मूळची बिहारची असलेली नेहा सिंग राठोड ही उत्तर प्रदेशमधली लोकप्रिय गायिका आहे. ती भोजपुरी भाषेमध्ये गाते. तिने गायलेल्या ‘यूपी में का बा?’ या गाण्याच्या दुसऱ्या सीझनने सध्या फक्त इंटरनेटवरच नाही तर उत्तर प्रदेशमध्येही धुमाकूळ घातला आहे. कोणत्याही लोकप्रिय गायकाचे गाणे अशा पद्धतीने प्रदर्शित झाले की सहसा त्याचे चाहते ते डोक्यावर घेतात. त्यातून होणाऱ्या मौखिक प्रसिद्धीतून इतरही लोक उत्सुकतेपोटी इंटरनेटवर जाऊन ते गाणे ऐकतात. त्यातून त्या गाण्याच्या हिट्स वाढतात आणि ते आणखी लोकप्रिय ठरत जाते. दर काही काळाने एखादे गाणे अशा पद्धतीने व्हायरल होत राहते.
याआधी उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांदरम्यान नेहा राठोडने ‘यूपी में का बा?’ हे गाणे गायले होते आणि त्यामधून उत्तर प्रदेश सरकारवर टीका केली होती. वाढती बेरोजगारी, हाथरस प्रकरण, लोकांचे वेगवेगळे प्रश्न यांचा त्या गाण्यात उल्लेख होता आणि ‘जिंदगी झंड बा, फिर भी घमंड बा’ अशी सरकारवर टीका करत त्या गाण्याचा शेवट करण्यात आला होता. त्याआधी बिहार निवडणुकीत नेहा ठाकूरने ‘बिहार में का बा’ हे गाणे प्रसारित केले होते. ते लगोलग व्हायरल झाले. त्यालाच उत्तर देणारे ‘बिहार मे इ बा’ हे मैथिली ठाकूरचे गाणेही गाजले होते. प्रसिद्ध अभिनेता मनोज वाजपेयी याने गायलेले ‘बम्बई में का बा’ हे रॅप प्रकारामधले गाणेही त्यानंतर चांगलेच लोकप्रिय झाले होते.
आता नेहा सिंग राठोडच्या ‘यूपी में का बा?’ हे दुसऱ्या सीझनचे गाणे नुसते लोकप्रिय आणि व्हायरल झाले नाही, तर त्यामुळे तर नेहा आणखी प्रकाशझोतात आली. वेगवेगळ्या टीव्ही वृत्तवाहिन्यांवर, समाजमाध्यमांमध्ये तिच्या मुलाखतींचा सपाटा सुरू झाला. पण हे सगळे मायबाप उत्तर प्रदेश सरकारच्या डोळ्यांवर आले आणि सरकारने ‘समाजात विद्वेष पसरवत असल्याचा’ आरोप करत नेहाला चक्क सात प्रश्न विचारणारी नोटीस पाठवून तीन दिवसांत उत्तर द्यायला सांगितले आहे.
नेहाचा नवरा हिमांशू सिंह औपचारिक पातळीवर हे गाणे कारणीभूत असल्याचे नाकारत असला तरी दिल्लीतील आयएएस अधिकारी घडवणाऱ्या कोचिंग क्लासमधली २०१८ पासून सुरू असलेली त्याची नोकरी तडकाफडकी गेली. या सगळ्याचा ताण येऊन नेहा ठाकूरला रुग्णालयात भरती व्हावे लागले. उपचार घेऊन ती घरी परतली असली तरी डॉक्टरांनी तिला ताण घेऊ नका असे सांगितले आहे. असे सगळे असले तरी नेहा राठोड उघडपणे सांगते आहे की ‘आपल्या राज्यघटनेने मला वाचन करण्याचे, लिखाण करण्याचे, मोकळेपणाने बोलण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. मग मी सरकार आणि पोलिसांना का घाबरू?’ ती असेही म्हणते की मी नेहमीच वेगवेगळ्या घटना आणि समस्यांवरची गाणी गाते. कानपूरमध्ये अतिक्रमणविरोधी कारवाईदरम्यान एका मायलेकीचा जळून मृत्यू झाला. बुलडोझर चालवून लोकांच्या घरांची मोडतोड करण्यात आली. यावर बोलायचेच नाही का? जे सरकार सत्तेवर आहे त्यालाच प्रश्न विचारले जाणार ना?
