राजा कांदळकर
आमदार कपिल पाटील यांनी विखुरलेल्या समाजवाद्यांना एक करण्यासाठी ‘समाजवादी गणराज्य पार्टी’ची स्थापना केली. ३ मार्चला धारावीत शिवसेना पक्ष प्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार्टीचं लॉंचिंग झालं. महात्मा फुले एज्युकेशन ट्रस्टच्या मैदानावर मेळावा झाला. यावेळी जवळपास १० हजार समाजवादी जनता परिवारातील कार्यकर्ते, जनसंघटनांचे प्रतिनिधी राज्यभरातून आले होते. समाजवाद्यांची मातृसंस्था असणाऱ्या राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन वैद्य यांनी या पार्टीच्या नावाची उद्घोषणा केली. एरव्ही कुणाच्याही राजकीय मंचावर न जाणारे ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी या नव्या पार्टीला शुभेच्छा दिल्या. जागतिक कीर्तीचे अर्थशास्त्रज्ञ डॉ. नीरज हातेकर यांनी पार्टीत सहभागी होत असल्याचं जाहीर केलं. माजी मंत्री वर्षा गायकवाड, बिहारचे युवा नेते प्रतीक पटेल हे मान्यवर मंचावर होते. अजित शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.
जॉर्ज यांचे कार्यकर्तेही सोबत
या मंचावर समाजवादी नेते जॉर्ज फर्नांडिस यांच्यासोबत काम केलेले नेते, कार्यकर्ते कपिल पाटील यांच्यासोबत बसलेले होते. समाजवादी नेते सच्चिदानंद शेट्टी, मुंबईतल्या म्युनसिपल आणि बेस्ट कामगारांचे नेते रमाकांत बने, रंगा सातवसे, नवी मुंबई पनवेल परिसरातले कामगार नेते प्रफुल्ल म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. राज्यातील बहुतांश कामगार, कष्टकरी संघटनांवर आजही समाजवादी विचारांचा पगडा आहे. त्या संघटनांचे नेते, कार्यकर्ते कपिल पाटील यांच्याची जोडलेले आहेत. जॉर्ज यांनी वाढवलेली हिंद मजदूर किसान पंचायत आणि रेल मजदूर युनियनचे कपिल पाटील विद्यमान राज्य अध्यक्ष आहेत.
हेही वाचा : कोण म्हणतं भारत हुकूमशाहीच्या वाटेवर आहे? यात तथ्य आहे का?
१९ लाख कर्मचाऱ्यांचा कौल –
राज्यातल्या १९ लाख सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांचे नेते विश्वास काटकर पेन्शनची लढाई जिंकून निर्धाराने या मंचावर आले होते. राज्य सरकारी निमसरकारी अधिकारी कर्मचारी संघटनेवर समाजवादी आणि लाल निशाण विचारांचा प्रभाव राहिलेला आहे. या संघटनेचे यापूर्वी शरद पवारांशी जवळचे संबंध असल्याचं म्हटलं जात असे. आता या संघटनेचा कपिल पाटील यांच्याशी जवळचा संवाद आहे. यावरून राज्यातल्या सरकारी अधिकारी कर्मचारी यांचा कौल लक्षात येतो.
जनसंघटनांची सोबत
आदिवासी समाजाचे सर्वमान्य लोहियावादी समाजवादी नेते काळूराम काका धोदडे, शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे, कार्याध्यक्ष सुभाष मोरे, भटक्या विमुक्तांचे नेते डॉ. कैलास गौड, अंजुमन बाशिंदगान ए बिहारचे अध्यक्ष मो. इस्लाम शेख, मो. हकिमी, झोपडपट्टी रहिवाशी यांचे नेते हिरामण पगार, अंगणवाडी ताई, शेतकरी, वंचित, तरुण अशा जनसंघटना यावेळी हजर होते.
हेही वाचा : बेरोजगारी हा निवडणुकीचा मुद्दा होत असेल तर चांगलेच आहे…
जनता परिवाराची साथ –
याआधी कपिल पाटील यांनी समाजवादी जनता परिवाराला एक करण्यासाठी पुण्यात एस. एम. जोशी फाउंडेशन आणि मुंबईत एमआयजी क्लब येथे बैठका घेतल्या होत्या. पुण्यातल्या बैठकीत समाजवादी नेते बाबा आढाव, डॉ. कुमार सप्तर्षी, पन्नालाल सुराणा, डॉ. अभिजीत वैद्य, रेल्वे कामगारांचे नेते असीम रॉय, सुभाष वारे, सुभाष लोमटे, जयदेव डोळे उपस्थिती होती. मुंबईतल्या बैठकीला उद्धव ठाकरे यांनी संबोधित केलं होतं. मुंबईतल्या बैठकीत ज्ञानेश महाराव, सुभाष मळगी, अब्दुल कादर मुकादम, अरुण म्हात्रे सहभागी झाले होते.
महाराष्ट्र हुकूमशाहीच थडगं बांधेल – उद्धव ठाकरे
देशात लोकांचे भले करणारे समाजवादी विरुद्ध लोकांना बरबाद करणारे माजवादी अशी लढाई सुरू आहे. आपण समाजवादाच्या बाजूने लढणार आहोत. हुकूमशाही गाडण्याची जबाबदारी छत्रपती शिवरायांनी आपल्यावर सोपवलेली आहे. महाराष्ट्र हुकूमशाहीचे थडगे बांधेल. ही लढाई आपण एकजुटीने लढूया. शेतकरी, कामकरी, वंचित, तरुण या सर्वांनी एकत्र येऊन आपण विजयी होऊ, असा विश्वास शिवसेना पक्ष प्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धारावीमध्ये व्यक्त केला.
