डॉ. रंजन केळकर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यात पुढल्या पाच दिवसांत विजा आणि गडगडाटासह पाऊस होईल” असे ११ एप्रिलच्या इशाऱ्यात नमूद करणाऱ्या भारतीय हवामान खात्याने, “मध्य महाराष्ट्रात १३ आणि १४ एप्रिल रोजी तुरळक गारपीटही होऊ शकते” असे म्हटले आहे. दिवसा एवढा उन्हाळा आणि अंदाज मात्र गारपिटीचा, यात सामान्यजनांना विरोधाभास वाटेल. पण ही कारणे एकमेकांत गुंतलेली आहेत.

जरा आठवून पाहा : लहान मुलांना पावसात भिजायला आणि खेळायला खूप मजा येते… पण त्यांना खरी गंमत वाटते ती जेव्हा आकाशातून गारा पडतात तेव्हा. रिमझिम पाऊस पडत असताना कधी कधी अचानक टपटप आवाज येऊ लागतो. कारण ढगातून पावसाच्या थेंबांऐवजी गारा पडू लागतात. गोट्यांसारखे गोल गुळगुळीत पांढरे खडे जमिनीवरून वेचून मुले त्यांना हातात धरून ठेवायचा प्रयत्न करतात. पण थोड्याच वेळात त्यांचे पाणी होते कारण ते बर्फाचे खडे असतात. तापमान शून्य अंशापेक्षा जास्त असले की, बर्फ वितळतो.

गारांची निर्मिती

गारांच्या निर्मितीमागे तापमान हे एक कारण आहे. आपण आकाशाकडे सहज पाहिले तर आपल्याला विविध प्रकारचे ढग दिसतात. काही पांढरे शुभ्र तर काही काळसर, काही छोटे तर काही विस्तीर्ण. काही ठेंगणे तर काही उंच वाढलेले असतात. जे ढग खाली असतात त्यांच्यात सूक्ष्म जलबिंदू असतात. जे ढग उंच वाढतात त्यांच्या भोवतीच्या हवेचे तापमान शून्याहून कमी असते. अशा थंड वातावरणात पाणी गोठते आणि जलबिंदूंऐवजी हिमकण बनतात. ते अत्यंत कोमल आणि हलके असल्यामुळे ते खाली पडत नाहीत. काही विशिष्ट ढगात ऊर्ध्वाधर वाहणारे प्रवाह किंवा तरंग असतात ज्यांबरोबर हे हिमकण ढगात वरखाली फेकले जातात. प्रत्येकदा त्यांच्यावर बर्फाचा एक थर चढतो, ते मोठे होतात आणि त्यांचे वजन वाढत जाते. शेवटी ते इतके बोजड होतात की, हवा त्यांना पेलू शकत नाही आणि ते जमिनीवर येऊन पडतात. मग त्यांना आपण गारा म्हणतो.

पुष्कळ गारा जमिनीपर्यंत पोहोचतही नाहीत कारण त्या ढगाखालच्या उष्ण हवेत विरघळून गेलेल्या असतात. उलट पुष्कळदा असेही होते की, गारा मोठ्या असतात आणि त्या थंड जमिनीवर बराच वेळ टिकून राहतात. मग जमिनीवर एक पांढरी चादर पसरल्यासारखी दिसते आणि गारपीट झाली असे म्हटले जाते. गारपीट जर सौम्य झाली असेल तर ती जमिनीत ओलावा भरते आणि काही पिकांना फायद्याची ठरते. पण काही वेळा तर गारा आकाराने क्रिकेटच्या चेंडूएवढ्या असतात. अर्थात त्या नुकसान करणारच.

गारपीट कधी आणि कुठे होते?

गारपीट ही काही नित्यनियमाने घडणारी हवामानाची घटना नाही. मान्सूनच्या चार महिन्यांत म्हणजे जून ते सप्टेंबरमध्ये गारपीट होत नाही कारण त्यासाठी जे विशिष्ट प्रकारचे ढग असावे लागतात ते मान्सूनच्या काळात नसतात. गारपिटीच्या घटना बहुतेक फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यांत म्हणजे हिवाळा आणि उन्हाळा यामधील संक्रमणकाळात घडतात. गारपिटीच्या घटना वारंवार होत नाहीत. त्या अगदी बोटावर मोजता येतील इतक्या कमी असतात.

आपल्या देशाच्या उत्तरेकडील राज्ये, म्हणजे जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश, सिक्किम, ही शीत कटिबंधात मोडतात. तेथे हिवाळ्यात तापमान खूप कमी असते आणि तेथे हिमपात होतो. भारताचा उर्वरित प्रदेश उष्ण कटिबंधात मोडतो आणि काही उंच हिल स्टेशन वगळता, त्यावर हिमपात होत नाही, फक्त गारपीट होऊ शकते. त्यातही मध्य भारतातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रावर गारपिटीच्या घटना अधिक होत असतात. याचे कारण हे आहे की, महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती अशी आहे की, आपल्याकडे अरबी समुद्रावरचे आणि बंगालच्या उपसागरावरून दमट वारे वाहतात तसेच कधी उत्तरेकडचे थंड व शुष्क वारेही वाहतात. हे परस्परविरोधी प्रवाह एकमेकांना भिडले तर गारपिटीसाठी अनुकूल असे हवामान निर्माण होते. महाराष्ट्रात यंदा मार्च एप्रिल महिन्यांत अनेक ठिकाणी गारपीट झाली. पण तिला असामान्य म्हणता येणार नाही. मागील अनेक वर्षे महाराष्ट्रावर गारपिटीच्या घटना झालेल्या आहेत आणि त्या भविष्यात होणेही अपेक्षित आहे.

गारपिटीची पूर्वसूचना

गारपीट होते ती एका विशिष्ट प्रकारच्या ढगातून, ज्यातून वादळी पाऊस पडतो, मेघगर्जना होते आणि विजा लखलखतात. हे ढग उंच असतात आणि दूरवरून दिसतात. त्यांचा कालावधी केवळ १-२ तासांचाच असतो. हे ढग स्थानिक असतात. ते एका ठिकाणी उंच वाढतात आणि तेथेच संपुष्टात येतात. तेव्हा त्यांचे पूर्वानुमान बरेच दिवस आधी करता येत नाही. असे असले तरी गारपिटीसाठी पोषक किंवा अनुकूल वातावरण निर्माण होईल हे ३-४ दिवस आधी सांगता येते. अशा महितीचा योग्य उपयोग करून घेणे गरजेचे आहे. कोणत्याही आपत्तीची आगाऊ सूचना मिळाली तर माणसांना सुरक्षित स्थळी घेऊन जाता येते. मात्र सूचना मिळूनसुद्धा पिकांची तशी हलवाहलवी करणे शक्य नसते. म्हणून गारपिटीचा सर्वात जास्त तडाखा शेतात उभ्या असलेल्या पिकांना बसतो. पिकांचा, विशेषतः कापणी जवळ आलेल्या पिकांना गारपिटीपासून कसे वाचवता येईल आणि त्यासाठी काय उपाययोजना करता येईल यावर विचार व्हायला हवा.

( लेखक ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ असून हवामान-भौतिकीचे प्राध्यापक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. लोकांपर्यंत हवामानशास्त्र सोप्या शब्दांत पोहोचावे, यासाठी ते कार्यरत असतात. )

r.r.kelkar@gmail.com

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why does hailstorm happen in summer asj