नानासाहेब थोरात
गेली अनेक वर्षे ‘ब्रेन ड्रेन’ची चर्चा होते आहे. परदेशात जाऊन शिक्षण घेण्याची आणि तिथेच स्थायिक होण्याची भारतीय विद्यार्थ्यांना एवढी आस का आहे? मागील आठवड्यात आलेला ‘डंकी’ हा सिनेमा आणि त्यानंतर दुबईतून अवैध मार्गाने अमेरिकेला जाणारे आणि फ्रान्समध्ये अडकलेले अवैध भारतीय स्थलांतरित या दोन वेगवेगळ्या, पण एकमेकांत गुंतलेल्या घटनांमुळे अवैध स्थलांतर हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. डंकी सिनेमामध्ये दाखवल्याप्रमाणे एखाद्या देशात वैधरीत्या स्थलांतरित होण्याचा सोपा मार्ग म्हणजे त्या देशात शिक्षणासाठी जाणे आणि पुढे तेथेच नोकरी करणे. इतर वैध-अवैध मार्ग आहेत, पण परदेशी शिक्षण हा मार्ग तुलनेने सरळ आहे.
२०२२ मध्ये अंदाजे १८ लाख भारतीय विद्यार्थ्यांनी परदेशी विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी देश सोडला. यामध्ये सर्वाधिक पसंती अमेरिकेला असून, त्यानंतर इंग्लंड, कॅनडा, ऑस्ट्रेलिया या इंग्रजी भाषिक देशांचा क्रम लागतो, तर जर्मनी, फ्रान्स, नेदरलँड, रशिया अशा इतर भाषीय देशांतसुद्धा लाखो विद्यार्थी शिक्षणासाठी जात आहेत. भारतीयांचा विचार केला, तर गुजरात, पंजाब, आंध्र प्रदेश, तमिळनाडू या राज्यांतील विद्यार्थी परदेशी शिक्षणाला प्राधान्य देतात. गुजराती आणि दक्षिण भारतीय विद्यार्थी अमेरिकेला प्राधान्य देतात, तर पंजाबी विद्यार्थी कॅनडाला. मराठी मुलांचा टक्का यामध्ये कमी असला तरी, गेल्या पाच वर्षांत तो वाढत चालला आहे.
हेही वाचा : पदवी आहे, संधी आहेत, तरीही वाणिज्यचे विद्यार्थी बेरोजगार राहतात, कारण…
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या माहितीनुसार, परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या मुलांकडून मोठ्या प्रमाणात शैक्षणिक कर्जाची मागणी होत असून, तो आकडा काही वर्षांपूर्वी एक लाख कोटींवर गेला आहे. ब्रिटिश सरकारच्या आकडेवारीनुसार, सन २०२२ मध्ये सुमारे एक लाख २५ हजार भारतीय विद्यार्थी ब्रिटिश विद्यापीठांत शिक्षणासाठी आले आहेत. एका वर्षात एक विद्यार्थी कमीत कमी ३० आणि जास्तीत जास्त ५० लाखांपर्यंत या देशांमध्ये फीसाठीचा आणि राहण्यासाठीचा खर्च करतो. पूर्वी फक्त एक वर्षाची पदव्युत्तर पदवी मिळवण्यासाठी विद्यार्थी जायचे, पण कोविडनंतर तीन ते चार वर्षांची पदवी मिळवण्यासाठीही विद्यार्थी या देशांत जायला लागले आहेत.
परदेशी शिक्षणासाठी जाण्यामध्ये सरकारी संस्थांमधील विद्यार्थी अग्रेसर आहेत. यामध्ये आयआयटीमधील पदवीधर सर्वांत पुढे आहेत. त्यानंतर दक्षिण भारतातील खासगी आणि अभिमत विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा क्रमांक लागतो. याउलट गुजरात आणि पंजाबमधून छोट्या कॉलेजमधील विद्यार्थीही परदेशी शिक्षणासाठी पर्यटन करताना दिसून येतात. सर्वांत जास्त इंजिनीअरिंग, त्यानंतर बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनचे उच्च शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी परदेशी विद्यापीठांना पसंती देतात.
