प्रमोद मुनघाटे
महात्मा गांधींची दीडशेवी जयंती २०१९ या वर्षी होती; त्यानिमित्त जगभर गांधींवर नवी पुस्तके प्रसिद्ध झाली. एकविसाव्या शतकातील नव-भांडवलशाही आणि नव-साम्राज्यवादाच्या पार्श्वभूमीवर ‘गांधी’ किती औचित्यपूर्ण आहे, याचा शोध या पुस्तकातून घेतला गेला. मराठीतही डझनभर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. गांधींचे तत्त्वज्ञान, त्यांची आंदोलने, भारतातील राजकारणातील त्यांचे स्थान, त्यांचे विरोधक, गांधी हत्येचे कट-कारस्थान या विषयांचा ऊहापोह, हा बहुतेक पुस्तकांचा विषय होता. चंद्रकांत वानखडे यांच्या ‘गांधी का मरत नाही’ हे पुस्तक मात्र यापैकी वेगळे ठरले. २०२२ मध्ये या पुस्तकाचे कल्पना शास्त्री यांनी केलेले हिंदी भाषांतर ‘राजकमल’ने प्रसिद्ध केले. पारोमिता गोस्वामी यांनी केलेले इंग्रजीत भाषांतर ‘व्हाय गांधी इज इम्मॉर्टल’ या नावाने नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. पारोमिता गोस्वामी या महाराष्ट्रातील सामाजिक चळवळीतील एक प्रमुख कार्यकर्त्या आहेत.

गांधीहत्येचा प्रभाव गेली कित्येक दशके भारतीय समाजमनावर आणि राजकारणावर आहे. त्यामुळे गांधीहत्येच्या संदर्भात बरीच पुस्तकेही लिहिली गेली. वानखडे यांच्या या पुस्तकात गांधींच्या हत्येमागील राजकीय कारणे, कटाचा तपशील किंवा खून खटल्याचा इतिहास या गोष्टींची चर्चा नाही; तर गांधीहत्येचे सांस्कृतिक आकलन मांडण्याचा प्रयत्न आहे. वानखडे हे इतिहासाचे अभ्यासक किंवा राजकीय विश्लेषक नाहीत. ते दीर्घकाळ सामाजिक चळवळीत कार्यरत असलेले कार्यकर्ते आहेत. त्यामुळे त्यांची शैली निबंधकार किंवा पत्रकाराची नाही. गांधी चरित्रातील काही दुवे शोधून त्या आधारे ते एक गृहीतक सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. ‘गांधींच्या हत्येचे मूळ हे सांस्कृतिक व विशेषत: जातीय वर्चस्ववादाच्या संघर्षात आहे’, हे या पुस्तकातील त्यांचे गृहीतक आहे. गांधींपूर्वीचा भारत, टिळकांचे निधन, स्वातंत्र्याच्या चळवळीची सूत्रे हाती घेतल्यावर गांधींचे ‘महात्मा’ होणे, त्यांच्या चळवळीतील अडथळे, त्यांना होणारा विरोध, जातीयता-धर्मांधता, मुस्लीम अनुनय या मुद्द्यांवर त्यांच्यावर झालेली टीका आणि त्यातून तावूनसुलाखून निघालेले गांधींचे नायकत्व अशा १५ प्रकरणांतून गांधींच्या हत्येमागील जातीय सूत्र शोधण्याचा यशस्वी प्रयत्न करणारे हे पुस्तक आहे.

Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Dabbawala, Dabbawala backs Uddhav Thackeray,
मुंबईचे डबेवाले शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) पाठीशी
Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?
maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
maha vikas aghadi releases manifesto for maharashtra assembly poll 2024
महिला, शेतकऱ्यांवर आश्वासनांची खैरात; मविआचा ‘महाराष्ट्रनामा’ जाहीर
Kharge slams Modi for ignoring dalit leaders in cabinet
मतांसाठीच दलित, आदिवासी हिताची भाषा ; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा आरोप
crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?

