नागेश चौधरी
नवरात्रात होणाऱ्या ‘रामलीला’ कार्यक्रमाचे समापन दसऱ्याच्या दिवशी रावण-दहनाने करण्याची प्रथा उत्तर भारतात दिसून येते. तुलसीदासांच्या ‘रामचरित मानस’च्या आधाराने सादर होणारे नाट्यमय प्रसंग असे ‘रामलीला’ उपक्रमाचे स्वरूप असते आणि रावणाच्या वधाने हे आख्यान संपते म्हणून फटाक्यांनी भरलेल्या रावणाचे दहन हा त्या नाट्यीकरणाचा भाग. अर्थात गेल्या काही दशकांत सर्वच सणांचे आणि प्रथांचे उत्सवीकरण होऊ लागल्यामुळे रामलीला कार्यक्रमाशी रावण-दहनाचा संबंध अनेक ठिकाणी उरलेला दिसत नाही. रामचरितमानस, तुलसीदास, रामलीलेतला अखेरचा प्रसंग या कशाचाही विचार न करता एक इव्हेन्ट म्हणून रावण-दहन केले जाते आणि त्याला भाबडे जनसामान्य धर्माशी संबंधित असलेला सोहळा मानतात. पण दक्षिणेतील राज्यांत- विशेषत: तमिळनाडूत- रावण-दहनासारखी प्रथा मान्य होणारी नाही. महाराष्ट्रातही रावणाबद्दल उत्तर भारतीय परंपरांपेक्षा निराळे चिंतन, निराळा विचार झालेला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डॉ वि. भि. कोलते हे महाराष्ट्राचे एक महान साहित्यिक आणि नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू होते त्यांनी ‘महात्मा रावण’ या मथळ्याचा लेख नागपूरच्या त्या वेळच्या ‘महाराष्ट्र’ या दैनिकात १९४९ साली लिहिला होता. आता त्या लेखाची १६ पानी पुस्तिका सुगावाने प्रकाशित केली. या पुस्तिकेत रावण कशा प्रकारे महात्मा होता हे डॉ. कोलते यांनी सिद्ध केले आहे. ते म्हणतात, “रावण दुरात्मा, अधार्मिक, कामुक होता असे जे म्हटले जाते ते रामाच्या विजयामुळे आणि रावणाच्या वधामुळे ज्यांचा फायदा झाला अशा साम्राज्यवादी आर्यांकडून. पण अनार्यांच्या दृष्टीने राम आर्यवंशीय असला तरी …अनार्यांचा अत्यंत क्रूर संहारक होता. उलट रावण मात्र आपल्या देशावरील आर्यांचे आक्रमण परतवून लावण्यासाठी आणि आपल्या भगिनीच्या अपमानाचा सूड उगविण्यासाठी प्राणाचे बलिदान करणारा एक अत्यंत थोर महात्मा आणि हुतात्मा देशभक्त होता असे म्हटले तर चुकीचे होईल काय?” (महात्मा रावण- डाॅ. वि. भि. कोलते)

