नीरज चोप्राची सुवर्णपदकाची गवसणी घालणारी भालाफेक, प्रजनानंदची विजेतेपदकाची धडक, प्रोनोय, किदाम्बी श्रीकांत यांची विजेतेपदे, कुस्तीमध्ये नव्या महिला खेळाडूंची मांदियाळी, तिरंदाजीत अदिती स्वामी आणि ओजस अशी अनेक नावे गेल्या तीन महिन्यांत झळाळत आहेत. त्यामुळेच सत्ताधारी पक्षाने २०१४ मध्ये दिलेली घोषणा आता अर्थव्यस्थेकडून क्रीडाक्षेत्राकडेही पोहोचली आहे असे वातावरण देशात निर्माण झाले आहे.  

अच्छे दिन

हे अच्छे दिन येण्याची अनेक कारणे आहेत. त्याला केवळ २०१४ हे वर्ष व त्या वर्षातील राजकीय पटलावरील बदल कारणीभूत नाहीत हे स्पष्ट केले पाहिजे. गेल्या २० वर्षांत क्रिकेटशिवाय खेळण्यासारखे अनेक खेळ आहेत, त्याच्या स्पर्धा होतात, त्यामध्ये आपण भाग घेतला पाहिजे, पदके मिळवली पाहिजेत व आंतरराष्ट्रीय स्तरावर इतरांना स्पर्धा दिली पाहिजे याचे सर्वसाधारण भान अनेकांना झाले आहे ही एक बदलला कारणीभूत ठरलेली व त्यामुळे समाधानाची गोष्ट आहे. भारतभर मुंबई, दिल्ली, कोलकाता, बंगळुरू सोडून इतर अनेक मोठ्या व मध्यम आकाराच्या गावांमध्ये खेळांविषयी चांगल्या सुविधा निर्माण होताना दिसत आहेत. तेथे तज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध होऊ लागले आहे. खेळाबरोबर शरीरशास्त्र, खेळात होणाऱ्या दुखापतींवरचे उपायतज्ज्ञ, क्रीडा मानसतज्ञ, आहार व खेळाडूंच्या प्रवास इत्यादीचे नियोजन करणाऱ्या छोट्या मोठ्या व्यावसायिक संस्था यांचाही अनेक शहरांत उदय होतो आहे.  वेगळ्या भाषेत खेळांना व खेळाडूंना पोषक असे समग्र पर्यावरण सर्वत्र तयार होण्याचे सुखद चित्र दिसू लागले आहे.  

What caused the fall in industrial production index in the country
देशात औद्योगिक उत्पादन निर्देशांकातील घसरण कशामुळे? ही मंदीची चाहूल मानावी का?
22nd October Rashi Bhavishya In Marathi
२२ ऑक्टोबर पंचांग: जन्मराशीनुसार आज कर्तुत्वाला मिळेल चांगला…
Loksatta kutuhal Artificial Intelligence and Research Institute
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्ता व संशोधन संस्था
investment in banking sector
बँकिंग समभागांतील तेजीने निर्देशांकांना बळ
actress priya bapat interview loksatta
Raat Jawaan Hai Promotion: भिन्न प्रकृतीची चारही माध्यमे वैशिष्ट्यपूर्ण; अभिनेत्री प्रिया बापटचे मत
freedom party Austria
ऑस्ट्रियामध्ये राजकीय भूकंप… ‘नाझी’वादाची पार्श्वभूमी असलेला अतिउजवा पक्ष सत्तेच्या वाटेवर… युरोपचा राजकीय रंगमंच बदलणार?
accuracy of facial recognition technology
कुतूहल : चेहऱ्यावरून ओळख पटवताना सावधान!
2nd October Gandhi Jayanti Physical Mental Violence Religion
बदलतं जग आणि महात्मा

हेही वाचा – मुंबई उद्ध्वस्त कोण करतंय?

एक खेळाडू तयार होण्यामागे व सुवर्णपदकापर्यंत पोहोचण्यामागे केवळ त्याचा मार्गदर्शक पुरा पडत नसतो तर त्याचे पूर्ण कुटुंब, त्या कुटुंबाच्या बरोबरीने क्रीडा मानसशास्त्रज्ञ, आहारतज्ञ व्यायामतज्ञ, त्याला सराव करण्यासाठी असणारे अनेक जोडीदार, त्याच्या प्रवासाची व राहण्याची – जेवणाची व्यवस्था करणारे व्यवस्थापक, या सगळ्यांचा आर्थिक भार पेलणारे छोटे मोठे प्रायोजक, असा संच काम करत असतो. त्या सगळ्यांचे श्रम एकवटले तर यशाची शक्यता वाढते. अशा अनेक संचाची संख्याही आता वाढताना दिसू लागली आहे. अशा खेळांची गुणवत्ता केंद्रेही भारतभर दिसू लागली आहेत. याची सुरुवात क्रिकेटमधून झाली. सुरुवातीला रांचीतल्या धोनीने मुंबई-दिल्ली पलीकडे क्रिकेट नेले आणि मग बडोदा, महाराष्ट्रातील छोटी गावे आणि मग उत्तर प्रदेशमधील अनेक शहरे यामधून मुंबई दिल्लीला शह देणारे किंबहुना त्याहून सवाई क्रिकेटपटू तयार होताना आपण बघतो आहोत.