गांधींची हत्या नथुराम गोडसेच्या पिस्तुलाच्या गोळीने झाली, हे प्रत्यक्ष वास्तव आहे. पण या घटनेमागील अप्रत्यक्ष वास्तव मात्र वेगळे आहे. गांधी फाळणीला जबाबदार होते किंवा ते मुस्लीमधार्जिणे होते म्हणून त्यांची हत्या झाली, हे कारण लेखकाला पुरेसे वाटत नाही. ‘गोडसे’ हे भारतातील जातिव्यवस्थेच्या साखळीतील एक प्रतीक आहे. त्यामागे गांधींना विरोध करणाऱ्या व्यापक व हिंदुत्ववादी गटाचा सामूहिक गांधीद्वेष कसा आहे, याचा शोध वानखडे घेतात. तो घेताना गांधींच्या भारतीय राजकारणातील सहभागाची नव्याने मांडणी करतात. गांधींनी आपल्या आचरणातून सिद्ध केलेल्या सत्य-अहिंसा, सत्याग्रह, धार्मिकता, जातिव्यवस्थेच्या संदर्भातील त्यांची भूमिका यांची चिकित्सा करतात.

ही चिकित्सा निव्वळ वैचारिक पातळीवर न करता ते गांधींच्या आयुष्यातील अनेक प्रसंगांचा-घटनांचा आधार घेत करतात. भारतीयांच्या मनातील गांधींचे नायकत्व आणि त्यांच्या विरोधकांच्या आणि त्यांच्या हत्येला जबाबदार असलेल्या वर्गाच्या मनातील त्यांचे खल नायकत्व ते वेगवेगळे मुद्दे घेऊन उलगडून दाखवतात.

‘गांधीपूर्व भारत’ या पहिल्याच प्रकरणात पुण्यातील एका विद्वानाचे विधान लेखक उद्धृत करतो : ‘ज्या अर्थी चित्तपावन ब्राह्मणांच्या हातून ब्रिटिशांनी सत्ता मिळविली असेल, तर तर ती सत्ता चित्तपावन ब्राह्मणांनीच परत मिळविली पाहिजे वा भोगली पाहिजे’. ‘शेतकऱ्यांनी विधिमंडळात जाऊन काय नांगर धरावयाचा आहे?’ असा प्रश्न लोकमान्य टिळकांनीही विचारला होता. ‘‘एकूणच स्वातंत्र्य कोणासाठी? वर्चस्व कोणाचे? तर जन्मजात आधारावर ज्यांना ‘जन्मजात’ श्रेष्ठत्व मिळाले आहे त्यांचे, वा ‘अभिजनांचे’. मग बहुजनांचे काय? ‘शेवटच्या’ माणसाचे काय? याची चर्चादेखील स्वातंत्र्याच्या चळवळीत गांधीपूर्व काळात नव्हती.’’ – असा निष्कर्ष लेखकाने यावरून काढला आहे.

टिळकांच्या मृत्यूनंतर गांधी स्वातंत्र्य चळवळीचे सूत्र हाती घेतात तेव्हा पहिल्या प्रथम या ‘अभिजन-बहुजन’ वादाला छेद दिला जातो. स्वातंत्र्य हे शेवटच्या माणसासाठी आहे, ही भूमिका गांधी घेतात आणि स्वातंत्र्य आंदोलनात सर्व जातीधर्मांचा, स्त्री-पुरुषांचा आणि सामान्य कष्टकरी-शेतकऱ्यांचा सहभाग ते मिळवतात. यामुळे टिळकांच्या प्रभावळीतील बुद्धिवंतांच्या भूमिकेला कसा तडा जातो, ते वानखडे पटवून देतात. टिळकांच्या वर्णीय भूमिकेवर ते कठोर टीका करतात. या पार्श्वभूमीवर गांधींचा भारताच्या राजकारणातील प्रवेशच मुळात सामान्य लोकांच्या सहभागाच्या आग्रहाने कसा झाला आहे, ते नोंदवून ‘आधी राजकीय की आधी सामाजिक स्वातंत्र्य?’ हा संघर्ष मुळात अभिजन विरुद्ध बहुजन असा होता, असा निष्कर्ष काढतात. गांधींच्या पूर्वीचे राजकारण मुंबई, कलकत्ता व मद्राससारख्या महानगरात एकवटलेले असताना गांधी चंपारणसारख्या मागास भागापासून आपल्या आंदोलनाची सुरुवात करून अभिजनवादाला धक्का देतात. गांधींच्या प्रभावामुळेच १९१६च्या लखनौ अधिवेशनात प्रथमच शेतकऱ्यांच्या तोंडून त्यांचे दु:ख येते, अशी ते मांडणी करतात. थोडक्यात भारतीय स्वातंत्र्याच्या राजकारणातील गांधीच्या अशा हस्तक्षेपामुळे तेव्हापासूनच गांधी काही समूहाच्या डोळ्यात काट्यासारखे सलत राहिले असल्यास नवल नाही. टिळक अस्पृश्यता निवारण परिषदेच्या जाहीरनाम्यावर सही करीत नाहीत; तर दुसरीकडे गांधी आपल्या आश्रमात आपल्या अनुयायांच्या विरोधाची पर्वा न करता अस्पृश्य जोडप्याला प्रवेश देतात. थोडक्यात तत्कालीन अनेक घटनांचा आधार घेऊन अभिजन विरुद्ध बहुजन या संघर्षाचेच पर्यवसान म्हणजे गांधीहत्या असे वानखडे ठामपणे मांडतात आणि गांधीहत्येच्या कटाचे स्वरूप केवळ सांस्कृतिक व धार्मिकच नव्हते तर ते जातीय कसे होते, याचे ठाम प्रतिपादन करतात.

