विजया जांगळे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘खरगेजीने ये लुइ विटाँ का स्कार्फ पहना है, ये कहाँ से आया, किसने इसके पैसे दिये, कितने का स्कार्फ है, इसकी भी जांच जॉइंट पार्लमेंटरी कमिटी करेगी क्या?…’ पीयूष गोयल संसदेत तावातावाने विचारत होते. हा स्कार्फ ५६ हजार ३३२ रुपयांचा असल्याचा दावा करण्यात आला. यापूर्वी तृणमूल काँग्रेसच्या महुआ मोइत्राही लुइ विटाँच्या बॅगवरून ट्रोल झाल्या होत्या. ‘महागाईवर चर्चा सुरू होताच कोणाची तरी लुइ विटाँची बॅग पटकन डेस्कखाली गेली,’ असं ट्वीट बीजेपीच्या नेत्याने केलं होतं. फ्रान्समधला हा लक्झ्युरी ब्रँड भारतात राजकारणाचा विषय का ठरतोय? असं काय आहे लुइ विटाँमध्ये?

जगातला सर्वांत मोठा, महागडा आणि प्रतिष्ठेचं प्रतीक असलेला हा लक्झुरी ब्रँड! स्वतःच एक मोठा ब्रँड असलेले सेलिब्रिटीसुद्धा आपली ब्रँड व्हॅल्यू वाढविण्यासाठी लुइ विटाँ मिरवताना दिसतात ते का? हा ब्रँड इथवर का आणि कसा पोहोचला याची कथा मोठी रंजक आहे. ती जशी एका घर सोडून पळून आलेल्या मुलाच्या जिद्दीची आहे तशीच फ्रान्स आणि एकंदर युरोपात घडत गेलेल्या स्थित्यंतरांचीही आहे.

घर सोडून पळून गेलेला लुइ

या मल्टी मिलयनीअर ब्रँडची गोष्ट सुरू होते फ्रान्समधल्या एका छोट्याशा खेड्यातून. घरच्या शेतीत राबणारा, वडिलांना टोप्या तयार करण्यात मदत करणारा, सावत्र आईच्या जाचाला कंटाळलेला लुइ तेराव्या वर्षी घर सोडून पॅरिसच्या दिशेने निघाला. पोट भरण्याच्या खटाटोपात वाटेत भेटणाऱ्या कारागिरांकडून दगड, कापड, धातू, लेदरपासून वस्तू तयार करण्याचं कसब त्याने अवगत केलं. १८३७ मध्ये पॅरिसमध्ये पहिली रेल्वे धावली. उद्योगांना चालना मिळू लागली. प्रवास वाढला आणि बॅगांची मागणीही वाढली. कलांचं माहेरघर असलेल्या फ्रान्समधून पेंटिंग्ज, फर्निचर आणि अन्य शोभिवंत वस्तू अन्यत्र नेण्यासाठी विविध प्रकारच्या बॅगांची गरज भासू लागली. लुइकडे विविध माध्यमांत काम करण्याचा अनुभव होता. त्याने या व्यवसायात येण्याची तयारी सुरू केली.

एका बॅगांच्या कारखान्यात त्याने नोकरी मिळवली. त्याचं काम पाहून फ्रान्सच्या राजघराण्याने त्याला त्यांचा खासगी ‘बॉक्स मेकर’ म्हणून नेमलं. वर्षभरात म्हणजे त्याने स्वतःचं दुकान उघडलं. त्या काळातल्या लेदरच्या बॅगा जड, कळकट, पावसात टिकाव न धरणाऱ्या होत्या. पावसाचं पाणी वाहून जावं म्हणून त्यांचं झाकण खालच्या दिशेने वळवलं जात असे. या वळवण्याच्या प्रक्रियेत बॅगचा पृष्ठभाग फुगीर होत असे. अशा बॅगा ट्रेनच्या बोगीत एकावर एक रचणं कठीण होई. लुईने लेदरऐवजी कॅन्व्हासपासून बॅग तयार करण्यास सुरुवात केली. या बॅगा हलक्या, पावसातही लेदरपेक्षा चांगल्या टिकणाऱ्या होत्या. मुख्य म्हणजे त्या एकावर एक सहज रचता येत. लेदरपेक्षा स्वच्छ आणि सुंदर दिसणाऱ्या या बॅगा अल्पावधीत लोकप्रिय झाल्या.
व्यवसायविस्तार