हेही वाचा : भारतीय (जनता पक्षाच्या) राजकारणाचा विश्वकर्मा

संदीप सृजन हे उज्जैनमधील तरुण लेखक. त्यांनी एका लेखात (स्वैच्छिक दुनिया – २४ ऑक्टोबर २०२०) जैन ग्रंथांमध्ये रावणाला ‘प्रतिवासुदेव’ मानले गेल्याचा दाखला देऊन म्हटले आहे : ‘रावण शिव का परम भक्त था। प्रकांड विद्वान, सभी जातियों को समान मानते हुए भेद भाव रहित समाज की स्थापना करने वाला था।’ आणि तरीही दरवर्षी रावण दहन का? रावण दहन करण्याचा कार्यक्रम केला जातो त्याचा उद्देश काय आहे आणि कशासाठी हे दहन सातत्याने करण्यात येते? रावण हेच एक व्यक्तिमत्त्व असे दिसते की ते आक्रमक रामाचा मुकाबला करते. वाल्मीकि रामायणात रावणाला नास्तिक म्हटलेले आहे. असे दिसून येते की, रावण आणि राम यांच्या मधला जो संघर्ष आहे हा दोन संस्कृती मधला संघर्ष आहे, दोन वंशांमधला संघर्ष आहे. आणि म्हणून या देशातील जे वर्चस्ववादी लोक आहेत त्यांच्या दृष्टीने रामाचं उदात्तीकरण करणे, देशभर तसे वातावरण तयार करणे यामागे चातुर्वर्ण्याचे रक्षण करणे ही भूमिका आहे. दुसरे असे की रावण ज्या ‘रक्ष’ संस्कृतीचा प्रतिनिधी होती ती समतावादी होती. यज्ञ संस्कृतीचे लोक उत्पादक नव्हते किंवा रक्षक नव्हते. तेव्हा ती संस्कृती कायम ठेवण्यासाठी त्यांनी रक्ष संस्कृतीच्या लोकांना किंवा ज्यांनी सर्वसामान्य लोकांची बाजू घेऊन त्यांचे उत्थान करण्याची भूमिका घेणाऱ्या लोकांना त्या चातुर्वर्ण्यवादी लोकांनी राक्षस म्हटलेले आहे. वाईट ठरवलेले आहे…

हेही वाचा : ऋषितुल्य गायक  

रावणाचा राजकीय वापर

आणि याची उदाहरणे अलीकडे पण दिसताहेत. उदाहरणार्थ जेव्हा माजी प्रधानमंत्री व्ही पी सिंहांनी ऑगस्ट १९९० मध्ये मंडल आयोग लागू करण्याची घोषणा केली तेव्हा १९९० च्या दसऱ्याला रावण म्हणून त्यांच्या पुतळ्याचे दहन केले होते. यावरून हे दिसते की जे कोणी सामाजिक न्यायवादी भूमिका घेतात त्यांना रावण संबोधण्यात येते, त्यांना रावण म्हणून जाळण्यात येते. अगदी अलीकडचे आणखी उदाहरण म्हणजे राहुल गांधी यांनी आरएसएसच्या विरोधामध्ये भूमिका घेत जाती जनगणनेची बाजू घेतली तेव्हा याच लोकांनी राहुल गांधींना रावण संबोधले आहे. रावण म्हणून त्यांचा आता निषेध करणे सुरू आहे.

याआधी महात्मा गांधींना देखील रावण संबाेधण्यात आले होते आणि रावणाच्या प्रतिमेत गांधीजींना दाखवणारे एक व्यंगचित्रही प्रसृत झाले होते. या व्यंगचित्रात रावणाच्या दहा तोंडांच्या जागी त्या वेळच्या विविध काँग्रेसनेत्यांचे चेहरे आहेत. गांधीजींची व्यापक सर्वसमावेशक भूमिका धर्माधर्मांमध्ये शत्रुत्व राहू नये अशी होती, त्यामुळे गांधींना देखील किंवा गांधींच्या सहकाऱ्यांना देखील त्या वेळच्या उजव्या संघटनांनी रावण ठरवलेले आहे.

हेही वाचा : आता निदान समलैंगिकता हा ‘रोग’ समजून उपचार तरी केले जाणार नाहीत…

या देशातील राजकारणात ज्यांना ज्यांना रावण ठरवले जाते जे सामाजिक न्यायाच्या बाजूचे असतात, धर्माधर्मातील शत्रुत्ववादी भूमिकेच्या विरुद्ध असतात अशा लोकांना रावण संबोधतात, त्यांचे खून करतात. समतावादी विचारांना सतत जाळा अशा प्रकारचा भयानक संदेश या रावण दहनाच्या कृतीमधून देण्यात येत आहे. रावण हा नास्तिक होता, देव मानणारा नव्हता हे वाल्मिकी रामायणातच लिहिले आहे. (समाप्त) (chaudhari.nagesh@yahoo.co.in)

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why ravan dahan on vijayadashami dr v b kolte thoughts on ravan css