हेही वाचा : ही रुजविलेली अन्यायग्रस्तता तर नव्हे?
परदेशी विद्यापीठांतील पदवीला भारतात असलेल्या ग्लॅमरमुळे हे विद्यार्थी परदेशी जातात. हे त्यामागचे सर्वाधिक महत्त्वाचे कारण आहे. फक्त एक वर्षाची पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतरही नोकरीच्या असणाऱ्या संधी हे दुसरे महत्त्वाचे कारण, परदेशातील सरळ-सुरळीत आयुष्याचे स्वप्न, कामाच्या ठिकाणी असणारे वातावरण आणि त्याबद्दल इतरांकडून ऐकलेले किस्से यामुळे तरुण वयातच परदेशी शिक्षणाला जाण्याचे प्रमाण वाढत आहे. नावाजलेल्या परदेशी विद्यापीठांत असणारी शिक्षणाची गुणवत्ता, विद्यापीठांमधील संशोधनाचे वातावरण, उच्च गुणवत्तेच्या तरुण आणि वयस्क प्राध्यापकांचा योग्य मेळ यामुळे ही विद्यापीठे तरुणांना खुणावतात. अनेक परदेशी विद्यापीठांमध्ये उद्योग आणि नोकरीसाठी लागणारे कौशल्याधारित शिक्षण, उच्च प्रतीच्या प्रयोगशाळा, संशोधनात रुची असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी निर्माण केलेल्या संधी, यांमुळे ही विद्यापीठे आपल्या पारंपरिक सरकारी आणि खासगी विद्यापीठांपेक्षा सरस ठरतात. फक्त हुशार मुलेच परदेशी शिक्षणासाठी जातात असे नाही. धनदांडगे पालक आपल्या कमी गुणवत्ता असलेल्या मुलांनासुद्धा कमी दर्जाच्याच परदेशी विद्यापीठांत पाठवतात. उदाहरण द्यायचे, तर इंग्लंडमधील ऑक्स्फर्ड शहरात ऑक्स्फर्डच्या नावाने दोन विद्यापीठे आहेत. एक हजार वर्षांपूर्वीचे मूळ ऑक्स्फर्ड विद्यापीठ, जिथे प्रवेश मिळवण्यासाठी जगभरातून हजारो मुले प्रयत्न करतात. तर याच शहरात ऑक्स्फर्ड ब्रुक नावाचे दुसरे एक विद्यापीठ आहे जिथे कमी गुणवत्तेच्या मुलांना सहजच प्रवेश मिळतो आणि त्या विद्यापीठाच्या डिग्रीवर नोकरीही मिळत नाही. तरीसुद्धा श्रीमंत भारतीय आणि चिनी मुलांचा भरणा या विद्यापीठांत असतो, कारण त्यांच्या डिग्रीवर ऑक्स्फर्ड नाव येते म्हणून. अशी अनेक विद्यापीठे अमेरिका, कॅनडा, जर्मनीमध्येसुद्धा आहेत.
हेही वाचा : आपण सावित्रीबाईंचा वसा पुढे नेणार का?