हरियाणामध्ये कुस्ती, आसाम-मणिपूरमध्ये हॉकीच्या बरोबरीने बॉक्सिंग, कर्नाळा पनवेल-कोल्हापूर या ठिकाणी रायफल शूटिंग, रांचीबाहेर अनेक ठिकाणी तिरंदाजी, पंजाबच्या बरोबरीने ओदिशा व अन्य राज्यांमध्ये हॉकी, गोवा-बंगालबाहेर फुटबॉल असे चित्र दिसू लागले आहे. मोठ्या संख्येने विविध आर्थिक स्तरातील पुरुष व महिला खेळाडू या गावांत खेळात सहभागी होताना दिसतात. क्रीडासंस्कृतीचे एकप्रकारे हे लोकशाहीकरण आहे व त्यामुळेच स्वागतार्ह आहे. १५-२० वर्षांपूर्वी पुण्यात टेनिस हा खेळ फक्त डेक्कन जिमखाना संस्कृतीत ज्याचा समावेश आहे त्यासाठी होता. तेथे प्रवेश अर्थातच मर्यादित होता. बॅडमिंटनचेही तसेच होते. आज पुण्यात सर्व भागांत टेनिस व बॅडमिंटन कोर्ट्स उपलब्ध आहेत. अशी अनेक उदाहरणे इतर ठिकाणही दिसतील.

प्रायोजक व आर्थिक पाठबळ

‘अच्छे दिन’ येण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे खेळांमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झालेल्या प्रायोजकांचे व उद्योगपतींचे आर्थिक योगदान. हे एक प्रकारे व्यावसायिकरण झाले असले तरी आयपीएलसारख्या अन्य खेळांमध्ये ज्या खेळाडूने एक दोन हजाराच्या वर बक्षीसाच्या रकमा कधी पाहिल्या नव्हत्या त्यांना कधी नव्हे ते भरभक्कम रकमा दृष्टिपथात आल्या आहेत. त्यामुळेही आर्थिक ओढाताण व उपासमार करूनच खेळांमध्ये पुढे जाता येते, हे चित्र हळूहळू बदलते आहे. प्रीमियर लीगमुळे कबड्डी, फुटबॉल, हॉकी अशा अनेक खेळांमध्ये मोठ्या प्रमाणात खेळाडू सहभागी होत आहेत, त्यांना प्रायोजक मिळत आहेत. खेळाडूंच्या सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये खर्च भागवणारे प्रायोजक मिळवणे हे प्रचंड कष्टाचे काम होते. कुठे परदेशी जायचे म्हणले की मोठा खर्च, परदेशी प्रशिक्षकाला बोलवायचे म्हणले तरी ती रक्कम कुठं उभी करायची हा दुसरा प्रश्न, चांगले साहित्य वापरून प्रशिक्षण घ्यावे तर तेही खर्चिक असे अवघड प्रश्न त्या खेळाडू व त्याच्या कुटुंबीयांसमोर असायचे. त्यातूनच एक दुष्टचक्र तयार व्हायचे. अनुभव नाही, प्रशिक्षण नाही, चांगल्या संधी नाहीत, त्यामुळे खेळांचा दर्जा वाढत नाही, त्यामुळे पदके मिळत नाहीत, त्यामुळे प्रायोजक मिळत नाहीत त्यामुळे नवीन प्रशिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होत नाही, हे दुष्टचक्र कुठेतरी तुटण्याची आवश्यकता होती. सुदैवाने नव्या प्रकारच्या संस्था विविध खेळांना पाठबळ देण्यासाठी गेल्या १५ वर्षांत उभ्या राहिल्या दिसतात. त्यामुळे चमकणाऱ्या खेळाडूंना त्यांची पुढची पाच-सात वर्षे अगदी क्रीडा सामान विकत घेण्यापासून ते परदेशी स्पर्धांमध्ये सहभाग घेण्यापर्यंत सढळ हाताने मदतीचा ओघ मिळण्याची काहीतरी शक्यता निर्माण झाली आहे. मोठे प्रायोजक भारतीय खेळाडूंच्या मागे उभे राहिल्यामुळे महागडे खेळ काही प्रकारे आता मध्यमवर्गीय व गरीब पण होतकरू खेळाडूंच्या आवाक्यात आले आहेत. जागतिक पातळीवर स्पर्धा करायची असेल तर उत्कृष्ट क्रीडा साहित्य असावेच लागते. त्यामुळे तिरंदाजीत दोन ते तीन लाखांचे धनुष्य हे अत्यावश्यक मानले आहे. अभिनव बिंद्रासारखे यश मिळवायचे असेल तर दररोज हजार दीड हजार काडतुसे वाया घालवण्याचा म्हणजे तेवढ्या गोळ्या मारण्याचा सराव करायला पर्याय नाही.  एकट्या दुकट्या स्पर्धकाला व त्याच्या कुटुंबियांना १५-२० वर्षांपूर्वी हे अशक्यप्राय होते. आता हे थोडेसे निदान आटोक्यात तरी आल्यासारखे वाटते

