के. चंद्रकांत
कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी जाहीर झाला, पण ‘हा जनतेचा कौल आहे, तो मान्य करावाच लागेल’ अशा छापाच्या प्रतिक्रिया काँग्रेसच्या नेते तर दोन दिवस आधीपासूनच देऊ लागले होते. समाजमाध्यमांवरही काँग्रेसच्या समर्थकांची भाषा जणू आपलेच राज्य आल्यासारखी होती. एग्झिट पोल हे अखेर अंदाज असतात, हे वारंवार सिद्ध होऊनसुद्धा, सिद्धरामय्यांचे कर्नाटकी समर्थक एग्झिट पोललाच निकाल मानू लागले होते… त्यांनी जर उत्तराखंड, पंजाब, यांसारख्या राज्यातल्या मतदानोत्तर पाहण्यांचे – अर्थात एग्झिट पोलचे- आकडे पाहिले असते तर?
उत्तराखंडात भाजपविरोधी लाट असल्याचा बोलबाला २०२२ मध्ये झाला होता. वारंवार मुख्यमंत्री बदलण्याची पाळी भाजपवर तेथे आली होती. मात्र भाजपला ७० सदस्यांच्या उत्तराखंड विधानसभेत ३६ ते ४६ जागा मिळतील असे ‘इंडिया टुडे- माय ॲक्सिस’ ने म्हटले होते. अन्य पाहण्यांपैकी ‘एबीपी- सीव्होटर’ने भाजपला फार तर ३२ आणि काँग्रेसला मात्र ३२ ते ३८ जागा मिळणार असल्याचे भाकीत केले. ‘रिपब्लिक – पी मार्क’च्या पाहणीनेही काँग्रेसला ३३ ते ३८ जागा, तर भाजपला फार तर ३४ जागा मिळणार असेच म्हटले होते. तर ‘भाजप ३७, काँग्रेस ३१’ अशी स्थिती ‘टाइम्स नाऊ-व्हेटो’च्या पाहणीने दाखवली होती.एकट्या ‘न्यूज २४- टुडेज चाणक्य’ पाहणीने भाजपला ४३ जागा मिळून काँग्रेसला २४ जागांवर समाधान मानावे लागेल, असे म्हटले होते. प्रत्यक्ष निकाल लागले तेव्हा भाजपने ४७ जागा मिळवल्या, तर काँग्रेस २० जागांवर राहिली.
आणखी वाचा-आरक्षणाची मागणी, हेच अपयश!
थोडक्यात, भाजपला जास्त जागांचे अंदाज ‘इंडिया टुडे- माय ॲक्सिस’ आणि ‘न्यूज २४- टुडेज चाणक्य’ यांनीच उत्तराखंडसाठी व्यक्त केले. याच दोन मतदानपूर्व पाहण्यांनी, उत्तर प्रदेश विधानसभेत भाजपला २८८ ते ३२६ जागा (इंडिया टुडे- माय ॲक्सिस) किंवा २९४ जागा (न्यूज २४- टुडेज चाणक्य) मिळणार असल्याचे म्हटले होते. ‘एबीपी- सीव्होटर’ने भाजपला २२८ ते २४४, ‘टाइम्स नाऊ-व्हेटो’ने भाजपला २२५, तर ‘रिपब्लिक – पी मार्क’ने भाजपला २४० जागांचा अंदाज वर्तवला होता. प्रत्यक्षात भाजपने स्वबळावर २५५ जागा जिंकल्याच, शिवाय अनुप्रिया पटेल यांच्या ‘अपना दल (सोनेलाल गट)’ या भाजपच्या मित्रपक्षाने १२ जागा मिळवल्यामुळे ४०३ सदस्यांच्या उत्तर प्रदेश विधानसभेत भाजप निर्विवाद बहुमताच्या कितीतरी पुढे पोहोचला. अर्थात, भाजपला साधारण २४४ जागा मिळण्याचा अंदाज अनेक पाहण्यांनी वर्तवलाच होता. परंतु मायावतींच्या बहुजन समाज पक्षाने मात्र उत्तर प्रदेशात, या साऱ्याच पाहण्यांचा अपेक्षाभंग केला. या पक्षाला १४ ते १७ जागा मिळण्याचा अंदाज ‘इंडिया टुडे- माय ॲक्सिस’ आणि ‘न्यूज २४- टुडेज चाणक्य’खेरीज अन्य सर्व चाचण्यांतून व्यक्त होत होता. प्रत्यक्षात बसपने मिळवली अवघी एक जागा! त्या मानाने समाजवादी पक्ष – ज्याला ‘इंडिया टुडे- माय ॲक्सिस’ ने ७१ ते १०१ जागा, तर ‘एबीपी- सीव्होटर’ने १३२ ते १४८ जागा मिळतील असे म्हटले होते- त्याने १११ जागांवर स्थिरावून मतदानोत्तर पाहण्यांच्या अंदाजांची सरासरी तरी खरी ठरवली.
