चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी त्या देशातील ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’तल्या जनरल दर्जाच्या तब्बल नऊ अधिकाऱ्यांना पक्षातून रातोरात बरखास्त केलेले आहे. हे सर्व जनरल चीनच्या नामधारी संसदेचे, अर्थात ‘नॅशनल पीपल्स काँग्रेस’चे सदस्य आहेत. या तथाकथित संसदेवर ज्या पॉलिटब्यूरोचा वरचष्मा असतो, त्यातील २५ सदस्यांपैकी संरक्षण क्षेत्राशी निगडित अशा तिघा वरिष्ठांनाही जिनपिंग यांनी घरचा रस्ता दाखवला आहे. आता चीनच्या संरक्षण मंत्री पदी डाँग जुन यांची निवड झाली आहे, असेही चिनी सरकारच्या प्रवक्त्या माओ निंग यांनी अलीकडेच (३० डिसेंबर) जाहीर केले. या तीन्ही घडामोडी, क्षी जिनपिंग हे आता चीनच्या लष्करावरही स्वत:चीच पकड ठेवू इच्छितात हे स्पष्ट करणाऱ्या आहेत.
चीनचे माजी संरक्षण मंत्री ली शांगफू मागील ऑगस्ट महिन्यापासून गूढरीत्या गायब झाल्यामुळे, त्यांची पदावरून गच्छंती होणार हे ठरलेले होते. डाँग जून यांची नियुक्ती अनेक अर्थाने भौगोलिक राजकारणाच्या अंगातून महत्त्वाची ठरते. चीनची ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ म्हणजे नावाप्रमाणे फक्त लष्कर नव्हे. चिनी हवाईदल आणि नौदलालाही ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’चा- ‘पीएलए’चा भाग मानले जाते आणि नवे संरक्षणमंत्री हे या ‘पीएलए’च्या नौदलाचे प्रमुख (ॲडमिरल) या पदावरून थेट संरक्षणमंत्री झाले आहेत. एकाच आठवड्यात केलेल्या तीन मोठ्या बदलांचा हेतू काय असावा, हे चिनी राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणातून सूचित झाले. या भाषणात जिनपिंग यांनी, ‘एकसंध चीनची निर्मिती होण्यापासून कोणत्याही प्रकारची ताकद आम्हाला रोखू शकत नाही’ याचा पुनरुच्चार केला. हे वाक्य तसे नेहमीचेच, पण तैवानवर ‘वन चायना’चा दबाव चीनने वाढवल्याच्या संदर्भात, त्यातही तैवानमध्ये लवकरच होणाऱ्या निवडणुकीनंतर चीन कुरापत काढणार असल्याची शक्यता अनेक तज्ज्ञ वर्तवत असताना हे विधान करण्यापूर्वी जिनपिंग यांनी संरक्षण खात्यात आणि सेनादलांत मोठे फेरबदल केले, हे लक्षणीय.