गेल्या काही वर्षांतील तंत्रज्ञानाचा वाढता वापर हा खेळाडूंच्या कामगिरीमध्ये सकारात्मक परिणाम करणारा दिसतो. आज कोणत्याही मोठ्या स्पर्धेच्या वेळी स्पर्धा पाहणाऱ्या मार्गदर्शकाच्या हातात कागद लेखणीऐवजी आयपॅड किंवा छोटा संगणक असतो. त्यावर त्या खेळाडूच्या प्रत्येक हालचाली तो टिपून ठेवत असतो. हे व्यक्तिगत तसेच सांघिक खेळामध्ये दिसते. सामन्यानंतर झालेल्या फिल्म्स अनेकवेळा बघणे, प्रतिस्पर्ध्याच्या कामगिरीच्या चित्रणांच्या फिल्म स्पर्धेपूर्वी बघणे आणि त्यातल्या बारकाव्यानुसार आपले स्वतःचे खेळातील कौशल्य प्रसंगानुरूप बदलणे हेही आता जिंकण्याच्या स्पर्धेतील अविभाज्य भाग आहे. माझ्या माहितीत पुण्यातीलच एक तरुण उद्योजक अशा प्रकारे जागतिक स्तरावर खेळणाऱ्या टेनिस स्पर्धकांचे बारकाईने विश्लेषण करून देतो. त्याच्या विश्लेषणाचा प्रचंड उपयोग झाल्याचा दाखला काही टेनिसपटू व त्यांचे प्रशिक्षक देतात. त्यामुळेच खूप वर्षांपूर्वी उजव्या यष्टीबाहेर जाणाऱ्या वेगवान चेंडूला बॅट लावून पहिल्या किंवा दुसऱ्या स्लीपमध्ये आयन बॉथंमचे गिऱ्हाईक होण्याचा काळ आता वेगाने मागे पडत आहे. आता नव्या काळात फ्रेम बाय फ्रेम, प्रत्येक चौकटीत, फलंदाज व गोलंदाज आपल्या कृतीची चिरफाड करू शकतात अर्थात हे क्रिकेटचे बद्दल झाले. फुटबॉल हॉकी यासारख्या सांघिक खेळात व पोहणे अ‍ॅथलेटिक्ससारख्या व्यक्तिगत खेळात अशाप्रकारे तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर  होतो आहे. आपल्याकडे त्याची सुरुवात झाली आहे.

देशी व परदेशी मार्गदर्शकांचे पर्याय

उत्तम तंत्रज्ञान, प्रायोजकांची संख्या व त्या बरोबरीने या क्षेत्रात नव्याने उतरणाऱ्या ज्येष्ठ खेळाडू प्रशिक्षकांची उपस्थिती हे बदलाचे नवीन वारे येण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण आहे. अंजली भागवत, सुमा शिरूर, रणजित चाटले, गोपिनाथ, प्रकाश पदुकोण यांच्यापासून तिरंदाजी, मुष्टीयुद्ध यामध्येही पदके मिळवलेले किंवा पदकांपासून जेमतेम लांब राहिलेले अनेक ज्येष्ठ खेळाडू आता प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहेत. त्याला परदेशी प्रशिक्षकांच्याही कौशल्याची जोड मिळते आहे. त्यामुळे एकेकाळी खेळ प्राधिकरण (स्पोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया) यांची मक्तेदारी आता सुदैवाने या क्षेत्रात नाही. अनेक उत्तम प्रशिक्षक त्यांचे नवे नवे चेले तयार करतात आहेत, हे अतिशय आश्वासक चित्र आहे. एक प्रकारे हे संगीत क्षेत्रात जसे आहे की एका घराण्यात पुढच्या पुढच्या पिढीतील गायक तयार होण्याची प्रक्रिया सुरुवातीस तंबोऱ्याचे साथ करण्यापासून होते तसेच काहीसे या श्रेष्ठ खेळाडूंच्या हाताखाली नवीन नवीन खेळाडू हे तयार होत आहेत.