तसेच परदेशात डिग्री घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला नोकरी मिळतेच असे नाही. अनेक जण कंटाळून माघारी येतात. कित्येक जण डंकी सिनेमासारखे फसवलेही जातात. भारतात असताना परदेशी विद्यापीठांबद्दल आणि एकंदरीतच तिथल्या परिस्थितीबद्दल जी स्वप्ने दाखवलेली असतात, तेवढ्या दर्जाची परिस्थिती नसेल ते पाहून अनेकांचा भ्रमनिरास होतो. ती मुले माघारी येतात. पण एकंदरीत शिक्षण घेऊन परदेशातच स्थायिक व्हायचे किंवा पुढची काही वर्षे नोकरी करायची हे किमान ९० टक्के मुलांचे स्वप्न असते. जागतिक परिस्थितीचा विचार केला, तर चीनमधून सर्वांत जास्त विद्यार्थी शिक्षणासाठी युरोप-अमेरिकेत येतात. त्यानंतर भारतीय, अरब देशांतील मुले आणि सर्वांत शेवटी श्रीमंत आफ्रिकी मुले. जपान, कोरिया या देशांतील मुलांचे प्रमाण खूप कमी असते. अनेक वर्षांपासून भारतात ‘ब्रेन ड्रेन’ म्हणजेच चांगल्या जीवन पद्धतीसाठी सुशिक्षित लोकांचे स्थलांतर यावर चर्चा होत आहेत. पण समजा ‘ब्रेन ड्रेन’मुळे भारतीय विद्यार्थ्यांनी परदेशी शिक्षणासाठी जायचे थांबवले, तर ती जागा इतर देशांतील विद्यार्थी भरून काढतील. चीन, व्हिएतनाम, फिलिपाइन्स, श्रीलंका, पाकिस्तान या आशियाई देशांबरोबरच घाना, दक्षिण आफ्रिका, नायजेरिया, इथिओपिया, अल्जेरिया या देशांतील विद्यार्थी भारतीयांच्या जागा मिळवतील. आफ्रिकेपेक्षा भारतात उच्च दर्जाचे शिक्षण असूनसुद्धा इंग्लंड-जर्मनी-अमेरिकेमध्ये आफ्रिकेतील विद्यार्थ्याने एक वर्षाची डिग्री घेतली, तरी या देशातील कंपन्या नोकरी देताना आफ्रिकी मुलांनाच प्राधान्य देतील. कारण त्या देशातील डिग्री घेतल्यानंतर व्हिसा, वर्क परमिट अशा अनेक गुंतागुंतीच्या प्रक्रियांतून या मुलांना सवलत मिळते आणि कंपन्यांना तेच हवे असते. त्यामुळे हळूहळू या देशांतील नोकरीमधील भारतीयांचा टक्का कमी होत जाईल. त्यामुळे एवढ्या सहजासहजी परदेशी शिक्षणाला जाण्याचा ओढा कमी होईल असे होणार नाही; उलट दर वर्षी यामध्ये किमान ३० ते ४० टक्के वाढ होताना दिसून येत आहे.
भारतातच जागतिक दर्जाची विद्यापीठे उभी राहिली, तर हे प्रमाण लगेचच कमी होणार नाही. दिल्लीजवळ २०१४ मध्ये स्थापन झालेल्या अशोका विद्यापीठाने हा प्रयोग करून पाहिला आहे, पण तोसुद्धा फार यशस्वी होताना दिसून येत नाही. चांगल्या प्रयोगशाळा, जगातील अनेक भारतीयांना प्राध्यापक म्हणून संधी, तसेच महागडी फी यामुळे हे विद्यापीठ काही प्रमाणात वेगळे वाटते; पण जागतिक विद्यापीठांसारखी वातावरणनिर्मिती करण्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे अनेक विद्यार्थी येथील डिग्री घेऊन पुन्हा परदेशी विद्यापीठांची वाट धरत आहेत, पण भारतामध्ये असे प्रयॊग व्हायला लागलेत हेसुद्धा प्रशंसनीय आहे. पुढील काही वर्षांत याच धर्तीवर अनेक खासगी विद्यापीठे उभी राहतील यात शंका नाही. त्याच जोडीला येऊ घातलेल्या काही परदेशी विद्यापीठांमुळे भारतीय विद्यापीठांत आमूलाग्र बदल होईल, शैक्षणिक वातावरण अधिक स्पर्धात्मक होईल; पण यामुळे परदेशी शिक्षणाला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्यात फरक पडेलच असे नाही.
हेही वाचा : धार्मिक उत्सव जरूर असावेत… पण त्यात सरकार कसे सहभागी होऊ शकते?
शिक्षणानंतर लगेच असणाऱ्या नोकरीच्या संधी, शिक्षणादरम्यान संशोधन आणि कौशल्याधारित विद्यापीठांतील वातावरण, नोकरीच्या ठिकाणी गुणवत्ताआधारित प्रमोशन आणि कुटुंबासाठी असणारे सामाजिक वातावरण या चतुःसूत्रीमुळेच लाखो विद्यार्थी परदेशी शिक्षणासाठी जातात आणि आपल्याला यावरच सर्वाधिक लक्ष केंद्रित करावे लागेल.