विजया जांगळे
इस्रायल- पॅलेस्टाइन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मॅकडोनाल्ड्सची आउटलेट्स ओस पडल्याची छायाचित्रे व्हायरल होत आहेत. स्टारबक्सचा बाजार गडगडल्याची वृत्ते येत आहेत. रोज कोणत्यातरी नव्या ब्रँडच्या जाहिरातींवरून वाद गाजत आहेत आणि बहिष्काराचे हॅशटॅग ट्रेण्ड होत आहेत. ग्राहकराजा आपल्या खिशातले मत कोणत्या तरी एका पारड्यात टाकून युद्धाची दिशा बदलू पाहत आहेत. या पार्श्वभूमीवर बहिष्कारामागची कारणे आणि त्याचे परिणाम जाणून घेणे, बहिष्काराचा उद्देश साध्य होतो का, कंपन्यांवर येणाऱ्या दबावामुळे देश त्यांची धोरणे बदलतात का हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. युद्धामुळे दरवेळी ब्रँड्सना फटकाच बसतो असेही नाही. युद्धातून काही ब्रँड्सना अच्छे दिन आल्याचीही उदाहरणे आहेत. काही ब्रँड्सचा तर जन्मच युद्धामुळे झाला आहे. युद्ध आणि ब्रँड्सच्या परस्पर संबंधांचा प्रवास विचारप्रवृत्त करणारा आहे…
स्टारबक्स
युद्धविषयक भूमिकेचा सर्वांत मोठा फटका बसलेला ब्रँड म्हणजे स्टारबक्स. या कंपनीच्या कामगार संघटनेने पॅलेस्टाइनला पाठिंब दर्शविणारे ट्विट केले आणि कंपनीने संघटनेविरोधात खटला दाखल केला. याचे पडसाद जगभर उमटले आणि बॉयकॉट स्टारबक्स हा हॅशटॅग ट्रेण्ड होऊ लागला. या बहिष्काराचा कंपनीला मोठा आर्थिक फटका बसला. सलग १२ सत्रांत स्टारबक्सचे समभाग गडगडले. कंपनी लिस्ट झाल्यापासून प्रथमच सलग एवढा प्रदीर्घकाळ ही घसरण कायम राहिली. १९ दिवसांत समभागांचे मूल्य ८.९६ टक्क्यांनी घटले, तर कंपनीचे एकूण मूल्य तब्बल ९.४ टक्क्यांनी घसरले.
मॅकडोनाल्ड्स
युद्ध सुरू झाल्यानंतर काही दिवसांत मॅकडोनाल्ड्सच्या इस्रायलमधील फ्रंचायझीने पॅलेस्टाइनमध्ये लढा देणाऱ्य शेकडो जवानांना मोफत जेवण देण्याची घोषणा केली आणि ती मॅकडोनाल्ड्स ब्रँडला प्रचंड महागात पडली. लेबनॉन, सौदी अरेबिया, टर्की, मोरोक्को, मलेशिया, जॉर्डनमध्ये याचे तीव्र पडसाद उमटले. एरवी ग्राहकांनी ओसंडून वाहणारी रेस्टॉरन्ट्स ओस पडली. या तोट्यातून बाहेर पडण्यासाठी आणि ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी काही इस्लामबहुल देशांत मॅकडोनाल्ड्सच्या अनेक पदार्थांवर सवलत देण्यात येत आहे. मॅक फ्लरी, आइस्क्रीम कोन, काही सॉफ्ट ड्रिंक्स, चिकन नगेट्स सारख्या पदार्थांवर ५० ते तब्बल ३५० रुपयांपर्यंतची (भारतीय चलनात) सूट देण्यात येत आहे.
