महाराष्ट्रात जशी वारी तशीच उत्तर भारतात कावड यात्रा. इथे विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ, तर तिथे ‘जय भोले की’ हा जप इथे माऊली आणि तिथे भोले. पण गेल्या काही वर्षांत हे भोले वारंवार उग्र रूप धारण करताना, भाररस्त्यात तांडव करताना दिसू लागले. दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड, हरियाणा राजस्थानमध्ये रस्तोरस्ती कावड यात्रींची दहशत पसरू लागली. आज परिस्थिती अशी आहे की रस्त्यांवर यात्राकाळात दहशतीचं सावट असतं. गाड्या फोडल्या जाणं, वाहनचालकांना बेदम मारहाण होणं सामान्य घटना ठरू लागतात. यात्रेकरूंच्या बाजूने जाताना साधा हॉर्नही वाजवणं महागात पडतं. या काळात दंगलसदृश वातावरण असणारंच अशी खूणगाठ रहिवाशांनी बांधलेली असते. कावड यात्रेत कावडीएवढ्याच सर्रास हॉकीस्टिक आणि बेसबॉल बॅट दिसू लागल्या आहेत. आपण काहीही केलं, तरीही पोलीस किंवा कोणतीही यंत्रणा आपलं काहीही बिघडवणार नाही, असं कावड यात्रींना का वाटतं?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यात्रा हा केवळ शरीराने नव्हे, तर मनानेही आपल्या आराध्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न. वाटेत फारतर भजन, कीर्तन होणं अपेक्षित असतं. पण कावड यात्रेत काय दिसतं? ठणाणा हॉर्न वाजवत, इंजिनचे कर्कश आवाज काढत, ट्रिपल सीट, हेल्मेट न घालता निघालेल्या मोटारसायकलस्वारांचा जत्था. तोंडी जय भोले की ही घोषणा आणि हाती असलेले भगवे झेंडे वगळले तर हे जत्थे धार्मिक भावाने निघालेले असावेत असं अजिबात वाटत नाही. आमच्या वाटेत याल तर खैर नाही, हा इशाराच त्यांच्या वर्तनात दिसतो.

हेही वाचा : नाना- नानी पार्क नको, पेन्शन द्या पेन्शन!

कावड यात्रेची मूळ संकल्पना अशी की गंगोत्री, नीलकंठ, ऋषिकेश, गोमुख येथील घाटांवरून गंगेचं पाणी कावडीत भरून घ्यायचं आणि वाटेत येणऱ्या महत्त्वाच्या मंदिरांत कावडीतून जलाभिषेक करत चालत आपापल्या घरी जायचं. ६०-७० ते १००-१५० किलोमीटर किंवा त्याहूनही जास्त अंतर हे कावडिये दरवर्षी कापतात. या यात्रेची एक विशिष्ट संस्कृती आहे आणि त्याभोवती अर्थकारणही विणलं गेलं आहे. अनेकदा यात्रा मुस्लीमबहुल वस्त्यांतून जातात. दरवर्षी या वस्त्यांत त्यांच्या खाण्या-पिण्याच्या गरजा, हे मुस्लीम बांधवच भागवत. यंदा मात्र फळांच्या आणि अन्य खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर मालकाचे पूर्ण नाव लिहिण्याचा फतवा एका पोलीस ठाण्याने काढला. कारण काय, तर यात्रा भ्रष्ट होऊ नये म्हणून. यामागचा हेतू वेगळा सांगण्याची गरज नव्हतीच. पुढे संपूर्ण उत्तर प्रदेश आणि पाठोपाठ उत्तराखंडमध्येही हा ‘नियम’ लागू करण्यात आला. हा हिंदू- मुस्लिमांत फूट पाडण्याचा, मुस्लिमांवर आर्थिक बहिष्कार टाकण्याचा प्रयत्न असल्याची टीका देशभरातून झाली. नंतर न्यायालयाच्या आदेशामुळे हा फतवा मागे घ्यावा लागला, हा भाग वेगळा. पण यातून या दोन्ही राज्यांतील सरकारांचे हेतू स्पष्ट झालेच. एवढे झाल्यानंतरही हरिद्वारमध्ये यात्रा मार्गातली मुस्लिमांची धार्मिक स्थळं पडदे लावून झाकण्यात आली. या कृत्याची जबाबदारी घेण्यास कोणतीही यंत्रणा वा संस्था पुढे आली नाही. त्याची छायाचित्र व्हायरल झाल्यानंतर पडदे काढण्यात आले. आमच्या धार्मिक स्थळांच्या केवळ दर्शनाने यात्रेचं पावित्र्य भंग होणार होतं का, असा प्रश्न तिथल्या मुस्लीम समुदायाला पडला.

उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील घटना- मुरादनगर परिसरात यात्रेकरूंच्या आणि समान्य रहिवाशांच्या वाहनांची प्रचंड गर्दी होती. त्यातच कावड घेऊन पायी निघालेलेही होते. आकिब अहमद नावाचा तरुण आपल्या नातेवाईकांना मेरठला सोडण्यासाठी चारचाकी वाहनातून निघाला होता. त्याच्या कारचा धक्का यात्रेकरूंपैकी कोणाच्या तरी बाइकला लागला, असा यात्रेकरूंचा दावा आहे. आपल्याला असं काही झाल्याचं आठवत नाही, असं आकिबचं म्हणणं. तिथून पुढे दिल्ली-मेरठ हायवेवरच्या टोल नाक्यापर्यंत कावडियांनी त्याचा पाठलाग केला. टोलवर अनेक कावडिये रस्ता अडवून उभे होते. त्यांनी आकिबला अडवलं. त्याचं नाव विचारलं. गाडीतून बाहेर खेचलं आणि हॉकीस्टिक व काठ्यांनी बेदम मारलं. त्याच्या मानेवर चाकूने वार केले. गाडी पूर्णपणे फोडून टाकली.

हेही वाचा : ‘क्रांतिकारक’ निकालाचे आव्हानात्मक वास्तव

मुजफ्फर नगरमध्ये एका कारचा कावडीला धक्का लागल्याचा दावा करत मालकाला मारहाण करण्यात आली. गाडी फोडण्यात आली. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा कळलं की कावड फुटली नव्हती. केवळ धक्का लागला म्हणून एवढं आकांडतांडव?

रुरकीमध्ये एक ई-रिक्षा चालक कावडियांच्या गर्दीतून वाट काढत प्रवाशाला बसविण्याचा प्रयत्न करत होता. आमच्या जवळून का गेला, या रागातून कावडियांनी त्याला क्रूरपणे मारहाण केली. रिक्षा उलटवली आणि तोडफोड केली. पोलिसांच्या समोरही हे तथाकथित भोले गाडी वर काठ्यांनी प्रहार करत असल्याच्या चित्रफिती प्रसारित झाल्या.

मुजफ्फर नगर हायवेवरच्या एका पेट्रोल पंपावर काही कावडिये बसले होते. ते आंबे खाऊन बाठा तिथेच फेकत होते. काहीजण विड्या ओढत होते. पंपावरील कर्मचाऱ्याने त्यांना इथे कचरा टाकू नका. विडी ओढल्याने अपघात होऊ शकतो, म्हणून दटावलं. तर शेकडो कावडिये त्याच्यावर तुटून पडले. त्याला रुग्णालयात दाखल करावं लागलं.

कावडियांनी ना शाळेची बस सोडली ना पोलिसांचं वाहन. हरियाणाच्या फतेहाबाद जिल्ह्यात कावडीला धक्का लागला म्हणून शाळेची बस थांबवली गेली. मुलांना खाली उतरवून त्यांच्या देखत मोठाले दगड फेकून बसच्या काचा फोडण्यात आल्या. लाठ्या-काठ्यांनी बसची नासधूस केली गेली.

हेही वाचा : आमच्या जलमय झालेल्या वायनाडची गोष्ट हेच सांगते की…

उत्तरप्रदेश पोलिसांनी कावड यात्रेकरूंवर नजर ठेवण्याचं कारण देत १४ लाख रुपये खर्च करून एक हेलिकॉप्टर भाडेतत्त्वावर घेतलं होते. त्यातून नजर ठेवण्याऐवजी खुद्द पोलीस महासंचालक प्रशांत कुमार यांनी स्वतः यात्रेकरूंवर पुष्पवृष्टी केली आणि यात्रेकरूंनी काय केलं? गाझियाबादमध्ये कावड यात्रेसाठी राखीव असलेल्या मार्गिकेतून पोलीस असा स्टिकर असलेली कार जात होती. तिचा कावडीला धक्का लागला म्हणून कार अडवली. उलटवून तोडफोड केली. त्यावर पोलिसांचं स्पष्टिकरण काय, की ती पोलीस दलाची नव्हे, तर पोलीस असं स्टिकर लावलेली कार होती. वाहन कोणाचंही असो, त्याचं असं नुकसान करण्याचा अधिकार कावडियांना आहे?

हा सारा हिंसाचार, नासधूस कावडिये स्वतःच चित्रित करतात आणि समाजमाध्यमांवर पोस्ट करतात. प्रत्येक घटनेच्या चित्रफिती उपलब्ध आहेत. सर्व दृश्यांत नासधूस करणाऱ्यांचे चेहरे स्पष्ट दिसत आहेत. पण एरवी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आग्रही असलेल्या बुलडोझर बाबांनी यापैकी कोणावरही कठोर कारवाई केल्याचं ऐकिवात नाही. पोलीस येतात, समज देतात, ताब्यात घेतात आणि सोडून देतात. धर्माच्या नावाखाली सुरू असलेल्या ह्या हुल्लडबाजीला, हिंसाचाराला पोलिसांचं संरक्षण असल्यामुळेच कावडिये अनिर्बंध आहेत, हे स्पष्टच आहे.

