राहुल तांबोळी

मथळा वाचून बहुतेकांना वाटू शकेल, की भाजप व शिंदे यांच्या शिवसेनेसोबत जाण्याच्या अजित पवार यांच्या भूमिकेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीच फूस, आशिर्वाद, पाठबळ आहे का? तर तसे अजिबात म्हणायचे नाही. मात्र शरद पवारांनी आजपर्यंत विविध प्रसंगी व आताही घेतलेल्या भूमिका काही आमदार अजित पवारांसोबत जाण्यास कशा कारणीभूत आहेत, याची नोंद घेणे आवश्यक ठरते.

prince narula yuvika chaudhary lohri celebration with daughter
सोशल मीडियावरील मतभेदानंतर ‘बिग बॉस’ फेम जोडपे प्रथमच दिसले एकत्र; लेकीसह साजरी केली लोहरी, फोटो आले समोर
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
friend beaten , loan , Pune, Bhosari, pune news,
पुणे : उसने दिलेले पैसे परत मागितल्याने मित्राला लाकडी दांडक्याने मारहाण
sharad pawar slams amit shah news in marathi
देशाचे पहिले तडीपार गृहमंत्री! शरद पवारांचा अमित शहांवर प्रतिहल्ला
cm Devendra fadnavis loksatta
महाकालीचे दर्शन शुभसंकेत, ठरवल्यापेक्षा मोठे काम होणार – फडणवीस
NCP Sharad Pawar Group Politics
NCP : ‘प्रदेशाध्यक्षांसह सर्वांचे राजीनामे घ्या’, शरद पवारांसमोरच कार्यकर्त्याची जयंत पाटलांच्या राजीनाम्याची मागणी, नेमकं काय घडलं?
Image of Ajit Pawar
Ajit Pawar : “पक्ष वगैरे न बघता…” धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांची मोठी प्रतिक्रिया
Anna Bansode statement over Sharad Pawar praise RSS
शरद पवारांनी संघाचे कौतुक करताच अजित पवारांच्या ‘या’ आमदाराने व्यक्त केली खंत, म्हणाले…

फार मागे जाण्याची गरज नाही, २०१९ ला पहाटेचा किंवा सकाळचा जो शपथविधी झाला तो खरा महाभूकंप होता. आता अजित पवार भाजप व शिंदें सेनेसोबत गेल्यानंतर बसलेल्या धक्क्यापेक्षाही तो धक्का मोठा होता. आता समाजमाध्यमांवर अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यासह संबंधित राजकीय नेते, पक्ष अगदी माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यापर्यंत अनेकांची जी टिंगल टवाळी झाली तेवढी ती तेव्हा लगोलग सुरूही झाली नव्हती. यावरून तेव्हाच्या त्या धक्क्याची कल्पना यावी.

त्या शपथविधीला सुरुंग शरद पवारांनीच लावला आणि ती औटघटकेची भाजप- अजित पवार युती नष्ट केली. त्यावेळी अजित पवारांबरोबर जे काही मोजके नेते गेले होते ते लगोलग माघारीही फिरले. विशेष म्हणजे तेव्हा अजित पवारांसोबत ना भुजबळ होते, ना वळसे पाटील, ना तटकरे, ना पटेल. मात्र २०१९च्या बंडाआधी पडद्याआड जे झाले होते ते शरद पवारांनी दडवून ठेवले. बंड मोडून काढल्यानंतर त्यांनी जी भूमिका घेतली, तीच अजित पवार यांचे बळ वाढवणारी ठरली.

अजित पवार यांचे बंड तेव्हा अवघ्या ४८ तासांत मोडून निघाले होते. अजित पवार खरे व्हिलन ठरले होते ते तेव्हा. मात्र जेव्हा उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात अजित पवार यांनाच उपमुख्यमंत्री करण्यात आले आणि अजित पवारांच्या तेव्हाच्याही बंडात आघाडीवर असणाऱ्या धनंजय मुंडे यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले, तेव्हा मात्र अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. बंड मोडीत निघाल्यानंतर अजित पवार सिल्व्हर ओकवर शरद पवार यांना भेटायला गेले आणि सारे काही आलबेल झाले.

ठाकरे सरकारमधील राष्ट्रवादीचे कारभारी अजित पवारच झाले आणि पुढील अडीच वर्षे सोबत गेलेल्या आणि न गेलेल्या आमदारांना दररोज सामना करावा लागला तो अजित पवार यांचाच. आधीच म्हटल्याप्रमाणे २०१९ मध्ये खरा महाभूकंप घडवूनही अजित पवार यांच्यावर कोणतीच कारवाई झाली नाही उलट त्यांनाच उपमुख्यमंत्रीपद देऊन शरद पवार यांनी जी भूमिका घेतली ती अनेकांना कोड्यात टाकणारी होती. अजित पवार यांची नाराजी ओढवून घेण्याची वेळ २०१९ च्या बंडात अजित पवारांसोबत न गेलेल्या अनेकांवर आली.