गोडसेच्या गोळ्यांनी गांधींची हत्या झाली असली तरी आजही भारतात गांधीहत्येच्या कटातील सांस्कृतिक व धार्मिक सूत्रे जिवंत आहेत. देहाने संपवून गांधी संपविताच आला नाही, ही विरोधकांची समस्या आहे. गांधींच्या ‘अहिंसा’ आणि ‘सत्याग्रह’ या संकल्पना जीवनाच्या सम्यकतेचे स्वरूप आहे. म्हणून गांधी जीवनाचे राजकीय, सामाजिक किंवा आध्यात्मिक अशी विभागणी करीत नाहीत. म्हणूनच गांधी आजही संपूर्ण जगात अधिकाधिक औचित्यपूर्ण ठरत आहे. गांधीहत्येवर गांधी विचारांनी मिळवलेला हा विजय आहे. पण आपल्या जात-धर्म विशिष्ट राष्ट्रवादाच्या आड येतात म्हणून आजही भारतात गांधींच्या बदनामीची मोहीम विरोधक सुरू ठेवतात, असा सप्रमाण आरोप वानखडे या पुस्तकात करतात.

गांधी आणि आंबेडकर

महाराष्ट्राच्या विचारविश्वात ‘गांधी आणि आंबेडकर’ हे एक ध्रुवीकरण सातत्याने दिसते. गांधींचे स्वत:ला सनातनी हिंदू म्हणवणे, चातुर्वण्यावर विश्वास असल्याचे सांगणे आणि दलितांच्या विभक्त मतदारसंघाला विरोध असणे यावरून गांधी आणि आंबेडकर यांच्यात जाणीवपूर्वक विरोध निर्माण केला गेला असे वानखडे म्हणतात. गांधींचे आंबेडकर यांना समजून घेणे आणि त्याची आंबेडकरांना जाणीव असणे हे अनेक प्रसंगातून वानखडे अधोरेखित करतात. गांधींच्या धर्म आणि अध्यात्माची अडचण पुरोगामी, डाव्या चळवळीतल्यांना जशी होत असते, त्यापेक्षाही ती हिंदुत्ववाद्यांना अधिक होत राहते. गांधी स्वत:ला सनातनी हिंदू मानत असले तरी हिंदुत्वाच्या कोणत्याही खुणा बाळगायला नकार दिला. त्यांच्या आयुष्यात ‘राम’ दिसतो पण रामाचे मंदिर, रामाची मूर्ती, पूजा अर्चा किंवा रामाचा साधा फोटोही दिसत नाही. गांधी वेदप्रामाण्य मानत नाही आणि शंकराचार्यांनी केलेल्या हिंदू धर्माच्या व्याख्येलाही नाकारतात. विवेकाला आणि बुद्धीला जे पटणार नाही अशा गोष्टी ते स्वत:वर बंधनकारक मानत नाही; आणि देशातील प्रत्येकाला आपण पोटभर अन्न व अंगभर वस्त्र देऊ शकत नाही, तोपर्यंत त्यांच्या दृष्टीने धर्माला काही अर्थ उरत नाही, अशी भूमिका घेतात, याही मुद्द्यांची अत्यंत सूत्रबद्ध नोंद लेखकाने केली आहे आणि इंग्रजी अनुवादात ती यथातथ्य उतरली आहे.

Pramodmunghate304@gmail. com