डॉ. उदय नारकर
१६ फेब्रुवारी २०१५ रोजी गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमाताई यांच्यावर गोळीबार करण्यात आला. २० तारखेला गोविंदरावांचे प्राणोत्क्रमण झाले. त्यानंतर कोल्हापूर महानगरपालिकेच्या सभागृहात झालेल्या नागरी शोकसभेत सर्वांचे एकमत होते : समाजातील विवेकाचा आवाज नष्ट करण्यासाठी त्यांची हत्या करण्यात आली आहे. त्यापूर्वी पुण्यात डॉ. नरेंद्र दाभोलकरांची आणि पानसरेंच्या पाठोपाठ धारवाडला डॉ. एम. एम. कलबुर्गी आणि बेंगळूरुला गौरी लंकेश यांची, अशा एकंदर चार हत्या करण्यात आल्या. या सर्व हत्यांच्या पाठीशी गोवास्थित आणि दक्षिण भारतात सक्रिय असलेल्या सनातन संस्थेच्या हिंस्र ’साधकां’चा हात असल्याचे तपासांती दिसून येऊ लागले. विवेकाचा आवाज नष्ट करण्याचे जे ’धर्मकार्य’ हिंदुत्ववादाच्या नावे राबवले जात आहे, त्याचाच हा एक आविष्कार असल्याचीही शंका गडद झाली. आज दाभोलकर आणि पानसरे यांच्या हत्यांसाठी त्या मारेकऱ्यांवर न्यायालयात आरोपपत्रे दाखल झाली आहेत. मात्र पानसरेंचे सर्वच मारेकरी अजून सापडलेले नाहीत. सूत्रधारांपर्यंत पोचणे तर दूरच.
सूत्रधार आज सात वर्षांनंतरही न सापडणे, हे महाराष्ट्र पोलिसांच्या कामगिरीवर त्यांनी स्वतःच केलेले भाष्य आहे. नेमण्यात आलेली पोलीस पथके या खलांचे पारिपत्य करण्यासाठी कार्यक्षम ठरलेली नाहीत. इतकेच नव्हे, तर ती त्यासाठी फारशी उत्सुक असल्याचेही दिसत नाही. त्यासाठी २०१५पासूनच्या राज्यकर्त्यांनाही काही टोचणी लागल्याचे जाणवलेले नाही. त्यामुळे पानसरेंच्या हत्येसाठी चालू असलेल्या खटल्याच्या अंती सर्व गुन्हेगारांना शिक्षा होईल, यावर पोलीस आणि प्रशासन या दोघांचाही विश्वास असल्याचे दिसत नाही. विश्वास ठेवावा, अशी परिस्थिती नाही.
पानसरेंची हत्या कोणी केली, त्यात कोणकोण सहभागी झाले होते, त्या हत्येच्या गुन्ह्याचे सूत्रसंचालन कोणी केले, याचा शोध लागला पाहिजेच. कायद्याच्या राज्याची ती गरज आहे. त्याचबरोबर कायद्याचे राज्य कायम राहायचे झाल्यास ती का झाली, याचाही शोध घेतला पाहिजे.
आधीच्या आणि नंतरच्या हत्या
पुण्यात डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या झाल्यानंतर २ जून २०१४ रोजी आणखी एक राजकीय हत्या झाली होती. मुस्लिमद्वेषापोटी मोहसिन शेख या सॉफ्टवेअर इंजिनीअरची हिंदुत्ववादाच्या नावाने केलेली अलीकडच्या काळातील ही पहिली झुंडहत्या. त्यानंतर देशभर मुस्लिमांच्या झुंडहत्यांचे पेवच फुटले. मोहसिन शेखच्या हत्येच्या खटल्याचा नुकताच निकाल लागला. तथाकथित हिंदुराष्ट्र सेनेच्या वीस जणांची त्या आरोपातून निर्दोष मुक्तता करण्यात आली. पोलिसांच्या कष्टाला ‘अपेक्षित’ फळ आले. असेच कष्टाचे काम पुण्याच्या एल्गार परिषदेच्या निमित्ताने पोलीस करत आहेत. गुन्हेगार निर्मितीचा अभूतपूर्व प्रयोग पुणे पोलिसांनी केल्याच्या आरोपांना तत्कालीन आणि आजचे गृहमंत्री उत्तर द्यायच्या भानगडीत पडलेले नाहीत. तीस्ता सेटलवाड, श्रीकुमार आणि संजीव भट्ट यांना तुरुंगवास आणि बिल्किस बानोच्या बलात्काऱ्यांना, तिच्या कुटुंबियांच्या खुन्यांना अभय हा इथल्या तपासयंत्रणांचा आणि सरकारी कारभाराचा रिवाज बनला आहे.