डिओर
लझ्युरी फॅशन ब्रँड डिओरने नोव्हेंबरमध्ये एक हॉलिडे कॅम्पेन केले. डिओरची ब्रँड ॲम्बेसिडर सुपर मॉडेल बेला हदिद होती. मात्र कॅम्पेनमध्ये इस्रायली मॉडेल मे टॅगरचा चेहरा झळकला आणि समाजमाध्यमांत डिओरवर येथेच्छ टीका होऊ लागली. बेला हदिदचे वडील पॅलेस्टिनी आहेत. त्यामुळे तिने समाजमाध्यमांवर पॅलेस्टाइनला ठामपणे पाठिंबा दिला होता. त्यानंतर आलेल्या या कॅम्पेनमध्ये तिच्याऐवजी इस्रायली मॉडेल दिसल्यामुळे डिओर इस्रायल समर्थक असल्याचा दावा करत अनेकांनी या ब्रँडवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले. यावर डिओरचे स्पष्टीकरण असे की, बेला हदिदशी झालेला करार संपुष्टात आला होता आणि याआधीही मे टॅगरने या ब्रँडसाठी हॉलिडे कॅम्पेन्स केली होती. त्यामुळे या कॅम्पेनचा युद्धाशी काहीही संबंध नाही. मात्र व्हायचे ते नुकसान झालेच.
जारा
डिओर प्रमाणेच जारा या क्लोदिंग ब्रँडचेही ॲड कॅम्पेन वादात सापडले होते. त्यात हात किंवा पाय मोडलेल्या आणि पांढऱ्या वस्त्रात गुंडाळलेल्या मॅनिक्विन्सचा वापर करण्यात आला होता. या जाहिराती जाराच्या संकेतस्थळावर आणि ॲपवर अपलोड करण्यात येताच टीकेची झोड उठली. ही दृश्ये गाझापट्टीतील हिंसाचाराची खिल्ली उडविणारी असल्याच्या प्रतिक्रिया उमटल्या. इन्स्टाग्रामवर बॉयकॉट जारा हा हॅशटॅग ट्रेण्ड होऊ लागला आणि त्यानंतर जाराने दिलगिरी व्यक्त करत, या जाहिराती डीलिट केल्या. जाहिरातींचे चित्रिकरण युद्ध सुरू होण्यापूर्वीच झाले होते, त्यामुळे त्यांचा पॅलेस्टाईनशी काहीही संबंध नाही, असे स्पष्टीकरण जाराने दिले.
मार्क्स अँड स्पेन्सर्स
या लझ्युरी ब्रँडने ख्रिसमिसनिमित्त केलेल्या जाहिरातीत कागदी टोप्या (सान्ताक्लॉज कॅप) जळतानाचे दृष्य होते. या टोप्यांची रंगसंगती पॅलेस्टाइनच्या राष्ट्रध्वजाशी मिळती जुळती असल्याने ही जाहिरात पॅलेस्टाइनविरोधी असल्याची टीका झाली. त्यात भर पडली ती मार्क्स अँड स्पेन्सर्सचे मूळ अंशतः ज्युइश असल्याची.
अन्य अमेरिकी कंपन्या
अमेरिकेच्या सरकारचा इस्रायलवर वरदहस्त असल्याचा फटका अन्यही अनेक अमेरिकी कंपन्यांना बसला. केएफसी, पिझ्झा हट, बर्गर किंग, कोका-कोला, पेप्सीसारख्या कंपन्यांच्या उत्पादनांवर बहिष्काराचे आवाहन करण्यात आले आहे. गुगल आणि ॲमेझॉनलाही इस्रायली सरकारला आणि संरक्षण दलांना सेवा पुरविल्यामुळे टीकेचे धनी व्हावे लागले आहे. इस्रायलला कोणत्याही प्रकारची मदत किंवा पाठिंबा हे वांशिक संहाराचे समर्थन असल्याची भावना जगातील अनेक देशांत निर्माण झाली आहे.
