डॉ. हमीद दाभोलकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुनील गावस्कर, कपिलदेव यांच्यासारखे एके काळचे दिग्गज, आजचे आदर्श असलेले खेळाडू पानमसाल्यासारख्या व्यसनांकडे नेणाऱ्या पदार्थाची जाहिरात का करतात? या जाहिरातींमधून मिळणाऱ्या पैशांचा मोह त्यांना आवरता आला नाही असे म्हणावे तरी कसे?

जवळजवळ दीड महिने चाललेला क्रिकेट विश्वचषकाचा माहोल नुकताच संपला असला तरीही भारताच्या अंतिम फेरीतील पराभवाचे कवित्व अजून सुरूच आहे! खेळ म्हटले की हारजीत आलीच हे आपण समजू शकतो, पण या विश्वचषकादरम्यान दोन षटकांमधील ब्रेकदरम्यान कपिलदेव आणि सुनील गावस्कर यांना पानमसाल्याच्या नावाखाली तंबाखू/ गुटखा यांची जाहिरात करताना बघणे हे मात्र माझ्यासारख्या क्रिकेटरसिकाला पचवणे खूपच अवघड जाते आहे. भारतातील क्रिकेटरसिकांच्या तीन-चार पिढय़ांनी सन्मानित केलेले हे क्रिकेटमधले दिग्गज  आहेत! क्रिकेट म्हणजे जणू धर्मच मानणाऱ्या आपल्या देशात कपिलदेव, सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर यांच्यासारख्या लोकांना क्रिकेटचे तारे म्हणूनच पुजले जाते. सत्तरीला आलेल्या कपिलदेव यांच्याबद्दल तंदुरुस्तीची मिसाल म्हणून आजही भारतीय क्रिकेटचाहत्यांमध्ये मोठा आदर आहे. खेळताना दुखापत न होता ते शंभर कसोटी खेळले आहेत. ते घेत असलेला चौरस आहार, दूध यांचे किस्से क्रिकेटरसिक अजूनही चवीने चघळतात. ‘83’सारख्या सिनेमामध्ये ते दाखवले गेले आहेच. असा माणूस वयाच्या सत्तरीमध्ये तंबाखूजन्य पदार्थाची जाहिरात करत तरुणाईला त्यांचा उपभोग घेण्याचे आवाहन करतो, तेव्हा ती खटकणारीच गोष्ट असते. तीच गोष्ट सुनील गावस्कर यांची! क्रिकेटपटू म्हणून त्यांनी ऑफ स्टंपबाहेरचे चेंडू सोडताना दाखवलेल्या संयमाचे आजही उदाहरण दिले जाते. ज्या निग्रहाने ते ऑफ स्टंपबाहेरचा बॉल सोडत तो निग्रह तंबाखूजन्य पदार्थाच्या जाहिरातीमधून मिळणाऱ्या पैशाच्या मोहात पडताना मात्र ते दाखवू शकलेले नाहीत असे दिसते. तरुण क्रिकेटपटूंनी केलेल्या चुका ते कोणतीही भीडभाड न ठेवता आपल्या समलोचनामधून सांगत असतात. त्यांच्या या स्पष्टवक्तेपणाचे खूप जण चाहते आहेत. आपण विश्लेषण करत असताना, भाषा कठोर असली तरी वेळीच चुका दाखवून देणे हे भविष्यातील गंभीर दुष्परिणाम टाळण्यासाठी महत्त्वाचे असते असे त्यांचे म्हणणे असते आणि ते रास्तही आहे. मग हीच गोष्ट ते पानमसाल्याच्या जाहिराती करताना मात्र  सोयीस्कररीत्या विसरतात! त्यांचे चाहते असलेल्या अनेक तरुण मुलांना ते व्यसनाचा अनुभव घेण्यास उद्युक्त करतात हे शोचनीय आहे. वीरेंद्र सेहवागसारख्या सत्तेपुढे ‘वाका म्हटले तर रांगणाऱ्या’ खेळाडूकडून किंवा ख्रिस गेलसारख्या खेळाडूंकडून ही अपेक्षा नाही, पण गरज पडली तर सत्ताधारी लोकांच्या विरोधात जाऊन महिला कुस्तीगिरांना पािठबा देणाऱ्या कपिलदेव आणि सुनील गावस्कर यांच्याकडून हे अपेक्षित नक्कीच नाही.          