या व्यवसायात स्थान पक्कं केल्यावर लुइचं लक्ष हँडबॅगकडे गेलं. कुरूप, इजा करणाऱ्या म्हणून नाकारल्या गेलेल्या या प्रकाराला त्याने आकर्षक आणि वापरास सुलभ डिझाइनने चांगले दिवस दाखवले. लगेजच्या बॅगला ट्रेजर चेस्टचं रूप दिलं. कुलपात सुधारणा करून बॅग अधिक सुरक्षित केली. व्यवसाय बहरत असतानाच फ्रँको पर्शियन युद्ध सुरू झालं. काही काळ निर्वासितांसारखं राहावं लागलं. मात्र युद्ध संपताच लुइने संकटाचं संधीत रूपांतर केलं. अधिक उच्चभ्रू भागात शोरूम सुरू करून त्याने नुकत्याच सुरू झालेल्या छपाई तंत्राच्या साहाय्याने आपल्या बॅगांचं वेगळेपण अधोरेखित केलं, ते कायमचंच. त्याने व्यवसाय इंग्लंडपर्यंत विस्तारला. लुइच्या निधनानंतर त्याचा मुलगा जॉर्जने धुरा सांभाळली. आज या ब्रँडची ओळख ठरलेलं लुइ विटाँचा लोगो असलेलं आणि प्रचंड ब्रँड व्हॅल्यू असलेलं डिझाइन त्यानेच तयार केलं. त्याने अमेरिकेत पाऊल रोवलं.

हिटलर कनेक्शन

दुसऱ्या महायुद्धाने पुन्हा व्यवसाय संकटात आला. एवढा की ब्रँडने जर्मन हुकूमशहाशीही जुळवून घेण्याची तयारी दर्शवली. युद्धकाळात जेव्हा सर्व दुकानं बंद ठेवावी लागत, तेव्हा केवळ लुइ विटाँ सुरू असे. त्यावरून आजही या ब्रँडला टीका सहन करावी लागते.

घड्याळं, दागिने, परफ्युम्स…

लुइच्या चौथ्या पिढीने रिटेल बाजारात पाऊल ठेवत आशियापर्यंत मजल मारली. त्यानंतर अवघ्या सहा वर्षांत कंपनीच्या उत्पादनांची वार्षिक विक्री दोन दशलक्ष डॉलर्सवरून २६० दशलक्ष डॉलर्सपर्यंत पोहोचली. पुढच्या पिढ्यांनी बॅगांबरोबरच घड्याळं, दागिने, पादत्राणं, सनग्लासेस आणि परफ्युमचंही उत्पादन सुरू केलं आणि ही उत्पादनंही प्रचंड लोकप्रिय झाली. आज कंपनीचं मूल्य ४३२ बिलियन डॉलर्स एवढे अवाढव्य आहे.

असं आहे काय या ब्रँडमध्ये?

लुइ विटाँची उत्पादनं अतिशय महाग असतात आणि तरीही त्यांना प्रचंड मागणी असते याचं सर्वांत मूलभूत कारण म्हणजे त्यांनी गेल्या पावणेदोन शतकांत निर्माण केलेली विश्वासार्हता. दर्जा, उपयुक्तता, सुरक्षितता, नावीन्य यात या ब्रँडने जपलेलं सातत्य अनन्यसाधारण आहे. अतिशय उत्तम कच्चा माल वापरून, उत्पादनांच्या सर्व नियमांचं काटेकोर पालन करून या पूर्णपणे निर्दोष वस्तू ग्राहकाला अक्षरश: पेश केल्या जातात. खरेदी हासुद्धा एक खास अनुभव ठरेल याची काळजी घेतली जाते. शोरूममध्ये प्रवेश करताच ग्राहकाला आपण खूप विशेष असल्याचा अनुभव येईल अशी सजावट असते, त्याला उत्पादनाविषयी पुरेपूर माहिती मिळेल, उत्पादनाचं पॅकेजिंग उत्तम असेल याचीही पुरेपूर काळजी घेतली जाते. ग्राहकाला खरोखरच ‘राजा’ असल्याची अनुभूती दिली जाते. आणि त्यासाठी मोठी किंमत मोजायला तो तयार असतो.

एवढं महाग का?

लुइ विटाँच्या काही बॅग्ज या एक लाख डॉलर्सपेक्षाही अधिक किमतीच्या आहेत. यातील काहींचे खास व्यक्तींसाठी मर्यादित संख्येत उत्पादन करण्यात येते. त्या खुल्या बाजारात उपलब्धच नसतात. लुइ विटाँच्या शूजची किंमत साडेतीन लाख डॉलर्सपर्यंतही आहे. एवढीशी बॅग आणि लाख डॉलर्स? शूजसाठी एवढे पैसे? हे प्रश्न स्वाभाविक आहेत.