खेळानंतर काय?

खेळाला अच्छे दिन येण्याचे आणखी एक कारण म्हणजे खेळाडूंना विविध क्षेत्रांतील त्यांचा खेळ संपल्यानंतर, म्हणजे स्पर्धात्मक खेळात त्यांचे भाग घेणे थांबल्यानंतर, नोकरी व्यवसायाचे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. सुमारे ३० वर्षांपूर्वी भारतीय रेल्वे व सैन्य दल व काही सरकारी बँका अशी दोन-तीनच पर्यायांची सोय खेळाडूंना उपलब्ध होती. २५-३० व्या वर्षी खेळातून निवृत्त झाल्यानंतर पुढची ३० वर्षे काय करायचे असा प्रश्न अनेकांना होता. आता नव्या काही शक्यता दिसतात. वर्षभर देशात व परदेशात अनेक स्पर्धा होत असल्यामुळे त्या स्पर्धेचे प्रक्षेपण होत असताना निवेदन वा समालोचन हे एक मोठे क्षेत्र उपलब्ध झाले आहे. प्रशिक्षणाचे क्षेत्र पूर्वीपासूनच उपलब्ध होते. अनेक ज्येष्ठ खेळाडूंनी स्वतःच्या नावाने क्रीडा शिक्षण देणाऱ्या संस्था काढले आहेत. पी. टी. उषा हे त्यातल्या आघाडीचे नाव. खेळाडूंनी खेळ व्यवस्थापन या क्षेत्रातही चांगल्या अर्थाने जम बसवला आहे, त्याचबरोबर खेळाडू म्हणून जाहिरात व प्रसिद्धी या क्षेत्रातही ब्रँड अँबेसिडर म्हणून काम करू शकतात हे सिद्ध झाले आहे. त्यामुळेच खेळ संपल्यानंतर दुरावस्था येईल ही परिस्थिती संपून खेळाडू सन्मानाने जगू शकतील ही परिस्थिती हळूहळू तयार होत आहे.  

हेही वाचा – नवीन ‘विटां’चा भार ‘ब्रिक्स’ला सोसवेल?

अच्छे दिन येत असतानाच सर्व काही उत्तम आहे असे नाही. अजून पदकांच्या संख्येमध्ये आपण खूप मागे आहोत. छोट्या व मोठ्या गावांमध्ये सार्वजनिक खेळण्याच्या जागा आक्रसत आहेत. सरावासाठी अनेक खेळाडू जुन्या साहित्यावरच अवलंबून राहत आहेत. अ‍ॅस्ट्रोटर्फ ही अजूनही चैनच आहे. महिला खेळाडूंना मिळणारे मानधन हे पुरुष खेळाडूंच्या मानाने निम्मे किंवा त्याहून कमीच आहे. अजूनही महिलांना सर्व खेळ मोकळेपणे खेळता येतील, प्रवासाला बिनधोक जाता येईल व त्यांच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष देण्याचे काम करणारे त्यांचे मार्गदर्शक त्यांचे लैंगिक शोषण करणार नाहीत अशी खात्रीलायक सुस्थिती आपल्याकडे आलेली नाही.

अनेक शाळांमध्ये क्रीडा शिक्षक नेमलेले नाहीत. त्यामुळे खेळ हा ऑप्शनला टाकण्याचा विषय अजूनही आहे. त्यामुळे एकीकडे नीरज चोप्रा, सिंधू, राजवर्धन राठोड व अभिनव बिंद्रा अशी नावे ठळकपणे पुढे येत असताना त्यांच्यासारखेच होण्याची आकांक्षा असलेले अनेक होतकरू खेळाडू आणखी चांगले दिवस येण्याची वाट पाहत आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळणाऱ्या यशामुळे देशभरामध्ये ‘आपण कमी नाही’ व ‘आपण जिंकू शकतो’ ही उर्मी वाढली तर आणखी अच्छे दिन क्रीडा क्षेत्राला येतील. नीरज चोप्राच्या सुवर्ण पदकाच्या निमित्ताने असे दिवस लवकर येवोत!

Kanitkar.ajit@gmail.com