हेही वाचा >>>‘खासा मराठा म्हणविणाऱ्या’स..             

आता या जाहिराती पानमसाल्याच्या आहेत, तंबाखूजन्य पदार्थाच्या नाहीत, असे एक लंगडे समर्थन त्यांचे समर्थक करू शकतात, पण ते जाहिरात करतात तो केवळ पानमसाला नसून प्रामुख्याने गुटखा आहे हे अगदी शालेय मुलांनादेखील माहीत असते. पानमसाला या नावाखाली गुटखा, पाण्याच्या बाटलीच्या नावाखाली दारू (बॅगपायपर इत्यादी) यांच्या जाहिराती करणे याला सरोगेट जाहिराती म्हटले जाते. व्यसनाच्या पदार्थाची जाहिरात करता येत नाही या कायद्यामुळे अशा सरोगेट पद्धतीच्या जाहिरातीमधून ते लोकांपर्यंत पोहोचवले जातात. केवळ कायद्याला फाटा देण्यासाठी दुसरे नाव असलेले उत्पादन वापरले जाते. खरे सांगायचे तर एका निर्णयाद्वारे सर्वोच्च न्यायालयाने अशा स्वरूपाच्या सरोगेट जाहिरातींना बंदी घातलेली आहे. पण त्या निर्णयाची अंमलबजावणी केली जात नाही. अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांनी अशा जाहिराती केल्या होत्या आणि नंतर आम्हाला या तंबाखूजन्य पदार्थाच्या जाहिराती आहेत हे माहीतच नव्हते असा पवित्रा घेतला होता! तसे करण्याची संधी कपिलदेव आणि सुनील गावस्कर यांनादेखील आहे, पण इतके जग बघितलेल्या या मोठय़ा लोकांना इतकी छोटी गोष्ट माहीत नाही हे सामान्य माणसाला पचणे थोडे अवघडच आहे. त्यापेक्षा सरळ आपली चूक मान्य करून जाहिरातीचे पैसे परत देऊन तातडीने जाहिरात बंद करावी हे उत्तम. यानिमित्ताने खरेच या जाहिरातींनी काही तोटा होतो का असा प्रश्न काही जणांना पडणे स्वाभाविक आहे. तर याचे उत्तर नि:संशयपणे ‘हो’ असे आहे. अन्यथा तंबाखू आणि मद्य लॉबीने एवढय़ा मोठय़ा प्रमाणात जाहिरातीमध्ये पैसे खर्च केले नसते. जगभरात झालेले विविध अभ्यासदेखील हेच दाखवतात की या जाहिरातींचा संदेश आणि संभाव्य वर्ग हे अतिशय विचारपूर्वक नियोजन करून ठरवलेला असतो. उदाहरणार्थ एका विशिष्ट जाहिरातीमध्ये दोन पिढय़ांमधील खेळाडू जीवन जगण्याची पद्धत वेगळी असली तरी आनंद साजरा करताना ते विशिष्ट उत्पादन वापरतात हा संदेश जाहिरातीमधून दिला जातो. लहानथोर अशा सर्व पिढय़ांना कवेत घेणारी जाहिरात मोहीम असावी असा ‘उदात्त’ हेतू असतो हे वेगळे सांगायला नको! ‘आनंद साजरा करणे म्हणजे व्यसन करणे!’, ‘चांगली दोस्ती म्हणजे एकत्र व्यसन करणे’ असे समाजात खोलवर रुजलेले विचार हे आपोआप तयार झालेले नसून जाहिरातीमधून नियोजनबद्ध पद्धतीने रुजवले आहेत हे लक्षात घ्यायला हवे.

