संपूर्ण भारत राममय झाला आहे. राम नामाची लाटच जणू उसळली आहे, असे राममय वातावरण आहे. असे असताना प्रभू श्रीरामाच्या नावे स्वतःलाही चमकवून घेण्याची संधी साधणार नाहीत ते नेते कुठले? यातही ज्यांना राजकीय पोळ्या भाजून स्वतःचा स्वार्थ साधायचा आहे त्यांची खरच कीव वाटते. ‘देव भावाचा भुकेला असतो,’ हे वाक्य आजपर्यंत अनेकदा ऐकले आहे. मात्र या वाक्याकडे सोयीस्करपणे कानाडोळा करणारे नेते आणि देवाप्रती भाव यांचा संबंध असेल का, असा प्रश्न पडल्याविना राहात नाही. रामभक्तांच्या स्वागत कमानी, बॅनर्स, होर्डिंग्ज लागले आहेत. काही ठिकाणी अनेक कंदील लावून परिसर सुशोभित केला आहे. पण यात लोकांना जे खटकते त्याला बगल न देता त्याचाही समावेश केलेला दिसत आहे- ते म्हणजे बॅनर्स इत्यादींवर नेत्यांची नावे, छायाचित्रे छापण्यात आली आहेत. मुळात यांच्या कुठल्याच शुभेच्छांची आवश्यकता नाही. नेत्यांनी शुभेच्छा दिल्या नाहीत म्हणून काही बिघडत नाही. जनता जाणून आहे की, राम मंदिर, राम यांविषयी कोणाला मनापासून आस्था आहे आणि कोण आस्थेची खोटी शाल घेऊन फिरत आहे! त्यामुळे कुठल्याच राजकीय पक्षाने एकमेकांवर शेरेबाजी न करता राममय वातावरणात मिठाचा खडा टाकण्याचे दुष्कर्म करू नये. एवढे केले तरी पुष्कळ मेहरबानीच म्हणावी लागेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्वतःची आणि पक्षातील प्रमुख नेत्यांची छायाचित्रे, नावे या कालावधीत कुठे झळकली नाहीत म्हणून लोक आपल्याला विसरतील की काय, या भीतीने पोटात गोळा येण्याचे काही कारण नाही. कारण लोकांचे लक्ष केवळ रामरायाकडेच एकाग्र असणार आहे. त्याच्या नावे राजकारण करणाऱ्या आणि हिंदुत्ववादी असल्याचा ढोंगीपणा करणाऱ्या नौटंकीबाजांना जनता ओळखून आहे. त्यामुळे रामनामाचे निमित्त करून आपल्याला चमकता येईल आणि त्यावरच लक्ष केंद्रित केलेल्यांवर टीका करून आपण काहीतरी वेगळे करत असल्याचे दाखवून लोकांचे लक्ष वेधता येईल या भ्रमात राहून उपयोग नाही.

हेही वाचा : शांतता, ऐक्याचा संदेश देणारा दिवस..

खऱ्या रामभक्तांना प्रसिद्धीशी काहीही देणेघेणे नसते. तसेच मोडतोड, हाणामारी, खोटा बडेजाव, इतरांवर दमदाटी, कोणत्याही प्रकारे दुसऱ्याची फसवणूक यांचा तर विचारही अजिबात स्पर्शत नाही. पण खोट्या हिंदुत्वाची शाल घेतलेलेच वर्तमान स्थितीत चमकून घेत आहेत. हिंदुत्व म्हणजे काय, हे जाणून घेण्याची इच्छा नसल्याने बेशिस्तपणा अंगी भिनला गेल्याने त्यांना वैचारिक बैठक राहिलेली नाही. हिंदुत्व म्हणजे राजकारण नव्हे आणि राजकारण म्हणजे हिंदुत्व नव्हे. हे समजून घेण्याची मानसिकता राहिलेली नाही. त्यामुळे त्यांच्याकडून होणारे कार्य केवळ वरवर आणि दिखाऊ असते. ते लोकांच्या पसंतीस पडत नाही. असे बेगडी हिंदुत्व नको. भक्तिमय वातावरणाचे राजकारण करून आनंदावर विरजण टाकू नये. आधीच राज्य आणि देशातील गलिच्छ राजकारणाचा लोकांना वैताग आला आहे. राममंदिराच्या निमित्ताने तरी या वातावरणात पालट व्हावा!

प्रभू श्रीराम, एकवचनी – सत्यवचनी होते. त्यांचे व्यक्तिमत्त्व आदर्शवत असेच होते. त्यांच्या या गुणांपासून बोध घेत त्यानुसार आचरण करण्याचा संकल्प करणे आवश्यक आहे. राजकीय उठाठेवी करण्यात वेळ वाया न घालवता प्रभू श्रीराम कसे होते याचा- त्यांच्या निर्णयांचा बारकाईने अभ्यास करून त्यानुसार आचरण ठेवणे अपेक्षित आहे. राममंदिराचा भव्यदिव्य सोहळा पार पडेल. पण आपले व्यक्तिमत्त्व प्रभू श्रीरामाप्रमाणे आदर्शवत करण्याचा विचार तरी या निमित्ताने केला जाईल का? अन्यथा हा सोहळा पार पडेल… पण आपली पाटी कोरीच राहील त्याचे काय?