हेही वाचा : म्हणून भारतीय विद्यार्थ्यांना असते परदेशी शिक्षणाची ओढ…
‘नऊजण पक्षातून बडतर्फ’ हे भारतीयांना कदाचित फार मोठे वाटणार नाही, कारण आपल्याकडे पक्षातून ये-जा सुरूच असते. चीनमध्ये मात्र एकच सत्ताधारी पक्ष (आणखी आठ पक्ष आहेत, पण ते सारे मुख्य पक्षाला अंकित आहेत आणि कधीही सत्ताधारी होऊ शकत नाहीत) त्यामुळे पक्षातून बडतर्फ होणे सर्वात मोठी शिक्षा मानली जाते! ही कारवाई जिनपिंग यांनी अनेकदा, अनेकांविरोधात राजकीय हत्यारासारखी वापरली आहे. त्यासाठी जिनपिंग यांनी २०१३ मध्ये पहिल्यांदा राष्ट्राध्यक्ष झाल्यावर, कम्युनिस्ट पक्षातील गैरकारभारवर नजर ठेवणाऱ्या ‘सेंट्रल कमिशन फॉर डिसिप्लिन इन्स्पेक्शन’ (सीसीडीआय) या यंत्रणेला ‘स्वायत्तता’ देण्याच्या नावाखाली त्यात आमूलाग्र बदल करून, ही यंत्रणा म्हणजे जणू आपल्या राजकीय अजेंड्याची अंमलबजावणी करणारे संचालनालय ठरेल, अशी तजवीज केली. त्यानंतर २०१५ सालापासून जवळपास दरवर्षी पाच लाख कम्युनिस्ट पक्षाच्या सदस्यांना विविध प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये अटक झाली व त्यांची पक्षातून बरखास्ती करण्यात आली. यात प्रांतीय सरकारचे सदस्य होते, तसेच अतिशक्तिशाली अशा केंद्रीय पॉलिट ब्यूरोचे सदस्यही होते. कम्युनिस्ट पक्षातील जिनपिंग यांच्या विरोधकांना किंवा ज्यांनी जिनपिंग यांची निष्ठा माननेली नव्हती अशांना या मोहिमे अंतर्गत लक्ष्य बनविण्यात आले. आपल्या पहिल्याच कार्यकाळात जिनपिंग हे सर्वशक्तिमान नेते बनले याचे श्रेय या भ्रष्टाचार विरोधी मोहिमेस जाते.
हेही वाचा : पदवी आहे, संधी आहेत, तरीही वाणिज्यचे विद्यार्थी बेरोजगार राहतात, कारण…
पक्षाच्या सत्तेचे केंद्रीकरण करण्यात जिनपिंग यांना यश आल्यावर कितीही वेळा अध्यक्ष बनण्याची मुभा त्यांनी पदरात पाडून घेतली आहे. ‘वन बेल्ट वन रोड’ सारखे जगातल्या अनेक देशांतल्या मालवाहू मार्गांमध्ये वाटा घेण्याचे धोरण असो किंवा २०१७ साली आलेला चीनचा नवा संरक्षण कायदा असो, प्रत्येक धोरणातून त्यांनी आपले वेगळे अस्तित्व प्रस्थापित केले. वर हेच जिनपिंग ‘चिनी चेहऱ्याचा समाजवाद’, ‘नैतिक भूमिका महत्त्वाची’ वगैरे तत्त्वज्ञानाच्या सुरातही बोलतात आणि त्या भाषणांना ‘जिनपिंग थॉट’ म्हणा, असा ‘वरून आलेला आदेश’ सुद्धा सगळ्यांना पाळावा लागतो. या ‘जिनपिंग थॉट’चा खरा चेहरा आहे तो जगड्व्याळ महत्त्वाकांक्षेचा. यामागची व्यापारी आणि भांडवली महत्त्वाकांक्षा यापूर्वी दिसली आहेच, पण आता लष्करी महत्त्वाकांक्षाही दिसू लागली आहे. त्यासाठीची पूर्वउभारणी म्हणून ‘भ्रष्टाचार उखडून काढण्या’च्या नावाखाली लष्करात आपल्याच मर्जीतले, आपलाच शब्द झेलणारे वरिष्ठ क्षी जिनपिंग आणू शकतात.
क्षी जिनपिंग यांच्याकडे राष्ट्रपती व जनरल सेक्रेटरी वगळता सेंट्रल मिलीटरी कमिशनचे (सीएमसी) चेअरमन पद आहे. चिनी ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ची ‘सीएमसी’ हीच सर्वोच्च यंत्रणा मानली जाते. या ‘सीएमसी’ ११ सदस्य असतात आणि हा आयोगच सर्व पातळीवरील जनरलची नियुक्ती करतो, तसेच चायनीज रॉकेट फोर्स व धोरणात्मक अणुआयुधांच्या देखरेखीसाठी असलेल्या समित्यासुद्धा या ‘सीएमसी’च्या अखत्यारीत येतात. अशाप्रकारे जिनपिंग यांच्याकडे लष्कराच्या सर्व विभागांची किल्ली आहे.