समाजवादी पक्षापासून आम आदमी पक्षापर्यंत उत्तर प्रदेशमधल्या सगळ्याच राजकीय पक्षांनी या प्रकरणाबाबत सरकारवर टीका केली आहे. समाजवादी पक्षाच्या अखिलेश यादव यांनी “यूपी में का बा, यूपी में झूठे मामले की बहार बा, यूपी में गरीब-किसान बेहाल बा, यूपी में मागास-दलित पर प्रहार बा, यूपी में व्यवसाय का बनताधार बा” असे गाणे ट्वीट केले आहे. ‘भाजप सरकार एका गायिकेला घाबरते का,’ असा प्रश्न ‘आप’ने विचारला आहे. तर दुसरीकडे अभिनेते आणि भाजपचे खासदार रवि किशन यांनी ‘यूपी में सब बा’ असे गाणे गाऊन सरकारच्या वतीने उत्तर दिले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही विधानसभेत या वादावर “‘यूपी में का बा’ असे विचारले जात आहे. अरे पण ‘यूपी में बाबा बा…’ बाकी काही नाही तर आम्ही इथे आहोत.” असे उत्तर दिले आहे.
या एका गाण्यावरून राजकीय घमासान माजावे असे त्या गाण्यात काय आहे, ते बघू या.
बाबा के दरबार में घर बार ढह रहे हैं…
मां-बेटी को आग में झोंका जा रहा है…
बुलडोजर से दीक्षित परिवार को रौंदा जा रहा है…
यूपी में का बा,
बाबा की डीएम तो बड़ी रंगबाज बा,
कानपुर देहात में ले आई राम राज बा…
बुलडोजर से रौंदते दीक्षित के घर बार बा…
यूपी में का बा…
या त्या गाण्यामधल्या काही ओळी आहेत. संपूर्ण गाण्यात उत्तर प्रदेशमधल्या काही प्रश्नांवर टिप्पणी आहे. ती अर्थातच सरकारविरोधी आहे. या टिप्पणीमुळे समाजात विद्वेष पसरू शकतो, असे तेथील सरकारचे म्हणणे आहे. उत्तर प्रदेश सरकारने नेहाला पाठवलेल्या नोटिशीत पुढील सात प्रश्न आहेत.
१- व्हिडीओमध्ये तुम्ही स्वतः आहात की नाही?
२- व्हिडीओमध्ये तुम्ही स्वतः असाल तर तुम्ही हा व्हिडीओ तुमच्या यूट्यूब चॅनल नेहा सिंह राठौर आणि ट्विटर अकाउंट @nehafolksinger वर अपलोड केला आहे की नाही?
३- नेहा सिंग राठौर चॅनल आणि ट्विटर अकाउंट @nehafolksinger तुमचे आहे की नाही? जर होय, तर तुम्ही ते स्वतः वापरता की नाही?
४- व्हिडीओमधील गाणे तुम्ही स्वतः लिहिले आहे? की कोणीतरी तुम्हाला दिले आहे?
५- हे गाणे तुम्ही लिहिले असेल तर ते तुम्ही प्रमाणित केले आहे की नाही?
६- हे गाणे दुसऱ्याने लिहिले असेल तर ते गाण्यासाठी तुम्ही गीतकाराची संमती घेतली आहे की नाही?
७- या गाण्याचा समाजावर होणारा परिणाम तुम्हाला माहीत आहे की नाही?
नेहाला पोलिसांनी २१ फेब्रुवारीला नोटीस पाठवली होती आणि तीन दिवसांत तिचे उत्तर द्यायला सांगितले होते. आपल्या नोटिशीला उत्तर मिळाले नाही तर पुन्हा नोटीस पाठवली जाईल असे पोलिसांचे म्हणणे होते. नेहाने मात्र यावर सांगितले आहे की मी नोटिशीला उत्तर देणार नाही. कारण प्रश्न विचारणे हे माझे काम आहे आणि ते मी करते आहे. मी यापुढेही प्रश्न विचारत राहणार. माझे प्रश्न हेच माझे उत्तर आहे.
तिच्या या भूमिकेमुळे ‘यूपी में का बा’ हे प्रहसन उत्तरोत्तर रंगत जाण्याचीच शक्यता आहे.