चंद्रयान-३ चे लखलखीत यश देशानेच नव्हे, तर संपूर्ण जगाने नुकतेच अनुभवले. त्यावेळी टीव्हीच्या पडद्यावर दिसणारे चेहरे आणि त्यात असलेले दाक्षिणात्यांचे बाहुल्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. मात्र या क्षेत्रात महाराष्ट्रानेही योगदान दिले आहे. इस्रो आणि संबंधित संस्थांमध्ये मराठी माणसांच्या कामगिरीचीही या निमित्ताने दखल घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर या क्षेत्रात आपण मागे का राहिलो, याचीही मीमांसा करणे गरजेचे आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इस्रोच्या स्थापनेपासून तिच्या विकासात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणारी मराठी व्यक्ती म्हणजे प्रा. एकनाथ वसंत चिटणीस (सध्या वय अंदाजे ९७ वर्षे). पुणे विद्यापीठातून एमएससी (भौतिक/ इलेक्ट्रॉनिक्स) पदवी घेतल्यावर त्यांना उत्तम पगाराची नोकरी मिळाली होती; ती सोडून ते १९५३ मध्ये अहमदाबादस्थित भौतिकी संशोधन प्रयोगशाळेत काम करू लागले. सी. व्ही. रमण यांचे विद्यार्थी के. आर. रामनाथन तसेच विक्रम साराभाई या संस्थेत शिकवत असत. सुरुवातीला अवघे १०० रुपये अनुदान असलेल्या या प्रयोगशाळेने वरील सर्व मंडळींच्या अथक परिश्रमांमुळे प्रगती केली. त्यातूनच १९६२ मध्ये ‘इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रीसर्च’ म्हणजेच ‘इन्कॉस्पर’ ही अंतराळ संशोधन संस्था स्थापन झाली. १९६९ मध्ये तिचे रुपांतर सध्याच्या इस्रोत झाले. प्रा. चिटणीस हे ‘इन्कॉस्पर’चे संस्थापक-कार्यवाह होते. वैश्विक किरण म्हणजेच कॉस्मिक रेज हा त्यांच्या अभ्यासाचा विषय होता. जगप्रसिद्ध ‘मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी’मध्ये त्यांना वरील विषयावर संशोधन करण्यास बोलावण्यात आले होते. त्यांनी ही संधी घेतली, मात्र पुढे साराभाईंनी विचारणा करताच ते भारतात परतले.

हेही वाचा – स्वपक्षातील घराणेशाहीचे काय?

थुम्बा येथील थुम्बा इक्वेटोरियल रॉकेट लॉन्चिंग स्टेशनच्या (टर्ल्स) स्थापनेत (१९६३) त्यांची महत्त्वाची भूमिका होती. तसेच, अब्दुल कलाम यांची अमेरिकेच्या ‘नासा’मध्ये उच्चशिक्षणासाठी शिफारस व निवड प्रा. चिटणीस यांनीच केली होती. अहमदाबादस्थित ‘स्पेस अप्लिकेशन सेंटर’चे (सॅक) ते संचालक होते. २००८-०९ मध्ये ते ‘प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया’चे अध्यक्षही होते. सध्या ते निवृत्त होऊन पुण्यात स्थायिक झाले आहेत.

प्रा. चिटणीसांप्रमाणे प्रा. वसंत गोवारीकर यांचेही अवकाश संशोधन क्षेत्रातील कार्य प्रसिद्ध आहे. माधव ढेकणे हे इस्रोमधून संचालक म्हणून निवृत्त झाले. चंद्रयान-३ मोहिमेवरील त्यांचा छान लेख २४ ऑगस्टच्या ‘लोकसत्ता’ मध्ये प्रसिद्ध झाला होता. मलाही इस्रोत नोकरी मिळाली होती. परंतु, नेमणूक पत्र फार उशिरा आले होते; तत्पूर्वी मला शिष्यवृत्तीसह एका परदेशी विद्यापीठात प्रवेश मिळून व्हिसाची प्रक्रिया सुरू होती. इस्रोत न गेल्याबद्दल कधीकधी खंत वाटते. असो! माहितीतंत्रज्ञान क्षेत्रात, मराठी माणसाची ‘परसिस्टन्ट सिस्टिम्स’ ही कंपनी प्रसिद्ध आहे. या कंपनीचे संस्थापक व प्रमुख आनंद देशपांडे आहेत. अशी काही तुरळक मात्र महत्त्वाची उदाहरणे सापडतात.