हेही वाचा : ही रुजविलेली अन्यायग्रस्तता तर नव्हे?
२८ जुलै २०२३ रोजी ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’च्या रॉकेट फोर्स मधील वरिष्ठ अधिकारी ली युचाओ व ल्यु गाऊंगबीन या दोघांना बडतर्फ करण्यात आले. हा ‘राॅकेट फोर्स’ विभाग ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’च्या मिसाईल सिस्टीमसाठी खरेदी, विक्री व निर्मिती करतो. ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात चायनीज संरक्षण मंत्री ली शांगफू ‘गायब’ झाले. आफ्रिका-चीन संरक्षण मंत्री शिखरपरिषदेनंतर ते गायब झाले. जिनपिंग यांनी सप्टेंबर २०२३च्या शेवटी चीनच्या ईशान्येकडील ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ मुख्यालयाला भेट दिली होती त्यावेळीही शांगफू अनुपस्थित होते. त्यामुळे सर्वत्र शंकेचे वातावरण निर्माण झाले. नंतर परराष्ट्रमंत्री किन गांगही अशाच प्रकारे ‘दिसेनासे’ झाल्याने शांगफू यांचीही चौकशी सुरू असणार, असा अंदाज जगभरच्या चीन-निरीक्षकांनी बांधला. चिनी संरक्षण मंत्री होण्याआधी २०१७-२०२२ पर्यंत ली शांगफू हे ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’च्या साधनसामुग्री विभागाचे (इक्पिमेंट डिपार्टमेंट) प्रमुख होते. याच विभागातील गैरकारभारविरुद्ध चौकशी सुरू होती जिच्या परिणामी जुलैमध्ये दोघा अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले. पक्षातून अलीकडेच बडतर्फ झालेल्या नऊ लष्करी वरिष्ठांचेही लागेबांधे ली शांगफू यांच्याशी असणार, असे मानले जाते. बडतर्फ झालेल्या ‘जनरल’ दर्जाच्या अधिकाऱ्यांची नावे झाँग झेंझांग, झांग युलिन, राओ वेन्मिन, जू शिनचिन, डिंग लाईहांग, लू हाँग, ली युचाओ , ली चुऑंगगॉंग, झाई यानिंग अशी आहेत. याखेरीज चायनीज एअरोस्पेस टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशनचे प्रमुख वू यानशेंग, नॉरिन्को या संरक्षण क्षेत्रातील अद्ययावत स्वयंचलित आयुधे तयार करणाऱ्या संस्थेचे प्रमुख ल्यू शिकिआन, ‘चायना एअरोस्पेस सायन्स ॲण्ड टेक्नॉलॉजी इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन’ या उपग्रह प्रक्षेपण करणाऱ्या चिनी संस्थेचे प्रमुख वाँग चांगकिंग यांच्यावरही बडतर्फीची कारवाई झाली आहे.
हेही वाचा : आपण सावित्रीबाईंचा वसा पुढे नेणार का?
एकंदरीत या सर्व बडतर्फींमुळे ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’मधील अस्थिरता प्रकर्षांने जाणवते. मागील ‘एनपीसी’ अधिवेशनात रॉकेट फोर्स व एअरोस्पेस विभागातील तंत्रज्ञान अत्याधुनिक करण्याबाबत नवनव्या कार्यक्रमांची घोषणा झाली होती. या सर्व कारवायांमुळे नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञ मंडळी व्यक्त करत आहेत. तरीदेखील जिनपिंग यांच्या भ्रष्टाचार विरोधी धडक मोहिमेपुढे आता ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’चीही धडगत नाही, असे यातून दिसते.
थोडक्यात, दक्षिण चिनी समुद्राच्या जटील समीकरणांसाठी ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’मधल्या या आमूलाग्र बदलांकडे बारकाईने लक्ष ठेवून राहणे गरजेचे आहे.
prathameshpurud100@gmail.com