विनय जोशी
हमासच्या सुरुवातीच्या हल्ल्यानंतर इस्राएल आणि पॅलेस्टाईन यांच्यात भीषण युद्ध सुरू आहे. हा हल्ला जसा एकतर्फी होता तसाच आत्ताचा इस्रायली प्रतिकारसुद्धा एकतर्फी आहे. इस्रायली सेना जमिनीवरून आणि वायुसेना आकाशातून आग ओकत आहे आणि निम्मं गाझा आजपर्यंत बेचिराख झालं आहे. संपूर्ण जगात १९० कोटी मुस्लिम आहेत आणि त्यांच्या तुलनेत १ कोटी ६५ लाख ज्यू (इस्राएलमध्ये ७१ लाख आणि अमेरिकेत ६५ लाख) आहेत. याचा अर्थ साधारणपणे ११५ मुस्लिमांच्या मागे १ ज्यू आहे. तरीही इस्राएलच्या विरोधात आणि गाझाच्या बचावासाठी एकही मुस्लिम देश प्रत्यक्ष मैदानात उतरत नाही, असं का, या प्रश्नाचा उलगडा करण्याचा हा प्रयत्न.
मुस्लिमांनी काय केलं?
कराची स्थित पत्रकार जावेद चौधरी यांनी काही वर्षांपूर्वी एक लेख लिहिला होता, त्याचं शीर्षक होतं, ‘मुसलमानों ने पिछले हजार सालों मी हरामखोरी के सिवा कुछ नही किया!’ या लेखाचं शीर्षक उर्दू शायर जौंन इलिया याचा शेर ‘हम मुसलमान अपने एक हजार साल की तारीख (इतिहास) मे हरामखोरी के सिवा कुछ नही कर रहे है’ यावरून घेतलेलं आहे.
हा मूळ लेख वाचण्यासारखा आहे. लेखक म्हणतो इस्लामच्या पहिल्या ३५० वर्षात अर्धअधिक जग पादाक्रांत करणाऱ्या इस्लामने त्यानंतर आपापसात मारामाऱ्या आणि कत्तली यापेक्षा काहीही केलं नाही. गेल्या १००० वर्षात जितक्या मुस्लिमांना गैर मुस्लिमांनी मारले आहे, त्यापेक्षा कित्येक पटींनी मुस्लिम हे स्वतः मुस्लिमांनीच ठार मारले आहेत. मागच्या हजार वर्षात मुस्लिम देशांनी आणि समाजाने मानव जातील उपयोगी ज्ञान, विज्ञान, शास्त्र, तंत्रज्ञान यात कोणतीही नवीन भर घातलेली नाही. मुस्लिम ज्यूंच्या विरोधात जिहादची घोषणा ज्या माईकवरून करतात तो माईक आणि स्पीकरसुद्धा ज्यूंनी बनवलेला असतो आणि ‘काफ़िरां’च्या विरोधात जिहाद करण्यासाठी जी शस्त्रं आणि स्फोटकं मुस्लिम वापरतात तीही कोणा ‘काफिरा’नेच तयार केलेली असतात! लेखात वर्णन केलेली स्थिती कोणत्याही सुजाण मुस्लिम व्यक्तीला अंतर्मुख करायला लावणारी आहे पण अंतर्मुख व्हायची प्रामाणिक इच्छा असेल तर!
आणखी वाचा-खरा संघर्ष प्रस्थापित मराठा विरूद्ध गरीब मराठा असाच आहे…
मुस्लिम समाजाच्या प्राथमिकता काय ?
सध्या जगात इस्लाम धर्मीयांची लोकसंख्या लक्षणीय असली तरी त्यांच्या सरसकट सामाजिक पातळीबाबत तसे म्हणता येत नाही. मुस्लिम नेतृत्वाच्या सुमार दर्जाच्या प्राथमिकता हे जागतिक पातळीवरील मुस्लिमांच्या अधोगतीचं एकमेव कारण आहे.
जगभरातील गैर मुस्लिम तरुण उच्च शिक्षण आणि वैयक्तिक उन्नतीसाठी झटत असताना गरीब मुस्लिम तरुणांपासून ते लाखो- कोटींची पॅकेज असणारी अनेक तरुण मुस्लिम मुले मरणोत्तर काल्पनिक स्वर्गाच्या मृगजळाच्या मागे धावून मृत्यूला कवटाळण्यासाठी आतुर दिसत आहेत. अर्थात धार्मिक कर्मकांडात ज्यूही कमी नाहीत. यौम किप्पूरला अख्खा इस्राएल पूर्ण ठप्प असतो. विमानतळ, रेडिओ, टीव्ही, रस्ते वाहतूक आणि सगळ्या मानवी हालचाली पूर्ण दिवसभरासाठी ठप्प असतात आणि हे यहुदी धार्मिक मान्यतेला धरून आहे. पण उर्वरित पूर्ण वर्ष ते सरस्वती आणि लक्ष्मीच्या आराधनेत घालवतात.