ते पलटले, आम्ही महाविकास आघाडी आणि इंडिया सोबत – कपिल पाटील
समाजवादी गणराज्य पार्टीचे अध्यक्ष कपिल पाटील भाषणात यावेळी म्हणाले की, ते पलटले, आम्ही महाविकास आघाडी आणि इंडिया सोबत आहोत. महाराष्ट्रातला समाजवादी जनता परिवार नथुरामी फॅसिस्ट शक्तींच्या विरोधात लढण्यास कटिबद्ध आहे. देश, समाजवाद वाचवण्यासाठी लोकशाही समाजवादी विचारांच्या राजकीय पक्षाचे पुनर्गठन करण्याची गरज आहे. त्यासाठीच ‘समाजवादी गणराज्य पार्टी’ची पुनर्स्थापना केली आहे. लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे कटिबद्ध आहेत. त्यांची या प्रसंगी साथ आहे ही उभारी देणारी गोष्ट आहे. शेती, आरोग्य, शिक्षण या क्षेत्रात महाराष्ट्राची पिछेहाट सुरू आहे. मुंबईची लूट सुरू आहे. हे थांबवण्यासाठी समाजवादी गणराज्य पार्टी लढाई लढेल.
हेही वाचा : लेख : तैवानच्या ‘घासा’साठी चीन किती अधीर?
अतुल देशमुख यांनी देशातल्या सामाजिक, राजकीय परिस्थितीवर ठराव मांडला.
तो ठराव खालील प्रमाणे –
देशातील सद्य स्थिती ही अत्यंत वाईट आहे. लोकशाही धोक्यात आहे. सांविधानिक यंत्रणा दबावाखाली आहेत. फॅसिझम वाढत आहे. आंदोलनं दडपली जात आहेत. बेरोजगारीने आपला उच्चांक गाठला आहे. तरुणांच्या हाताला काम नाही. महागाईने कंबरडे मोडले आहे. शेतकरी – शेतमजुरांची अवस्था बिकट आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत. दाद मागायला जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या वाटेत खिळे पेरले जात आहे.
अकलियत डर के माहौल में जी रहे है ।
विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्त्या बंद आहेत. नोकर भरतीच्या खाजगी यंत्रणेमार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये घोटाळे होत आहेत. सरकारी नोकऱ्यांमध्ये कपात आणि कंत्राटीकरणात वाढ केली जात आहे. आर्थिक विषमता वेगाने वाढत आहे. भटक्या विमुक्तांचे दैन्य संपलेले नाही. जातीजातींमध्ये भांडणे लावली जात आहेत. धार्मिक भेदभाव वाढवले जात आहेत. अशा परिस्थितीमध्ये लोकशाही समाजवादी परिवारातील आम्ही सर्वजण एकत्र येऊन विकल्प उभा करण्याचा संकल्प करत आहोत. भारतीय संविधानावर आलेले संकट यशस्वीपणे परतवून लावण्याचा निर्धार आमदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली या सभेच्या माध्यमातून आम्ही करत आहोत.
हेही वाचा : महाराष्ट्रात भाजप आहे कुठे ?
त्यासोबतच महाराष्ट्रात परिवर्तन घडवायचे असेल तर सर्व वंचित बहुजन, शेतकरी, कामगार आणि अन्य कष्टकरी घटकांना सोबत घेऊन मजबूत आघाडी उभी केली पाहिजे. लोकशाहीवर आलेला हुकूमशाहीचा वरवंटा रोखण्यासाठी देशातील इंडिया आघाडीला आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीला समर्थन देण्याचे आवाहन ही सभा करत आहे. या ठरावाला सर्वांनी एकमुखाने अनुमोदन दिलं.
समाजवादी गणराज्य पार्टीला स्कोप काय ?
‘समाजवादी ऐक्याचा धम्मघोष, समाजवादी गणराज्याचा संकल्प,’ असा नारा कपिल पाटील यांनी दिला. उद्धव ठाकरे यांचे भाषणही जोरदार झाले. आपण सोबत लढूया अशी साद उपस्थितांना त्यांनी घातली तेव्हा टाळ्यांचा कडकडाट झाला. लढेंगे, जितेंगेच्या घोषणा घुमल्या.
कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली ‘समाजवादी गणराज्य पार्टी’ ची घोषणा झाल्यानंतर या पार्टीला स्कोप काय, अशी चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्रात इतके पक्ष असताना या पक्षाचे काय होणार?
हेही वाचा : निवडणूक आयुक्त निवडीच्या वेळी कायद्याचीच कसोटी लागेल…
राज्यात समाजवादी विचारांची सहा टक्के मते असल्याचे पुण्यातील एका मोठ्या वृत्तपत्र समूहाच्या सर्वेतून आढळून आले होते. कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, मराठवाड्यातील काही भाग, कोकण, मुंबई, विदर्भातील काही जिल्हे, पालघर, ठाणे परिसरात समाजवादी विचारांचे मतदारांचे पॉकेट्स आजही आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या या पक्षाच्या स्थापनेचं महत्त्व आहे. इंडिया आणि महाविकास आघाडीला म्हणूनच या पक्षाची किती मदत होते हे येत्या काळात पाहायला मिळेल.
rajak2008@gmail.com