गेल्या काही दिवसांपासून समाज माध्यमांवर हिमांशू मिश्रा या जेईई परीक्षा चांगल्या गुणांनी पास झालेल्या तरुणाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यामागचं कारणही तसंच आहे. हिमांशू हा महादेव बेटींग ॲप आणि ऑनलाईन गेमच्या इतक्या आहारी गेला होता की वयाच्या २२ व्या वर्षी त्याच्यावर ९६ लाखांपेक्षा जास्त कर्ज झालं. त्याच्या या ऑनलाईन गेमच्या व्यसनापायी त्याच्या घरच्यांनी त्याच्याशी नातं तोडून टाकलं. त्याच्या वडिलांचं निधन झालं तर त्याला वडिलांचं अंत्यदर्शनही घेता आलं नाही. त्याच्या आईने त्याच्या या गोष्टीला कंटाळून त्याच्याशी आपलं कसलंही नातं नाही, असं जाहीर केलं आहे. ‘मी रस्त्यावर मरून पडलो तरी घरचे मला बघायला येणार नाहीत’ असंदेखील तो म्हणत आहे.

हिमांशूच्या प्रकरणावरून नेटिझन्समध्ये दोन गट पडले आहेत. एका गटाचे म्हणणे आहे की हिमांशू खोटंनाटं सांगून सहानुभूती मिळवून लोकांकडून पैसे उकळतो. तर काहीजण त्याच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करत आहेत. पण हे प्रकरण खोटं असो किंवा खरं, पण हा व्हिडिओ व्हायरल झाला त्याखाली ज्या अनेक टिप्प्ण्या होत्या, त्या जास्त महत्त्वाच्या आहेत. कारण त्यात आपणही अशा पद्धतीने ऑनलाइल गेमिंगमधून पैसे हरल्याचे उल्लेख होते. माझे ८० हजार गेले, १२ लाख गेले, १५ लाखांना डुबलो आहे, असं तिथं लोकानी सांगितलं आहे. यावरून हे समजतं की हिमांशूचं प्रकरण खोटं असो वा खरं पण ऑनलाईन गेमिंग, गॅम्बलिंगच्या आहारी जाऊन बरीच तरुणाई फसली चालली आहे.

आणखी वाचा-आजच्या राजकारणात आहे फक्त स्वार्थ… त्यात समाजकारण कुठे आहे?

ऑनलाईन गेममध्ये व्यक्ती अडकते कशी?

आज सगळ्यांकडे मोबाईल आणि इंटरनेट असतं. त्यात या ऑनलाईन गेमिंग, गॅम्बलिंगच्या जाहिरातीही झळकतात. त्या जाहिरातींमधून एखाद्या सेलिब्रिटीचा चेहरा दाखवला जातो आणि ते म्हणतात की मी ५० रु, १०० रु लावले आणि ५० हजार जिंकले, १ लाख जिंकले, १० लाख जिंकले. काही जाहिरातींमध्ये हा आकडा यापेक्षाही मोठा दाखवला जातो. म्हणजे मी सुरुवातीला १०० रु. ने खेळलो आणि एक कोटी जिंकले. तरुण पिढी अशा जाहिरातींकडे साहजिकच आकर्षली जाते. हल्ली समाज माध्यमांवरचे इतर लोकांचे चमकूपणा करणारे रील, व्हिडिओ पाहून आपलाही असाच रुबाब असावा असा विचार तरुणांच्या मनात घोळत असतो किंवा त्याचं त्यांना आकर्षण असतं. पण पुरेसे पैसे नसल्याने ते शौक पूर्ण करता येत नाहीत. मग अशा जाहिराती पाहून कमी वेळात झटपट पैसे कमवण्याचा मोह होतो.

युट्यूबवरही असे अनेक व्हिडिओज आहेत ज्यामध्ये गेमिंग चॅनल चालवणारे युट्यूबर सर्रास सांगतात की ऑनलाईन गेम खेळून मी महिन्याला इतके कमवले. त्या पैशातून लक्झरी गाडी घेतली, परदेशीच फिरलो. याची भुरळ इतर तरुणांना लगेच पडते. ते पाहून गेम डाऊनलोड करतात. किंवा कोणीतरी लिंक शेअर केली असेल तर त्या लिंकद्वारे ॲप डाऊनलोड करतात किंवा ॲप नसेल तर वेबसाईटद्वारे हे गेम खेळले जातात. यामध्ये नवीन वापरकर्त्यांना आकर्षित करण्यासाठी सुरुवातीला त्यांच्या गेमिंग वॅलेटमध्ये काही रक्कम वेलकम बोनस म्हणून जमा केली जाते. ती तुमच्या वॅलेटमध्ये दिसते पण ती तुम्ही काढू शकत नाही. पण तिचा वापर करून तुम्ही सुरुवातीला गेम खेळू शकता. खेळायला सुरुवात केल्यावर तुम्ही सतत जिंकत नाही. कधी ना कधी हरताच. हरणारा विचार करतो की जाऊ दे, कुठे माझे पैसे होते… गेले तर गेले. आता एकदा माझे पैसे लावून खेळतो. मग त्यात एखादा गेम जिंकला की त्याच्या मनात आणखी पैसे जिंकायची लालूच निर्माण होते. मग तरुण आणखी पैसे लावून गेम खेळू लागतात. हळूहळू त्याची सवय होऊन जाते.