नंतरच्या कालावधीत वारंवार स्पष्ट होत राहिले, की अजित पवार आज ना उद्या भाजपसोबत जाणारच. अशा परिस्थितीत अजित पवार तयारी करण्यावाचून राहिले असतील का? ही तयारी करताना २०१९ मध्ये सोबत न आलेल्या आमदारांना ते खासगीत सुनावत राहिले. त्यामुळेच २०२३ मध्ये त्यांनी पुन्हा दिवसाढवळ्या उजळमाथ्याने उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा त्यांच्या पाठीमागचे संख्याबळ वाढल्याचे दिसून आले.

मागच्या वेळी बंड करूनही अजित पवारांवर कोणतीही कारवाई झाली नाही. आताही अजित पवारांबरोबर गेलो नाही तर त्यांची नाराजी ओढवून घ्यावी लागेल आणि पुन्हा बंड मोडले तरी अजित पवार यावेळी कदाचित मिठाई घेऊन जातील आणि आपले स्थान कायम राखतील. तेव्हा त्यांच्याशी पंगा नको याच भावनेने अनेक आमदार सोबत गेले असावेत.

ईडीचा चटका बसल्यामुळे पवार साहेबांचे लोढणे झिडकारून भाजपच्या दावणीला जाणारेही आहेत. मात्र ते ४०च्या तुलनेत मोजकेच आहेत. शरद पवार हे अजित पवार यांच्याबाबत तेव्हा कठोर झाले नाहीत, म्हणूनच आत्ता अजित पवारांची पाठराखण करणाऱ्या आमदारांचे संख्याबळ वाढले. शरद पवार यांनी आताही कठोर होणार असल्याचा विश्वास आमदार, कार्यकर्त्यांना दिला नाही तर सोबत गेलेले आमदार अजित पवारांपासून परत फिरताना दहादा विचार करतील हे नक्की.

अजित पवार यांच्याशी रोज येणारा संबंध, पक्षीय पातळीवर नेते म्हणून त्यांचा असणारा वचक, प्रत्येक मतदारसंघातील त्यांचे नेटवर्क यामुळेच पुन्हा काका- पुतणे, बहीण- भाऊ एक झाले तर अजित पवारांचा रोष नको यासाठीच अनेक आमदार अजित पवार यांच्यासोबत गेले. त्यांना परत आणायचे असेल तर अजित पवार यांना राष्ट्रवादीच्या कुटुंबात अजिबात स्थान राहणार नाही, असे छातीठोकपणे सांगण्याची गरज आहे. त्याशिवाय त्या आमदारांमध्ये आणि पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये विश्वासच निर्माण होणार नाही.

अशा ठाम भूमिकेची गरज असताना खा. सुप्रिया सुळे म्हणतात, की मी दादाशी भांडूच शकत नाही. तो आयुष्यभर माझा भाऊच राहणार. शरद पवार साताऱ्यात म्हणतात, अजित काय परका आहे का? आणि आ. रोहित पवार म्हणतात, ते भेटले तर मी त्यांच्या पायाच पडणार आहे. राजकारण म्हणजे वैर नाही. व्यक्तिगत संबंध राखलेच पाहिजेत. मात्र ते जाहीरपणे वेशीवर मांडण्याची ही वेळ नाही हे ताईंना सांगायला हवे. तुम्ही एक राहणार मग खाली पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी का वेगळे व्हायचे? आत्ता प्रेम नाही, कठोर भूमिका दिसणे आवश्यक असताना विविध वक्तव्यांतून पवार कुटुंबियांचे अजित पवार यांच्याबाबतचे प्रेम असे ऊतू जायला लागले तर अजित पवारांशी वैर ओढावून घेताना बाकीचे विचार करणारच. तोच विचार करून अजित पवारांच्या पाठीमागे आमदारांचे आश्यर्चकारक संख्याबळ एकवटले आहे. ते कमी करायचे असेल तर अजित पवार यांना यापुढे पक्षाचे दरवाजे कायमचे बंद राहतील, असे ठणकावून सांगावे लागेल.

देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेचा शपथविधी शरद पवार यांच्याच आशिर्वादाने झाला असे सांगून, आणि तेव्हा नाही… नाही… म्हणणाऱ्या शरद पवारांकडून पुढे मात्र ते वदवून घेऊन खळबळ उडवून दिली. शरद पवार आधी नाहीच म्हणत होते. नंतर मात्र त्यांनी ती गुगली होती असेे सांगितले. तसे असेल, तर शरद पवारांनी गुगली टाकण्याच्या नादात भाजपसोबतच्या सत्तेला फारतर छोटेसे छिद्र पाडले असेल. मात्र अजित पवारांनी त्याचाच फायदा घेऊन ते छिद्र मोठे करून त्यातून सत्तेचा सोपान चढायचा प्रयत्न केला असेल त्यांनाच पूर्ण दोष जात नाही. अजित पवार यांना तेव्हाच्या बंडानंतर उपमुख्यमंत्रीपद दिले हे सत्य असले तरी, गुगली टाकली होती हे आता सांगावे लागणारे शरद पवार त्यावेळी मात्र गप्पच राहिले होते. परिणामी अजित पवारांच्या पदरी गेली साडेतीन वर्षे अवेहलनाच आली.

‘लोक माझे सांगाती’ या राजकीय आत्मचरित्रात (त्या पुस्तकावरच राजकीय आत्मचरीत्र असे म्हटले आहे.) या गुगलीबाबत चकार शब्दही नाही. आत्मचरित्रात सत्यकथनाची अपेक्षा असते. अगदी किरकोळ अपवाद वगळता इतर आत्मचरित्रांत ती फोलच ठरते. मात्र ज्या अहंभावाने शरद पवार यांनी ‘लोक माझे सांगाती’मध्ये उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेकांच्या उणिवा दाखवल्या, त्याचप्रमाणे त्यांनी २०१९ चे बंड कसे मोडून काढले हे सांगताना त्यापूर्वी गुगली कशी टाकली हेही सांगायला हवे होते. ते त्यांनी टाळले असले तरी फडणवीसांनी त्यांच्याकडून ते वदवून घेतल्याने ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाला राजकीय आत्मचरित्र म्हणण्याऐवजी राजकीय आठवणी असे म्हणायला हवे.

हे सर्व सांगण्यामागे, अजित पवारांचे समर्थन करण्याचा प्रयत्न अतिबात नाही. किंबहुना त्यांनी ६३व्या वर्षी केलेली ही घोडचूक म्हणूनच इतिहासात नोंद होईल. ७५ हजार कोटींचा सिंचन घोटाळा आरोप मागेच बासनात निघाला आहे. जरंडेश्वर कारखान्यावर ते येतच असतात, तेथील निर्णय तेच घेत असतात. यापुढे ते जरंडेश्वर कारखान्यावर उघडपणे येतील, एवढेच.

शरद पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले नाहीत, असे नाही. किंबहुना सर्वाधिक आरोप त्यांच्यावरच झाले. मात्र त्यांनी त्या सर्व आरोपांकडे दुर्लक्ष करत स्वत:चे स्थान निर्माण करण्यात, वर्चस्व कायम राखण्यात हयात खर्ची पाडली. ते काम त्यांनी अत्यंत कष्टाने, चिवटपणे केले. त्यामुळेच त्या आरोपांचा वाराही आता त्यांच्या आसपास नाही आणि राजकीय भीष्माचार्य म्हणूनच त्यांची प्रतिमा झळकत असते.

या उलट अजित पवार मात्र ईडीकडून कारवाई होईल या भीतीनेच गेले अशी लोकचर्चा बळकट होताना दिसते. शरद पवार यांना जेव्हा ईडीची नोटीस आली तेव्हा अजित पवार यांनी डोळ्यात अश्रू आणले होते. पत्रकार परिषद घेऊन राजकारण संन्यासाची भाषा करत नको हे राजकारण, जाऊन आता शेती करतो असा टाहो त्यांनी फोडला होता. डोळ्यात पाणी येण्यापर्यंत शरद पवारांबाबत त्यांना खरोखरच प्रेम असते तर या वयात शरद पवार यांना असा झटका ते कसा काय देऊ शकतात? किंबहुना शरद पवारांना नोटीस आली, आता पुढचा नंबर आपलाच या धास्तीने तर त्यांचा तो टाहो नव्हता ना? आणि त्याच धास्तीपोटी ते येतो येतो, आलोच आलोच म्हणत तर भाजप व शिंदेंच्या शिवसेनेसोबत गेले नाहीत ना? अनेकांना असे प्रश्न पडणे गैर नाही. अजित पवार पाचव्यांदा उपमुख्यमंत्री झाले. ही काही फार मोठी कौतुकाची गोष्ट नाही. अजित पवार यांना पाचव्यांदा देखील उपमुख्यमंत्रीच व्हायचे होते आणि त्यासाठीच त्यांनी एवढा सगळा गदारोळ माजवला असेल तर निश्चितच त्यांच्या या भूमिकेपाठी केवळ राज्याचे, राज्यातील शेतकरी, कष्टकरी वर्गाचेच हित आहे, हे कसे मानावे बरे?