पानसरे किंवा डॉ. दाभोलकर, डॉ. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्या का करण्यात आल्या, हा काही गहन अभ्यासाचा विषय राहिलेला नाही. ते विवेकाला शब्दबद्ध करत होते. विज्ञानविरोधी, विषमताप्रसारक भाकडकथांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ते शब्दधन वेचत होते, शब्दांची शस्त्रे पाजळत होते. राज्यकारभार विवेकाच्या कसोटीला उतरला पाहिजे, याविषयी ते आग्रही होते. भारताचे संविधान हा विवेकाचा दीप असल्याची त्यांना जाणीव होती. तो दीप सतत तेवत ठेवला पाहिजे, आजूबाजूला घोंघावणाऱ्या द्वेषमूलक वादळवाऱ्यांनी तो विझता कामा नये, ही त्यांची जीवननिष्ठा होती. लोकशाही, धर्मनिरपेक्षता, सामाजिक न्याय ही भारतीय संदर्भातली विवेकाची त्रिशक्ती आहे, याबद्दल त्यांच्या मनात बिलकुल संदेह नव्हता. त्यांचे रक्षण हे वरील हुतात्म्यांनी आपले जीवनकार्य बनवलेले होते.
या मूल्यांचे जतन करण्यासाठी पानसरे यांनी आपली वाणी आणि लेखणी झिजवली. नफेखोरीचे तत्त्वज्ञान स्वीकारलेल्या नवउदार नीतीच्या विरुद्ध ते कामगार-कष्टकऱ्यांना संघटित करत आले होते. त्यांना नवउदार हा शब्द नेहमी खटकत असे. या नफेखोरीत ‘उदार’ काय आहे, असा सवाल ते विचारीत. सहकाराचे रूपांतर खासगी मालकीत करू पाहणाऱ्यांच्या विरुद्ध पानसरे आवाज उठवत राहिले. शोषणाविरुद्ध कामगारांच्या संघटना उभारत आले. समतावादी विचार रुजवत राहिले. यासाठी त्यांची हत्या झाली का?
विषमतावादाला आव्हान
कामगारांची शोषणमुक्ती, शूद्रातिशूद्रांची जातीबंधनाच्या जोखडातून सुटका, स्त्रियांचे पितृसत्तेच्या गुलामीतून स्वातंत्र्य साध्य करायचे तर एक प्रमुख अडथळा ओलांडला पाहिजे, या निष्कर्षाप्रत पानसरे आले होते. श्रमिक, मागासजातीय आणि महिलांच्या जाणिवांवर ‘विषमतावादी विचारांचा पगडा’ वाढत असल्याचे त्यांना पदोपदी जाणवू लागले. समतानिष्ठ समाज निर्माण करण्यासाठी समाजाची वैचारिक मशागत आवश्यक असल्याच्या निष्कर्षाप्रत ते आले होते. यासाठी त्यांनी आयुष्याच्या उत्तरार्धात आपल्या कार्याची एक दिशा निश्चित केली होती. समतानिष्ठ समाज प्रस्थापित करायचा तर त्यासाठी सुसंगत आणि उपकारक मनोवृत्ती तयार झाली पाहिजे. त्यामुळे त्यांनी मराठी समाजाला अंधारयुगात ढकलू पाहणाऱ्या सनातन, प्रतिगामी शक्तींना आपल्या कार्याचे आणि विचाराचे लक्ष्य करण्यास सुरुवात केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हाच त्या शक्तीचा मूलस्रोत आहे आणि त्या शक्तीचे पारिपत्य करणे आवश्यक असल्याचे ते सांगू लागले. चार्वाक-बुद्धांनी रुजवलेल्या टिकाऊ परंपरांची जोपासना आणि विषमता टिकवणाऱ्या सनातनी, जातवर्चस्ववादी परंपरांचा उच्छेद हे त्यांनी आपले जीवनकार्य, विशेषतः आपल्या आयुष्याच्या उत्तरकाळात, बनवले.