हेही वाचा >>>राजकारणाची वळणे आणि आरक्षणाची ‘मिरची’

 आपल्याला हेदेखील माहीत असायला हवे की एकटय़ा भारतात दरवर्षी तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनाने दहा लाखांपेक्षा अधिक मृत्यू होतात. हे सर्व टाळता येणारे मृत्यू आहेत. ग्रामीण भागात ३० ते ५० टक्के पुरुष आणि महिला तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करतात. त्यामधून हृदयविकार, मधुमेह, कॅन्सर अशा अनेक आजारांना आमंत्रण मिळते. या सगळय़ांना एक प्रकारचे प्रोत्साहन देण्याचे काम वरील जाहिरातीद्वारे कपिलदेव आणि सुनील गावस्कर करत आहेत. समाज म्हणून त्यांना आपण सगळय़ांनी हे वास्तव ठणकावून सांगणे आवश्यक आहे. त्यांच्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या चाहत्यांच्या प्रेमाचा हा टोकाचा गैरवापर आहे. खरे तर या जाहिरातींच्या पैशामधून सुनील गावस्कर आणि कपिलदेव यांचे काही अडले असेल असे अजिबात नाही. आणि अडले असेल तरी असा तरुणाईला मृत्यूकडे ढकलणारा पैसा त्यांना खरेच हवा आहे का, हादेखील विचार त्यांनी करायला पाहिजे. या लेखात सुनील गावस्कर आणि कपिलदेव यांच्याविषयी लिहिले असले तरी अशाच जाहिराती करणारे अक्षय कुमार, अजय देवगण, शाहरुख खान, रणवीर सिंग हेदेखील काही त्या दोघांपेक्षा वेगळे नाहीत. सचिन हा वडिलांना शब्द दिला म्हणून तंबाखूजन्य पदार्थाच्या जाहिराती करत नाही, पण त्याच्यासकट सौरभ गांगुली, शुभमन गिल, रोहित शर्मा असे एकापेक्षा एक लोक ऑनलाइन सट्टा या नव्याने रुजू घातलेल्या व्यसनाची जाहिरात करत आहेत. एका शीतपेयाची जाहिरात नाकारणारा पी. गोपीचंद किंवा भर पत्रकार परिषदेत स्वत:समोर असलेले शीतपेय बाजूला करणारा क्रिस्तियानो रोनाल्डो हे म्हणून आपल्या क्रिकेटमधल्या सिताऱ्यांच्या तुलनेने खूप मोठी माणसे वाटतात. क्रिकेटमधले हे लोकप्रिय खेळाडू मोठे आहेत म्हणून ते करत असलेल्या चुकांविषयी त्यांच्या चाहत्यांनी बोलायचेच नाही, हे वागणेदेखील योग्य नाही. यामधूनच काळ सोकावत जातो. या दिग्गज खेळाडूंच्या या भूमिका मान्य असलेल्या सगळय़ा चाहत्यांनी आपले याविषयीचे मत कोणतीही भीडभाड न बाळगता लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजे. सध्याच्या काळात हे सगळे लोक समाजमाध्यमांवर कार्यरत असतात. त्यामुळे त्यांच्यापर्यंत आपले म्हणणे आपण नक्कीच पोहोचवू शकतो. महाराष्ट्र अंनिस आणि परिवर्तन व्यसनमुक्ती संस्था याविषयी समाजमाध्यमांमधून एक मोहीम सुरू करत आहेत. ज्यांना वरील विचार योग्य वाटतात त्यांनी त्यामध्ये जरूर सहभागी व्हावे. क्रिकेटचे तारे ते तंबाखूजन्य पदार्थापासून होणाऱ्या हानीचे समर्थन करणारे लाभार्थी हे आपल्या आवडत्या खेळाडूंचे अध:पतन थांबवण्यासाठी आपण एवढे तरी करायलाच पाहिजे !

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why role model athletes advertise addictive foods like panmasala amy