मुख्यतः भौगोलिक व अंतराळशास्त्र- संबंधित कारणांमुळे थुम्बा व श्रीहरीकोटा येथे अंतराळ प्रक्षेपण केंद्रे स्थापन झाली. त्याकाळी लोकांमध्ये मर्यादित चलनवलन (मोबिलिटी) होते; त्यामुळे इस्रोमध्ये स्थानिक दाक्षिणात्य लोकांचा मोठ्या प्रमाणात प्रवेश होऊ शकला. साधारण याच कारणाने असे दिसून येते की, इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिटयूट (आयएसआय) कोलकता व आयआयटी खरगपूरमध्ये बहुसंख्य शिक्षक बंगाली आहेत. मी शिकत असताना, सर्व प्रमुख शिक्षण व संशोधन संस्थानमध्ये बंगाली भाषिक शिक्षक व संशोधक फार मोठ्या प्रमाणावर असत. हल्ली ते प्रमाण थोडे कमी झाले असावे, असे वाटते.

हेही वाचा – विखे पाटील साहित्य पुरस्काराची ३३ वर्षं, श्रमाचा आणि मातीचा गंध लाभलेल्या साहित्याचा गौरव

स्वात्रंत्र्यानंतर काही काळ महाराष्ट्र राज्य सर्वच क्षेत्रांमध्ये आघाडीवर होते. स्वातंत्र्यपूर्व काळातील स्वातंत्र्यासाठी, समाज प्रबोधनासाठी व समाज सुधारणेसाठी ज्या चळवळी राज्यात झाल्या होत्या, त्यांनी कमावलेल्या पाथेयावर स्वांतत्र्योत्तर महाराष्ट्राची वाटचाल सुरू झाली, पण त्यात मराठी नेतृत्वाला पुढे फारशी भर घालता आली नाही. सध्यातर विविध राज्यांतील प्रादेशिक नेत्यांमध्ये महत्त्वाकांक्षा वाढत आहे; त्यामुळे उद्योग व रोजगार स्वत:च्या राज्यात खेचून आणण्याची तीव्र स्पर्धा आहे. तसेच, राज्यवार निवडणुकांचा विचार करूनच केंद्र सध्या योजना व प्रकल्प वाटते; त्यामुळे भविष्यात महाराष्ट्राचा वाटा काही प्रमाणात मर्यादितच राहील असे वाटते.

माझ्या मते, ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात चढउतार होत असतात, हे वास्तव कुटुंब, समूह, समाज, संस्कृती व राज्यांनाही लागू पडते. यासाठी अमेरिकेतील एक उदाहरण घेऊया. पोलाद व कोळसा यांना एकेकाळी प्रचंड महत्त्व होते- त्यावेळी पेन्सिल्व्हेनिया, वेस्ट व्हर्जिनिया इ. राज्यांची चलती होती. पण, पुढे हे उद्योग मागे पडले व इतरत्र गेले; त्यामुळे वरील राज्यांच्या विकासावर मोठा परिणाम झाला. तसेच, पेट्रोल व डिझेलवर चालणाऱ्या वाहनांची निर्मिती मिशिगन, ओहायो व इलिनॉय राज्यांमध्ये केली जात असे. त्यावेळी ही राज्ये भरभराटीला आली. आज, वरील उद्योगांचे महत्त्व कमी झाल्याने या राज्यांना अवकळा आली आहे. हेच उदाहरण महाराष्ट्राला लागू पडते. कायम प्रगतीपथावर राहणे कठीण असते. या प्रतिकूलतेवर मात करण्यासाठी विशेष प्रयत्न व नेतृत्वाची गरज आहे; या दोन्ही गोष्टी सध्या दुर्दैवाने दिसत नाहीत.

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why did the marathi man lag behind in space research a review on this ssb