आणखी वाचा- जगभरातील नद्यांचे नाले झाले, कारण…

मग एखादा गेम, बेटिंग हरल्यावर ते पैसे वसूल करण्यासाठी पुन्हा पुन्हा पैसे लावून गेम खेळू लागतात. आणि इथेच ते त्या ऑनलाईन गेममध्ये गुरफटून जायला लागतात. एखादा दिवस खेळलं नाही तर ते सैरभैर होतात, सतत त्यांची चिडचिड होऊ लागते. आणि स्वत: जवळचे पैसे संपले तर घरातून पैसे मागायचे, नाही मिळाले तर बाहेरून उसने घ्यायचे वगैरे प्रकार सुरू होतात. पुढे हे इतके जास्त होते की झटपट श्रीमंत होण्याच्या नादात डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहतो. पण आपली चूक कळेपर्यंत उशीर झालेला असतो. मग मानसिक तणाव येतो. कधी आत्महत्या देखील करतात. तसेच या प्रकरणात काही ठिकाणी तर अपहरण, खून झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत.

तज्ञांच्या मते हल्लीच्या तरुण पिढीचा पारंपारिक जुगारापेक्षा ऑनलाईन जुगाराकडे जास्त कल आहे.कारण पारंपरिक जुगार खेळण्यासाठी पोलीस, घरचे यांच्या नजरेपासून सुरक्षित ठिकाणी जावे लागत असे. क्लबमध्ये जाऊन खेळायचं तर तिथं वयाचं बंधन असतं. या ऑनलाईन गेमिंग, गॅम्बलिंगमध्ये तुम्ही घरी बसून, कॉलेज, ऑफिस कुठेही खेळू शकता. इथं वयाचं बंधन असलं तरी मुलं वयाचा आई वडील भाऊ यांच्या आधारकार्ड, पॅन कार्डचा वापर करतात.

आणखी वाचा-उपभोगशून्य स्वामी!

जाहिराती आणि सेलिब्रिटींचा पडणारा प्रभाव :

समाज माध्यमावरील प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरकडे पाहून आपलीही लाईफस्टाईल अशी असावी असा विचार अनेकांच्या मनात येतो. हे प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरची गॅम्ब्लिंग, गेमिंग ॲपची जाहिरात करतात. ती पाहून झटपट श्रीमंत होण्याच्या त्यांच्या बाता ऐकून तरुण प्रभावित होतात. तसेच हल्ली फिल्मी कलाकार, सुप्रसिद्ध खेळाडू देखील गेमिंगची जाहिरात कराना दिसतात. आपल्या देशात फिल्मी कलाकार, खेळाडू यांचे चाहते मोठ्या प्रमाणावर आहेत. यांना आदर्श, देव मानले जाते. त्यामुळे जाहिरातींवर विश्वास ठेवून तरुणपिढी या गेमकडे आकर्षित होत आहे. ग्राहक संरक्षक कायद्यानुसार सोशल मिडिया स्टार किंवा कोणत्याही सेलिब्रिटिंना ते ज्या उत्पादनाची जाहिरात करतात त्यााची नैतिक जबाबदारी घेणे बंधनकारक आहे. सोशल मिडिया स्टार, कलाकार, खेळाडू सेलिब्रिटींनी या गॅम्बलिंग, गेमिंग, बेटींग ॲपची जाहिरात करू नये असे केंद्रीय ग्राहक संरक्षक प्राधिकारणानेही बजावले आहे. पण यावर पळवट, तोडगा म्हणून गेमिंग, बेटिंग कंपन्यांनी आपल्या ॲप्स, वेबसाईटना गेम ऑफ स्किल्स म्हणजे कौशल्यबुद्धीमतेचा खेळ म्हणून स्वत:ला प्रेझेंट केलं आहे.

आजची तरुण पिढी ही उद्याचे भविष्य समजले जाते. त्यांनी ऑनलाईन गेमच्या विळख्यात अडकणे हे देशासाठी हानीकारक आहे. आपल्या देशात इतर व्यसनं सोडविण्यासाठी व्यसनमुक्ती केंद्रं आहेत पण हे ऑनलाईन गेमिंग, गॅम्बलिंगचं व्यसन सोडवणारे कोणतेही केंद्रं अद्याप तरी नाही.

rohitpatil4uonly@gmail.com