इथे येणाऱ्या प्रत्येक कारागिराला साधारण दोन वर्षं प्रशिक्षण दिलं जातं आणि त्यातून सर्वोत्तम तेवढेच निवडले जातात. लुइ विटाँचा कर्मचारी हे जगभर अभिमानास्पद बिरुद असतं. उत्पादनाचं आऊटसोर्सिंग केलं जात नाही. फ्रान्स, इटली, स्पेन आणि अमेरिकेव्यतिरिक्त कुठेही उत्पादन केलं जात नाही. एक वस्तू शोरूममध्ये येण्यापूर्वी तिच्या दर्जाविषयी तब्बल ३०० स्तरांवर खातरजमा करून घेतली जाते. ब्रँडचा यंत्रांपेक्षा मानवी कलात्मकतेवर भर आहे. त्यामुळे उत्पादनाचा फारच कमी भाग यांत्रिक पद्धतीने होतो. शिवणे, ठोकणे, रंगवणे अशा सर्व गोष्टी हातांनी केल्या जातात. बॅगांमध्ये अतिशय महागड्या पण टिकाऊ लेदरचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. कॅन्व्हास बॅगमध्येही हे लेदर वापरलेले असते. कुलूप, साखळ्या तयार करण्यासाठी गोल्डन ब्रास या टिकाऊ धातूचा वापर केला जातो. १८व्या शतकापासून आजवर हा ब्रँड केवळ आणि केवळ श्रीमंतांचाच ब्रँड म्हणून ओळखला जातो. या वस्तूंभोवतीच्या वलयापुढे किंमत हा अगदी गौण मुद्दा ठरतो. वारंवार वापरल्यानंतरही ही उत्पादने नवीकोरी दिसतात. पाणी आणि आगीपासून सुरक्षित असतात.

आपली खासियत जपण्याचा आग्रह

लुइ विटाँचा कधीही सेल लागत नाही किंवा डिस्काऊंटमध्ये विक्री होत नाही. हा ब्रँड समोर एक निश्चित लक्ष्य ठेवून उत्पादन करतो. ते गाठल्यानंतर उत्पादन बंद केलं जातं. त्यामुळे बहुतेक उत्पादनांसमोर ‘आऊट ऑफ स्टॉक’चं लेबल अल्पावधीत झळकू लागतं. याचा ग्राहकांवर होणारा मानसिक परिणाम म्हणजे, ते उत्पादन लवकरात लवकर मिळवण्याची स्पर्धा लागते. विक्रीचं लक्ष्य गाठल्यानंतर उर्वरित स्टॉक हा केवळ कर्मचाऱ्यांसाठी सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिला जातो. मात्र सवलतीत खरेदी करून तो अन्यत्र विकला जाणार नाही, याची खबरदारीही घेतली जाते. यातलं प्रत्येक उत्पादन नेमकं कोणाला विकलं किंवा कोणी कोणाला भेट देण्यासाठी खरेदी केलं याची नोंद कंपनीकडे असते. सवलतीत विकत घेऊन कोणी इतरांना विकण्याचा प्रयत्न केल्यास भरभक्कम दंडाची तजवीज आधीच केलेली असते.

नक्कल कराल तर परिणाम भोगाल

आपल्या उत्पादनांची नक्कल होऊ नये म्हणून कंपनी अतिशय सजग असते. ब्रिटनी स्पिअर्सच्या म्युझिक अल्बममध्ये दाखवण्यात आलेल्या गाडीच्या डॅशबोर्डवरील डिझाइनचं आपल्या चेरी ब्लॉसम डिझाइनशी साधर्म्य असल्याचा दावा लुइ विटाँने केला होता. हा खटला कंपनीने जिंकला. ‘सोनी बीएमजी’ आणि ‘एम टीव्ही’ला या गाण्याचं प्रक्षेपण बंद करावं लागलं आणि दोन्ही समूहांना प्रत्येकी ८० हजार पाऊंड्सचा दंड भरावा लागला. हाँगकाँगमधील एका दुकानाने एस-लॉकची नक्कल केल्याचा आणि एका केशकर्तनालयातील खुर्चीवर आपल्या चौकडींच्या पॅटर्नचा वापर केल्याचा दावा ब्रँडने केला होता. हे दोन्ही दावे कंपनी जिंकली. दिल्लीतल्या सदर बाजारातल्या एका बॅग विक्रेत्यालाही नुकताच नक्कलप्रकरणी पाच लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

बॅगचं काम आहे साहित्य सांभाळणं. एरव्ही हजारभर रुपयांची बॅगसुद्धा तेच काम करते. बरी टिकते, चार दिवस छानही दिसते. असले महागडे ब्रँड हवेत कशाला, असं वाटणं स्वाभाविक आहे. तो ज्याच्या त्याच्या प्राधान्यक्रमाचा, जीवनशैलीचा आणि अभिरुचीचा मुद्दा. पण ब्रँड कसे घडतात, त्यामागे किती पिढ्यांची चिकाटी असते आणि जगाच्या कोणत्या तरी एका कोपऱ्यातल्या कंपनीची चर्चा जगभर का आणि कशी होते, हे जाणून घेणं निश्चितच रंजक आहे.

vijaya.jangle@expressindia.com