युद्धांचा लाभ झालेल्या कंपन्या
कंपन्यांना युद्धाचा फटका बसणे नेहमीचेच आहे, मात्र काही उत्पादने युद्धामुळे आणि युद्धकाळातच उदयास आली. फॅन्टा हे अशा उत्पादनांपैकी एक लक्षणीय उदाहरण. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जर्मनीत कोक सिरप मिळेनासे झाले. त्यावेळी त्याला पर्याय म्हणून उपलब्ध फळांची सिरप्स वापरून फँटा तयार झाला. हे उत्पादन लोकप्रियही झाले. तेव्हा फँटा हे नाझींचे पेय म्हणून ओळखले जाऊ लागले. आज आपण जे फॅन्टा पितो त्याचा उदय मात्र इटलीत झाला. त्याचा याच्याशी संबंध नाही. फोक्स वॅगन कंपनीची कथाही अशीच. युद्धकाळात स्वस्त कार उपलब्ध करून देण्यासाठी ही कंपनी स्थापन झाली. आज ती आघाडीच्या कंपन्यांपैकी एक आहे. आताही इजिप्तमध्ये अमेरिकन शीतपेयांवर बहिष्कार घालण्यात आला आहे. याबहिष्काराचा लाभ स्पॅथिस या स्थानिक शीतपेयाला झाला आहे. पूर्वी ज्या दुकानांत या शीतपेयाचे पाच बॉक्स आठवड्याभरात विकले जात होते, तिथेच आता दिवसाला ५० बॉक्स हातोहात खपत आहेत.
बहिष्काराचा उद्देश सफल होतो का?
कंपन्यांचे आणि पर्यायाने संबंधित देशाच्या अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान व्हावे आणि सरकारवर युद्ध थांबविण्यासाठी दबाव टाकता यावा, हाच या साऱ्या खटाटोपामागचा उद्देश असतो. पण त्याचा काही परिणाम होतो का, याचा हिशेब मांडणेही गरजेचे आहे. आजवरचा इतिहास पाहता, कंपन्यांचे तात्कालिक नुकसान होते, मात्र त्यामुळे सरकार झुकले आणि युद्ध थांबले असे अद्याप झालेले नाही.
रशियाने युक्रेनवर लादलेले युद्ध हे याचे नजिकच्या काळातील उदाहरण. रशियाने हल्ला केल्यानंतर रशियन कंपन्याच नव्हे, तर रशियाच्या सरकारवरही आंतरराष्ट्रीय स्तरावर बरेच निर्बंध (सँक्शन्स) घालण्यात आले, मात्र वर्ष उलटले तरीही युद्ध थांबण्याची चिन्हे नाहीत.
मुळात असे बहिष्कार अतिशय अल्पजीवी ठरतात. बॉयकॉट ॲमेझॉन असा हॅशटॅग ट्रेण्ड करणे जेवढे सोपे आहे, तेवढेच हा बहिष्कार अंगिकारणे कठीण. ग्राहकांना उत्पादन आणि सेवांची सवय लागलेली असते. फारच कमी ग्राहक तत्त्वांसाठी आपल्या सवयी सोडण्यास किंवा जास्त पैसे खर्च करण्यास तयार किंवा सक्षम असतात. शिवाय एक उत्पादन वा सेवा सोडायची, तर साधारण तसा दर्जा असणारे, तेवढ्याच किमतीतील पर्यायी उत्पादनही उपलब्ध असणे गरजेचे असते. तसे असेल, तर त्या पर्यायाला त्याचा लाभ होऊ शकतो, मात्र नसेल, तर बहिष्कार अल्पजीवी ठरतो.
२००५मध्ये डेन्मार्कमधील एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या व्यंगचित्रावरून बराच हलकल्लोळ माजला होता. मोहम्मद पैगंबरांविषयी उपरोधिक भाष्य करणाऱ्या या जाहिरातीमुळे मध्यपूर्वेतील देशांत असंतोष उसळला. मात्र डेन्मार्क सरकाने वृत्तपत्रावर कारवाई करण्यास नकार दिला. त्याचा परिणाम असा झाला की डॅनिश-स्वीडिश फूड ग्रुप- ‘अर्ला’ या ब्रँडच्या सर्व उत्पादनांवर त्या देशांत बंदी घालण्यात आली. मध्य-पूर्वेत तब्बल ४० वर्षे केलेल्या व्यवसायविस्तारावर कंपनीला पाणी सोडावे लागले. चार महिन्यांनी त्या वृत्तपत्राने माफिनामा छापला, मात्र त्याचा डेन्मार्कच्या अर्थकारणाला अजिबात फटका बसला नाही.
थोडक्यात, बहिष्कार घालणे ठीकच! आपली बाजू मांडण्याचा हा एक पर्याय ठरू शकतो, मात्र युद्ध थांबविण्याची क्षमतात त्यात नाही, हे निश्चित!
vijaya.jangle@expressindia.com