कावडयात्री नशा करताना आढळणंही अगदी समान्य झालं आहे. शंकराचे भक्त अनेकदा भांग प्राशन करतात. ती परंपराच आहे, मात्र आता यात्रेत मद्य, चरस, गांजा, अफूचं सेवन करणाऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे. त्यांना हे अमली पदार्थ पुरविणाऱ्यांचंही एक जाळं यात्रा मार्गावर तयार झालं आहे. नशेच्या भरात हिंसाचाराला अधिक चालना मिळते.

हेही वाचा : लेख: निवडणुकीपुढे शेतकरी आत्महत्येचा प्रश्न नगण्य?

पारंपरिकरित्या दोन-चार घागरी भरून साध्याशा कावडीला त्या बांधून यात्रा केली जात असे. आता घागरींची संख्या वाढली आहे आणि स्वरूपही पालटलं आहे. काही कांवडिये क्षमतेपेक्षा जास्त अवजड कावड वाहून नेतात. आम्ही एक क्विंटलची कावड घेतली आहे, असं अभिमानाने सांगतात, पण अशाने दमछाक आणि पर्यायाने चिडचिड अधिक होते आणि त्यातूनच हिंसक प्रवृत्ती वाढते. सर्वच कावडिये गुंड प्रवृत्तीचे नाहीत. जे खरोखरच भक्तिभावाने यात्रेत सहभागी होतात, त्यांच्या मनात अशा दंगेखोर कावडियांबद्दल प्रचंड राग आहे. अशा तरुणांमुळे यात्रा बदनाम होते, अशी खंत ते व्यक्त करतात.

कांवड यात्रेत गेल्या काही वर्षांपासून समाविष्ट झालेला आणखी एक घटक म्हणजे डीजे. रोज रात्री महामार्ग अडवून डीजेचा दणदणाट सुरू होतो. कोणाचे डेसिबल अधिक, कोणाचा बेस धडकी भरवणारा, कोणाच्या दणदणाटाने काचा फुटल्या, कोणी किती काळ हायवे अडवून धरला, हे आकडे अभिमानाने मिरवले जातात. डीजे अमर, डीजे सार्जन, डीजे रावण असे अनेक प्रसिद्ध डीजे आहेत. एक डीजे वाजत असताना दुसऱ्याने सुरू करायचा नाही, हा तिथला अलिखित नियम आहे, पण जर तो कोणी मोडलाच, तर मग स्पर्धा झालीच समजा. मग रात्रभर हा दणदणाट वाढत जातो. अशा अहमहमिकेतून कधी दगडफेक होते. दोन डीजेच्या समर्थकांत मारमाऱ्या होतात. पोलीस हिंदी चित्रपटाप्रमाणे दरवेळी घटना घडून गेल्यावर येतात. मुजफ्फरनगरमध्ये डीजेच्या गाडीला अचानक ब्रेक लावल्यामुळे गाडीवरचा जनरेटर कोसळला. या अपघातात एक कावडिया मृत्युमुखी पडला, तर आठ जण जखमी झाले. गतवर्षी डीजेच्या वाहनाचा विजेच्या तारेला स्पर्श झाल्यामुळे पाच कावडियांचा मृत्यू झाला होता.

हेही वाचा : ‘लोकमान्य’ फक्त ब्राह्मणांचेच नव्हते!

वर्षानुवर्षांपासून उत्तर भारतातल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेली, हिंदू- मुस्लीम बंधुतेचे दर्शन घडवणारी कावड यात्रा आज विकृत आनंदाचं, झुंडशाहीचं, हिंसाचाराचं, द्वेशाचं प्रतीक ठरू लागली आहे. आपली संख्या मोठी आहे म्हणजे आपल्याला कोणी काही करणार नाही, अशी खात्री हे त्यामागचं कारण आहे. सरकार आपल्या बाजूने आहे, हा विश्वासही कारणीभूत असू शकतोच. तो अधिक बळकट करण्याचं काम पोलीस आणि प्रशासन करताना दिसतं. बंधुत्वाचा, एकमेकांच्या आधाराने पुढे जाण्याचा संदेश देणारी ही यात्रा आता दहशतीचं सावट पसरवताना दिसू लागली आहे.

vijaya.jangle@expressindia.com

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why kanwar yatra become so violent in the last few years kanwar yatra for devotion or terror css
Show comments