उत्पादन करून कार्बन मोनॉक्साइडच्या उत्सर्जनात सूट मिळणार नाहीच तर त्यावर कर भरावा लागेल आणि असे न केल्यास पूर्ण आयातीवर दंड भरावा लागेल. जगभरात किमान ४.३ अब्ज टन सिमेंट उत्पादन दरवर्षी केले जाते. यामुळे जगातील एकूण कार्बन डायऑक्साईडपैकी आठ टक्के कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन होते. याच कारणामुळे होल्सिमसारख्या कंपन्या पारंपरिक पद्धतीने उत्पादित केल्या जाणाऱ्या सिमेंटचे कारखाने विकून पर्यावरणपूरक सिमेंट बनवण्याकडे वाटचाल करीत आहेत.

पर्यावरणपूरक सिमेंट? ते कसे?

सिमेंट बनवण्याच्या प्रक्रियेत कॅल्शिनेशन या प्रक्रियेचा अंतर्भाव होतो ज्यात अतिउच्च तापमानाला चुनखडक व ॲल्युमिनियम सिलिकॉनचे मिश्रण तापवले जाते. या टप्प्यावर मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साइड उत्सर्जित होतो. या प्रक्रियेचा परिणाम म्हणून क्लिन्कर या नावाचे विविध आकाराचे गोळे असलेले सिमेंटपूर्व प्रॉडक्ट मिळवले जाते. नंतर याला दळून सिमेंटची पावडर स्वरूपात निर्मिती होते. विविध मिश्रणांच्या अनुषंगाने वर्गवारीनुसार हे सिमेंट बाजारात उपलब्ध केले जाते. या प्रक्रियेत अतिउच्च तापमानाची भट्टी कॅल्शिनेशनची प्रक्रिया व क्लिन्कर हे पूर्वउत्पादन यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित होतो.

सिमेंटचे मुख्य कार्य म्हणजे रेती, खडी, पाणी इत्यादी बांधकाम साहित्य यांचे मिश्रण एकत्रित धरून ठेवणे. साधारणत: एकूण मालाच्या बारा टक्केपर्यंत सिमेंट वापरले जाते व त्याचमुळे काॅंक्रीटची निर्मिती होते. बांधकाम झालेल्या काँक्रीटमधूनसुद्धा इतर बांधकाम साहित्यापेक्षा सिमेंटच कार्बनचे उत्सर्जन करीत राहते. याचे सहज उदाहरण म्हणजे फार बांधकाम असलेल्या शहरात तापमान एक ते दीड डिग्रीने जास्त जाणवते, तर शहराच्या बाहेर आल्यावर गारवा जाणवतो. याचमुळे एसीचा वापरसुद्धा वाढतो. कारण काॅंक्रीट बांधकामात हवा खेळती राहण्यासाठी जागाच नसते.

सिमेंट उद्योगापुढील आव्हान

१) उपरोक्त करार झाल्यानंतरसुद्धा अदानी उद्योग समूहातील एसीसी कंपनी (३४.४५ दशलक्ष टन) व अंबुजा सिमेंट (३१.४५ दशलक्ष टन) यांची एकत्रित उत्पादन क्षमता ‘अल्ट्राटेक’ (११९ दशलक्ष टन) या क्रमांक एकवरील कंपनीपेक्षा अजूनही अर्धीच आहे. इथून पुढे होणाऱ्या स्पर्धेमुळे ते आणखी किती वाढेल याची शाश्वती नाही.

२) पर्यावरणीय बदलांचे अभ्यासक व गुंतवणूकदार यांच्याकडून कमीत कमी कार्बन उत्सर्जन व्हावे यासाठी दबाव आणला जात आहे, पण तो आता आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नसल्याचा दावा सिमेंट उत्पादक कंपन्या करीत असतात.

३) याचबरोबर भौगोलिकदृष्ट्यासुद्धा सिमेंट उत्पादन काही भागात विखुरलेले व काही भागात एकत्र झालेले आढळून येते. यामुळे कच्च्या मालाची व उत्पादित मालाची वाहतूक प्रमाणात वाढते.

पुढे काय?

१) २०५० सालापर्यंत पृथ्वीचे तापमान दोन डिग्रीने वाढवू न देण्याचे ध्येय आता सुधारित दीड डिग्रीवर आणण्यात आले आहे. यामुळे ग्रीन हाऊस वायू व कार्बन उत्सर्जित करणाऱ्या प्रक्रिया व उद्योग व अर्थव्यवस्थांवर दबाव वाढविण्यात आला आहे.

२) सिमेंट उद्योगाच्या प्रत्येक टप्प्यावर कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन होते. त्यामुळे प्रत्येक टप्प्यावर सुधारित तंत्रज्ञान वापरण्याची नितांत आवश्यकता आहे. आता उत्सर्जित होणाऱ्या कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण ७५ टक्क्यांनी खाली आणण्याचे व कार्बन नियंत्रण पुनर्वापर करण्याची गरज आहे. त्याचबरोबर क्लिन्करच्या टप्प्यावर फ्लाॅय ॲश व पोझेलीन यांचा वापर करणे व इंधन म्हणून अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा वापर करणे अत्यंत आवश्यक झाले आहे.

३) संपूर्ण सिमेंट उत्पादन व्यवस्थेचे डिजिटायझेशन व शाश्वत पद्धतीकडे वाटचाल करून पर्यावरणस्नेही हरित सिमेंटनिर्मिती करणे हेच सिमेंट उद्योगापुढील खरे आव्हान आहे. भारतातील सर्वच सिमेंट कंपन्या ते पार पाडतील.

भारतातील कंपनीने व्यवसाय वाढवला तर त्याचे सुपरिणाम भारतातील अर्थव्यवस्थेवर दिसू शकतात. मात्र केवळ आर्थिक परिणामांचा विचार करून कसे चालेल? भारतातील पर्यावरणावर काय परिणाम होतील, याचा साकल्याने विचार करण्याची व निर्णय करण्याची जबाबदारी भारतीय सुजाण नागरिकांवर आज येऊन ठेपली आहे.

लेखक पर्यावरण व सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत.

rahul.swarajfoundation@gmail.com

Story img Loader