हेही वाचा : सांस्कृतिक राष्ट्रवादाचे ‘रामकारण’!

भारत भूमीला अनेक आदर्शवत शासकांची मोठी परंपरा आहे. प्रत्येकाकडून शिकण्यास वाव आहे. पण शिकणाऱ्यांची संख्या किती आहे? याचे उत्तर शोधण्यासाठी विचार करावा लागणे, बुद्धीला ताण द्यावा लागणे यातच सर्व आले. आदर्शवत असणाऱ्या सूत्रांचे शिरोमणी असलेले प्रभू श्रीराम या भूमीत होऊन गेले आहेत. इतके आपले भाग्य थोर असताना त्याकडे दुर्लक्ष का ? अद्यापही वेळ – संधी गेलेली नाही. जी वर्तमान उपलब्ध वेळ आहे, तीच सुवर्ण संधी मानून तिचे सोने करण्याचा गांभीर्याने विचार झाला पाहिजे. आपल्या गुणांचे आचरण झालेले प्रभू श्रीरामांना निश्चितच आवडणार आहे. त्याप्रमाणे स्वतःत पालट करण्याच्या दृष्टीने प्रयत्न होताना दिसत नाहीत. ते झाले पाहिजे. तरच हा भव्यदिव्य सोहळा पार पडल्यावर भाव – भक्ती – शिस्त यांची अंतर्गत चेतना जागृत राहील आणि आज जो राजकारणाचा विचका झालेला पाहण्यास मिळत आहे. त्यापासून लोकांची सुटका होईल.

सुरुवात सत्ताधारी पक्षापासूनच हवी…

केंद्रातील सत्ताधारी पक्ष राममंदिर या विषयाला अनुसरून चर्चेत आहे. या निमित्ताने सांगावेसे वाटते की, त्यांनी आपल्या चिंतन शिबिरांतून नेते – पदाधिकारी – कार्यकर्ते यांच्याकडून रामायणाचा अभ्यास होण्याच्या दृष्टीने कृतीच्या स्तरावर प्रयत्न होण्यासाठी काय करता येईल, याची व्यवस्थित आखणी केली पाहिजे. भाव – भक्ती – शिस्त यांची मशागत करून मगच त्या भूमीवर लोकसेवेची पेरणी केली तर नक्कीच त्याचा अनुभव निराळा असेल. तो घेतला जावा. असे केले तर समाजातील लोकांतही तुमच्याकडून शिकण्याची जिज्ञासा जागृत होईल आणि तसा प्रतिसादही मिळू शकेल. आता केवळ राजकारण असल्याने सामान्य जनता सर्वच राजकीय पक्षांपासून अंतर राखून आहे. ‘सर्वच एकाच माळेचे मणी आहेत’ अशी धारणा बळावते आहे. हे चित्र पालटण्यासाठी प्रथम नेत्यांना स्वतःला पालटावे लागेल.

हेही वाचा : ..तेव्हा शिवसेना नसती तर? 

वादविवाद उत्पन्न होतील अशा प्रकारे टिप्पणी न करणे. कोणत्या टिपणी आणि त्या कोणी केल्या, हे लोकांना स्मरणात आहेत. त्याची उजळणी करण्याची आवश्यकता वाटत नाही. कारण पुन्हा मग मूळ सूत्रापासून लक्ष विचलित होऊ शकते. हे मूळ सूत्र म्हणजे रामायण या ग्रंथाद्वारे शिकणे आणि त्यानुसार आचरण करण्याचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करणे. याची जाणीव सतत कशी राहील, हे पाहणेही महत्त्वाचे आहे. कुरघोड्या करण्याचे राजकारण करून आणि भ्रष्टाचाराने बरबटलेले यांना सुरक्षित आश्रय देऊन किती मोठी घोडचूक करत आहोत, हे कळले पाहिजे आणि आगामी लोकसभा आणि विविध राज्यांच्या विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यांत ते थांबले पाहिजे. चुकीच्या मंडळींना सुरक्षित आश्रय देऊन आपण खरच प्रभू श्रीरामाचे नाव घेण्यास पात्र आहोत का, असा प्रश्न स्वतःला विचारावा. आगामी निवडणुकांचा काळ हा या दृष्टीने महत्त्वाचा असणार आहे .

अयोध्येत होणारी पर्यटनवाढ – त्यातून मिळणारा महसूल – भारतीय अर्थव्यवस्था सक्षम होण्यास हातभार लागणे हेही श्रेयस्कर असले तरी प्रभू श्रीरामाप्रमाणे आदर्श – सत्यवचनी – एकवचनी राहण्याची अग्निपरीक्षा कशी उत्तीर्ण केली जाते? की तिला बगल देत परीक्षाच दिली जात नाही. हे पाहणेही उत्सुकतेचे असणार आहे.

jayeshsrane1@gmail.com

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will our leaders give agni pariksha of truthfulness and singularity css
Show comments