या दोन्ही राज्यांत सत्तापालट झाला नाही, पंजाबात तो झाला. ‘आप’ला एकट्याच्या बळावर ९२ जागा मिळतील असा अंदाज मात्र पाचपैकी चारच पाहणी-संस्थांना आला होता. ‘इंडिया टुडे- माय ॲक्सिस’ने फारतर ९०, ‘एबीपी- सीव्होटर’ ने जास्तीत जास्त ६१, ‘रिपब्लिक – पी मार्क’ तसेच ‘टाइम्स नाऊ-व्हेटो’ने ७० अशा संख्येने जागा ‘आप’साठी वर्तवल्या होत्या. केवळ ‘न्यूज २४- टुडेज चाणक्य’ या एकाच पाहणीत ‘आप’ला ८९ ते ११ जागा दिसत होत्या. ‘न्यूज २४- टुडेज चाणक्य’चा अंदाज आपच्या हवेचा वेध घेण्यात अधिक कार्यक्षम ठरला. मावळते सत्ताधारी शिरोमणी अकाली दल या अंदाजांच्या सरासरीनुसार सात ते दहा जागा मिळवू शकले असते. तेही अवघ्या तीनच जागा जिंकणाऱ्या या पंजाबी पक्षाला शक्य झाले नाही.
आणखी वाचा- समाजात काय आहे… काय असायला हवे आहे ?
सत्तापालटाचा अंदाज खोटा ठरला पश्चिम बंगालमध्ये. सन २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत या राज्यामध्ये भाजपला किमान १०५ तरी जागा मिळणारच, असे झाडून सर्वच्या सर्व – पाचही मतदानोत्तर पाहण्यांचे अंदाज सांगत होते. ‘रिपब्लिक टीव्ही- सीएनएक्स’ च्या अंदाजांनुसार तर ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला जास्तीत जास्त १३८ जागा, पण भाजपला कमीत कमी १३८ ते जास्तीत जास्त १४८ जागा, असे चित्र उभे राहात होते. अन्य पाहण्यांनी १६२ ते १७४ जागा देऊ केल्या होत्या… प्रत्यक्षात तृणमूल काँग्रेसने स्वबळावर जिंकलेल्या जागा होत्या तब्बल २१३!
यातून कुणा एका पाहणी -संस्थेचे निष्कर्षच कसे खरे ठरतात, हे पाहण्याचा प्रयत्नही वाचकांनी करू नये. काही पाहण्यांमध्ये कल किंवा हवेचा अंदाज अधिक प्रमाणात घेतला जातो, तर काही पाहण्यांमध्ये अन्य पक्षांच्या आव्हानाला पुरेसे महत्त्व दिले जाते आणि खरोखरीच या अन्य पक्षांच्या मतांची टक्केवारी त्या- त्या निवडणुकीत वाढलेली देखील असते. परंतु ‘जास्त संख्येने मते तो विजयी’ या तत्त्वामुळे आणि मतांची फाटाफूट झाल्यास हे अन्य पक्ष कमी जागा मिळवून साऱ्याच पाहण्यांचा अपेक्षाभंग करतात.
कर्नाटकात बहुतेक पाहण्यांनी ‘हवे’ला महत्त्व दिले, हे उघड आहे. असो.