कुठल्याही राजकीय क्रांतीला प्रबोधनाची जोड असल्याशिवाय ती यशस्वी होत नाही, टिकत नाही या निष्कर्षाप्रत पानसरे आले होते. यासाठी त्यांनी समतावादी वैचारिक वाङमयनिर्मिती आणि सभासंमेलनांवर आपले लक्ष केंद्रित केले. कोल्हापुरात श्रमिक प्रतिष्ठानच्या वतीने वर्षानुवर्षे विषमतावादाला आव्हान देणारी व्याख्यानमाला चालवली. वाङमयातील समतानिष्ठ परंपरा जागवण्यासाठी कॉ. अण्णाभाऊ साठे साहित्य संमलेन स्थापन केले. महाराष्ट्रातील शंभरहून अधिक क्रांतिकारकांच्या जीवनाचा वेध घेणारी पुस्तके प्रकाशित केली. स्वतः तर समाजाच्या आस्थेच्या समस्यांवर अगणित लेख, पुस्तिका लिहिल्या, व्याख्याने दिली. त्यात राजर्षि शाहूंचा“वसा आणि वारसा’पासून निःस्पृह पोलीस अधिकारी हेमंत करकरेंची हत्या का व कशी झाली यापर्यंत अनेक विषयांचा समावेश होता. त्यांनी ब्रिटीश इतिहासकार एरिक हॉब्सबॉम वाचलेला नव्हता. पण त्याने मांडेलली ‘डावे प्रबोधन’ ही संकल्पना पानसरेंनी डाव्या चळवळीच्या स्वानुभवातून पूर्णतः आत्मसात केली होती. फ्रेंच राज्यक्रांतीपूर्वी तेथील सामाजिक भूमी आधुनिक, विवेकनिष्ठ विचारसरणीने नांगरली होती, तद्वतच समाजवादी क्रांती यशस्वी होण्यासाठी समता स्वीकराणारी समाजाची नवी मनोभूमिका तयार केली पाहिजे, अशी मांडणी हॉब्सबॉम करत आले होते. त्यालाच त्यांनी डावे प्रबोधन ही संज्ञा दिली होती. भारतातील डावे प्रबोधन यशस्वी करायचे तर धार्मिक अंधश्रद्धांची उचलबांगडी आवश्यक आहे, कर्मकांडातून जनतेला बाहेर काढले पाहिजे, याची पानसरेंनी आपल्या मनात खूणगाठ बांधली होती.
त्यामुळेच सनातन्यांनी त्यांना खलपुरुष ठरवले. २००८ साली कोल्हापुरात केवळ आर्थिक लाभासाठी कोल्हापूरला तीर्थक्षेत्राचा दर्जा मागण्याची टूम काढण्यात आली. त्यासाठी संसाधने बेचिराख करणाऱ्या, अंधश्रद्धा पसरवणाऱ्या ’महाविश्वशांती यज्ञा’चे कारस्थान रचण्यात आले. त्याचा अध्वर्यू उत्तर प्रदेशातील कोणी अनामिक विप्र होता. समाजाची दिशाभूल करणारी एक भूमिगत यंत्रणाच कामाला लागली होती. पानसरेंनी एन. डी. पाटील, सदाशिवराव मंडलिक आणि छत्रपती शाहू महाराजांच्या साथीने ते महायज्ञाचे कारस्थान हाणून पाडले. त्या चळवळीचे वैचारिक आणि संघटनात्मक नेतृत्व केले. ही गोष्ट सनातनी शक्तींच्या जिव्हारी लागली.
‘शिवाजी कोण होता?’