सध्या संपन्न म्हणून जे मुस्लिम देश दिसतात त्यात काही अरब देश आहेत. पण त्यांना नैसर्गिकरीत्या मिळणाऱ्या क्रूड तेलाने समृद्ध केलंय आणि यात त्यांचे परिश्रम किंवा बुद्धिमत्तेचा फारसा संबंध नाही. तेलाच्या कारभारासाठीचं तंत्रज्ञान पाश्चिमात्य देश पुरवतात, अरबी राजघराणी कट्टर सुन्नी अरब प्रजेपासून सुरक्षित ठेवण्यासाठी अमेरिकन सैन्य प्रयत्न करतं आणि रोजच्या कामांसाठी आशियाई मजूर तिथे स्वस्तात अहोरात्र राबतात.
आणखी वाचा-बातमी बातमीदारापासून मुक्त झाली आहे, पण त्याबरोबरच माध्यमांची जबाबदारी वाढली आहे…
काही मुस्लिम व्यक्ती, काही मुस्लिम समाज आणि काही इस्लामी देश यांच्या प्राथमिकता इस्लामचा प्रसार करणं आणि जगात जिथे कुठे मुस्लिम आणि गैर मुस्लिम यात संघर्ष असेल अशा ठिकाणी ‘जिहाद’ लढायला एकतर प्रत्यक्ष मनुष्यबळ किंवा असेल तर पैसा पाठवणं याच दिसतात. संपन्नतेच्या शिखरावर असताना सौदी अरेबियाने कट्टर इस्लामची ‘वहाबी’ आवृत्ती जगात निर्यात करण्यासाठी अब्जावधी डॉलर्स ओतले. रशियाच्या अफगाण मोहिमेला शह देण्यासाठी समस्त संपन्न अरब देशांनी तरुण मुस्लिम जिहादी आणि कोट्यावधी डॉलर्स ओतले. त्यामुळे रशिया हरला पण मुस्लिम देश आणि समाज म्हणून काय फायदा झाला याचा कुणीही ताळेबंद मांडला नाही. रशिया विरुद्धच्या अफगाण जिहादनंतर आजपर्यंत अफगाणिस्तान रक्तपाताने माखताना आपण बघतो आहेत. दुसरीकडे चीन सिंकियांग प्रांतातल्या उईघुर मुस्लिमांची खुलेआम ससेहोलपट करत असताना पाकिस्तान, अरब देश, अफगाणिस्तान तोंडातून ब्र न काढता चीनच्या गळ्यात गळे घालून जगात मिरवतात.
सध्याच्या इस्राएल हमास संघर्षात सीरिया, लेबनॉन आणि इराणने हमासला इस्त्रायल विरोधात संघर्ष सुरू करायला फूस लावली पण इस्राएलने याचा सूड घ्यायला सुरुवात केल्यानंतर त्यांच्यापैकी कुणीही इस्राएल विरोधात प्रभावी सैनिकी कारवाई करायला पुढे येत नाही आणि याचं कारण एकाही मुस्लिम देशाकडे प्रभावी सैनिकी, वैज्ञानिक, आर्थिक शक्ती नाही जी पश्चिमी देश आणि इस्राएल युतीसमोर टिकाव धरू शकेल.
इराण, सीरिया, लेबनॉन हेजबुल्ला अतिरेक्यांना जी मिसाईल पुरवतात ती दिवाळीच्या फटाक्यातल्या रॉकेटच्या लायकीची आहेत. अशी रॉकेट इस्राएलवर डागली की इस्राएली सेना काही क्षणात त्या जागेवर बॉम्बफेक करते. आज इस्त्रायल वाटेल तेव्हा बैरुतवर आपली लढाऊ विमाने निर्धोकपणे पाठवून बॉम्ब हल्ले करतं. इस्रायली विमानं वाटेल तेव्हा दमिष्कच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्बहल्ले करून परत येतात. पण सध्याचा हा संघर्ष सुरू झाल्यापासून आजपर्यंत एकही इस्रायली लढाऊ विमान या शेजारी मुस्लिम देशांच्या आकाशात असताना पाडलं गेलं अशी बातमी आलेली नाही!
आणखी वाचा-सिल्क्यारा बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांमुळे चर्चेत आलेले तीन मुद्दे…
हमासच्या हल्ल्यानंतर इस्त्रायलने गाझात १५,००० लोक मारले आहेत, ४१,००० घरे जमीनदोस्त केली आहेत जी गाझाच्या एकूण घरांच्या संख्येच्या ४५% होतात! जगाच्या कोणत्याही भागात जा, मुस्लिम एकतर गरिबीने गांजलेले दिसतील, जिहाद करताना दिसतील किंवा एकमेकांशीच संघर्ष करताना दिसतील!
पत्रकार जावेद चौधरी म्हणतो मुस्लिमांनी मारलेल्या मुस्लिमांची संख्या ही गैर मुस्लिमांनी मारलेल्या मुस्लिमांच्या संख्येच्या कित्येक पट जास्त आहे. नायजेरिया, सीरिया, येमेन, इराण, इराक, अफगाणिस्तान, पाकिस्तान या सगळ्या देशात मुस्लिमांच्या सशस्त्र गटांचा आपापसातील खूनखराबा बघितला तर हे विधान पटायला वेळ लागत नाही!
एकूण काय तर अख्खं जग ‘परचम- ए – इस्लाम’ खाली आणायची मनीषा असली तरी समस्त मुस्लिम जगत पराकोटीच्या केविलवाण्या अवस्थेत जगत आहे! निर्धन, हतबल, हिंसक, संघर्षरत, अशिक्षित आणि केविलवाणं!
कुणीतरी मुस्लिम नेता याचा कधी विचार करेल का?