महाराष्ट्रात राज्य विधानसभेच्या निवडणुका ऐन भरात आलेल्या असताना महायुतीचा घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले) अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामा सत्र सुरू केले आहे. महायुतीकडून रिपब्लिकन पक्षाला विधानसभेत एकही जागा सोडली नसल्यामुळे राज्यभरातील रिपब्लिकन कार्यकर्ते प्रचंड नाराज आणि संतप्त झालेले आहेत. त्यामुळे आपण या निवडणुकीत महायुतीचा- भाजपचा प्रचार करणार नसल्याचे जाहीर करून बहुसंख्य मोठ्या पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे पक्षाध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याकडे धाडले आहेत. कार्यकर्त्यांमध्ये खदखद, नाराजी, असंतोष व्यक्त होत असून कोणत्याही प्रकारचे सहकार्य महायुतीला करणार नसल्याचे जाहीरपणे म्हटले जात आहे. रिपब्लिकन पक्षाचे नेते, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मात्र महायुतीत होत असलेला अवमान पचवून महायुतीचा प्रचार करण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. त्यामुळे एका बाजूला स्वाभिमानी रिपब्लिकन कार्यकर्त्यांचा भाजपा विरोधात एल्गार पुकारलेला असताना रिपब्लिकन नेतृत्व मात्र गपगार झाल्याचे दिसून येत आहे!

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले ) हा पक्ष गेल्या दहा वर्षापासून भाजपचा मित्र पक्ष असून तो राज्य आणि केंद्रातल्या सत्तेतील सहभागी पक्ष आहे. भाजपचा मित्र पक्ष असलेला आरपीआय नावापुरता सत्ताधारी पक्ष राहिला आहे. या पक्षाला केंद्रातील राज्यमंत्री पदाव्यतिरिक्त कोणत्याच प्रकारची सत्ता अथवा सत्ता पदे देण्यात आलेली नाहीत. केवळ आश्वासनांच्या झुल्यावर कार्यकर्त्यांना झुलवत ठेवण्यात आलेले आहे. त्यामुळे रिपब्लिकन कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड खदखद व्यक्त केली जात आहे. विधानसभेच्या जागा वाटपातही अशाच प्रकारे शेवटपर्यंत झुलवत ठेवून पक्षाला एकही जागा सोडण्यात आलेली नाही. त्यामुळे कार्यकर्ते अस्वस्थ आणि संताप झालेले आहेत. भाजपाने रिपब्लिकन पक्षाला एक जागा सोडल्याचे म्हटले खरे; परंतु त्याही जागी (कलीना मुंबई ) भाजपचे – संघाचे कार्यकर्ते कमळ चिन्हावरच निवडणूक लढवीत आहेत. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाशी त्यांचा काही एक संबंध नाही.

maharashtra assembly polls 2024 state economy in decline during bjp rule says chidambaram
भाजपच्या सत्ताकाळात महाराष्ट्राची पीछेहाट; माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची टीका
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
those claiming hindus in danger denying reservation to marathas says manoj jarange patil
‘हिंदू खतरे में’ म्हणणाऱ्यांचे मराठ्यांकडे दुर्लक्ष; मनोज जरांगे यांची महायुतीवर टीका
Arjuni Morgaon Constituency , Ajit Pawar, Manohar Chandrikapure,
विदर्भात अजित पवारांची भाजपकडून कोंडी
conflicting politics, maha vikas aghadi, mahayuti, amravati district
अमरावती : विरोधाभासी राजकारणामुळे मतदारही संभ्रमित !
dcm devendra fadnavis praise obc community
भाजपच ओबीसींच्या पाठीशी!, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा
maharashtra assembly election 2024 rohit pawar s reply to mahesh landge in bhosari assembly constituency
पिंपरी : धमक्या देऊ नका, आम्ही राजकारणात गोट्या खेळण्यास आलो नाहीत; रोहित पवार यांचे महेश लांडगे यांना प्रत्युत्तर
ajit pawar sharad pawar sadabhau khot
“त्या विधानानंतर मी सदाभाऊ खोतांना फोन केला आणि…”, अजित पवारांनी केली कानउघाडणी; म्हणाले…