अजित पवार यांना कधी ना कधी स्वतंत्र व्हायचेच होते. राजकीय संधी जरुर शरद पवारांमुळे मिळाली, मात्र बाकी मी माझ्या ताकदीवर, गुणवत्तेवर राजकारणात पुढे आलो आहे, हे त्यांचे बोल अनेकांनी ऐकले आहेत. प्रत्येक वेळी अजित पवारांचे मोजमाप शरद पवारांच्या पुण्याईवरच जोखले जात असल्याने ते कंटाळले होते. त्यामुळे तेही जोखड कधी ना कधी त्यांना झुगारायाचे हेाते का? तसे असेल तर मात्र ते झुगारताना भाजप सोबत जाण्याऐवजी स्वकर्तृत्वाची मोठी रेष ओढली असती तर कदाचित ते कर्तृत्व अधिक उजळून निघाले असते.

भूखंडापासून ते अगदी दाऊदशी असणाऱ्या संबंधांपर्यंत शरद पवार यांच्यावर आरोप झाले तरी त्याला उत्तर देत न बसता ते काम करत राहिले. पुरोगामी विचारांचा जप कायम केला. आपले नेतृत्व बहुश्रुत कसे राहील याची जाणीवपूर्वक काळजी घेतली. अगदी तरुण असल्यापासून ते देशाच्या राजकीय पटावर स्थान निर्माण करण्याचा, त्यासाठी संबंध जोडण्याचा, जपण्याचा प्रयत्न करत राहिले. म्हणूनच त्यांच्या पक्षाकडे एका हाताच्या बोटावर मोजण्याएवढेच खासदार असूनही त्यांना विरोधी आघाडीच्या एकजुटीत मानाचे स्थान आहे. समाजातील हरेक घटकांशी त्यांनी जाणीवपूर्वक संवाद जपला आहे. त्यातून त्यांच्या प्रतिमेच्या प्रेमात असणारा मोठा वर्ग आहे. शरद पवार सत्तेत असोत किंवा नसोत याचा फरक त्या मोठ्या वर्गाला पडत नाही. त्याच प्रेमातून, राजकारणातून निवृत्त झालेले शांतीलाल सुरतवाला यांच्यासारखे हजारो शरद पवारप्रेमी वारुळ फोडून आपल्या साहेबांच्या समर्थनार्थ बाहेर पडले. तर भाजपने अजित पवार यांना सोबत घेतले ही कडू गोळी शिस्तबद्ध संघ स्वयंसेवक आणि मूळ भाजप नेते कार्यकर्ते पचवायला तयार नाहीत.

एकनाथ शिंदे यांचे बंड झाल्यानंतर हेच अजित पवार विधिमंडळात आणि जाहीर सभांत दाखले देऊन सांगायचे, की बंड करून बाहेर गेलेले पुढच्या निवडणुकीत निवडून येत नाहीत. हे सांगताना ते छगन भुजबळ यांचेही नाव घ्यायचे. शिवसेना पक्ष, व धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच आहे. तरीही खरी शिवसेना कोणती याबाबत जी लोकभावना आहे तीच खरी राष्ट्रवादी कोणती याबाबतही आहे. एकनाथ शिंदे व त्यांच्यासोबत गुहावटीमार्गे विधिमंडळात आलेल्या सहकाऱ्यांना बंड केलेले पुढच्या निवडणुकीत निवडून येत नाहीत असे सुनावणाऱ्या अजित पवारांना आता स्वत:चे तेच बोल आठवत असतील का?

अजित पवारांच्या पाठीशी गेल्या वेळेपेक्षा आताचे आमदार संख्याबळ अधिक आहे हे खरे असले तरी पवारांची प्रतिमा, वय आणि एकूणच राज्याच्या राजकारणाचा खालावलेला स्तर पाहता, निवडणुकीच्या रणांगणात शरद पवार अजित पवारांना भारी पडतील. तेवढ्या कर्तबगारीची बेगमी शरद पवार यांच्या ठायी निश्चित आहे. ती बेगमी त्यांनी अनेक वादळे पचवून केली आहे. ती घरातूनच दिलेल्या आव्हानावेळी पुरेपूर वापरली जाणार हे नक्की.

Story img Loader