त्याही पूर्वीची गोष्ट. महाराष्ट्रामध्ये स्थापन झालेल्या रास्व संघाला दीर्घकाळ कधीच व्यापक समाजमान्यता मिळाली नव्हती. त्याला कारण म. फुल्यांनी रुजवलेला आणि शाहू, वि. रा. शिंदे, डॉ. आंबेडकरांनी विस्तारलेला समतेचा विचार मराठी समाजाने आपलासा केला होता. ही रास्व संघाच्या मान्यतेतील मुख्य धोंड होती. त्यात म. गांधींच्या नथुरामाच्या माध्यमातून झालेल्या हत्येची जोड मिळाल्याने रास्व संघापुढे जास्तच दुर्धर प्रसंग ओढवला. यातून बाहेर पडण्याचा रस्ता तो शोधत होता. बहुजनांना आपल्या वैचारिक गुलामीत ओढण्यासाठी त्यांनी शिवाजी महाराजांचा चलाखपणे दुरुपयोग करण्यास सुरुवात केली. त्या युगपुरुषास मुस्लिमद्वेष्टा आणि ‘गोब्राह्मण प्रतिपालक’ अशा प्रक्षिप्त रूपात साकारायला सुरुवात केली. पानसरेंनी या कारस्थानाचा प्रखर वैचारिक मुकाबला केला. शिवाजी महाराजांचे सत्य त्यांनी ‘शिवाजी कोण होता?’ या आपल्या छोट्याशा पुस्तिकेतून मांडले. त्याच्या लाखो प्रती हातोहात खपू लागल्या. या लिखाणाने, बहुजनांच्या धडावर बसवलेले ब्राह्मणी शीर पूर्ववत त्याच्या मूळ स्कंधावर ठेवले. आपला पूर्ण शक्तिपात होण्यापूर्वी काहीतरी केले पाहिजे, याची सनातनी मनोवृत्तीने खूणगाठ बांधली.
फॅसिस्ट राजवटीचे राजकीय बस्तान बसवण्यापूर्वी सांस्कृतिक, वैचारिक तयारी आवश्यक असते. जर्मन नाझींना आपली सत्तेची मांड समाजावर पक्की करण्याआधी ‘विवेकशक्तीचा निःपात’ करावा लागला. त्याची एक वाट जर्मन तत्त्वज्ञानातून गेली. ल्यूकाच या विचारवंताने आपल्या ’डिस्ट्रक्शन ऑफ रीझन’ या ग्रंथातून हिटलरपर्यंत आणणाऱ्या जर्मन तत्त्वज्ञानाचा रस्ता दाखवून दिला आहे. या जर्मन तत्त्वज्ञानाने विवेकनिष्ठ विचारसरणीचा निःपात करण्याचा कार्यक्रम राबवला. त्याचे नेतृत्व नीत्शेसारख्या तत्त्वज्ञाने कसे केले, हे ल्यूकाचने सोदाहरण दाखवून दिले. रक्तरंजित इतिहास रचण्यासाठीदेखील तत्त्वज्ञान उपयोगी येते, नव्हे ते आवश्यक असते, हे दाखवून दिले. मनुस्मृतीसारखी धर्मशास्त्रे भारतीय फॅसिझमसाठी रस्ता बनवतात, याची कायद्याचा अभ्यास केलेल्या पानसरेंना पूर्ण कल्पना होती. जोपर्यंत भारतीय संविधानानुसार उभारलेल्या एखाद्या न्यायालयाच्या इमारतीसमोर मनूचा पुतळा उभा आहे, तोवर ही अतिशय अवघड लढाई आपल्याला लढावी लागणार आहे, नव्हे ती लढावीच लागणार आहे, याची स्पष्ट जाणीव पानसरेंना होती. ती लढाई डोळसपणे लढण्याची निवड त्यांनी केली होती.
रेषेच्या अलीकडचे आणि पलीकडचे ही पानसरेंसाठी सामाजिक विभागणी होती. भारताचे समतानिष्ठ, लोकशाही, धर्मनिरपेक्ष संविधान ही ती रेषा आहे. ती मानणारे सारे रेषेच्या अलीकडचे, त्यांना एक करण्याची आस त्यांच्या प्रत्येक प्रयत्नातून दिसून येते. त्या रेषेचा दुसऱ्या बाजूने विचार करणाऱ्या शक्तींची आज देशावर आणि राज्यावर सत्ता आहे. त्यांनी पद्धतशीरपणे संविधानाचा परीघ संकुचित करत आणला आहे. भारतीय संविधानाचा परीघ विस्तारण्यासाठी पानसरेंनी आपला जीव पणाला लावला होता.
यातच पानसरेंची हत्या का झाली, या प्रश्नाचे उत्तर सामावलेले आहे.
लेख मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महाराष्ट्र राज्य सचिव आहेत.
udaynarkar@gmail.com