आणखी वाचा-आपण कधी जागे होणार? स्पेनचा विध्वंसक पूर

या पार्श्वभूमीवर राज्यभरातील वेगवेगळ्या प्रदेशातील रिपब्लिकन कार्यकर्ते संघटितपणे या गोष्टीचा तीव्रपणे विरोध करीत आहेत. काही कार्यकर्त्यांनी याबाबत मुंबईत निदर्शने देखील केलेली आहेत. तीन महिन्यापूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला किमान दोन जागा सोडाव्यात, अशी अपेक्षा पक्षाच्या वतीने व्यक्त करण्यात आली होती. त्यापैकी एका जागेवर स्वतः रामदास आठवले निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. (शिर्डी किंवा सोलापूर या जागेतून ) मात्र ती एकही जागा शेवटपर्यंत सोडली नाही. त्या वेळी विधानसभेला आपल्या पक्षाला उमेदवारी दिली जाईल, जागा दिली जाईल असे सांगण्यात आल्याचे समजते. मात्र आता विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपात रिपब्लिकन पक्षाला कोणतेही स्थान देण्यात आलेले नाही.

जागा वाटपाच्या ज्या बैठका झाल्या तेव्हाही रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले अथवा त्यांच्या प्रतिनिधीला बोलावण्यात आले नाही. त्यामुळे पक्षाच्यावतीने सुरुवातीला २१ जागांची यादी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे देण्यात आली होती, असे खुद्द रामदास आठवले यांनी माध्यमातून जाहीर केले. मात्र त्या यादीला त्यांनी केराची टोपली दाखवल्याचे आता उघड झाले आहे. नंतरही कोणत्याच हालचाली होत नसल्यामुळे रामदास आठवलेंनी देवेंद्र फडणवीस यांच्या गाठीभेटी घेतल्या. मात्र त्यांनी देखील त्यांची आश्वासनांवरच बोळवण केली. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तथा उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी मात्र रामदास आठवले यांना कोणताच प्रतिसाद दिला नसल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांकडून समजते. भेटही दिली नाही. एवढा अपमान सहन करूनही रामदास आठवले व त्यांचा पक्ष अद्यापही महायुती सोबत राहिला आहे. वर्तमान स्थितीत रामदास आठवलेही महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करीत आहेत . मात्र ज्या पक्ष कार्यकर्त्यांच्या बळावर रामदास आठवले पक्षाचे अध्यक्ष आहेत, अथवा त्यांना मंत्रिपद आहे, त्या कार्यकर्त्यांनी मात्र या सर्व निवडणूक प्रचारापासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे.

आणखी वाचा-कला अकादमी आणि नूतनीकरणाची मोगलाई

भाजपसोबत जाऊन गेल्या दहा वर्षात पक्षाध्यक्ष रामदास आठवले यांना केंद्रीय राज्यमंत्रीपद देण्याखेरीज रिपब्लिकन पक्षाला कोणत्याही प्रकारचा सत्तेचा वाटा अद्यापही मिळालेला नाही. तालुकास्तरापासून ते अगदी संसदीय राजकारणापर्यंत असणाऱ्या विविध सत्ता लाभामध्ये कोणत्याही प्रकारचा लाभ पक्षाच्या कार्यकर्त्यांना मिळालेला नाही. विधान परिषदेचे सदस्यत्व, जिल्हा नियोजन समित्यांमध्ये सदस्यत्व, विविध शासकीय समित्यांमध्ये सदस्यत्व, महामंडळाचे अध्यक्ष पद , सदस्य, विशेष कार्यकारी अधिकारी, महानगरपालिका नगरपालिका मध्ये उमेदवारी काहीच मिळालेले नाही. यावेळी विधानसभेत एकही जागा न सोडल्यामुळे या खदखदीला पुण्यातून वाचा फोडली गेली. पुणे महानगरपालिकेचे माजी उपमहापौर डॉक्टर सिद्धार्थ धेंडे यांनी आपल्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला, मग पिंपरी चिंचवड येथील अनुभवी नगरसेविका व पक्षाच्या पदाधिकारी चंद्रकांता सोनकांबळे यांनी देखील याच नाराजीतून पक्षाचा राजीनामा दिला. पिंपरी चिंचवड या राखीव मतदार संघातून त्यांनी उमेदवारी मागितली होती. मागच्या वेळी थोड्या मतांसाठी विजय हुकला होता. ती मिळू शकलेली नाही.

तिकडे बीड मधील केज मतदार संघातून पप्पू कागदे, यवतमाळ उमरेड मतदार संघातून महेंद्र मानकर यांना उमेदवारी हवी होती तीही मिळू शकलेली नाही. त्याचप्रमाणे पक्षाचे राष्ट्रीय संघटन सचिव माजी प्रदेशाध्यक्ष, ज्येष्ठ पँथर नेते भूपेश थुलकर यांनी देखील याच मुद्द्यावर पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्यासमवेत विदर्भातील कार्यकर्त्यांनी राजीनामेची भूमिका घेऊन निवडणूक प्रचारात असहकार पुकारला असून, आपण महायुतीचा प्रचार करणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्याऐवजी आंबेडकरी विचारधारेचा, रिपब्लिकन विचारांचा जो कोणी सक्षम उमेदवार असेल, त्याला सहकार्य करण्याची भूमिका या कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे. राज्याच्या वेगवेगळ्या प्रदेशातील रिपब्लिकन कार्यकर्त्यांची हीच सामूहिक भावना आणि भूमिका बनलेली आहे.

आणखी वाचा-बलाढ्य टेक कंपन्यांसाठी ट्रम्प यांच्या विजयाचा अर्थ काय ?

भाजपा हा पक्ष रिपब्लिकन पक्षाला संपवायला चाललेला आहे. त्याला रिपब्लिकन पक्ष संपवायचा आहे आणि म्हणूनच तो लोकसभा असो अथवा विधानसभा असो, या निवडणुकीत पक्षाला जागा सोडत नाहीत. अथवा सत्तेच्या कोणत्याही पदाचा लाभ दिला जात नाही, असे भूपेश थूलकर व कार्यकर्त्यांचे उघडपणे म्हणणे आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस बरोबरच्या युतीत असताना रिपब्लिकन पक्षाला लोकसभा विधानसभेच्या जागा जागावाटपात मिळत होत्या. विधान परिषदेवर कार्यकर्त्यांना संधी मिळत होती. सत्तापदे थोडी का होईना मिळत होती. मात्र भाजपासोबत गेल्यानंतर कोणत्याच प्रकारची सत्ता पदे अथवा जागा मिळत नसल्याचे अनुभवांती दिसून येत आहे, आत्तासुद्धा दिलेली आश्वासने सत्तेत आल्यानंतर पाळली जाणार नाहीत असे ठामपणे वाटते, असे भूपेश थुलकर यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी स्पष्टपणे म्हटलेले आहे.

त्यामुळे राज्यभरातील रामदास आठवलेंच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी ज्यांनी बंड पुकारले आहे , अशा अनेकांनी आंबेडकरी विचारधारेच्या उमेदवारासोबत जाण्याची स्पष्ट भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे निश्चितच राज्यभरातील आंबेडकरी मतदार हा महायुतीच्या विरोधात जाण्याची भूमिका घेऊ शकतो, असे कार्यकर्त्यांचे तसेच राजकीय जाणकारांचे मत आहे. त्यामुळे पक्षाचे नेते रामदास आठवले आता कोणती भूमिका घेतात : आपला पक्ष सांभाळण्याची ? आपले मंत्रिपद टिकवण्याची ? की सर्व साथ सोडून गेले तरी महायुतीसोबत राहण्याची? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

लेखक सामाजिक, राजकीय चळवळीचे अभ्यासक आहेत.

sandesh.pawar907@gmail.com